मनोगत : अष्टदीप या पुस्तकासाठी
आपला भारत देश म्हणजे नररत्नांची खाण आहे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी वेचले पण ते करताना देशहित, समाजहित आणि अखिल मानवजातीचे हित नजरेआड होऊ दिले नाही अशी असंख्य नररत्ने आपल्या देशात जन्मली. आपल्या दीर्घोद्योगाने, सततच्या अखंड प्रयत्नाने त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली. भारतमातेच्या गळ्यातील मोतीहारातले हे सगळे तेजस्वी मोतीच ! आज यशोशिखरावर पोहोचल्यानंतर सगळ्यांना या मंडळींचे यश दिसते. त्यांची प्रसिद्धी दिसते. पण त्यासाठी त्या पदापर्यंत पोहोचताना त्यांना किती कष्ट पडले असतील याची कल्पना फारच थोड्याना असते.
कोणतेही यश हे कधीच एकाएकी मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नांच्या पायघड्या घालाव्या लागतात. निराश न होता अखंड परिश्रम करावे लागतात. जिद्द, एकाग्रता, साहस, धैर्य, चिकाटी, संयम, सहनशीलता यासारख्या गुणांचा कस यावेळी लागतो. असं म्हटलं जातं की स्वप्न तीच असतात की जी जागेपणी पाहिली जातात. त्याच स्वप्नांचा पाठपुरावा आयुष्यभर जिद्दीने करावा लागतो. मग झोपेतही तीच स्वप्ने दिसतात. उद्दिष्ट एकदा निश्चित असले की त्याकडे जाण्याचा मार्गही आपोआप गवसत जातो.
मराठी किंवा कोणत्याही भाषेच्या साहित्यात कथा, कादंबरी, नाटक, काव्य इ अनेक साहित्यप्रकार असतात. त्यात चरित्रे किंवा आत्मचरित्रे हाही एक प्रकार असतो. लहानपणी मला माझ्या वडिलांनी वाचनाची आवड लावली. ते मला बरीचशी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देत असत. त्यांनी आणलेल्या पुस्तकांचे मी मोठया उत्साहाने आणि आनंदाने वाचन करीत असे. ती माझ्यासाठी एक आनंदाची पर्वणीच असे. वडिलांनी आणलेल्या त्या पुस्तकात बऱ्याच वेळा चरित्रे किंवा आत्मचरित्रे यांचा समावेश असे. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख, संकटे ही तर असायचीच. पण आपण त्यांना न भिता सामोरे जायला हवे हे जर कुठे शिकायला मिळत असेल तर ते थोरांच्या चरित्रातून ! म्हणून मी अशी थोरामोठ्यांची चरित्रे वाचावीत हा माझ्या वडिलांचा आग्रह असायचा.
आली जरी कष्टदशा अपार। न टाकती धैर्य तथापि थोर।। केला जरी पोत बळेचि खाले। ज्वाला तरी ते वरती उफाळे।।
सुख असो की दुःख, संपत्ती असो की विपत्ती, यश मिळो वा अपयश, त्यांची ध्येयमार्गप्रत वाटचाल सुरूच असते. यशाने, सुखाने, संपत्तीने ते हुरळून जात नाहीत. त्यांचे पाय जमिनीवरच असतात. तसेच विपरीत परिस्थिती असतानाही ते आपल्या ध्येयापासून विचलित होत नाहीत. म्हणून तर असे म्हटले जाते की
थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा
आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा.
या पुस्तकात अशाच आठ प्रेरणादायी भारतरत्नांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न मी केला आहे. या सगळ्यांना आपल्या आयुष्यात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली नैतिक मूल्ये ढळू दिली नाहीत. निराश झाले नाहीत. आज एवढ्या तेवढया संकटाने खचून जाऊन आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या साऱ्यांनाच ही चरित्रे प्रेरणादायी ठरतील असा विश्वास वाटतो.
स्त्रियांच्या उद्धारासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेले प्रयत्न आणि घेतलेले अपार कष्ट पाहिले तर आपण अक्षरशः नतमस्तक होतो. विधवा स्त्रियांचं नरक झालेलं जिणं सुसह्य करण्यासाठी, अनाथ आणि परित्यक्त स्त्रियांना आपले स्थान मिळवून देण्यासाठी, त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी आणि मुलींच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी अक्षरशः रक्ताचे पाणी केले. आपल्या सुखावर, घरावर तुळशीपत्र ठेवले.
सर विश्वेश्वरैय्या यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. वडिलांचे अचानक निधन झाल्याने मोठेच आर्थिक संकट त्यांच्या कुटुंबावर ओढवले. मामांकडे राहून त्यांना आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. पुढे मानसमान, पदे चालून आली तरी त्यांच्या आईवडिलांनी, गुरुजनांनी दिलेले संस्कार एवढे प्रभावी होते त्यांनी की आपले नैतिक अधिष्ठान, चारित्र्य कोणत्याही परिस्थितीत ढळू दिले नाही. त्यांनी उभी केलेली कामे आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. इंग्रज अधिकारीही देखील त्यांच्या कामाबद्दल त्यांची प्रशंसा करीत.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अखंड भारतासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा केली नाही. मैलोनमैल खेडोपाडी अक्षरशः वणवण फिरले. तहान भूक विसरून अखंड भारतासाठी त्यांनी जे अजोड कार्य केले त्याची तुलना अन्य कोणाशीही वा कोणत्याही कार्याशी होऊ शकत नाही. आपापसात भांडणारी, विखुरलेली आणि पुढे देशाच्या एकतेला धोका ठरू शकली असती अशा जवळपास ५६५ संस्थानांचे देशात विलीनीकरण करून त्यांनी भारतीय स्वातंत्र्याला एक नवा आयाम प्राप्त करून दिला. त्यांच्या या महान कामगिरीमुळे भारतीय स्वातंत्र्याचा आणि पंडित नेहरूंचा पुढील मार्ग सुकर झाला.
जे आर डी टाटांनी टाटा उद्योगसमूहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. उद्योगाचा विकास तर केलाच पण ते करताना देशहिताला यत्किंचितही बाधा येणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली. इतर उद्योगपतींना त्यांनी आपल्या वागणुकीने आदर्श घालून दिला. माणसाची पारख कशी करावी, त्यांच्यात देशभक्तीची आणि आपल्या कामाप्रती निष्ठेची भावना कशा प्रकारे वाढीस लावावी याचे मूर्तिमंत आदर्श उदाहरण म्हणजे जे आर डी. या दृष्टीने हा एक प्रकारे मूर्ती घडवणारा शिल्पकार होता. डोंगराएवढ्या उंचीची माणसे जे आर डींनी उभी केली. या माणसांची एक भक्कम फळी निर्माण केली. प्रसंगी सरकारला लागेल ती माहिती आणि मनुष्यबळ पुरवण्याची त्यांची क्षमता होती. उद्योग हे फक्त नफा कमावण्यासाठीच नसून समाजासाठी, देशासाठी त्यांची बांधिलकी महत्वाची आहे याची जाणीव जे आर डींनी सरकारसह सर्व उद्योगपतींना करून दिली.
पंडित नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्यावर जबाबदारी आली. शारीरिक उंची भलेही कमी असेल पण कर्तृत्व, नेतृत्व आणि उज्ज्वल चारित्र्य या सगळ्या गोष्टींची हिमालयाएवढी उंची शास्त्रीजींजवळ होती. त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. रेल्वेमंत्री म्हणूनही काम करताना घडलेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारो स्वीकारून त्यांनी राजीनामा देऊन एक वेगळा आदर्श लोकांसमोर ठेवला. पंतप्रधानपदी काम करताना अनेक महत्वाचे आणि लोकहिताचे निर्णय घेतले. १९६५ मध्ये पाकिस्तानचे आक्रमण समर्थपणे परतवून लावले.
कविहृदयाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे तर एक अजातशत्रू व्यक्तिमत्व. निर्मळ, शुद्ध चारित्र्य आणि सहृदय असलेले अटलजी प्रसंगी ' भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी...' अशा कणखर व्यक्तिमत्वाचे धनी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करताना अटलजी पायी, सायकलवर उन्हातान्हात फिरले. जेवणाची पर्वा केली नाही. मिळेल ते खाल्ले. कधी उपासही सहन केले. त्यांच्यासाठी देशनिष्ठा सर्वतोपरी होती. अटलजींच्या देशभक्तीने भारलेल्या कविता आणि जोशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे.
बालपणीच आपल्या वडिलांचे म्हणजे मास्टर दीनानाथांचे छत्र हरपल्यानानंतर कुटुंबाची जबाबदारी अगदी कोवळ्या वयात लता मंगेशकरांवर पडली. त्यांनी ती तर समर्थपणे पार पाडलीच पण आपल्या वडिलांना दिलेला शब्द खरा केला. सगळ्या मंगेशकर भावंडांनी गायनकलेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. लतादीदी तर मिळेल तेथून शिकत गेल्या. अखेरपर्यंत त्यांची ही नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती कायम होती. यातूनच त्यांचे समृद्ध व्यक्तिमत्व घडत गेले. ' मी कोणत्याही क्षेत्रात गेले असते तरी त्या क्षेत्रातली लता मंगेशकरच झाले असते...' या त्यांच्या उद्गारात आत्मविश्वास काठोकाठ भरलेला आहे. गानसम्राज्ञी या सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या लतादीदींची इच्छा पुढील जन्मीही संधी मिळाली तर शास्त्रीय संगीतच शिकण्याची आहे.
या पुस्तकासाठी सिद्धहस्त लेखक, ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेले आदरणीय लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रस्तावना लाभली हे मी माझे भाग्य समजतो. ते आपल्या कामात आणि लेखनात अतिशय व्यस्त असताना माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून देण्यासाठी त्यांनी वेळ काढला. त्यांचे ऋण कोणत्या शब्दात व्यक्त करू ? विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारे हे माझे तिसरे पुस्तक. विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे सीईओ विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे, सहसंपादक संदीप तापकीर, त्यांच्या सहकारी असलेल्या पूनम बैचे, चैताली नाचणेकर, प्रीता कानिटकर या सर्वांच्या अमूल्य सहकार्यामुळे हे पुस्तक या सुंदर स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवणे शक्य झाले. या पुस्तकासाठी प्रथमेश नाझरकर याने अत्यंत देखणे मुखपृष्ठ तयार करून दिले. या सर्वांचा मी ऋणी आहे. माझी पत्नी सौ श्रद्धा आणि घरातील सर्व सदस्यांचे सहकार्य नेहमीप्रमाणे आहेच.
ही आठ महान व्यक्तिमत्वे म्हणजे जणू दीपस्तंभच ! अखंड प्रेरणा आणि प्रकाश देणारी. म्हणूनच या पुस्तकाचे नाव अष्टदीप ! या अष्टदीपांनी केलेल्या कार्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी यथामती यथाशक्ती केला आहे. त्यात आपल्याला काही चांगले आढळले तर ते श्रेय या महान व्यक्तिमत्वांचे ! या अष्टदीपांनी आपलाही जीवनमार्ग उजळून निघो ही मनोकामना.
विश्वास देशपांडे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा