मुख्य सामग्रीवर वगळा

गेले द्यायचे राहून...

उगवतीचे रंग 

गेले द्यायचे राहून... 

कवी आरती प्रभू यांची एक सुंदर कविता आहे. 

 गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्राचे देणे 

माझ्यापाशी आता कळ्या आणि थोडी  ओली पाने. 

कधी कधी असं सुंदर, आवश्यक असलेलं नक्षत्रांचं देणं राहून जातं. हातात फार काही उरत नाही. काळ हातातून निसटून गेलेला असतो. राहून गेलेल्या गोष्टींची बोच मात्र मनाला लागून राहते. 

कधी कधी मला वाटतं की आपलं आयुष्य एखाद्या क्रेडिट कार्डसारखं आहे. काय हवं ते आपल्याला आधी देऊन टाकलेलं असतं. नंतर आपल्याला ते फेडायचं असतं. आपण ते ऋण कसं फेडतो यावर पुढील सगळा व्यवहार अवलंबून असतो. आईवडील आपल्याला शिकवतात, मोठं करतात. गुरुजन ज्ञान देतात. शेतकऱ्याने शेतात अन्न पिकवल्याने आपल्याला खायला मिळतं. मित्र, समाज, आप्तेष्ट या साऱ्या साऱ्यांचं आपल्यावर ऋण असतं. ते जमेल तसं आपल्याला परत करायचं असतं. त्याच्यासाठी मुदत दिलेली नसते, ठराविक असं व्याज नसतं आणि फेडलं नाही तर काही गुन्हा दाखल होण्याची शक्यता फारशी नसते. पण परत करणं हे आपलं नैतिक कर्तव्य असतं. आपल्यावरचे संस्कार किती प्रभावी आहेत त्यावर हे ठरतं. 

माझं ज्यांच्यावर खूप प्रेम होतं असे माझे वडील शेवटी शेवटी थकले होते. त्यांचं वय बरंच झालं होतं. मी शाळेत शिक्षक म्हणून काम करत होतो. मी शाळेत जायला निघालो की त्यांचं लक्ष माझ्याकडे असायचं. माझ्या चेहऱ्याकडे नजर लावून असायचे. ' बाबा, येतो मी...' असं म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचं. बऱ्याचदा त्यांना सांगूनच जायचो मी. पण कधी कधी धावपळीत असताना माझ्याकडून तेवढंही सांगणं व्हायचं नाही. मी गर्दीत निघून जायचो. त्यांचे डोळे आशेने माझ्याकडे लागलेले असायचे. मग मलाच अपराध्यासारखं वाटायचं. काय विशेष असं हवं असायचं त्यांना... ? जाताना आपल्या मुलानं त्यांच्याकडे प्रेमभराने पाहावं, सांगून जावं एवढीच त्या प्रेमळ पित्याची अपेक्षा असायची. 

शाळेत प्रचंड काम असायचं. वर्गात मोठमोठ्यानं शिकवणं, घसा दुखायचा. मुलांची सारखी कलकल. शाळेतून आलो की डोकं भणाणून गेलेलं असायचं. मग असं वाटायचं की कोणाशी काहीच बोलू नये.  काही काळ अगदी शांत बसून राहावं. तसा प्रयत्न  करायचो देखील. पण त्यावेळी पुन्हा वडिलांची अपेक्षा असायची की मी क्षण दोन क्षण त्यांच्याजवळ बसावं. त्यांची थोडी मायेनं चौकशी करावी. पण त्या परिस्थितीत कधी कधी तेही नाही व्हायचं माझ्याकडून. बाबा तर आता नाहीत. पण आता ते क्षण आठवले की वाटतं आपलं चुकलंच. आपण कितीही थकलेलो असलो, काही असलं तरी त्यांच्याजवळ बसायला हवंच होतं. त्यांची आस्थेनं विचारपूस करायला हवी होती. त्यांना वेळच्या वेळी जेवणखाण, औषधे सगळं काही मिळत होतं. पण तेवढंच पुरेसं होतं का ? 

पुढे पुढे जसजसं त्यांचं शरीर थकत गेलं तसतशा शारीरिक तक्रारी वाढू लागल्या. रात्री अनेकदा त्यांना लघुशंकेसाठी उठावं लागायचं. वयानुसार नजर कमी झाल्याने रात्री दिसायचं नाही. दिवा सुरु ठेवावा लागायचा. त्यांना तहानही खूप लागायची. पण म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे... तसेच झाले माझे. मी उगीचच त्यांना म्हणायचो की बाबा, रात्री जास्त पाणी पिऊ नका. पण मला कळले की म्हातारपणी तोंडात लाळेची निर्मिती कमी होत असल्याने तोंडाला कोरड पडते. बऱ्याच वृद्ध लोकांना रात्री उठून लघुशंकेसाठी जावेच लागते. आता हे सगळे कळले आहे. पण बाबा राहिले नाहीत. आठवणींनी डोळे भरून येतात. 

वडील माझ्यासाठी आदर्श होते. प्रेमळ होते. त्यांनी माझ्यासाठी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर ठेवली नव्हती. मी देखील त्यांची कधी आज्ञा मोडली नाही. माझ्याकडून त्यांच्यासाठी जे जे करणे शक्य होते ते ते केले. त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील वर उल्लेख केलेल्या काही काही गोष्टींची बोच माझ्या मनाला लागून राहिली.  कुठेतरी हे ' नक्षत्रांचे देणे ' द्यायचे राहून गेले. असं काही खरं तर आपल्या हातून राहून जाऊ नये. कारण ते करण्याची संधी पुन्हा येत नाही. 

माझे बाबा मला खूप आवडायचे. माझं त्यांच्यावर प्रेम होतं पण ते असताना मी  कधी म्हटलं का की बाबा तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही मला हवे आहात ? ते मला आवडत होते, हवे होते हे तर खरंच पण त्यांना जर मी तसं जवळ बसून बोललो असतो तर त्यांना किती छान वाटलं असतं ! आता मला त्यांना तसं सांगावं असं लाख वाटलं तरी आता माझ्या हातात काही नाही. बाबा, तुमचं हेही देणं माझ्याकडे बाकी आहे. 

आपली आई सारखी आपल्यासाठी राबत असते. आपल्याला वाढवताना तिने किती खस्ता खाल्ल्या असतील हे ती कधी सांगते का ? कवी माधव ज्युलियन यांची ' प्रेमस्वरूप आई ' कविता ऐकताना, राजा और रंक चित्रपटातील ' तू कितनी अच्छी हैं ' ऐकताना, तारे जमीपर या चित्रपटातील ' तुझे सब हैं पता मेरी माँ ' ऐकताना मी खूप रडलो आहे. अजूनही ती गाणी लागली की डोळ्यात अश्रू उभे राहतातच. पण मी किती वेळा आईजवळ बसलो ? तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपलो ? तिला किती वेळा म्हटले की आई तू मला खूप आवडतेस ! तू मला हवी आहेस ! आई आहे, मातृछत्र आहे, अजून आहे हे माझे केवढे भाग्य ! अजूनही मी तिच्याजवळ गेलो की लहान होतो. मांडीवर डोके ठेवून काही क्षण पडून राहतो. तीही प्रेमळपणे माझ्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून हात फिरवते. जगातली सर्व दुःख, ताप हरण करण्याचं सामर्थ्य तिच्या त्या प्रेमळ हातात आहे. पण पूर्वी मी असे काही क्षण फुकट दवडलेच ना...! 

जीवनात असे अनेक प्रसंग येतात. त्या प्रसंगी नियती तुमच्याकडून परतफेडीची अपेक्षा करत असते. तुम्ही नाही दिले तर त्यावेळी काही फारसे बिघडत नाही. पण ते ऋण तुमच्यावर, तुमच्या नावावर जमा असते. त्याचे व्याजही वाढत जाणारे असते. 

परवा एका ओळखीच्या गृहस्थांकडे गेलो. त्यांच्यासाठी एक पुस्तक भेट म्हणून दिले. काहीतरी खायला म्हणून घेऊन गेलो. पण गेलो तेव्हा अचानक कळले की त्या दिवशी त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे. त्यांनी त्याला बोलावून मला नमस्कार करण्यास सांगितले. तो मुलगाही मोठा गोड आणि आज्ञाधारक होता. त्याने लगेच नमस्कार केला. मीही त्याला ' आयुष्यमान हो, खूप मोठा हो...' म्हणून आशीर्वाद दिला. मुलगा निघून गेला. पण नंतर मला लक्षात आले की त्या मुलासाठी आपण काही आणू शकलो नव्हतो तरी काहीतरी पैसे त्याला वाढदिवसाची भेट म्हणून देता आले असते. पण वेळ निघून गेली होती. आता मी पुन्हा कधीतरी जाईन तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी घेऊन जाईनच हा भाग वेगळा पण ती वेळ, तो दिवस आता पुन्हा थोडाच येणार आहे ! इथेसुद्धा गेले द्यायचे राहून... 

असे खूप प्रसंग घडतात. कधी कधी रस्त्याने एखादी भिकारीण कडेवर असलेल्या मुलासह आपल्याकडे दीनवाणेपणाने याचना करीत असते. पण आपल्यातला व्यवहारी माणूस आपल्याला सांगतो, ' अरे यांचे हेच उद्योग असतात. काही काम करत नाहीत. वगैरे वगैरे. ' मग आपण सराईतासारखे त्याकडे दुर्लक्ष करतो. नंतर मला वाटत राहतं की आपण दवाखान्यात डॉक्टरांनी मागितले तेवढे पैसे दिले, मेडिकलवर सांगतील तेवढ्या पैशांची औषधे घेतली. हजार दोन हजार हॉटेलचं बिल दिलं, शे दोनशे रुपये आईस्क्रीमवर खर्च केले. पण दोन पाच रुपयांसाठी आपला हात खिच्याकडे गेला नाही. 

विंदा करंदीकर आपल्या ' माझ्या मना बन दगड ' या कवितेत म्हणतात 

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव !
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड !

तसं तर झालं नाही ना...? खरंच दगड बनलं का माझं मन ?

नाही व्हायचं मला दगड 

नाही व्हायचं व्यवहारी 

देऊन टाकायचं हे देणं 

नको जिणं कर्जबाजारी 

किती राहिली वर्ष बाकी 

नाही कुणाला ठाऊक 

देऊन टाकावं नक्षत्राचं देणं 

एवढंच आता ठाऊक ! 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...