मुख्य सामग्रीवर वगळा

जागते रहो...

उगवतीचे रंग 

जागते रहो... 

आजकाल आपण सगळे बाजारू संस्कृतीच्या विळख्यात सापडलो आहोत. सकाळी उठल्यावर हातातल्या वृत्तपत्रापासून ते बाहेर कुठेही पडलो तरी विविध प्रकारच्या जाहिराती आपल्या डोळ्यासमोर नाचत असतात. जरा विरंगुळा म्हणून टीव्ही लावला तरी विविध चॅनल्सवर विविध प्रकारच्या जाहिराती आपल्या कानीकपाळी आदळतात. आणि तुम्हाला आम्हाला जे काही हवं असतं ते या जाहिरात नामक मायाजालात हरवून जातं. तुमची आणि आमची या प्रकारातून सुटका होण्याचा काही मार्ग दिसत नाही. मला वाटतं त्यासाठी विरक्ती पत्करून वनातच जायला लागेल. पण गंमत अशी की तिथेही या जाहिराती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपला पाठलाग करतीलच. 

डोक्यात एक मजेदार कल्पना आली की रामायण काळात इंटरनेट आणि जाहिराती असत्या तर...! काही गमतीदार बोर्ड वाचायला मिळाले असते. येथे शबरीची बोरे मिळतील. ( येथे शेगावची कचोरी मिळेळच्या धर्तीवर ), गुहकाच्या नौकेतून करा प्रवास ! समुद्रावर सेतू बांधू शकणारे नल , निल आदी तंत्रज्ञ उपलब्ध ! संपर्क जांबुवंतराव. येथे रामायणातील गोष्टींचा उपहास करणे हा उद्देश नाही. पण खरोखरोच पूर्वीचे जनजीवन किती सुखी होते याची खात्री त्यावरून पटते. पूर्वीच्या काळी जाहिरातबाजी नव्हती. लोक निष्ठेने आणि श्रद्धापूर्वक आपली सेवा प्रदान करत होते. कोणतीही गोष्ट विकाऊ नव्हती. म्हणूनच रामायणातील पात्रे ही संस्काराची पाठशाळा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तरी दुसरे काय होते ? लोकांची महाराजांवर अपार श्रद्धा होती. त्यातूनच जीवाला जीव देणारी माणसे त्यांना मिळाली. पण जसजसा काळ बदलत गेला, तसतशी माणसे आणि निष्ठाही बदलत गेल्या. वस्तूंप्रमाणेच माणसेही प्रलोभनाच्या आमिषाने विकाऊ झाली. जमिनीसाठी, राज्यासाठी, संपत्तीसाठी लोकांनी आपल्या निष्ठा विकल्या. 

आमचे टीव्ही चॅनेल्सवाले तर लोकांना बनवण्यात भलतेच वस्ताद ! एखाद्या सतरा अठरा वर्षांच्या मुलीला आई बनवून टाकतात. ती खरं तर कॉलेजला जाणारीच कोणीतरी तरुणी असते. मग ती दिसल्यावर ' कोणत्या कॉलेजात जातेस ? कॉफी प्यायला येणार का वगैरे बाष्कळ प्रश्न विचारले जातात. तेवढ्यात ' मम्मी ' म्हणून हाक येते. आपल्याला समोर दिसणारी कॉलेजची तरुणी ही दिसते तशी नसून एक आई असल्याचा साक्षात्कार होतो. एवढी तरुण आणि सुंदर आई दिसू शकते ? होय, हे जाहिरातीत शक्य असते. तुम्ही अमुक एक प्रकारचा साबण वापरला की तुम्ही तशा दिसणार. पण जी कार्टी अशा जाहिराती पहात असतात त्यांना नकळत जाहिरातीतल्या आईची तुलना आपल्या आईशी करावीशी वाटते. आपली आई जर दिसायला सुंदर नसेल तर उगीचच त्यांना आपली आई मागासलेली वगैरे वाटू शकते. एक प्रकारे आपल्या संस्कृतीवर जाहिरातींनी घातलेला हा घालाच आहे. पारंपरिक शिकेकाईच्या वापराने पूर्वी केसांची उत्तम निगा राखली जात असे. त्याची सर आता विविध केमिकल्सचा वापर करून बनवलेल्या शाम्पूना कशी येणार ? एखादी मुळातच लांब आणि सुंदर केस असलेली नवयौवना जाहिरातीसाठी निवडून शाम्पूची जाहिरात करायची हा या जाहिरात कंपन्यांचा फंडा. यातून सर्वसामान्यांना मात्र मूर्ख बनवले जाते.  विविध क्रीमच्याअशाच प्रकारच्या जाहिराती  गोरे होण्यासाठी, रंग उजळ होण्यासाठी म्हणून केल्या जातात.  

परवा मला माझे एक डॉक्टर मित्र भेटले. ते म्हणाले आपण पूर्वी सातूचे पीठ खात होतो. त्यात अमुक एक इतकी पोषक द्रव्ये आहेत. त्यात फायबर आहे. ते शक्तिवर्धक आहे. मी पण लहानपणी आईने करून दिलेले सातूचे पीठ बऱ्याच वेळा खाल्ले आहे. त्याची मजा काही औरच होती. सातूच्या पीठाने पोटाचे अनेक त्रास जसे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता इ कमी होतात. पचनशक्ती वाढते. पण हल्ली ' दोन मिनिटात मॅगीच्या जमान्यात ' सातूच्या पिठाला विचारतो कोण ? कोणत्याही लहान मुलाला विचारले की तुला सातूचं पीठ देऊ की मॅगी किंवा नूडल्स, तर ते पोर मॅगी किंवा नूडल्सच सांगेल. दोष त्याचा नाहीच. त्याला आम्ही लहानपणापासून सातूचं पीठ म्हणजे काय ते कधी सांगितलेच नाही. ते आपलं टीव्हीवरच्या जाहिराती पाहतच मोठं झालं. मग द्या त्याला कुरकुरे, मॅगी किंवा नूडल्स ! 

आजच्या या जमान्यात तुम्ही सकाळी उठल्यावर दात घासण्यासाठी कोणते मंजन, टूथपेस्ट, ब्रश वापरावा इथपासून तर तुम्ही झोपेपर्यंत विविध प्रकारच्या जाहिराती तुम्हाला पाहाव्या लागतात. एखादी अनाहूत व्यक्ती जर गेटवर आली तर तुमच्या हौसिंग सोसायटीचा वॉचमन तिला अडवू शकतो. कुणी तुमच्या दारावरची बेल वाजवली तर त्याला आत प्रवेश द्यायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता पण जाहिरातींचे असे नाही. त्या तुमची परवानगी न घेताच  तुमच्या जीवनात ढवळाढवळ करतात. तुम्ही अमुक एक वस्तू वापरावी हे त्या ठरवतात. कशाची जाहिरात करावी याला काही मर्यादा ? अगदी अंतर्वस्त्रापासून ते बाह्य पोशाखापर्यंत आणि चहापासून दारूपर्यंत. कसलाच धरबंध नाही. ' अमूल  मॅचो, बडे आरामसे...' ही अंतर्वस्त्रे तुम्ही एकदा परिधान केली की कठीणातील कठीण कामे सहज होऊन जातात. ते पुरुषार्थाचे जणू लक्षण !मग तुम्ही गुंडांचा मुकाबला करू शकता, प्रसंगावधान किंवा चातुर्य दाखवून समोरच्याला सहज इम्प्रेस करू शकता. 

सध्या टीव्हीपासून ते वर्तमानपत्रापर्यंत सगळीच समाजमाध्यमे जाहिरातींनी भरलेली आहेत. टीव्हीवर कोणताही कार्यक्रम लावा. जाहिरातींचा भडीमार असतो. बऱ्याच वेळा अशा जाहिरातींनी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाचे गांभीर्य निघून जाते. शीतपेये, साबण, शाम्पू, केसांची तेले, टूथपेस्ट आदींच्या जाहिरातींनी कार्यक्रम व्यापलेला असतो. क्रिकेट आदी खेळांच्या सामन्यात बकार्डी, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज इ. च्या जाहिराती दाखवल्या जातात. या जाहिराती सोडा, मिनरल वॉटर इ च्या म्हणून दाखवल्या जातात. त्या नेमक्या कशाच्या असतात हे सूज्ञांस सांगावे लागत नाही. त्याचप्रमाणे पान, सुपारीच्या नावाखाली चक्क गुटख्याच्या जाहिराती केल्या जातात. मोठमोठे सेलिब्रेटी, नटनट्या, खेळाडू यांनी ही जाहिरात केली म्हणजे ती सर्वसामान्य लोकांना सहजपणे भुलवू शकते. 

जाहिराती आपल्या मनामध्ये एखाद्या नैसर्गिक गोष्टीविषयी तिटकारा उत्पन्न करून त्यांचे उत्पादन आपल्याला वापरण्यास भाग पाडतात. उदा. अंगाला येणारा घामाचा वास ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. त्याला या जाहिराती घामाची दुर्गंधी म्हणून दाखवतात. मग एखाद्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या अंगाला घामाचा वास येत असेल तर त्याचे किंवा तिचे मित्रमैत्रिणी तिला टाळताना दाखवतात. त्यांनी डिओडरंट वापरले की ते पुन्हा आपल्या मित्रमैत्रिणींना प्रिय होतात. अशा रीतीने कंपन्या लोकांना आपले उत्पादन वापरण्यास भाग पडतात. सिगारेट किंवा दारूची जाहिरात ते सिगारेट किंवा दारूची म्हणून करत नाहीत. त्याला तुमच्या निवडीच्या स्वातंत्र्याशी जोडतात. तुम्हाला निवडीचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही हे निवडा आणि आपली प्रतिष्ठा, चोखंदळपणा दाखवून द्या असे त्या मनावर ठसवतात. एखादी गोष्ट खोटी असली तरी ती अनेकदा सांगितली की खरी वाटायला लागते. जाहिरात करणाऱ्या कंपन्यांजवळ अफाट पैसा असतो. त्या जोरावर सगळ्यात उत्तम प्रतिभावान लोकांना नोकरीस ठेवून त्यांच्याकडून आपले हेतू साध्य करून घेतात आणि आपले उत्पादन लोकांच्या माथी मारतात. 

वर्तमानपत्रे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. वर्तमानपत्रांची भूमिका समाजात जागल्याची असते. तशी ती असावी. वर्तमानपत्रांच्या संपादकांवर ही मोठी जबाबदारी असते. पण हल्ली वर्तमानपत्रे ठराविक गटाच्या किंवा भांडवलशहांच्या  हाती गेली आहेत. जाहिराती हा वर्तमानपत्रांच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. त्यावरच ती चालतात. आता संपादकांची भूमिका जणू दुय्यम झाली आहे. इतर अनेक मॅनेजर किंवा नोकरांप्रमाणे संपादक हाही एक मॅनेजर झाला असून त्याला आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते. जाहिराती देणाऱ्यांची मनधरणी करावी लागते. ज्या उत्पादनाच्या जाहिराती त्यांच्या पेपरमध्ये छापल्या जातात, त्यांच्याविरुद्ध त्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नाही. थोडक्यात म्हणजे टीव्ही चॅनेल्स काय किंवा वर्तमानपत्रे काय जाहिरातदारांची मिंधे झाली आहेत. अशा परिस्थितीत वर्तमानपत्रांनी टिळक आगरकरांसारखी पत्रकारिता करावी अशी अपेक्षा ठेवताच येऊ शकत नाही. जेव्हा वर्तमानपत्रे कोणाची दबलेली नसतात तेव्हाच एखादे टिळक ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ' असा खणखणीत प्रश्न विचारू शकतात. 

तात्पर्य, म्हणजे या जाहिरातींच्या मायावी विळख्यात आपण सगळे पुरते अडकले आहोत. म्हणून सावध राहणे आवश्यक आहे. मला काय हवे नको ते मी ठरवणार अशी आपली भूमिका असायला हवी. जे मला नको आहे, जी गोष्ट माझ्यासाठी अनावश्यक आहे ती मी माझे कष्टाचे पैसे खर्चून का घ्यावी ? मला माझ्या पैशाचा अधिक चांगला विनियोग करता येणार नाही का ? केवळ जाहिरातीत दाखवली जातात म्हणून आरोग्यास हानिकारक उत्पादने, पेये, खाद्यपदार्थ, वस्तू मी वापरणार नाही हे आपण ठरवणे आवश्यक आहे. यात आपल्या कुटुंबाचा आणि देशाचा विचारही अग्रक्रमाने व्हावा. तेव्हा अशा या वातावरणात ' जागते रहो..' असे सांगून एकमेकांना सावध करणेच आपल्या हाती आहे. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

०५/०५/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )










 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...