मुख्य सामग्रीवर वगळा

अखेरचा हा तुला दंडवत...!

उगवतीचे रंग 

अखेरचा हा तुला दंडवत...!

रविवार दि ६फेब्रुवारी २०२२ चा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी अघटित अशी बातमी कानावर पडली. गानसम्राज्ञी लतादीदी गेल्या.  अवघा देश शोकसागरात बुडाला. जे स्वर ऐकत सकाळ व्हायची त्या स्वरांची संध्याकाळ झाला होती. गानसूर्य अस्ताला गेला. जणू दिवसातले, नव्हे जगण्यातलेच चैतन्य कोणीतरी काढून घेतले होते. संपूर्ण दिवसच उदासवाणा झाला होता. दिनकर मावळला आणि लतादीदी पंचत्वात विलीन झाल्या. सूर निमाले. 

कविवर्य भा रा तांबेंचं एक गीत लतादीदींनी गाऊन अजरामर केलं आहे. ' मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडून दोन्ही करा...' दीदींच्या रूपाने हा गानसूर्य मावळला होता. याच गाण्यात सुंदर ओळी आहेत 

जो तो वंदन करी उगवत्या 

जो तो पाठ फिरवी मावळत्या 

रीत जगाची ही रे सवित्या 

स्वार्थपरायणपरा. 

उगवत्या सूर्याला वंदन करणे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणे ही जगाची रीतच आहे. पण हा गानसूर्य अस्ताला गेल्यावर जगाने आपली ही रीत बदलली. या मावळत्या दिनकराला डोळे भरून बघण्यासाठी माणसांनी दाटी केली. घराघरात टीव्हीसमोर बसून या मावळत्या दिनकराचे अनेकांनी दर्शन घेतले. मुंबईत लोकांची दाटी आणि घराघरातील लोकांच्या डोळ्यात अश्रूंची दाटी. प्रत्येकाला जणू आपल्याच घरातील कोणीतरी गेल्यासारखे वाटले. गानसम्राज्ञी, गानसरस्वती, गानकोकिळा यासारखी कितीही विशेषणे तुम्ही लावा, ' लता ' याच नावाने प्रत्येकाच्या हृदयात घर केले होते. ही ' लता ' प्रत्येकाच्या मनात अशी रुजली होती की ' तिचा वेलू गेला गगनावरी...' स्वर्गापर्यंत हा वेलू जाऊन पोहोचला. बहुधा स्वर्गलोकीच्या देवांनी, गंधर्वांनी तिला सांगितलं असावं की आता बस झालं पृथीवर लोकांना रिझवणं. खूप प्रतीक्षा करायला लावलीस आम्हाला. आता आम्हालाही तू हवी आहेस. 

त्या सुरांची जादूच अशी अनोखी होती. सोन्याच्या तारेसारखा लवचिक, मुलायम आवाज ! खरं तर या आवाजाला उपमाच नाही. दीदी दिसायला तुमच्या आमच्यासारख्याच. पण जेव्हा त्या गायला लागत तेव्हा त्या गळ्यातून गंधार बाहेर पडे. सरस्वतीची वीणा झंकारत असे, श्रीकृष्णाची बासरी स्वरांचे रूप घेऊन प्रकट होई. सकाळी भूपाळी, भजन, भक्तिगीतं म्हणून हा आवाज उठवायचा, संकटात आधार होऊन धीर द्यायचा, ' ऐ मेरे वतन के लोगो...' म्हणत राष्ट्रभक्ती जागवायचा. ' सागरा प्राण तळमळला... ' या शब्दांनी अंगावर रोमांच उभे करायचा. ' मोगरा फुलला ', ' आनंदवनभुवनी ' यासारख्या गीतांनी एका वेगळ्याच आनंदरसाची बरसात करायचा. श्रीरामचंद्र कृपालू, बाजे रे मुरलीया बाजे सारखी गाणी वेगळ्या विश्वात घेऊन जायची. रात्रीच्या वेळी हा आवाज अंगाई गाऊन निजवायचा. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ' जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...' असलेला हा आवाज होता. 

एक मुलगी नऊ दहा वर्षांची असल्यापासून श्रोत्यांसमोर गायला सुरुवात करते. पितृछत्र हरपल्यावर हीच चौदा पंधरा वर्षांची कोवळी पोर मोठी होऊन आपल्या घराची, भावंडांची काळजी घेते. दैवी सूर तर तिच्या गळ्यात असतोच. पण आपल्या मेहनतीने ती त्या सुरांना सौंदर्य प्राप्त करून देते. मिळेल तिथून शिकत जाते. शाळेत फारसे न गेलेली ही मुलगी पुढे स्वतःच्या बळावर शिकत जाते. पुस्तके वाचते तशीच माणसे वाचते. त्या सगळ्यातून जीवनाचे धडे घेते. स्वतःची तत्वे, नैतिक अधिष्ठान या गोष्टींशी कधीही तडजोड करत नाही. मिळेल त्या संगीतकाराकडून शिकत जाते. पण आयुष्यात आलेल्या या सगळ्या संकटांनी ती करपून जात नाही. तिचं आयुष्य म्हणजे जणू आनंदयात्री ! संगीत, प्रवास, क्रिकेट, खाणं आणि खाऊ घालणं, नर्म विनोद, नकला या सगळ्या सगळ्या गोष्टींचा आनंद तिने लुटला. लोकांनाही भरभरून दिला. तिच्या सुरांचं झाड अखेरपर्यंत बहरतच राहिलं. साडेसात दशकं हे झाड गात होतं, बहरत होतं आणि ' आता विसाव्याचे क्षण...' उपभोगत होतं ! 

संत कबीर म्हणतात 

 कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोये 

ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोये ।।

दीदी अशीच करणी करून गेल्या. अवघं जग हळहळलं. राष्ट्रध्वज अर्ध्यावर आले. एका भारतरत्नाला अखेरचं वंदन करण्यासाठी पंतप्रधान आणि अवघे मान्यवर अंत्यदर्शनाला आले. ' जीवन कृतार्थ होणं ' ते अजून वेगळं काय असतं ! जगावं तर असं जगावं आणि मरावं तर असं मरावं ! 

आता दीदी देहानं आपल्यात नाहीत. पण त्यांचे सूर चिरंतन आहेत. ते सदैव आपली साथ करत राहतील. ' नाम गुम  जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान हैं , गर याद रहे. ' तेव्हा दीदी ' अखेरचा हा तुला दंडवत...! '

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०७/०२/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...