उगवतीचे रंग
ये दिल मांगे ( नो ) मोअर...
दृश्य एक
भारतातील कोणत्याही राज्यातील कुठलंही एक छोटंसं खेडं. दिवस उन्हाळ्याचे. तोंडाला कोरड पडलेली. जीव पाणी पाणी करतोय. घरून आणलेलं बाटलीतलं पाणी संपलंय किंवा गरम झालंय. तुम्हाला हवंय थंडगार पाणी. जवळच्या हॉटेलात तुम्ही पाण्यासाठी जाताय. हॉटेलवाला सांगतोय गार पाणी नाही साहेब. त्या गावातल्या लोकांना पिण्याचं पाणी मिळायची मारामार आहे. गावातील स्त्रिया लांबून कुठून तरी एक दीड किमी वरून पाणी आणतात. पण त्या हॉटेलवाल्याच्या फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आहेत. बिसलरी किंवा कुठला तरी पाण्याचा लोकल ब्रँड. त्याशिवाय कोका कोला, थम्स अप, पेप्सी, स्प्राईट इ. शीतपेयांनी फ्रिज भरलेला आहे. बाईकवर बसून दोन जण येतात. कोका कोलाची बाटली विकत घेऊन तोंडाला लावतात.
दृश्य दोन
कोणत्याही मोठया शहरातील पिझ्झा, बर्गर वगैरे मिळते असे ठिकाण. तरुणाईची गर्दी. निरनिराळ्या प्रकारचे पिझ्झा, बर्गर वगैरे ऑर्डर केलेले. पाणी कुठेही मिळत नाही. पाण्याची काही सोयच नाही. फ्रिजमध्ये देखील निरनिराळ्या प्रकारचे फक्त कोल्ड्रिंक्स. मंडळी पिझ्झा बर्गर इ खाताहेत आणि सोबत पाण्याऐवजी कोल्ड्रिंक्स. माझ्यासारखी एखादी व्यक्ती केवळ मुलांच्या आग्रहाखातर प्रथमच तिथे आलेली. तिथे पाणी मिळत नाही आणि पाण्याऐवजी कोल्ड्रिंक घ्यायचं हे पाहून धक्काच बसतो.
दृश्य तीन
लहान मुलांसाठी कुठल्या तरी संस्थेने नाटक, सिनेमा यासारखा कार्यक्रम मजबूत पैसे वसूल करून आयोजित केलेला आहे. या ठिकाणी मध्यंतरात मुलांसाठी कोल्ड्रिंक्सची सोय. ते पाहून सुरुवातीला मुले आणि पालक दोघेही खुश. एका मुलाच्या बाटलीत मेलेले झुरळ निघते. नंतर त्या बाटल्यांची तपासणी होते. त्यामध्ये कीटकनाशकांचे अंश आढळतात.
दृश्य चार
घराघरात टीव्हीसमोर बसलेली मुले. छोट्या पडद्यावर शाहरुख खानची टेस्ट द थंडर असे सांगणारी जाहिरात लागलेली. शीतपेयाची बाटली तोंडाला लावतो आणि मग दिसतात ते त्याने केलेले स्टंट. ते शीतपेय पिऊन जी शक्ती, उत्साह आला त्यामुळेच अशा प्रकारचे स्टंट तो करू शकतोय हा उघड उघड संदेश यातून जातोय. तिथे खाली बारीक अक्षरात भलेही दाखवू द्यात की ही दृश्ये तांत्रिक करामतींचा वापर करून चित्रित करण्यात आली आहेत. असे करण्याचा प्रयत्न करू नये. पण त्याकडे कोण लक्ष देईल ? किंबहुना द्यावे अशी अपेक्षाच नसते. ______________________________________________________
अशी अनेक दृश्यं आपल्या सभोवताली घडताना आपण पाहत असाल. कोट्यवधी रुपये खर्चून शीतपेयांच्या जाहिराती तयार केल्या जातात. चित्रपटसृष्टीतील मोठमोठे नट, नट्या, क्रिकेटपटू यांच्याकडून अशा जाहिराती करवून घेतल्या जातात. सलमान खान, शाहरुख खान, अनुष्का शर्मा, अमीर खान, रणबीर कपूर, ऐश्वर्या राय, हृतिक रोशन, अलिया भट्ट, करीना कपूर या सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी शीतपेयाची जाहिरात केली आहे. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, कपिल देव यांनीही शीतपेयाची जाहिरात केली होती. ' यही हैं राईट चॉईस बेबी...' असेच ते सांगत होते. धोनी, बुमराह सारख्या क्रिकेटपटूंनी शीतपेयांच्या जाहिरातीत भाग घेतला आहे. त्यांना या जाहिराती करण्याबद्दल लाखो रुपये मिळतात. आपल्याला काय मिळते ? उलट ही शीतपेये तुमच्या आमच्या खिशातून अलगदपणे पैसे काढून घेतात आणि त्या जोडीला आरोग्याचीही अपरिमित हानी करतात.
मल्टिप्लेक्सच्या, मॉल्सच्या जमान्यात कोकाकोला, पेप्सी आपली पेयं अनेक मल्टिप्लेक्स मालकांना नाममात्र किमतीत देत असताना, ते ही पेये ग्राहकांना वाटेल त्या किमतीला विकतात. घरून नेलेलं पाणी चालत नाही, तिथलंच बाटलीबंद पाणीच विकत घ्यावं लागतं. बायकांच्या पर्समध्येही हात घालून सिक्युरिटीज पाण्याची बाटली तर आणली नाही ना, हे तपासतात. हॉटेलमालकांना किंवा किराणा दुकानदारांना बऱ्याचदा शीतपेये ठेवण्यासाठीच फ्रिज त्या त्या कंपन्यांनी दिलेला असतो. प्रसंगी त्याचं विजेचं बिलही या कंपन्या भरतात. असे असूनही हे दुकानदार पेये थंड करण्यासाठीचे जादा पैसे ग्राहकांकडून आकारतात. छापील किमतीपेक्षा जास्त किंमत आकारायची नाही, असा नियम फक्त कागदावरच असतो. आपली फसवणूक होते आहे, असं आपल्याला वाटत नाही. रस्त्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी घेतल्यावर रुपया दोन रुपयांसाठी वाद घालणारे आपण शीतपेयं मात्र निमूटपणे दुकानदार सांगेल त्या किमतीला घेतो.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आली तरी देशवासियांना आपण शुद्ध पिण्याचे पाणी पुरवू शकलो नाही. अनेक ग्रामीण भागातील जनता आज तहानलेली आहे. अनेक ठिकाणी आमच्या भगिनी एक दीड किमी वरून पायपीट करून पाणी आणतात. बऱ्याच ठिकाणी विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे. तिथे जीव धोक्यात घालून पाणी भरावे लागते. अशी अनेक छायाचित्रे, व्हिडीओज आपण पाहत असतो. क्षण दोन क्षण हळहळतो आणि नंतर तो विषय सोडून देतो.
आजकाल बाहेर जेवणाची मोठी लाट आली आहे. मोठमोठ्या शहरात तर सुटीच्या दिवशी जेवणासाठी रांगा असतात. लोक मोठ्या गर्दीतून प्रवास करून तिथे पोहोचतात. तिथे पोहोचल्यावर पाहावे तर गाड्यांचे पार्किंग फुल्ल. गाडी कुठेतरी दूर पार्क करून नंबर लावून जेवायला मिळेतोपर्यंत कोण दमछाक होते ! वेटरने एकदा आपले नाव पुकारले आणि कोपऱ्यातील टेबलाकडे अंगुलीनिर्देश केला की आम्ही धन्य ! मग सुरुवात पाण्यापासून होते. आम्ही ऐटीत बाटलीबंद पाणी मागवतो कारण हॉटेलात पुरवल्या पाण्यावर ते चांगले असेलच यावर आमचा विश्वास नसतो. जेवणाचे हजारो रुपये बिल आकारणाऱ्या हॉटेल्सची शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी नाही का ? प्रत्येक हॉटेलवाल्याने आपल्या ग्राहकांसाठी पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र बसवून त्यांना पिण्याचे पाणी मोफत द्यायलाच हवे असे मला वाटते. ग्राहक चळवळीतूनच ही गोष्ट साध्य होऊ शकेल.
पण आज मला तुमच्याशी बोलायचं आहे ते प्रामुख्याने शीतपेयांच्या वाढत्या वापराबद्दल. या लेखाच्या सुरुवातीला मी जी दृश्ये दाखवली आहेत, त्यातून शीतपेयांचा वाढता वापर आणि त्याला मिळत असलेली समाजमान्यता लक्षात येते. आज जी शीतपेये जाहिरात करून अतिशय चांगली, प्रतिष्ठेची असल्याचे भासवले जाते, ती प्रत्यक्षात आपल्या आरोग्यवर फार भयंकर परिणाम करणारी आहेत. थम्स अप, कोका कोला, फंटा, पेप्सी, स्प्राईट, माजा ही आणि इतर अनेक. ही सगळी शीतपेये एकमेकांची जुळी भावंडे आहेत. या सगळ्या शीतपेयांच्या दुष्परिणामाविरुद्ध सगळ्यात आधी आवाज उठवला तो स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार करणारे स्वर्गीय राजीव दीक्षित यांनी.
बऱ्याचशा शीतपेयांमध्ये फॉस्फरिक ऍसिड वापरले जाते. या ऍसिडचा वापर संडास साफ करणाऱ्या हार्पिक सारख्या टॉयलेट क्लिनर मध्ये केला जातो. थोडा वेळ आपण ते टॉयलेटमध्ये टाकून नंतर फ्लश करतो. संडास एकदम चकाचक. फॉस्फरिक ऍसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम इ चे प्रमाण बिघडते. आपल्या शरीरातून कॅल्शियम काढून घेऊन ही शीतपेये आपली हाडे ठिसूळ करतात. दातांची हानी करतात. अशी ही शीतपेये वारंवार घेतल्याने पोटातील नाजूक आतड्यांचे काय होत असेल याची नुसती कल्पना करणे सुद्धा अंगावर काटा आणते. या पेयांना आपण ' सॉफ्टड्रींक्स ' असा छान शब्द वापरतो. ही शीतपेये कोणत्याच अर्थाने सॉफ्ट वाटत नाहीत.
शीतपेयांमध्ये बीव्हीओ चा वापर केला जातो. बीव्हीओ म्हणजे ब्रोमिनेटेड व्हेजिटेबल ऑइल. ज्या शीतपेयांमध्ये फळांच्या स्वादाचा वापर केला जातो, अशा पेयांच्या टिकावूपणासाठी ब्रोमाइडचा वापर केला जातो. ब्रोमाइड या द्रव्याचा वापर अग्निशामक दलाकडून वापरल्या जाणाऱ्या पदार्थात आग विझवण्यासाठी केला जातो. बीव्हीओ युक्त पदार्थांचे अधिक सेवन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन स्मृतिभ्रंश, त्वचाविकार जडू शकतात असे अमेरिकेतील ' मेयो क्लिनिक ' च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
याशिवाय शीतपेयांमध्ये कॅफिन, कार्बन डाय ऑक्साईड, अल्युमिनियम इ घटकांचा वापर केला जातो. हे सगळे घटक आरोग्याच्या दृष्टीने घातकच आहेत हे आपण जाणतो. शिवाय बऱ्याचशा शीतपेयांमध्ये साखरेचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे शरीरात अनावश्यक प्रमाणात साखर जाते. बऱ्याच शीतपेयांमध्ये गोडी येण्यासाठी कृत्रिम स्वीटनर वापरले जाते. त्यामुळे वजनात, लठ्ठपणात वाढ होते. जास्त भूक लागते. त्यामुळे जास्त कॅलरीज आपल्याकडून घेतल्या जातात. शिवाय त्यातील कृत्रिम रंगांच्या वापरामुळे ऍलर्जी होऊन त्वचाविकारात वाढ होते. शीतपेये थंड राहावीत म्हणून त्यात इथिलिन ग्लायकॉलचा वापर करण्यात येतो. या रसायनाचा वापर कार कूलंट म्हणून केला जातो. शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास ते कॅन्सर सारखे आजार उत्पन्न करू शकते.
बरे या शीतपेयांची निर्मिती करणाऱ्या मोजक्या भारतीय कंपन्या सोडल्या तर बहुतेक कंपन्या विदेशी आहेत. या कंपन्या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना आणि देशांना आपले लक्ष करतात. या देशांतील अफाट लोकसंख्येमुळे या कंपन्यांना प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. राजीव दीक्षित यांनी एकदा आपल्या भाषणात सांगितले होते की दरवर्षी पेप्सी, कोका कोला या कंपन्यांच्या माध्यमातून पाच हजार सातशे कोटी रुपये भारतातून अमेरिकेत जातात. ही आकडेवारी साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची आहे. आजच्या घडीला त्यात प्रचंड वाढ नक्कीच झाली असणार. एवढा पैसा जर भारतातच खर्च केला तर भारत सरकार सगळ्या गावांना पिण्याचे शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवू शकेल.
शीतपेयाची निर्मिती करणाऱ्या या कंपन्या पर्यावरणारची देखील प्रचंड हानी करतात. मुळातच आपल्याकडे पाण्याची कमतरता. त्यातच या कंपन्या आपल्या उत्पादनासाठी जमिनीतल्या पाण्याचा प्रचंड उपसा करतात किंवा पाण्याच्या उपलब्ध स्रोतांचा भरमसाठ वापर करून नैसर्गिक साधनसंपत्तीचं शोषणच करतात.
आपल्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीत शीतपेयांची जागा घेऊ शकणारे अनेक पारंपरिक आणि आरोग्यवर्धक पर्याय उपलब्ध आहेत. उन्हाळ्यात आरोग्यदायी कैरीचे पन्हे, लिंबाचे सरबत, उसाचा रस, ताजे ताक, कोकम, आवळा इ पासून बनवलेली सरबते, शहाळ्याचे पाणी, फळांचे रस असे कितीतरी सुंदर पर्याय उपलब्ध आहेत. यातील बरीचशी पेये स्वस्तात घरी बनवता येतात. ती आरोग्यदायी तर असतातच शिवाय उन्हाळ्यात शरीरात कमी होणाऱ्या पाण्याची गरज भागवू शकतात. मग करणार ना यावर विचार ? निर्धार करू या मी भारतीय, भारतीय आरोग्यवर्धक पेयेच घेणार.
( लेखातील शास्त्रीय माहिती आंतरजालावरून मिळणाऱ्या माहितीवर आधारित )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३०/०४/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा