उगवतीचे रंग
दिगूची मुशाफिरी
मायानगरीत राहून दिगूला आता कंटाळा आला होता. एकतर भयानक उष्म्यामुळे अंगाची काहिली होत होती. त्यातच भोवतालच्या त्याच त्या वातावरणालाही तो कंटाळला होता. काही गोष्टी फारशा गांभीर्याने न घेता करमणूक म्हणून घ्यायच्या ठरवल्या तरी त्यालाही काही मर्यादा असतेच. दिगुने हिमालयाएवढी उंची असणारे नेते पाहिले होते. आता भोवताली असणाऱ्या खुज्या नेत्यांचे दर्शन त्याला घडत होते. एक पत्रकार म्हणून तो सगळ्या गोष्टी जरी निर्विकारपणे टिपत असला तरी आतमध्ये कुठेतरी अस्वस्थता होती. अस्सल जातिवंत वाघ दिगुने पाहिले होते. वाघाची डरकाळी, दरारा त्याला परिचित होता. पण आता अस्सल वाघ त्याला दिसेनासे झाले होते. मांजराची लक्षणे त्याला दृग्गोचर होत होती. मांजराची पिले सुद्धा वाघाचा आव आणून गुरगुरण्याचा प्रयत्न करीत होती पण त्यात फारसा दम नव्हता. एकेकाळी धनुष्यातून सुटल्यावर आपल्या लक्षाचा अचूक वेध घेणारे बाण आपली दिशा सोडून भलत्याच लक्ष्यावर आदळत होते. कोविडमुळे काही काळ गाड्या बंद झाल्याने इंजिन देखील आपल्या जागेवर शांतच होते. पण आता थोडे इंधन मिळाल्याने इंजिन दमदारपणे वाटचाल करेल असे वाटत होते. पण इंजिनाला नेमकी दिशा सापडत नव्हती. डिजिटल घड्याळाचा जमाना आल्यामुळे पूर्वीची जुनी काटे असलेली घड्याळी नीट वेळ दाखवत नव्हती. त्यामुळे या घड्याळांवरचा लोकांचा विश्वास उडू लागला होता. कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे कमळही कोमेजल्यासारखे झाले होते.
भोवतालच्या नेत्यांच्या कोलांट्याउड्या दिगुच्या आश्चर्याचा विषय बनल्या होत्या. पत्रकार असलेली पण राजकीय क्षेत्रात काम करणारी व्यक्ती वेळोवेळी वेगवेगळी विधाने करत होती. कधी कधी ती व्यक्ती नेमक्या कोणत्या पक्षाची आहे याचीही शंका यायची. पण लोकांना काही इलाज नव्हता. सामना तर करावाच लागणार होता त्यांना. आणखी एक नेता विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर वेगवेगळे आरोप करीत सुटला होता. जणू एवढेच एक काम त्याला होते. लोकांच्या कानावर मधून मधून ईडी वगैरे सारखे शब्द पडत होते. दिगूला आणखीही काही शब्द सारखे कानावर पडायचे. भोंगे, अस्मिता, हनुमान चालीसा, हिंदुत्व, नामधारी हिंदुत्व. त्याच्या ज्ञानात नाही म्हटलं तरी भर पडत होती. अधूनमधून अयोध्येचा गजरही त्याच्या कानी पडायचा.
तर असा हा भोवतालच्या वातावरणाने विटलेला आणि मुंबापुरीच्या उष्म्याने हैराण झालेला दिगू काही दिवसांसाठी पुण्यनगरीत आला. इथे उन्हाची काहिली जरा कमी असल्याने तसेच राजकारणापासून थोडे दूर आल्याने आपले काही दिवस मजेत जातील असा त्याचा अंदाज होता. सांस्कृतिक नगरी वगैरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या या नगरीत त्याने काही सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावली. स्वा. सावरकरांच्या जयंतीनिमित्त नगरीत विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. त्यातल्या त्यात दिगूला एका अभिनेत्याच्या भाषणाला हजेरी लावावीशी वाटली. तसा तो भरत नाट्य मंदिरात गेला. पाहतो तो काय संपूर्ण नाट्यगृह श्रोत्यांनी खच्चून भरलेले. सगळ्या खुर्च्या फुल्ल. पायऱ्यांवरही लोक बसलेले. कारणही तसेच होते. व्यासपीठावर सिनेनाट्य क्षेत्रातील तीन दिग्गज होते. शरद पोंक्षे, विक्रम गोखले आणि प्रवीण तरडे. शरद पोंक्षे यांचे विचार ऐकायला लोक उत्सुक होते.
कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर मात करून शरद पोंक्षे पुन्हा आपल्या क्षेत्रात कार्यरत झाले होते. त्यांच्या ' दुसरं वादळ ' या पुस्तकाचं प्रकाशनही याप्रसंगी झालं. आपल्या घणाघाती भाषणात शरद पोंक्षे यांनी स्वा सावरकरांवर केल्या जाणाऱ्या सर्व आरोपांचा समाचार घेतला. सगळे आरोप पुराव्यानिशी खोडून काढले. सावरकरांचा प्रत्येक शब्द देशासाठी होता. आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचणाऱ्या या माणसाच्या नशिबी स्वातंत्र्यानंतरही कशी उपेक्षा आली हे ऐकताना दिगू अंतर्मुख झाला. तर अंदमानच्या काळकोठडीत कोलू चालण्यासारखे कष्टाचे काम करून कारागृहातील भिंतीवर कविता लिहिणाऱ्या सावरकरांची कहाणी ऐकून दिगू थरारून गेला. या देशभक्ताने थोडेथोडके नव्हे तर बावीस हजार पृष्ठांचे साहित्य कारागृहात राहून निर्मिले. तेही अत्यंत प्रेरणादायी आणि देशभक्तीने भारलेले. अस्पृश्यता, जातीभेद, अंधश्रद्धा यावर प्रहार करणारे सावरकर. जातीभेद नष्ट व्हावा म्हणून ब्राह्मणेतर समाजातील मुलांच्या मुंजी लावणारे सावरकर. अस्पृश्याना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून झटणारे सावरकर. सावरकरांना तेवढ्याच कणखरपणे साथ देणारी त्यांची धर्मपत्नी. समाजातील ब्राह्मणेतर स्त्रियांना देखील हळदीकुंकू यासारख्या प्रसंगी आमंत्रित करून आधुनिक विचारांचा वारसा आपल्यापुढे ठेवणारी ही माता. विज्ञानाची कास धरणारे सावरकर. ही सगळी सावरकरांची विविध रूपे शरदजींनी आपल्या भाषणातून श्रोत्यांसमोर उभी केली. या सगळ्या विचारांनी भारलेला दिगू अंतर्मुख होऊन बाहेर पडला. त्याच्या मनात दोन दिवसांपूर्वी पाहिलेल्या एका कार्यक्रमाचे विचार गर्दी करू लागले.
कुठलातरी साहित्यविषयकच कार्यक्रम होता. त्या व्यासपीठावरून काही साहित्यिकांना पुरस्कार वाटले गेले. पुरस्कार ज्यांच्या हस्ते वाटले गेले तेच पुरस्कार वाटपानंतर म्हणाले की या पुरस्कारांचा काय उपयोग ? या पुरस्कारांचा एकच उपयोग आहे की ते तुम्ही निषेध म्हणून परत करू शकता. ज्या हातांनी काही क्षणापुर्वीच हे पुरस्कार वाटले तेच हात अशी भावना व्यक्त करीत आहेत हे पाहून दिगूला कमालीचे आश्चर्य वाटले. पुरस्कारांची यापेक्षा घोर उपेक्षा काय असू शकते हे त्याला कळेना ! असे होते तर पुरस्कार द्यायचेच कशाला ?
कुठल्यातरी आणखी एका विचारवंताने मनू, मनुस्मृती, मनुवाद वगैरे शब्द वापरून जुन्याच गोष्टी उकरून काढण्याचा प्रयत्न केला. दिगूला पूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवली. एक साधू महाराज आपल्या काही शिष्यांसह एक नदी पार करत होते. त्यावेळी एका तरुण सुंदर स्त्रीला देखील ती नदी पार करून पलीकडे जायचे होते. तिला मदतीसाठी कोणी पुढे येत नव्हते. साधू महाराज आणि त्यांच्या काही शिष्यानी नदी पोहून पार केली. त्यांच्या एका तरुण शिष्याने मात्र त्या सुंदरीला मदत करण्यासाठी तिला पाठीवर घेऊन नदी पार केली. नंतर तो शिष्य ती गोष्ट विसरूनही गेला. साधू महाराजांच्या डोक्यातून मात्र ती तरुणी आणि आपला शिष्य यांचा विचार डोक्यातून जाईना.
कोणीतरी साहित्यिकांना आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य सध्या नाही. काही बोलण्याचीही भीती वाटते वगैरे विचार व्यक्त केले. दिगूला या सगळ्या गोष्टींचे मोठे आश्चर्य वाटले. इतके दिवस झाले ही मंडळी धडाधड पुस्तके लिहिताहेत. व्यासपीठावरून आपले विचार मांडताहेत आणि पुन्हा विचार मांडता येत नाहीत म्हणून हाकाटी करताहेत. काय खरे समजायचे ? दिगुच्या मनात एक गोष्ट नक्की होती. देशाभिमान, राष्ट्रप्रेम आणि आपली गौरवशाली भारतीय संस्कृती या गोष्टींशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड त्याला नको होती. ज्यांनी समाजाला दिशा दाखवायची त्यांनीच समाजातील एकोपा नष्ट होईल अशी वक्तव्ये करावीत हे त्याला आवडले नाही. समाजाला दिशा देणाऱ्या, जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि ज्यांची जयंती दोन दिवसांवर आली होती अशा साहित्यिकांचे साहित्यिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा साधा उल्लेखही कोणी करू नये याचेही त्याला आश्चर्य वाटले. जाती पाहून महापुरुषांचे महानता ठरवण्याची समाजाची ही मानसिकता जोवर नष्ट होत नाही तोवर समाज प्रगती करू शकत नाही या विचारांप्रत येऊन दिगू थांबला. अर्थात त्याची मुशाफिरी सुरूच राहणार होती.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२९/५/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा