मुख्य सामग्रीवर वगळा

लेबल्स..

 उगवतीचे रंग 

लेबल्स.. 

सध्या लेबल्सचा जमाना आहे. जिकडे पाहावं तिकडे कुठलं ना कुठलं लेबल.  घरातल्या वस्तूंवर गृहिणी लेबल लावून ठेवते. पटकन सापडाव्यात म्हणून. याचा उपयोग तिलाच होतो असं नाही. ती घरी नसेल तेव्हा तिचा नवरा, मुलं या सगळ्यांना त्याचा उपयोग होतोच. पण कधी कधी गंमतही होते. वर लेबल लावलेलं असतं वेगळं आणि आतमध्ये वस्तू असते वेगळीच ! मग होते गडबड. कधी साखरेऐवजी मीठ पडतं तर कधी ज्वारीच्या पिठाऐवजी डाळीचं पीठ. भाकरी बनवणारा म्हणतो की आज भाकरी का जमत नाहीये ? अशी चिकट का होतेय ? ही सगळी गडबड झाली ती चुकीच्या लेबलामुळे. एक वेळ लेबल नसते लावले तरी चालले असते. कारण मग माणूस ती वस्तू पाहून घेतो. पण लेबल असले की निश्चिन्त असतो. त्याने गृहीत धरलेलं असतं की इथे साखर म्हणजे साखरच असणार, डाळीचं पीठ म्हटलं की डाळीचं पीठ असणार ! 

' लेकिन दाल में कुछ काला हैं...' हे ती वापरल्याशिवाय कळत नाही. असंच माणसांचंही होतं बरं का ! आपल्याला सवयच झालेली असते ना सतत प्रत्येकाला लेबल चिकटण्याची. काही काही संवाद बघा नेहमी आपल्या कानावर पडतात... तुमच्याही आजूबाजूला ते नक्कीच घडत असणार. नमुन्यादाखल काही संवाद बघा... 

' तो ना, अहो कमालीचा बावळट आहे. त्याचं काय ऐकता ? 

' आमचे हे म्हणजे नुसते भोळे सांब  ! त्यांना काही लक्षातच येत नाही. ' 

' तो ना, स्वतःला फार शहाणा समजतो. ' 

' अहो, त्याच्याकडे सगळा दोन नंबरचा पैसा आहे. म्हणून उडवतो नवीन नवीन गाड्या. ' 

' नाहीतरी बायकांना फार अक्कल नसते. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. ' 

वगैरे वगैरे... ! नमुन्यादाखल काही संवाद दिले आहेत. तुमच्याही कानावर कधी ना कधी अशा प्रकारचे संवाद नित्य पडतच असणार...! कधी केलाय गांभीर्याने विचार यावर ? आपण ते नुसतेच ऐकून सोडून देतो. विविध व्यक्तींना अशी विविध लेबल्स लावल्यामुळे आपण त्यांच्याकडे निकोप दृष्टीने पाहूच शकत नाही. 

एकदा कोणाच्या तरी वाढदिवसाचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आले होते, ते त्या वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीची आपल्या भाषणातून स्तुती करीत होते आणि ते साहजिकही होते. पण श्रोत्यात बसलेल्या काहींना हे पाहवत नव्हते. ते म्हणत होते, ' हं, हे प्रमुख पाहुणे ना आता त्यांची स्तुतीच करणार ! त्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणी तरी त्याच्याबद्दल चांगले बोलतो आहे तर बोलू द्या ना यार. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? पण नाही, आम्हाला ते मान्यच होणार नाही. 

एखाद्या व्यक्तीत चांगले गुण असू शकतात आणि त्याची तारीफ केली पाहिजे हे आम्हाला पटतच नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आम्ही लावलेले लेबल्स. लेबल्स म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर आपण मारलेला शिक्का. गोंधळ होतो तो त्या शिक्क्यामुळे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर लेबल्स म्हणजे एक प्रकारचे चष्मेच म्हणा ना ! एकदा का तो विशिष्ट दृष्टिकोनाचा चष्मा आपण चढवला की सगळे आपल्याला तसेच दिसायला लागले. दृष्टी दूषित होते. यालाच म्हणायचे पूर्वग्रह. नेता म्हटला म्हणजे तो भ्रष्टच असणार, अधिकारी, पोलीस म्हटला की तो लाचखाऊच असणार, शिक्षक म्हटला की तो पाट्या टाकणारच असणार, गृहिणी म्हटलं की तिला काय काम वगैरे वगैरे. ज्या स्त्रिया सुंदर असतात, त्या बुद्धिमान असतातच असे नाही असेही काही समज आपण करून घेतलेलले असतात. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांची फारकत असते अशा प्रकारचे अनेक पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आपण बाळगत असतो. नव्हे आपल्या मुलांमध्येही ते नकळत विकसित करत असतो. या असल्या दृष्टिकोनामुळे आपण सगळ्या चांगल्या गोष्टींची माती करून टाकली आहे. कारण आपल्या नजरेला काही चांगले दिसतच नाही. 

मग लहान मुलं सुद्धा आपल्या नजरेतून सुटत नाही. आपलं पोरगं गुणाचं आणि शेजाऱ्याचं लबाड. आता काय म्हणावं अशा वृत्तीला ! मुलंच असतात ती ! त्यांचं खेळणं, हसणं याकडे सुद्धा आपण निर्मळ नजरेनं पाहू शकत नाही का ? मला कधी कधी मंगेश पाडगावकरांची ' यांचं असं का होतं कळत नाही...' ही कविता आठवते. काही जण सतत गंभीरराव असतात. सकाळी पेपर आला की पाच दहा मिनिट पेपर पाहणार. मग हातातून टाकून देऊन म्हणणार ' आजकाल पेपरमध्ये वाचण्यासारखं काही असतंच नाही. ' नवीन गाण्यांबद्दल ते दोन शब्द कधी चांगले बोलणार नाहीत. आताची गाणी म्हणजे नुसती धांगडधिंगा. पूर्वीची गाणी काय होती ! अर्थपूर्ण, मधुर संगीत वगैरे वगैरे. मित्रांनो, यातील काही गोष्टी काही अंशाने खऱ्या असतीलही. पण सरसकट सगळ्या गोष्टी म्हणजे तशाच असं जे लेबल आपण लावतो ना, ते जीवनाचा आनंद भरभरून घ्यायला आपल्याला परावृत्त करतं. मग त्यात असलेल्या काही चांगल्या गोष्टीही आपल्याला दिसत नाही. 

आजही ताज्या दमाचे उत्तम संगीतकार, गायक पुढे येताहेत. सगळेच नेते भ्रष्ट आणि लबाड नाहीत. काही चांगलं कामही करतात. सगळेच सरकारी अधिकारी भ्रष्ट नसतात. काही सरकारी अधिकारी आजच्या परिस्थितीही चांगलं काम करताना दिसतात. काही पोलीस लोकांना मदतही करतात. गृहिणी म्हणजे तिला काही काम नाही असं नसतं. बरेचसे शिक्षक मनापासून शिकवत असतात. सौंदर्यस्पर्धेत स्त्रियांचं नुसतं सौंदर्य पाहिलं जात नाही तर त्यांच्या बुद्धिमत्तेचीही परीक्षा घेतली जाते. विद्येची देवता सरस्वती हिच्या नुसत्या प्रतिमेकडे पाहिलं तरी तिच्या ठायी सौंदर्य आणि बुद्धिमत्ता एकवटली आहे असे आपल्याला दिसून येईल. समृद्धीचं प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीबद्दल देखील असंच म्हणता येईल. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा मिलाफ ही आपली परंपरा आहे. सरस्वती आणि लक्ष्मी हे तर पुराणातील दाखले म्हणून काही लोक फेटाळतील. पण आपल्याकडे अनेक महापुरुषांचे जीवन घडवणाऱ्या त्यांच्या माता म्हणजे सुंदरता आणि बुद्धिमत्ता यांचा मिलाफ होता. झाशीची राणी, महाराणी येसूबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही इतिहासातील उदाहरणे याची साक्ष आहेत. 

 एखाद्या विनॊदावर खळखळून हसणं, मनमोकळी दाद देणं, एखाद्याच्या चांगल्या गुणांचं तोंडभरून कौतुक करणं या साध्या साध्या गोष्टींना आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाला आपण पारखे होत चालले आहोत. प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थची एक कविता आहे. कवितेचं नाव आहे ' द वर्ल्ड इज टू मच विथ अस. ' या कवितेत कवी म्हणतो की मनुष्य सभोवतालच्या या क्रूर जगात पुरता गुरफटला आहे. हे जग फक्त देवाणघेवी पुरतं मर्यादित झालं आहे. माणूस निसर्गापासून दूर चालला आहे. त्यामुळे साध्या साध्या गोष्टींच्या आनंदाला पारखा होत चालला आहे. या बजबजपुरी असणाऱ्या जगात राहण्यापेक्षा मला निसर्गात राहणे आवडेल किंबहुना निसर्गाचाच एक भाग बनून राहणे आवडेल. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

२२/०५/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा ) 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...