उगवतीचे रंग
( प्रिय रसिक वाचक. काल रात्री उशिरापर्यंत बसून लिहिलेला लेख आपल्यासमोर ठेवताना मला एक प्रकारचा वेगळा आनंद आहे. माझा हा लेख पुढे पुस्तकात येईल न येईल पण आपल्यासारखे माझ्याशी वेगवेगळ्या कारणाने जोडले गेलेले वाचक या लेखाचे प्रथम वाचक आहेत याचा हा आनंद ! मी कोणी मोठा लेखक नाही पण लहान मूल ज्या प्रेमाने आपल्या आईवडिलांना म्हणते, " आता तुम्हाला माझे ऐकावे लागेल बरं..." आणि ते मूल लहान असतानाही आईवडील कौतुकाने ते बोबडे बोल गोड करून घेतात. त्याच प्रेमाच्या धाडसातून मी तुमच्याशी बोलत आहे. माझ्या विचारमंथनातून प्रकटलेला नवनीतरूपी ' लावण्याचा गाभा " आपल्यासमोर याच प्रेमाने आणि धाडसाने ठेवत आहे. )
लावण्याचा गाभा : पं शिवकुमार शर्मा
कविवर्य बा भ बोरकरांच्या ' लावण्यरेखा ' या कवितेच्या सगळ्याच ओळी कवितेच्या नावाप्रमाणे लावण्यखाणी आहेत. पण परवा परवा पं शिवकुमार शर्मा आपल्यातून गेले आणि मला बोरकरांच्या या कवितेतल्या शेवटच्या दोन ओळी आठवल्या. बोरकर म्हणतात
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा.
पंडितजी गेले. सुरांचा सूर्य मावळला. संतूरचे सूर निमाले. पण त्यांचं हे जाणं अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्यासारखं देखणं होतं. पंडितजींचं संगीत जसं निर्मळ आणि सुंदर होतं तसंच त्यांचं व्यक्तिमत्वही. तो एक देखणा राजहंस होता. अंतर्बाह्य सौंदर्य काय असतं हे जाणून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तींकडे पाहावं. ' अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी...' असं म्हणतात ना ! तेच आतलं सौंदर्य सुरातही प्रतिबिंबित होत होतं अन चेहऱ्यावरही. अशी माणसं म्हणजे ' सत्यम शिवम सुंदरम ' ची उपासक असतात. सौंदर्याची पूजक असतात.
संतूर हा फारसी शब्द. संतूर हे वाद्य सुरुवातीला फक्त काश्मीर पुरतंच सीमित होतं. सुफी पंथीयांच्या संगीताला, गायनाला संतूरची साथ असायची. तेवढ्यापुरतंच ते मर्यादित होतं. पण संतूरला काश्मीरच्या बाहेर काढून त्याला केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रियता मिळवून देण्याचं श्रेय फक्त आणि फक्त शिवकुमारजींचं !
शिवकुमारजींच्या रक्तातच संगीत होतं. वडील बनारस घराण्याचे मोठे गायक आणि कलाकार. सुरुवातीला उत्कृष्ट तबला वाजवणारे पंडितजी नंतर संतूर वादनाकडे वळले ते कायमचेच ! नुकत्याच सहा फेब्रुवारी २०२२ ला लता मंगेशकर गेल्या आणि सूर निमाले आणि आता परवा १० मे रोजी पं शिवकुमारजी गेले आणि संतूर अबोल झाली. मला गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पं शिवकुमार शर्मा यांच्यात काही साम्यस्थळे आढळतात. ती अशी
दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनाच्या वेळी त्यांनी लतादीदींच्या हातात आपली चिजांची वही आणि तंबोरा सोपवला आणि एक फार मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवली. तिने आपलं आयुष्य गायनकलेसाठीच समर्पित करावं असंच जणू ते सांगत होते. लतादीदींनी आपल्या पित्याने सोपवलेली ही जबाबदारी किती सुंदर पद्धतीने निभावली हे सगळं जग जाणतं. गाणं आणि लता मंगेशकर या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. लता नावाची ही सुरांची वेल गगनाला जाऊन पोहोचली आणि रसिक त्या सुरांच्या वर्षावात चिंब न्हाऊन निघाले.
पं शिवकुमार यांच्या वडिलांनीही त्यांच्या हातात संतूर हे वाद्य दिलं आणि हे वाद्य तू शिक, लोकप्रिय कर असंच जणू सांगितलं. पंडितजींनी वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून संतूरच्या तारांवरून हात फिरवायला सुरुवात केली आणि संतूरमधून शुद्ध, निर्मळ सुरांच्या लडींची बरसात होऊ लागली. रसिक त्यात चिंब भिजले.
लता दीदी सुमारे साडेसात दशकं गात होत्या आणि पंडितजींची संगीत कारकीर्दही जवळपास तेवढीच. दोघांनीही संगीत जगभर पोहोचवलं. दोघंही श्रेष्ठ कलाकार. एकाच्या गळ्यात जादू तर दुसऱ्याच्या हातात. सूर दीदींच्या गळ्यात सौंदर्य घेऊन बाहेर पडत तर शिवकुमारजींच्या संतूरमधून ते सौंदर्य घेऊन प्रकटत. सुरांचा वर्षाव रसिकांवर सारखाच व्हायचा. अंगावर प्राजक्ताचा सडा पडावा, सगळं वातावरण त्या सुरांच्या सुगंधांनी मोहरून जावं तशी जादू व्हायची. श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे.
मी संगीताचा जाणकार नाही. शास्त्रीय संगीत तर मला अजिबात कळत नाही. पण जे मंत्रमुग्ध करतं, सगळं विसरून जायला लावतं ते संगीत उत्तम असं मला वाटतं. मग त्यासाठी संगीताचे जाणकार असण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या महान कलाकारांच्या संगीतात ती जादू होती. ते ऐकताना मनुष्य देहभान विसरून जायचा. म्हणूनच संगीत हे आपल्याला परमेश्वराशी जोडतं. पं शिवकुमारजी म्हणायचे की संगीत केवळ करमणुकीसाठी नाही. ते आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडतं. म्हणूनच त्याची साधना करत राहिलं पाहिजे. पं शिवकुमारजी यांची संतूरच्या सुरांवर हुकूमत होती पण शेवटपर्यंत ते स्वतःला साधकच समजत होते. जो साधक समजून आराधना करत राहतो, त्यालाच कलेची देवता प्रसन्न होते. याशिवाय संगीतामध्ये सृजनशीलता अत्यंत महत्वाची असते. याच सृजनशीलतेचे नवनवीन प्रयोग आपल्या संतूर वादनातून ते करत राहिले. रसिकांना भरभरून देत राहिले.
काही कलाकारांनी एवढी प्रचंड साधना केली की ते कलाकार आणि ते वाजवीत असलेली वाद्यं यांच्याशी त्यांचं नाव जे निगडित झालं ते कायमचं. शहनाई म्हटलं की आपल्याला आठवतात ते बिस्मिल्लाखां, सतार म्हटली की आठवतात पं रविशंकर, तबला म्हटलं की उस्ताद झाकीर हुसेन, अल्लारखां, व्हायोलिनचं नाव काढताच प्रभाकर जोग आठवतात. या सगळ्या कलाकारांची आयुष्यभराची तपश्चर्या या वाद्यांशी निगडित आहे. अशीच संतूरची साधना पं शिवकुमार शर्मा यांनी अखेरपर्यंत केली. संतूर आणि पं शिवकुमार शर्मा या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. संतूर वादनासाठी त्यांना जगभर लौकिक मिळाला तरी त्यांचे पाय सदैव जमिनीवर होते. कमालीची विनम्रता, ऋजुता आणि साधेपणा हे त्यांचे गुण त्यांचा मोठेपणा आणखी खुलवत होते.
पंडितजींच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एकदा दिल्लीला कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांचा कार्यक्रम सुरु होता. पंडितजींचा जन्म जम्मू काश्मीरचा. त्यामुळे बऱ्याच वेळा ते आपल्या श्रोत्यांशी ' डोगरी ' भाषेतूनही संवाद साधत. शिवकुमारजी संतूर वाजवताना लाकडी छडीचा वापर करीत. तिथे उपस्थित असलेल्या एका जम्मू काश्मीरच्या विद्यार्थिनीने उत्सुकतेने त्यांना विचारलं की संतूरवर ठेवलेलं हे काय आहे ? तेव्हा शिवकुमारजी डोगरी भाषेतच उत्तरले. " ये अखरोट ( अक्रोड ) की लकडीसे बनायी जाती हैं और इसे कलम कहते हैं. " हे सांगताना शिवकुमारजींच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू होते. कारण विद्यार्थी आणि कलम ( पेन ) यांचा घनिष्ठ संबंध ! तेव्हा कार्यक्रमाचे निवेदक चटकन म्हणाले, " और पुरे विश्वमे यही एक कलमधारी हैं..." आणि हे खरेच होते. संतूर म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा हे समीकरण होते.
काश्मीरला धरेवरचा स्वर्ग म्हटलं जातं. निसर्गानं मुक्त हस्तानं काश्मीरवर सौंदर्याची उधळण केली आहे. तेच काश्मीरचं सौंदर्य लेऊन हा लावण्याचा गाभा प्रकटला. आपल्याकडे संतांनी विठ्ठलाला ' लावण्याचा गाभा ' म्हटलं आहे. पं शिवकुमार म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी हाच लावण्याचा गाभा होते. पं शिवकुमारजी म्हणजे मला सौंदर्ययात्री वाटतात. रेशमी सोनेरी, अंजिरी रंगाचा कुर्ता. चेहऱ्यावर अनिर्बंध रुळणारे कुरळे केस आणि मनाचं सौंदर्य प्रतिबिंबित करणारा चेहरा. ते जेव्हा संतूर वाजवायचे तेव्हा सौंदर्याची जणू दोन रूपे प्रकट व्हायची. त्यांच्या सुरातलं सौंदर्य आणि स्वतः त्यांचं मूर्तिमंत सौंदर्य. ते आपल्या कलाविष्कारात मग्न असताना स्वतः तर देहभान हरपून जायचे पण पंचाईत व्हायची ती श्रोत्यांची. पंडितजींकडे पाहावं की त्यांच्या सुरांकडे लक्ष द्यावं यातच रसिकांचा गोंधळ व्हायचा. एकाच वेळी डोळे आणि कान तृप्त व्हायचे. पंडितजींची संगीत समाधी लागलेली असायची आणि रसिकांची श्रवणसमाधी ! कुरूपता या माणसाला मंजूरच नव्हती ! मग ती कुठलीही असो.
पं शिवकुमारजींवर बोलता बोलता मला आठवले रवींद्रनाथ टागोर. टागोरही अत्यंत देखणे व्यक्तिमत्व लाभलेले महान कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, संगीतकार, नाटककार, लेखक सारे सारे गुण सामावलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांच्याही अंगात रेशमी सोनेरी, अंजिरी कुर्ता. तेही सौंदर्याचे उपासक आणि पूजक होते. असं सांगितलं जातं की टागोरांना ' गुरुदेव ' ही उपाधी प्रथम महात्मा गांधींनी दिली आणि गांधीजींना ' महात्मा ' ही उपाधी प्रथम टागोरांनी दिली. दोघेही एकमेकांचे चाहते होते.
एकदा महर्षी रजनीशांनी आपल्या व्याख्यानात गांधीजी आणि टागोरांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला होता. गांधीजी एकदा टागोरांकडे राहायला गेले होते. गांधीजी कुठेही असले तरी आपले संध्याकाळचे फिरणे कधीच चुकवीत नसत. ते फिरायला निघाले तेव्हा रवींद्रनाथ म्हणाले, " चला, मीही येतो तुमच्याबरोबर. तेवढ्याच गप्पा होतील. " रवींद्रनाथ आरशासमोर उभे राहून आपले केस विंचरू लागले. कपडे ठाकठीक करू लागले. इकडे गांधीजी त्यांची वाट पाहत कंटाळले होते. गांधीजी त्यांना म्हणाले, " आता या वयात कशाला पाहिजे एवढा नट्टापट्टा ? कोण तुमच्याकडे पाहणार आहे ? "
तेव्हा रवींद्रनाथांनी दिलेले उत्तर अतिशय सुंदर आणि त्यांची सौंदर्यदृष्टी स्पष्ट करणारे आहे. ते म्हणाले, " कोणी पाहणार आहे म्हणूनच आपण सुंदर राहायचे का ? आपण सुंदर राहिलो तर आपल्या मनाला तर चांगले वाटतेच पण समोरच्या पाहणाऱ्या व्यक्तीलाही आनंद होतो. मी अस्वच्छ राहिलो, कुरूप राहिलो तर त्यामुळे समोरची व्यक्ती प्रसन्न होणार नाही. तिच्या मनाला दुःख होईल. माझ्या मते कुरूपता म्हणजे हिंसा आणि सुंदरता ही अहिंसा ! आयुष्यभर अहिंसेचे पुजारी राहिलेल्या गांधीजींनी कुरूपता म्हणजे हिंसा आणि सौंदर्य म्हणजे अहिंसा अशी आगळीवेगळी हिंसा आणि अहिंसेची व्याख्या प्रथमच ऐकली असावी. नुसतेच सत्याचे उपासक असण्यापेक्षा ' सत्यम शिवम सुंदरम ' चे उपासक असणे कधीही चांगले हेच जणू रवींद्रनाथांना त्यांना सांगायचे होते.
पं शिवकुमार शर्मा यांनीही आयुष्यभर ' सत्यम शिवम सुंदरम ' ची उपासना केली. ' शिव ' तर त्यांच्या नावात होतेच ! शिव आणि हरी ( हरिप्रसाद चौरासिया ) एकत्र आले तेव्हा अतिशय सुंदर सुमधुर चित्रपट संगीत प्रकटले. अनेक चित्रपटातून हा ' सिलसिला ' शास्त्रीय संगीताचे रूप घेऊन रसिकांपुढे आला आणि रसिकांना तो प्रचंड आवडला. आणि शिवकुमारजींच्या संतूरबद्द्दल तर काय बोलावं ! ज्याच्यातून शास्त्रीय संगीत निघणे शक्य नाही अशा संतूर या तंतुवाद्याला जागतिक स्तरावर त्यांनी शास्त्रीय संगीताचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. संतूर हे वाद्य ' सुफियाना मौसिकी ' म्हणजे सुफी पंथात ईश्वराची साधना करण्यासाठी वापरले जायचे. त्यालाच ' शततंत्र वीणा ' असेही मूळ नाव होते त्याला पंडितजींनी जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. संगीताच्या रक्तात असलेल्या ईश्वरी देणगीला त्यांनी अखंड साधनेची जोड दिली. म्हणूनच हे यश ते मिळवू शकले. आपल्या यशाबद्दल बोलताना ते जे म्हणतात ते सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखे आहे.
ते म्हणतात, " तुमच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचे काय असेल, तर ते आहे अपयश. कारण त्यामुळेच तुमचा प्रवास यशाकडे सुरु होतो. " कोणतीही माणसे उगाचच मोठी होत नाही. अपयशाने निराश न होता, खचून न जाता आपली वाटचाल सुरु ठेवायची असते. आपले ध्येय कधीही दृष्टीआड होऊ द्यायचे नाही हेच पं शिवकुमारजी जणू आपल्याला सांगतात.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१३/०५/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा