' आनंदाच्या गावा जावे ' या पुस्तकासाठीचे मनोगत
माझ्या ललित लेखांवर आधारित विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारे हे चौथे पुस्तक. या मनोगतात सर्वात आधी मी माझ्या लिखाणावर प्रेम करणाऱ्या सर्व वाचकांना उदंड धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांनी वेळोवेळी दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळेच माझे लिखाण मी सुरु ठेवू शकलो.
' आनंदाच्या गावा जावे ' या पुस्तकात आपल्याला विविध विषयांवर आधारित असे चाळीस लेख वाचायला मिळतील. प्रत्येकाच्या जीवनात संकटं आणि दुःख तर पाचवीला पुजल्यासारखी असतातच. पण ती पचवूनही इतरांसाठी आनंदाचा गाव उभा करणाऱ्या राहुल देशमुख, अविनाश आणि नंदिनी बर्वे हे दाम्पत्य, ज्या गोष्टी शिकण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील अशा गोष्टी एकाच जन्मात शिकणाऱ्या डॉ शारदा बापट, भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ अभिजित सोनवणे या सगळ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या कथा आपल्याला प्रेरणा देतील. ' अनंत अमुची ध्येयासक्ती ' या लेखातून स्वतः अंध असणाऱ्या पण डोळसांनाही लाजवेल असे कार्य करणाऱ्या सेब्री टेंबरकेन यांच्या असामान्य जिद्दीची कहाणी आपल्याला वाचायला मिळेल. स्वतः ऊन, वारा, पाऊस झेलून इतरांसाठी सावली, आश्रय देणाऱ्या आधारवडासारखीच ही माणसे.
या पुस्तकात आपल्याला रामदास सराफ, माळी गुरुजी यांच्यासारखी सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वे ' एक आधुनिक रामदास ' , ' जैसी गंगा वाहे...' यासारख्या लेखातून वाचायला मिळतील. ' देगा उसका भला ' या लेखात दारावर भिक्षा मागण्यास येणाऱ्या एका फकिराचे चित्रण आपल्याला खूप काही सांगून जाईल. या पुस्तकातील ' ध्येयनिश्चितीच्या मार्गावर ' आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्या सर्वांना उपयोगी आणि मार्गदर्शक होईल अशी खात्री आहे. इतरही अनेक विषयांवर आपल्याला भावतील आणि आनंद देतील अशा प्रकारचे लेख या पुस्तकात आपल्याला आढळतील. सगळ्याच लेखांबद्दल या ठिकाणी सांगण्यापेक्षा आपली उत्सुकता कायम ठेवून आपण ते सगळे लेख मुळातूनच वाचावे अशी नम्र विनंती. माझे हे पुस्तक या लेखांच्या रूपाने माझ्या सगळ्या प्रिय वाचकांना ' आनंदाच्या गावा जावे...' ची अनुभूती देईल असा विश्वास वाटतो.
या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी जी सुंदर प्रस्तावना लिहून दिली त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. वाढत्या वयानुसार येणाऱ्या शारीरिक समस्या असतानाही त्यांनी माझ्यासाठी वेळ देऊन ही अनुभवसिद्ध हातांची, शब्दांची प्रस्तावना लिहिली त्यांचे ऋण शब्दात कसे व्यक्त करता येईल ? मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो.
विश्वकर्मा प्रकाशनाचे हे माझे चौथे पुस्तक. विश्वकर्मा प्रकाशनाचे सीईओ विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे, सहसंपादक संदीप तापकीर, पूनम बैचे, प्रीता कानिटकर, चैताली नाचणेकर आदी सर्वानी मला सहकार्य केले असे म्हणण्यापेक्षा सोनी सरांच्या शब्दात सांगायचे तर माझ्या लेखनावर प्रेम करणारी ही माणसे आहेत. त्यांनी माझे नेहमीच प्रेमाने आणि अगत्याने स्वागत केले आहे. प्रथमेश नाझरकर याने या पुस्तकासाठी अतिशय देखणे असे मुखपृष्ठ तयार करून दिले. त्याचेही मनापासून आभार. माझी गृहस्वामिनी सौ श्रद्धा, मुलगा, मुलगी, सून या सर्वांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन आणि मदत दिल्यामुळेच हा लेखनप्रपंच सांभाळता आला.
विश्वास देशपांडे, चाळीसगाव

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा