उगवतीचे रंग
आनंद आणि उत्साहमूर्ती : श्री गुरुमूर्ती सर
आपल्या जीवनात आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात की एकदा भेटल्यानंतर त्या आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन राहतात. आम्हाला अशीच भेटलेली एक व्यक्ती म्हणजे कर्नाटकातील होस्पेट येथील श्री ए एम गुरुमूर्ती सर. खरे तर सी ए असलेली माझी मुलगी सारिका आणि जावई श्री सतीशराव यांच्या ते परिचयाचे. त्यांच्या माध्यमातूनच आमची आणि त्यांची भेट, ओळख झाली. त्यानंतर गुरुमूर्ती सर म्हणजे आमच्या कुटुंबाचा एक भाग होऊन गेले. त्यांच्या आणि आमच्या परिचयाला आठ दहा वर्षे तरी झाली असतील. आमच्या कुटुंबात कोणताही अगदी छोटासा घरगुती कार्यक्रम असला तरी आम्हाला गुरुमूर्ती सरांची आठवण हटकून येते. आम्ही त्यांना हक्काने आणि प्रेमाने बोलावतो आणि तेही अगत्याने आमच्या कार्यक्रमाला येतात. ते चाळीसगाव सारख्या माझ्या गावी छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन तीन वेळा येऊन गेले. पुण्यातही आमच्याकडे अनेकदा ते येऊन गेले. माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी एकदा ते चाळीसगावात आणि एप्रिल २०२२ मध्ये पुण्यात उपस्थित होते.
गावातल्या गावातही एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा बऱ्याच वेळा आपल्याला कंटाळा येतो. कधी कधी आपण फक्त जवळचे आणि आवश्यक संबंध आहेत अशाच ठिकाणी जातो. पण गुरुमूर्ती सरांचे मला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे. कर्नाटकातील होस्पेट या गावाहून ते वेळ काढून आपल्याकडे येतात. त्यांना ज्या प्रकारे शक्य होईल तसे ते येतात. बस, रेल्वे किंवा विमानप्रवासही करतात. काहीच शक्य नसेल तर ड्रायव्हरला घेऊन स्वतःच्या गाडीने येतात. खरं म्हणजे अशा वेळी त्यांच्या जागी दुसरी कोणीही व्यक्ती असती, तर रिझर्वेशन मिळत नाही. गाडीने येणे शक्य नाही कारण लांबचा प्रवास आहे असे सहज सांगू शकली असती. पण ज्याला मनापासून येण्याची इच्छा असते, तो अशा लंगड्या सबबी कधीच पुढे करीत नाही. त्यातीलच एक म्हणजे गुरुमूर्ती. सर येताना कधीही रिक्त हस्ते येत नाहीत. ज्यांच्याकडे जायचे त्यांच्यासाठी काहीतरी खास असे ते घेऊन येतात. चेहऱ्यावर कायम मंद स्मित विराजमान असते. एवढे करून आपण काही विशेष करतो आहोत अशा प्रकारची कोणतीही भावना त्यांच्या वागण्याबोलण्यात डोकावत नाही. नाहीतर आपण एखाद्याकडे गेलो तर, ' आलो रे बुवा तुझ्याकडे वेळ काढून. ' अशा प्रकारची भावना व्यक्त करून समोरच्याला एक प्रकारे आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली ठेवू पाहतो.
मला कधी कधी वाटायचं की कसं शक्य होतं गुरुमूर्ती सरांना हे येणं ? एवढा प्रवास, पैसे आणि वेळ खर्चून कसे येऊ शकतात हे ? तुमच्या ;मनात आला असेल तोच विचार माझ्याही मनात आला. आपल्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे ' यांना काही फारसे काम नसेल. रिकामा वेळ भरपूर मिळत असेल. खर्च करण्यासाठी पैसा पण मुबलक असेल. ' पण माझ्या या सर्व कल्पना, हे विचार अनुभवांती खोटे ठरले. जसजसे आम्ही एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येत गेलो, तसतसा हा माणूस, त्याच्या मनाचा मोठेपणा, उमदेपणा लक्षात येत गेला आणि मग त्यांच्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला.
आम्ही आमच्या कर्नाटकातील बदामी येथे असलेल्या आमच्या कुलदेवतेचे म्हणजे शाकंभरी देवीचे दर्शन घेण्यासाठी नुकतेच गेलो होतो. गुरुमूर्ती सर आम्हाला अनेक वर्षांपासून बोलवत असल्याने यावेळी आम्ही त्यांच्याकडेही जायचे ठरवले होते. आम्ही बदामी येथे शाकंभरी देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडत नाही तोच गुरुमूर्ती सर आम्हाला होस्पेट येथे नेण्यासाठी त्यांचा मुलगा तेजस यांच्यासह हजर झाले. मी, माझी सौभाग्यवती, माझी मुलगी आणि नातू असे आम्ही चौघे त्यांच्याकडे दोन दिवस राहिलो. सोबत एक दिवस आमचे जावई होते परंतु रजेअभावी त्यांना जास्त थांबता आले नाही.
पाहताक्षणीच आपलेसे वाटावे असे प्रेमळ गुरुमूर्ती सरांचे व्यक्तिमत्व. मध्यम उंची, प्रमाणबद्ध असलेले शरीर, चेहऱ्यावर तेज आणि कायम मंद स्मित. वय साधारणपणे ५५ च्या आसपास असणाऱ्या या माणसाची मातृभाषा जरी कानडी असली तरी तामिळ, तेलगू, मल्याळी, हिंदी, इंग्रजी अशा पाच सहा भाषांवर प्रभुत्व. मराठी जरी सफाईदारपणे बोलता येत नसले तरी बोललेले मराठी सहज समजू शकतात. वाचनाची त्यांना अतिशय आवड आहे. स्वच्छतेची अतिशय आवड असलेले गुरुमूर्ती सर मनाने सुद्धा अंतर्बाह्य निर्मळ आहेत. मुलात मूल होऊन ते खेळतात.
सरांचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरु होतो. प्राणायाम, योगासने आणि ध्यानधारणेने त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. देवपूजा, घराची बागेची स्वच्छता ते स्वतःच करतात. सरांचे घर म्हणजे एक अतिशय प्रशस्त आणि सुदंर बंगला आहे. ' श्रीकृष्ण ' असे नाव दिलेल्या त्यांच्या बंगल्यात एक प्रशस्त हॉल आहे. प्रशस्त स्वयंपाकघर, स्वतंत्र आणि अत्यंत सुंदर अशी देवघराची स्वतंत्र खोली, दोन शयनकक्ष, त्यांच्या एका शयनगृहात नित्य वाचनाची पुस्तके, खाली तळघरात आणखी एक सुंदर खोली जिला ते ध्यानगृह असं म्हणतात. वरच्या मजल्यावर पुन्हा एक विशाल आणि अत्याधुनिक शयनगृह, एक वाचनालय आणि चित्रपट किंवा अन्य कार्यक्रम पाहण्यासाठी प्रोजेक्टरची सोय असलेली वातानुकूलित आणि साउंडप्रूफ अशी खोली, प्रशस्त गच्ची, झोपाळा, गेस्ट रूम आदी सोयी आहेत. घराच्या भोवती सुंदर बाग आहे ज्यामध्ये काही फळझाडे, फुलझाडे आहेत. चार मोटारी उभ्या राहू शकतील एवढे प्रशस्त बंगल्याचे आवार आहे. अशा या आलिशान घरात आमचा दोन दिवस निवास होता आणि सोबत गुरुमूर्ती सरांचा सहवास.
हे सगळं वाचल्यावर असं वाटेल की गुरुमूर्ती सर म्हणजे काय श्रीमंत आणि भाग्यवान व्यक्ती आहेत ! आता ते तसे श्रीमंत आणि भाग्यवान आहेतच यात वाद नाही पण हे सर्व एकाएकी झाले नाही. यामागे त्यांचे अपार कष्ट आणि जिद्द आहे. एका साधारण शेतकरी कुटुंबात गुरुमूर्ती सरांचा जन्म झाला. अरळीकट्टे हे त्यांचं छोटंसं गाव. वडील पूर्वीची चौथी परीक्षा उत्तीर्ण तर आई कधीही शाळेत न गेलेली. सरांना सात भाऊ आणि एक बहीण. आपल्या भावंडात त्यांचा क्रमांक पाचवा होता. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी आईवडिलांना अपार कष्ट करावे लागत. वडील शेती करायचे. सातवीपर्यंत शिक्षण घेता घेता गुरुमूर्ती सरांनी शेतीकामातही आपल्या आईवडिलांना मदत केली. पुढे आठवीच्या शिक्षणाची त्यांच्या गावात सोय नसल्याने जवळच असलेल्या एका गावी शिक्षणासाठी जावे लागे. ही शाळा त्यांच्या घरापासून सहा किमी दूर होती. या शाळेत जाण्यासाठी दररोज त्यांना १२ किमी ची पायपीट करावी लागायची. पण तशाही परिस्थितीत शिक्षणाची जिद्द आणि आवड त्यांनी जपली.
बी कॉम झाल्यानंतर काही काळ दावणगिरी येथे सी ए ऑफिसमध्ये उमेदवारी केल्यांनतर सी ए च्या पुढील शिक्षणासाठी त्यांनी गोवा गाठले. तेथे अत्यंत कष्टात दिवस काढून ते सी ए इंटरमिजिएट झाले. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि काही वैयक्तिक कारणांमुळे इच्छा आणि क्षमता असूनही सी ए फायनलची परीक्षा ते देऊ शकले नाहीत. पुढे दावणगिरीला येऊन करसल्लागार म्हणून कामाला सुरुवात केली. एक छोटेसे कार्यालय भाड्याने घेतले. त्यात एक टेबल आणि एक दोन खुर्च्या त्याही भाड्याने घेतलेल्या अशा स्थितीत त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. नंतर पुढे ते होस्पेटला स्थायिक झाले. येथे त्यांच्या कामाने वेग घेतला.
उत्तम सेवा, सचोटी, मृदू वागणे आणि बोलणे यामुळे लवकरच त्यांना आपल्या व्यवसायात प्रगती करता आली. उत्तम व्यवहारज्ञान असलेल्या गुरुमूर्ती सरांकडे लक्ष्मी सुवर्ण पावलांनी चालत आली. पैसा मिळवत असताना गुरुमूर्ती सरांनी नैतिक मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. ' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास व्यवहारे वेच करी ' या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे त्यांचे आचरण सदैव राहिले. यथावकाश त्यांच्या संसारवेलीवर विकास आणि तेजस अशी दोन फुले उमलली. त्यांच्या पत्नी अतिशय हसतमुख आणि मितभाषी होत्या. कठीण परिस्थितीही या माउलीने त्यांना उत्तम साथ दिली. त्यांच्या तोंडून कधीही तक्रारीचा शब्द निघाला नाही. गुरुमूर्ती सरांचा संसार ऐन भरात असताना अल्प आजाराने ही माउली हे जग सोडून गेली. तिच्या अकाली जाण्याने सरांच्या मनावर मोठाच आघात झाला. ती गेल्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी आईचे सुद्धा प्रेम दिले. पुनर्विवाह करणे सहज शक्य असताना आपल्या मुलांसाठी आणि पत्नीवरील अपार प्रेमामुळे त्यांनी तो केला नाही.
गुरुमूर्ती सरांनी होस्पेट येथे रोटरी क्लब, लायन्स क्लबची विविध पदे भूषवली. होस्पेटला विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून विग्नान इंडिपेन्डन्ट कॉलेज, विकास डिग्री कॉलेज, विकास इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट या संस्थांची स्थापना केली. पुढे या संस्था उर्जितावस्थेला आणल्यानंतर त्यांनी या संस्था इतर संचालकांकडे सोपवून त्यातून निवृत्ती पत्करली. आपल्याकडे शेवटपर्यंत पदे न सोडणाऱ्या व्यक्ती पाहिल्या तर त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा त्याग उठून दिसतो. आज त्यांचा मोठा मुलगा विकास हा इंजिनिअर असून बंगलोरला एका उत्तम कंपनीत नोकरी करीत आहे तर तेजस हा बी कॉम, एम बी ए आणि ऑडिटर होऊन त्यांचा वारसा पुढे चालवतो आहे. तेजसने आम्हाला हंपी येथे फिरवून आणले आणि तेथील विविध ठिकाणांची माहिती दिली. विकास आमच्यासोबत होस्पेटच्या बाजारपेठेत आला. त्याच्या सोबतीत आम्ही थोडीफार खरेदी तिथे केली.
गुरुमूर्ती सरांना मुलगी नाही. पण माझी मुलगी सारिका ही त्यांची मानसकन्या आहे. माझ्या जावयांना तेही आपला जावई मानतात. आता गुरुमूर्ती सरांनी मनाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला आहे. त्यांनी व्यवहारात लक्ष घालणे हळूहळू कमी केले असून मुलांना आवश्यक तेथे मार्गदर्शन आणि मदत ते करतात. विकास आणि तेजस ही दोन्हीही तरुण मुले कमालीची आज्ञाधारक असून कोणत्याही वाईट सवयींपासून चार हात दूर आहेत. उत्तम संस्कार कसे असतात हे विकास आणि तेजस यांच्याकडे पाहिले की कळते. गुरुमूर्ती सर आणि ही दोन्हीही मुले स्वयंपाकात अतिशय तरबेज आहेत.
गुरुमूर्ती सर कुठेही गेले की त्यांच्या लाघवी आणि प्रेमळ स्वभावामुळे सगळ्यांना आपलेसे करून घेतात. जिथे गेले असतील तिथे स्वयंपाकघरात जाऊन यजमानांसाठी ते आनंदाने आणि उत्साहाने विविध प्रकारचे दाक्षिणात्य पदार्थ करून खाऊ घालतात. त्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. त्यावेळी त्यांना कोणाचेही घर अजिबात परके वाटत नाही आणि कोणालाही ते परके वाटत नाहीत. आम्ही त्यांच्याकडे असताना त्यांनी स्वहस्ते बनवलेल्या विविध पदार्थांची मेजवानी आम्हाला मिळाली. त्यांच्याकडे लावलेले दही तर अगदी अप्रतिम असायचे. त्यामुळे इतर पदार्थांसोबतच दही, ताक इ पदार्थांची छान मेजवानी आम्हाला मिळाली. भोजन बनवण्यासोबतच त्यांना अध्यात्माचीही अतिशय आवड आहे. वेद, उपनिषदे, गीता इ ग्रंथ त्यांच्या नियमित वाचनात असतात. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ही त्यांची श्रद्धास्थाने आहेत. असा हा नेहमीच पाय जमिनीवर असलेला महान कर्मयोगी. त्यांचा निरोप घेताना आमचे पाय जड आणि डोळे ओले झाले होते तर त्यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. अशा या ऋणानुबंधाच्या गाठी !
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२८/०६/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा