उगवतीचे रंग
मनोरथा चल त्या नगरीला...!
कर्नाटकमध्ये विजयनगर जिल्ह्यात होस्पेट ( ज्याचे नावही आता विजयनगर करण्यात आले आहे ) नावाचं छोटंसं गाव आहे. या होस्पेट गावाजवळ हंपी नावाचं ठिकाण आहे. माझे एक स्नेही श्री ए एम गुरुमूर्ती हे होस्पेटला राहतात. ते बऱ्याच वर्षांपासून आम्हाला त्यांच्याकडे यावं म्हणून आग्रही होते. अखेर ४ जून २०२२ ला तो योग जुळून आला. कर्नाटकातच बदामी येथे असलेली शाकंभरी देवी ही आमची कुलदेवता असल्याने तिच्या दर्शनासाठी आम्ही बदामीला गेलो. मी, माझी पत्नी सौ श्रद्धा, मुलगी सारिका आणि नातू स्वराज असे आम्ही चौघेजण कारने आधी सोलापूरला आणि मग दुसऱ्या दिवशी बदामीला गेलो. बदामीचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. जवळच पट्टदकल आणि ऐहोळ येथील पुरातन मंदिरे व लेणी आहेत. आम्ही देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडतो न पडतो तोच आम्हाला घ्यायला श्री गुरुमूर्ती सर होस्पेटहून तिथे हजर होते. गुरुमूर्ती सरांबद्दल मी पुढच्या भागात सविस्तर लिहिणार आहे. एक अतिशय लोभस आणि हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे गुरुमूर्ती ! त्यांच्यामुळेच हंपी हे पुन्हा एकदा पाहण्याचा योग जुळून आला.
हंपी ही पूर्वी म्हणजे १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. आज आपण जेव्हा हंपी बघायला जातो तेव्हा आज भग्नावस्थेत दिसणारे हे शहर एके काळी किती वैभवशाली असेल याची कल्पना येते. हंपी हे शहर तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. याच शहराला पूर्वी पंपा किंवा किष्किंधा किंवा भास्करक्षेत्र म्हणून ओळखले जात होते. पंपा हे पूर्वी तुंगभद्रा नदीचे एक नाव होते. त्यावरूनच पुढे हंपी असे झाले असावे. यालाच विजयनगर किंवा विरुपाक्षपुरा असेही म्हटले जाते.
हंपीत प्रवेश केल्यानंतर जागोजागी अजस्त्र शिळा आपल्या दृष्टीस पडतात. अजस्त्र शिळा असलेल्या टेकडया आहेत. हेच अतिभव्य असे पाषाण जागोजागी पण विखुरले आहेत. काही ठिकाणी त्यांच्या नैसर्गिक गुहा, आडोसा तयार झालेला आहे. त्याआधाराने काही लोक राहत आहेत. हंपीत शिरताना मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला दोन विशाल शिळांची कमान झालेली आपल्याला दिसते. यांना जुळ्या बहिणी असे म्हटले जाते. त्या जणू हंपी शहराचे संरक्षण करतात ! देशी परदेशी पर्यटकांची प्रचंड गर्दी हे शहर पाहण्यासाठी नेहमीच असते. युनेस्कोने हंपीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे.
इ.स. १३३६ ते १५६५ या काळातील विजयनगर हे भारतातील अत्यंत वैभवशाली असे साम्राज्य होते. हरिहर आणि बुक्क या पराक्रमी आणि कर्तृत्वान बंधूंनी हे शहर वसवले होते. त्या काळात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि वैभवशाली शहरांपैकी हे एक असावे. कृष्णदेवराय या सम्राटाच्या काळात म्हणजे साधारणपणे इ.स, १५०३ ते १५३० हा कालखंड म्हणजे या नगरीचा सुवर्णकाळ मानला जातो. या भारतातील शहराची ख्याती अगदी इराण इराक पर्यंत पोहोचली होती. विविध देशातून हजारो मैलांचा प्रवास करून व्यापारी आणि पर्यटक या नगरात येत असत.
अब्दुल रझाक या पर्शियन प्रवाशाने हंपीबद्दल लिहिताना म्हटले आहे, ' माझ्या नेत्रांनी हंपी इतके अप्रतिम शहर कुठेही पाहिले नाही किंवा ऐकले नाही. अनेक टेकड्यांवर वसलेल्या या शहराला एकामागोमाग एक अशा वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी आहे. भर बाजारात दिवसाढवळ्या सोने, चांदी, हिरे, मोती, पाचू इ चे ढीग विक्रीसाठी उघड्यावर ठेवले आहेत. परदेशी व्यापाऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी खरेदीसाठी येतात. या राज्याचा विस्तार ओरिसापासून ते केरळपर्यँत होता. राजाजवळ सात ते आठ लाख एवढे प्रचंड खडे सैन्य जय्यत तयार होते. चलनामध्ये सोन्याची नाणी वापरली जात होती. अत्यंत वैभवशाली अशा या राज्याची १५६० नंतर दुर्दशा होत गेली. १५६५ ला या नगरीवर बहामनी राजांनी आक्रमण केले. त्यात तालिकोट ( राक्षसतागडी ) येथे झालेल्या घनघोर युद्धात विजयनगरचा पराभव झाला.
या आक्रमकांनी ही नगरी तर जिंकलीच पण या या सुंदर नगरीची कमालीची दुर्दशा केली. तीन महिने हे शहर लुटले जात होते. आक्रमकांनी या शहरातील सुंदर प्रासाद, देवळे, उत्तम वास्तुशिल्पाचा नमुना असलेली घरे तोडफोड आणि जाळपोळ करून उध्वस्त केली. राजप्रासादांना आगी लावल्या. आज आपण जे हंपी पाहतो ते म्हणजे या सगळ्यांचे उरलेले भग्नावशेष. या आक्रमकांच्या हल्ल्यातून वाचले ते अत्यंत देखणे असे विरुपाक्ष मंदिर. हा एक आश्चर्यकारक योगायोग. हे विरुपाक्ष मंदिर म्हणजे त्या काळातील भाविकांचे आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण होते. वैभवशाली विजयनगर साम्राज्याचा उदय आणि अस्त यांचे हे मंदिर मूक साक्षीदार आहे.
आज इतक्या वर्षांनंतरही आपल्याला हे मंदिर पाहताना ते गतकाळातील वैभवाची साक्ष देते. त्या काळातील स्थापत्य, शिल्पकला, मूर्तिकला किती प्रगत आणि विकसित होती याची जाणीव पाहताना होते. या मंदिराचे पूर्वेकडील गोपुर १०५ फूट उंच म्हणजे जवळपास दहा मजली इमारतीएवढे उंच आहे. त्यावर विविध प्रकारच्या मुर्त्या, नक्षीकाम आणि देखावे कोरलेले आहेत. मंदिराच्या मध्यभागी एक विशाल असे प्रांगण आहे. त्यातही अनेक देखणी गोपुरे आहेत. नक्षीकाम केलेलेआणि अलंकारांनी सुशोभित केलेले शंभर दगडी खांब आहेत. अलंकृत असा भव्य नंदी आहे. त्यावर आरूढ अशी गिरिजाशंकराची मूर्ती आहे. राम, विष्णू आणि भगवान शंकरांच्या अवतारांच्या अनेक कथा कोरीव कामातील शिल्पातून साकार झाल्या आहेत. या परिसरात मंद स्वरात दाक्षिणात्य पद्धतीचे सनई चौघड्याचे छान संगीत ऐकायला येते. पूर्वेकडील गोपुरातून आतमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एका कोपऱ्यात अत्यंत सुशोभित असा एक गजराज आपल्याला दर्शन देतो. अनेक भाविक त्याची पूजा करतात.
विजय चौकात एक भव्य उंच चौथरा आपल्या दृष्टीस पडतो. याला राज्याभिषेक चौथरा असे म्हटले जाते. या राज्याभिषेक चौथऱ्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवर सुंदर दृश्ये कोरलेली आपल्याला दृष्टीस पडतात. त्याला लागूनच दोन मजली भव्य हॉल आहे. राजघराण्यातील स्त्रियांना येथून राज्याभिषेक सोहळा पाहता येत असे. राजघराण्यातील स्त्रियांना राहण्यासाठी एका भव्य प्रसादाची निर्मिती केली गेली होती. त्याला झेनाना तटबंदी असे म्हणतात. या वास्तूच्या सरळ रेषेतील कमानी अत्यंत आकर्षक पद्धतीने बांधलेल्या आहेत. यात आपल्याला हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीच्या वास्तुकलेचा मिलाफ बघायला मिळतो. जवळच कमळाच्या आकाराचा लोटस पॅलेस आजही उत्तम स्थितीत पाहायला मिळतो. राजघराण्यातील स्त्रियांचे अंघोळीचे ठिकाण म्हणजेच हमामखाना ही सुद्धा अशीच भव्य आणि सुंदर वास्तू. हत्तींना ठेवण्यासाठी एका विशाल अशा जागेची निर्मिती करण्यात आली होती. याच परिसरात एक गणपतीचे मंदिर आहे. त्याला सासवकेलू असे म्हणतात. ही मूर्ती मोहरीच्या दाण्यासारख्या दगडापासून बनवलेली आहे तर मुर्तीसमोरचा मूषक वेगळ्या दगडातून घडवलेला आहे. हजारा राम मंदिर हे हिंदू वास्तू पद्धतीने बांधलेले सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी राजे पूजा करीत. या मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारतातील अनेक प्रसंग कोरलेले दिसतात.
विठ्ठल मंदिर हे हंपीतील भव्य आणि देखण्या मंदिरांपैकी एक. यालाच विजय विठ्ठल मंदिर म्हटले जाते. आता या मंदिराची दुरुस्ती सुरु आहे. या मंदिरात जाण्यासाठी आता बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची व्यवस्था केली आहे. हा मंदिर परिसर अत्यंत विशाल आणि भव्य आहे. मंदिराचे कोरीव काम तर पाहतच राहावे असे आहे. महाराष्ट्राबाहेर असलेले हे विठ्ठलाचे मंदिर. इथे हा पंढरीचा ' कानडा राजा ' विराजमान आहे. मंदिराचे खांब तर अतिशय देखणे कोरीव काम केलेले आहेत. या खांबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून संगीत निर्मिती होते. ' सा रे ग म ' चे स्वर या खांबांना छेडले की ऐकू येतात. या रहस्याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी दोन खांबांचे उत्खनन करून पाहिले पण त्यातील रहस्य त्यांना समजू शकले नाही.
या मंदिराचे प्रमुख आकर्षण असलेला एक भव्य दगडी रथ या मंदिराच्या प्रांगणात आहे. सुमारे ३० ते ३५ फूट उंच असलेला हा रथ आपले लक्ष वेधून घेतो. त्यावरील नजर हटत नाही इतके सुंदर कोरीव काम त्यावर केले आहे. रथाची दगडी चाके, त्यावरील अप्रतिम कोरीव नक्षी, रथाचा मध्यभागी असणारा दगडी आस किंवा आरी, रथाच्या अग्रभागी असणारे दोन दगडी हत्ती, रथाच्या मध्यात असणारी दगडी पण लाकडाचा भास होणारी शिडी हे सगळेच अप्रतिम ! एके काळी हा रथ फिरवीत असत असे सांगितले जाते.
हंपीतील उग्र नरसिंह मंदिर मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. जवळपास वीस ते बावीस फूट उंच अशी नरसिंह मूर्ती आहे. आक्रमकांनी मूर्तीचे हात तोडलेले दिसतात. पण मूर्ती अतिशय विशाल आणि सुंदर आहे. मूर्तीच्या समोरच एक विशाल अखंड पाषाणातून घडवलेले शिवलिंग आहे. त्याच्या तळाशी कायम पाणी असते.
हंपीत राहून पाहावीत अशी अनेक सुंदर स्थळे आहेत. हंपीत फिरताना तुंगभद्रा नदीचे मनोरम दर्शन जागोजागी होते. जवळच एका टेकडीवर अंजनेय हनुमानाचे मंदिर आहे. हे हनुमानाचे जन्मस्थान समजले जाते. याच ठिकाणी श्रीराम आणि हनुमानाची भेट झाली होती असे सांगितले जाते. जवळच एका टेकडीवर जैन मंदिरांचा समूह आहे. आपण बघू तेवढे कमी आहे.
येथे पर्यटकांसाठी अनेक हॉटेल्स आहेत. अशाच एका आगळ्यावेगळ्या हॉटेलात आम्ही भोजनाचा आस्वाद घेतला. त्याचे नाव मँगो ट्री रेस्टॉरंट. यात आपल्याला बसण्यासाठी भारतीय पद्धतीची बैठक व्यवस्था आहे. वेळ असेल तर वाचण्यासाठी काही पुस्तके देखील ठेवली आहेत. शाकाहारी पद्धतीचे केळीच्या पानावर वाढलेले उत्कृष्ट जेवण येथे मिळते.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२२/०६/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा