मुख्य सामग्रीवर वगळा

चष्मा... !

 उगवतीचे रंग 

चष्मा... ! 

मी लावतो चष्मा निरनिराळ्या रंगाचा 

मग मला हवे तसे दिसतात रंग भोवतालचे 


कधी कधी मला सोयीसाठी हिरवा रंग हवा असतो 

मग मी हिरव्या रंगाचा चष्मा परिधान करतो. 

आता हिरव्या रंगाशी माझी जवळीक असते 

मग हिरवी रोषणाई, हिरवे झेंडे, सारे कसे  हिरवे हिरवे 

रंगून जातो मग मी हिरव्या रंगात

ईद रमजान अन डोक्यावर गोल टोपी मोठया थाटात ।। १ ।। 


कधी कधी मी लावतो भगव्या रंगाचा चष्मा 

मग भवतालच होऊन जातो अवघा भगवा 

भगवे ध्वज, भगव्या मिरवणुका, भगवे कपडे 

दिसू लागतात भगवे तांडे 

भावी विजयाचे मनात मांडे ।। २ ।।


वाटलं तर लावतो निळ्या रंगाचा चष्मा कधी कधी 

मग होऊन जातो भवताल निळा 

कपाळाला निळाच टिळा 

मग आठवते प्रज्ञा, शील, करुणा 

' बुद्धम शरणं गच्छामि..' चा घोष मनात घुमू लागतो. ।। ३ ।। 


माझ्याजवळ फक्त चष्मेच नसतात 

असतात निरनिराळ्या प्रकारचे फिल्टर्स सुद्धा 

मला हवे तसे फिल्टर्स मी कानावर चढवतो 

मग त्यातून गाळून येतात आवाज 

तेच फक्त की जे मला ऐकायचे असतात. ।। ४ ।। 


मग मला ऐकू येतात फक्त मशिदीवरचे आवाज 

भोंग्यावरून चाललेली अजान 

तशी तर ती खूप वर्षांपासून ऐकू येत असते 

पण आता मला ती कानात खुपत असते 

खूप माणसं असतात माझं ऐकणारी 

लढा रे,  फुंकली मी तुतारी ।। ५ ।। 


मला दुसरे फिल्टर्स लावले की ऐकू येतात 

मंदिरांवरचे भोंगे आणि सुरु असणाऱ्या आरत्या 

हनुमान चालीसा, भजनं आणि कीर्तनं 

पण आता मी वेगळाच असतो 

हाही आवाज मला कानात खुपतो  ।। ६ ।।


मग मला आठवतात नियम आणि कायदे 

मतदारांशी केलेले वायदे 

नियम पाळण्याचे फायदेच फायदे ! 

आता असतो सोयीस्कर विचार 

सोयीस्कर आचार अन सोयीस्कर उच्चार ! ।। ७ ।। 


माझे हे चष्मे नाही दाखवत मला 

दारिद्र्याने पिचलेले आत्मे 

बेकारीने आलेली निराशा 

महागाईने त्रस्त जनता 

उपाशीपोटी झोपणारे अतृप्त लोक ।। ८ ।।


माझ्या या फिल्टर्समुळे 

नाही ऐकू येत मला दुःखितांचे निःश्वास 

मदतीसाठी याचना करणाऱ्यांच्या आर्त हाका 

मला नाही ऐकू येत कुपोषित बालकांचा टाहो आणि 

अत्याचारग्रस्त भगिनींच्या आर्त किंकाळ्या 

माझ्या दृष्टीने सारे काही अलबेल आहे ।। ९ ।। 


चष्मा काढून ठेवला तर 

मला मूळचा असा रंग नसतो 

कानावरचे फिल्टर्स नसले की सगळेच आवाज मला ऐकू येतात 

मग मी सगळ्यांचा असतो 

सगळे रंग माझेच असतात 

सगळे आवाजही मला बोलावतात. ।। १० ।। 


©खरं तर सगळे रंग एकच असतात 

निरनिराळ्या रंगांची तबकडी फिरवली की ती पांढरीच भासते 

पाण्याच्या थेंबातुन प्रकाश परावर्तित होताना 

सप्तरंगी मोहक इंद्रधनुष्य खुलते ।। ११ ।। 


अशीच असते विविधतेतील एकता 

आणि एकतेतील विविधता 

असावी लागते पाहण्याची दृष्टी 

चष्मे सारे काढून ठेवल्यावर 

दिसेल अवघी एकच सृष्टी. ।। १२ ।। 


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

६/५/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कविता आवडल्यास नावासह अग्रेषित करावी ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...