उगवतीचे रंग
हम बोलेगा तो...
' कसौटी ' या चित्रपटात अभिनेता प्राणच्या तोंडी एक गाणे आहे. ' हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हैं ...' किशोरकुमार या हरहुन्नरी गायकाने हे गाणे मोठे बहारदार म्हटले आहे आणि प्राण यांनी आपल्या अभिनयाने ते जिवंत केले आहे. या गाण्यात ' हम कुछ नही बोलेगा...' असे म्हणत तो बरेच काही सांगून जातो. प्रत्येक वेळेला सगळं बोललंच पाहिजे असं कुठे आहे ! कधी कधी मोजक्या शब्दांत तर कधी शांत राहण्यातही एक वेगळा आनंद असतो. तीही एक अभिव्यक्ती असते. प्रत्येक वेळी अभिव्यक्तीसाठी शब्दच हवेत असे नाही. आणखी एक छान गाणं हिंदी चित्रपटात आहे. ' कुछ ना कहो, कुछ भी ना कहो . ' अशा वेळी बोलण्याची आवश्यकताच नसते.
पण आपल्याकडे बोलणे हे एक व्यसन झाले आहे. बोलताना लोकांना आवरणे ही एक मोठीच कौशल्याची गोष्ट झाली आहे. अगदी संसदेपासून ते ग्रामपंचायतीच्या सभेपर्यंत आणि विविध संस्थांच्या वार्षिक सभांपासून ते गृहसंकुलांच्या वार्षिक सभांपर्यंत. ज्याला संधी मिळेल तो तावातावाने बोलत असतो. संधी मिळाली नाही तर ती घेतली जाते. माझेच म्हणणे कसे बरोबर, मला किती माहिती आहे...! असा एकूण बोलणाऱ्याचा आव असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मलाच सगळे कळते असा त्याच्या मनातला भाव असतो.
दूरदर्शनवर अनेक वेळा चर्चेसाठी अनेक वक्त्यांना किंवा राजकीय व्यक्तींना आमंत्रित करण्यात येते. त्यावेळी त्यांची हमरीतुमरीवर येऊन बोलण्याची पद्धत पाहिली की कुठून हा कार्यक्रम लावला असे होते. त्या टीव्हीवरील सूत्रसंचालकाचे काम या बोलणाऱ्यांना आवरणे हेच होऊन बसते. दुसऱ्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण झाल्याशिवाय आपण बोलू नये एवढा साधा संकेतही ही मंडळी पाळताना दिसत नाही.
बऱ्याचदा काही सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक वक्ते व्यासपीठावर आलेले असतात. त्यात एखाद्याच्या हाती माईक सापडला की तो आपल्या वाणीला विराम द्यायला तयारच नसतो. इतर वक्ते बिचारे चुळबुळत बसतात. या सगळ्यात जास्त पंचाईत कोणाची होत असेल, तर ती श्रोत्यांची. त्यांच्या हातात दोनच गोष्टी असतात. एक म्हणजे नको तेव्हा नको तिथे टाळ्या वाजवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शक्य असेल तर तिथून काढता पाय घेणे. या बाबत मागे वाचलेला एक विनोद आठवतो. एका वक्त्याचे भाषण सुरु असते. कंटाळून बरेच श्रोते निघून गेलेले असतात. शेवटी एक धिप्पाड व्यक्ती उठते आणि व्यासपीठाकडे जाऊ लागते. वक्ता क्षणभर घाबरतो, किंचित थांबतो तेव्हा ती व्यक्ती म्हणते, ' तुमचे चालू द्या. फक्त तुम्हाला इथे कोणी आणले ते मी शोधतोय...'
आपली जीभ साधारण सहा इंचाची. पण ही सहा इंचाची जीभ समोरच्या सहा फुटी माणसाला सहज गारद करू शकते एवढे सामर्थ्य तिच्यात आहे. पण हे भल्याभल्याना उमगत नाही. म्हणून आपल्याकडे ' जिभेवर ताबा ठेवा ' असा सल्ला दिला जातो. हा सल्ला दोन्ही अर्थांनी लागू होतो. आपले आरोग्य बिघडू नये म्हणून डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ आपल्याला जिभेवर ताबा ठेवा असे सांगतात. म्हणजेच आपल्याला सोसेल, मानवेल तेवढेच खा. कमी खा. हा त्याचा अर्थ असतो. दुसरा अर्थ म्हणजे कमी बोला किंवा योग्य तेच बोला. बऱ्याच ठिकाणी ' आपले म्हणणे थोडक्यात किंवा योग्य शब्दात सांगा ' अशी सूचना लिहिलेली असते.
मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या एकादशीला ' मौनी एकादशी ' म्हटले जाते. ही एकादशी त्या दिवशी तरी आपण ' मौन ' धारण करावे यासाठी असते. हे मौन म्हणजे नुसते निःशब्द होणे नाही तर त्यापलीकडेही बरेच काही असते. कोणत्याही प्रकारे काही बोलायचे नसते. पाटीवर किंवा कागदावर लिहून, देहबोलीद्वारे कोणत्याही प्रकारे व्यक्त व्हायचे नाही. मौनात जायचं म्हणजे निर्विचार व्हायचं. निदान काही काळ तरी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात
ऐसे ते अचिंत्य काय हो बोलावे । मौन स्वीकारावे हेचि भले ।।
याचा अर्थ काही विचार, चिंतन न करता बोलण्यापेक्षा न बोललेले किंवा मौन स्वीकारणेच उत्तम !
पंचतंत्रात एक छान श्लोक आहे.
आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिका : । बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनम ।।
आपल्या मुखदोषामुळे म्हणजेच बोलण्यामुळे पोपट किंवा मैनेला पिंजऱ्यात बंदिस्त व्हावे लागते बगळा मात्र मुक्त असतो कारण तो बोलत नाही. मौनाने सर्व काही साधते असे हा श्लोक आपल्याला सांगतो. अर्थात जेव्हा बोलायचे तेव्हा बोललेच पाहिजे. काही लोक योग्य वेळी बोलत नाहीत. अशा लोकांना वेळ निघून गेल्यानंतर पश्चात्तापाला सामोरे जावे लागते.
शारीरिक श्रमामुळेही जेवढा थकवा येत नाही तेवढा थकवा खूप बोलल्याने येतो. अग्नीतत्व आणि वायुतत्व जे आपल्या शरीरात विद्यमान असतात, ते मोठ्या प्रमाणावर खर्ची पडतात. म्हणून जास्त बोलण्यापेक्षा कृती करणे अधिक चांगले. काही लोक बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून समोरच्याला उत्तर देतात. आपल्याला परमेश्वराने दोन डोळे, दोन कान दिले आहेत पण जीभ मात्र एकच दिली आहे. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. जास्त पहा, जास्त वाचा. जास्त ऐका पण कमी बोला. लोक फोनवर सुद्धा एकेक तास एखाद्या व्यक्तीशी बोलत असतात.
आमच्या घराजवळ एक वहिनी राहतात. त्या बऱ्याचदा आमच्याकडे येतात. त्या आल्या म्हणजे साधारण तासाभराची निश्चिंती असते. त्या आल्या की किचनमध्ये हिच्या अगदी शेजारी उभ्या राहून जे गप्पा सुरु करतात, त्यांना अंत नसतो. बरं गप्पांना कुठलाही विषय चालतो. अगदी भांडेधुणेवाल्या बाईपासून स्वयंपाकापर्यंत. हिच्या मिस्टरांपासून तिच्या मिस्टरांपर्यंत. त्यांचे ते अनेक विषयांवरचे ज्ञान पाहून अक्षरशः स्तिमित व्हायला होते. मला कधी पाणी हवे असले तर मला त्यांना सांगावे लागते की वहिनी एक मिनिट बाजूला होता का ? तेवढे एक मिनिट त्या थांबतात ( माझे भाग्य ! ) पुन्हा त्यांची टकळी सुरु होते. जाताना म्हणतात ' बरं वहिनी निघते आता मी...' मला हायसे वाटते. पण हाय राम ! जातानाचा त्यांचा निरोपाचा अवधी सुद्धा दहा ते पंधरा मिनिटांचा असतो. आता मी जास्त बोलत नाही. थांबतो. नाहीतर म्हणाल. ' हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है...'
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/०४/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा