मुख्य सामग्रीवर वगळा

एक रात्र मंतरलेली...

 उगवतीचे रंग 

एक रात्र मंतरलेली... 

जोपर्यंत आपण जगत असतो, तोपर्यंत जीवनाचा प्रवास अखंड सुरूच असतो. या वाटेवर ऊन, पाऊस, वादळवारा यांचाही सामना करावा लागतो. पण याच प्रवासात काही काही विश्रांतीची अशी काही ठिकाणं येतात की प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे पळून जातो. रखरखत्या उन्हात काही झाडं भेटतात दाट सावली देणारी. त्यांच्या शीतल छायेत बसलं की सगळा थकवा निघून जातो. ही झाडं पुढील प्रवासासाठी आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. आज मी मला भेटलेल्या अशाच एका झाडाबद्दल बोलणार आहे. या झाडाचं नाव आहे विभाताई. विभाताई देशपांडे, राहणार मुंबई. 

साधारण वर्ष दीड वर्ष झालं असेल तिच्या आणि माझ्या भेटीला. अर्थात प्रत्यक्ष भेट नाहीच. माझा कुठलासा लेख तिच्या कधीतरी वाचनात आला असावा. मग त्यावर प्रतिक्रिया देताना ' विश्वासदा...' अशा गोड शब्दांनी सुरुवात. व्हाट्सअँपवर तिचा एक ग्रुप होता, म्हणजे आहे. ' मनमंदिर ' या सुरेख नावाचा. मला तिने त्यात सामील करून घेतले. मग कधी कधी मी काढलेले फोटो पाहून ' चित्र छायाचित्र ' या आणखी एका ग्रुपमध्ये सामील करून घेतले. आणि मग नियमितपणे आमचे संभाषण सुरु झाले. काही माणसांच्या हृदयात प्रेमच काठोकाठ भरलेलं असतं. राग, लोभ, द्वेष, मत्सर या मानवी भावनांना तिथे फारशी जागा नसते. कारण जिथे प्रेम राहतं, तिथून या नकारात्मक भावनांची आपोआपच हकालपट्टी होत असावी. ' मनमंदिर ' या ग्रुपवर मी लेख टाकला की मला विभाताईने इतरांना सुद्धा त्यांच्या लेख किंवा कवितांवर दिलेल्या प्रतिक्रिया आढळायच्या. प्रत्येकालाच ती भरभरून प्रतिक्रिया द्यायची. कोणाला सत्तूदा म्हणून तर कोणाला आणखी काही. त्यातूनच तिचे निर्मळ अंतरंग स्पष्ट होत गेले. तिच्या घरी नेहमी थोरामोठ्यांचे, निरनिराळ्या नाट्य चित्रपट कलाकारांचे जाणेयेणे असे. त्याबद्दलही ती आपल्या कथातून साध्यासोप्या पण आशयघन भाषेतून लिहीत असे. कधी आपल्या बालपणीचे प्रसंग देखील गोष्टीरूपाने सांगायची. त्यातून तिचा स्वभाव स्पष्ट होत गेला. त्यातून कधी कधी तिचे मिश्किल, खोडकर रूपही समोर यायचे. एकूणच विभाताई म्हणजे लाघवी व्यक्तिमत्व ! 

काही दिवसांपूर्वी ती आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव अमेरिकेत आपल्या लेक जावयांकडे गेले होते.  तिथे जाण्यापूर्वी आणि गेल्यानंतरही तिचा संपर्क कायम होता. तिथले विविध फोटो पाठवणं, तिथे आपण काय काम केलं, नवीन कलाकुसर, वस्तू तयार करणं याचे फोटो ती पाठवायची. तिथे शून्याखाली तापमान असताना सकाळी फिरायला जायची. स्वतःबद्दल फारशी कधी बोलायची नाही. पण तिचे विविध फोटो पाहिले की कळायचं की हिला बंदूक चालवता येते, बुलेट चालवते, कलाकुसरीची कामे, नक्षीकाम आणि अजून काय काय करता येते ते तिलाच माहिती ! विभाताई आणि गोपाळराव या दोघांना संगीताची आवड आहे. गोपाळराव अतिशय सुंदर पेटी वाजवतात. अमेरिकेतल्या वास्तव्याचा तिने आनंद घेतला. सगळ्यांशी संपर्क ठेवला. निरनिराळे फोटो पाठवले. त्यातच तिच्या जावयांची तब्येत बरी नव्हती. त्याचीही तिला कोण काळजी लागून राहिली होती. तिच्या सगळ्या आशा, आकांक्षा त्यांच्यावरच केंद्रित झाल्या होत्या. 

भारतात परत आल्यानंतरही तिचा तोच उत्साह कायम होता. माझी तिची भेट मात्र नव्हतीच. ती कधी होते अशी हुरहूर दोघांना लागली होती. तशी ती माझ्यापेक्षा दोनेक वर्षांनी मोठी असेल. तिचं माहेर नागपूरचं. वडील वकील होते. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नानाजी देशमुख तिचे मामा. घरी थोरामोठ्यांचा सतत राबता. अशा वातावरणातून ती आलेली. पण कमालीचा साधेपणा आणि विनम्रता. पाचलेगावकर महाराजांचे त्यांच्या घरी जाणेयेणे असायचे. 

मी काही कामासाठी नाशिकला आलो होतो आणि तिथून पुण्याला जाणार होतो. त्याच सुमारास विभाताई तिच्या यजमानांसह पुण्यात आली होती. तिचे लेक जावई देखील आले होते. मी पुण्याला येणार आहे हे कळताच ' विश्वासदा, कधी येणारेस, कुठे राहणार ' अशा तिच्या प्रेमळ  चौकशा सुरु झाल्या. ती पुण्याजवळ वाकड या ठिकाणी थांबली होती. तिथे तिने मला बोलावले. पण मला तेथील फारशी माहिती नसल्याने मीच त्यांना माझ्याकडे येण्याचा आग्रह केला. तो दिवस होता सोमवार दि २८ मार्च २०२२. त्या दिवशी संध्याकाळी विभाताई आणि गोपाळराव आमच्या घरी आले. आम्ही नुकतेच प्रवासातून आलो होतो आणि पुण्यातील तो आमचा पहिलाच दिवस होता. या पहिल्या दिवशी माझ्या लाडक्या ताईची भेट घडावी असा सुखद योग परमेश्वराने जणू घडवून आणला होता. त्या दिवशीचा विभाताईंचा हसरा, प्रसन्न चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. ती दोघं आली तेव्हा नेमके दिवे गेले होते. पण मंद मंद प्रकाश होता... 

दिवे नव्हते पण आकाशातले तारे 

होते तिच्या स्वागताला 

डोळ्यातल्याच निरांजनाच्या प्रकाशात 

उजळून निघाले होते चेहरे 

मग  यथावकाश जेवणं झाली. भरपूर गप्पागोष्टी झाल्या. गोपाळरावांशी तर गप्पांची भट्टी छानच जमली. त्यांच्याकडे सांगण्यासारखे भरपूर होते आणि आमच्याकडे ऐकण्यासारखे. गप्पा संपू नये असे वाटत होते पण शेवटी वेळेची म्हणून एक मर्यादा सगळ्यांनाच पाळावी लागते. तसे ते परत गेले. पण आठवणींचा सुगंध ठेवून. ती रात्र खरोखरोच माझ्या दृष्टीने मंतरलेली होती. काही तरी पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावेत म्हणून विभाताई मला भेटली. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

५/४/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासह अग्रेषित करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...