' रंगसोहळा ' या पुस्तकासाठी मनोगत
' रंगसोहळा ' या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच या पुस्तकात आपल्या विविध रंगांचे विषय आढळतील. विविध रंगांचे ललित लेख आढळतील. काही वैचारिक असतील, तर काही काल्पनिक. पण वैचारिक वा काल्पनिक असले तरी त्यांना वर्तमानाची, वस्तुस्थितीची पार्श्वभूमी नक्कीच असते. एखादा चित्रकार जसा विविध प्रकारची चित्रे काढतो आणि रंगांच्या विविध छटांचा वापर करून त्यात रंग भरतो, तसेच काहीसे लेखकांचे, कवींचे काम असते मला वाटते. चित्र हे शब्दांविना बोलते तर कविता, लेख इ वाङ्मयप्रकार शब्दांचा वापर करून त्यात रंग भरतात.
या पुस्तकातील विविध विषय विविध वेळी वेगवेगळ्या कारणाने सुचले आहेत. नीरक्षीरविवेक हा लेख ' तान्हाजी : द अनसंग हिरो ' हा चित्रपट पाहून सुचला. श्रेयस की प्रेयस हा लेख ' विष्णुपुराण ' ही टीव्हीवरील मालिका पाहताना सुचलेला आहे. माझ्या घरासमोर झोपलेल्या एका वृद्ध, निराधार व्यक्तीला पाहून ' नित्य नवा दिस जागृतीचा ' हा लेख लिहिला गेला. ऊन, वारा, पाऊस, प्राणी, पक्षी, निसर्गरम्य ठिकाणे आदींनी माझ्या ' निसर्गायन ' लिहिण्याला चालना दिली आहे. प्रत्येक लेखासाठी काहीतरी वेगवेगळे निमित्त घडले आहे. अर्थात लेख वाचताना सुज्ञ वाचकांच्या ते लक्षात येईलच. लेखासाठी एखादी घटना ही निमित्त असते. त्यानिमित्ताने मनात जे वेगवेगळे विचार येतात, विचारमंथन घडते, ते आपल्यासमोर या लेखांमधून मांडले आहे.
यातील काही लेख ऋतुपर्ण, सज्जनगड, भालचंद्र यासारख्या मासिकातून तर काही लेख वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या माध्यमांवर हे लेख वाचकांच्या पसंतीला उतरले आहेत. यातील काही लेखांचे सादरीकरण रेडिओ विश्वास या नाशिक येथून प्रसारित होणाऱ्या एफ एम चॅनेलवर झाले आहे.
प्रत्येक घटनेला वेगळा रंग असतो. लेखांनाही तो रंग आपसूकच प्राप्त होतो. ' मला आवडणारी त्रिमूर्ती ' या लेखात मला आवडलेल्या आणि भेटलेल्या तीन व्यक्तिमत्त्वांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, पाया, सुंदरता आणि कुरूपता, सिद्धी आणि प्रसिद्धी, सवय यासारखे लेख त्या त्या विषयावरील मी केलेले मूलभूत चिंतन आहे असे मला वाटते. तर ' बुद्धिमतां वरिष्ठम ', युगानुयुगांचा दीपस्तंभ -श्रीराम ' यासारखे लेख पौराणिक पात्रांचे महत्व सांगणारे आहेत. काही लेख समर्थ रामदास, संत तुकाराम यांच्याबद्दल आहेत. तर काही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि येसू वहिनी यासारख्या विषयाला वाहिले आहेत. अगदी ' हास्यरंग ' ही आपल्याला येथे आढळेल. असा हा विविधरंगी ' रंगसोहळा. ' वाचकांना निश्चितच आनंद देईल असा विश्वास आहे.
या पुस्तकासाठी ' दीपस्तंभ फाउंडेशन ' चे प्रमुख आणि सर्वांसाठीच एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असणारे आदरणीय श्री यजुर्वेंद्र महाजन सर यांनी अत्यंत व्यस्त असतानाही केवळ माझ्या एका शब्दाखातर प्रस्तावना लिहून दिली. त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे सीईओ विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे, सहसंपादक संदीप तापकीर, त्यांच्या सहकारी असलेल्या पूनम बैचे, प्रीता कानिटकर, चैताली नाचणेकर या सर्वांच्या प्रेम आणि सहकार्याशिवाय हे पुस्तक पूर्ण होऊ शकले नसते. उदयोन्मुख वास्तुशिल्पकार आणि चित्रकलेची असामान्य आवड असणाऱ्या प्रथमेश नाझरकर याने माझ्यावरील प्रेमाखातर ' रंगसोहळा ' मुखपृष्ठावर साकारला. या सर्वांचे मनःपूर्वक आभार !
विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा