उगवतीचे रंग
वाचन बिचन...
मुकेश यांनी गायिलेलं एक गाणं रेडिओवर लागलं होतं. ' झुमती चली हवा, याद आ गया कोई...' गाणं फार सुंदर आहे. आता या गाण्याचा आणि या लेखाचा काय संबंध आहे असा प्रामाणिक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असणार...! पण काय करणार आम्हाला अशी सुतावरून स्वर्ग गाठायची सवयच आहे. पण सांगतो. त्या गाण्यात या ओळी आहेत...
खो गयी हैं मंजिल, मीट गये हैं रास्ते
गर्दिशेही गर्दिशे अब हैं मेरे वास्ते...
म्हणजे कुठे जायचं माहीत नाही. रस्ते जणू नाहीसे झालेले. माझ्यासाठी आता ' गर्दिशे ' म्हणजे संकटंच संकटं माझ्या पुढ्यात वाढून ठेवली आहेत. अहो, असंच सगळं वातावरण सध्या आपल्या भवताली आहे, नाही का ? कोरोना काय, नवीन सादर झालेला अर्थसंकल्प काय, सरकारचे एकेक निर्णय काय...! अर्थात अर्थांसंकल्पातलं मला शून्य कळतं म्हणा. पण उगीच प्रसारमाध्यमांवर मध्यमवर्गीयांसाठी यात काही नाही, मध्यमवर्गीयांची निराशा वगैरे असं वाचलं. पण कोणताही अर्थसंकल्प पूर्णपणे कधीच वाईट नसतो असंही ऐकलं आहे. असो. माझा तो विषय नाही.
सरकारचा एक निर्णय जरा वेगळा वाटला. किराणा दुकानांवर जरी नाही तरी मोठमोठ्या मॉल्समध्ये दारू... (छे छे चुकलो ) वाईन ( म्हणायला हवं नाही का ) विक्रीला दिलेली परवानगी. उगीचच असं दृश्य दिसायला लागलं की अस्मादिक मॉल मध्ये काही खरेदी करण्यासाठी गेले आहेत आणि समोर आकर्षक रंगीबेरंगी बाटल्यात वाईन की काय म्हणतात ते विक्रीला ठेवलं आहे. तसंही आता मॉल्समध्ये नेहमी जाऊन कंटाळा येतो. नवीन काही दिसलं की बरं वाटतं. बरं सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे हे वाचून सरकार सामान्य लोक, शेतकरी यांच्याबद्दल किती संवेदनशील आहे याची जाणीव होऊन आनंद वाटला. बरं झालं आज लोकमान्य टिळक हयात नाहीत. नाहीतर त्यांनी ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा आजच्या संदर्भात ( गैरलागू ) प्रश्न विचारला असता. त्यातही लोकांनी दारू आणि वाईन यातील फरक समजून घ्यावा आणि वाईन विक्रीला परवानगी ही फार गंभीर गोष्ट आहे असे मला वाटत नाही अशी नेत्यांची विधाने ऐकून मला माझ्यासारखे सर्वसामान्य लोक जगाच्या किती मागे आहोत हे समजून आले. काहींनी तर अशीही विधानं केली की पतंजलीच्या औषधांमध्ये सुद्धा काही प्रमाणात अल्कोहोल असतं. मग वाईनमध्ये थोडंसच जास्त असलं तर ती वाईट कशी काय ठरते ? मला या लोकांच्या बुद्धिमत्तेचं खूप कौतुक वाटलं. वाईन आता एखाद्या वेळी पतंजलीच्या औषधांना सुद्धा पर्याय होऊ शकते आणि लोक हा पर्याय आनंदानं स्वीकारतील.
मला उगीचच पश्चिम बंगालमधील एक गोष्ट आठवली. तिथले पालक वाचन संस्कृती जोपासण्यासाठी फार प्रयत्नशील असतात असं मी कुठेतरी वाचलं की ऐकल्याचं आठवतं. रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी यासारख्या बंगाली साहित्यिकांची पुस्तकं तिथे प्रत्येक घरात पाहायला मिळतात. मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासण्यासाठी पालक दर महिन्याला आपल्या मुलांना पुस्तकाची एक यादी देतात. दर महिन्याला जसे किराणा सामान घरात आणले जाते, तशीच काही पुस्तकेही आणली जातात. मग माझ्या मनात आलं की आपल्या राज्यकर्त्यांना असं काही का नाही सुचलं ? दुकानांमध्ये, मॉलमध्ये दारू ( सॉरी, पुन्हा चुकलो ) वाईन विक्रीला परवानगी देण्याऐवजी पुस्तकंही विक्रीला ठेवता आली असती. निदान भावी पिढी त्यामुळे बौद्धिदृष्ट्या संपन्न, मानसिक दृष्ट्या बळकट होण्याची आशा करता आली असती.
पण जाऊ द्या. हे निमित्त झालं माझ्या लेखनासाठी. मला खरं तर वाचनाबद्दलच बोलायचं आहे तुमच्याशी. राजकारण आणि त्यावर लिहिणं हा माझा पिंड नाही. त्यामुळे वर लिहिताना काही चुकलं असेल, चुकून कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांनी मोठ्या मनानं मला माफ करावं. माझा उद्देश साफ आणि सरळ आहे आणि तो म्हणजे वाचन संस्कृती जोपासली जावी.
वाचक आणि लेखक या दोघांना जोडणारा प्रकाशक हा एक घटक असतो. लेखकाचं लेखन प्रकाशकामार्फत वाचकांपर्यंत पोहोचतं. पण बरेच प्रकाशक लोकांना काय आवडते ते देण्याचा प्रयत्न करतात. लोकांची आवड ते सांभाळतात. लोकांना आवडणाऱ्या साहित्याचा साहित्यिक दर्जा नेहमीच उच्च असेल असे सांगता येत नाही. पण प्रकाशकाला त्याचा व्यवसाय सांभाळायचा असतो. त्यातूनच तो लोकांची आवड जपणारी पुस्तके देण्याचा प्रयत्न करतो. एक इंग्रजी वाक्य आहे. पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व. पुस्तकांबद्दलही तसेच म्हणता येईल. वाचकांची पात्रता असेल तशीच पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचणार. अर्थात सगळेच प्रकाशक असे असतात असे नाही. काही प्रकाशक त्यांचा व्यवसाय सांभाळूनही वाचकांना दर्जेदार पुस्तके देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच साहित्यात चांगल्या साहित्यकृतींची भर पडत राहते. वाङ्मय समृद्ध होते.
माझे दोन मित्र बँकेत अधिकारी होते. आता ते निवृत्त झाले आहेत. ते दोघे पक्के वाचनवेडे. दर आठवड्याला वाचनालयात जाऊन नवनवीन पुस्तके आणणार. कादंबऱ्या तर त्यांनी वाचल्याच पण वैचारिक पुस्तके, चरित्रे, आत्मचरित्रे, प्रवासवर्णन आदी सगळ्या प्रकारची पुस्तके ते वाचत असतात. एवढेच नव्हे तर आपण कोणत्या लेखकाचे कोणते पुस्तक वाचले, त्यात काय सांगितले आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्या चांगल्या लक्षात असतात. मला त्यांच्या या वाचनाचा आणि स्मरणशक्तीचाही हेवा वाटतो. त्यांच्याशी गप्पा मारताना फार मजा येते. अनेक नवनवीन पुस्तकांची माहिती विनासायास मिळते.
एखाद्याला गाता येत नसले तरी गाणी ऐकून ऐकून एखाद्याचा कान तयार होतो. कोणी म्हटलेल्या गाण्यात एवढीशीही चूक झाली तरी त्याला लक्षात येते. एखाद्या खवय्याला एखाद्या पदार्थात काय कमी आहे ते लगेच कळते. तसेच जो पक्का वाचक असतो, त्याचीही दृष्टी तयार होते. एखाद्या पुस्तकाची सुरुवातीची काही पाने वाचल्यानंतर त्याला लगेच त्या पुस्तकाच्या दर्जाचा अंदाज येतो. जे दर्दी वाचक असतात ते असे तयार होतात. ते मिळतील तिथून पुस्तक आणून वाचतात.
माझ्या ओळखीच्या एका गर्भश्रीमंत व्यक्तीने आपल्या घराची शोभा वाढावी म्हणून काही पुस्तके आणायची ठरवली. त्याला तशी वाचनाची खास आवड नव्हती. त्याने एका मराठीच्या प्राध्यापकांना घरात चांगली दिसतील अशी पुस्तके सांगा म्हणून विचारलेही होते. कुठेतरी मी असेही उदाहरण वाचले की ऊस पिकवणाऱ्या एका श्रीमंत शेतकऱ्याने आधुनिक शेतीवरील खूप पुस्तके आणली होती. त्याच्या दिवाणखान्यात एक मोठे कपाट पुस्तकांनी भरलेलं होतं. बहुतेक सगळी पुस्तकं इंग्रजीत होती. त्यांना ती वाचणे शक्य नव्हते. पण अभिमानाने सांगायला झालं की माझ्याकडे शेतीवरील सगळी आधुनिक पुस्तके आहेत. आता अशा लोकांबद्दल काय बोलणार ?
वाचन हा छंद आहे. तो जोपासायचा असतो. ज्याला त्याची आवड लागते त्याला वाचनासाठी प्रवृत्त करायला इतर कुठल्या प्रेरकांची गरज नसते. वाचन केल्याने मी फार सुसंस्कृत, ज्ञानी वगैरे होईल असलं काही वाटून खरा वाचणारा जो असतो तो वाचत नाही. कोणी न सांगता तो वाचत असतो. त्याला वाचन आवडते, ते चांगले आहे म्हणून तो वाचत असतो. परवा मी एक अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ टायरॉन हेज यांच्यावर लेख लिहिला होता. त्यात त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणी मोलाचा उपदेश केला तो मला फार आवडला. त्यांचे वडील सांगायचे की काही बक्षीस मिळेल या आशेने योग्य गोष्ट करू नको आणि काहीतरी शिक्षा होईल या भीतीने अयोग्य गोष्ट करण्याचे टाळू नको. थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट चांगली असेल तर ती चांगली आहे म्हणूनच कर आणि वाईट असेल तर ती करायची नाही म्हणून करू नकोस. वाचावं तेही अशाच निरपेक्ष उद्देशानं.
डॉ सुमंत टेकाडे म्हणून नागपूरचे एक व्याख्याते होते. आता ते आपल्यात नाहीत. ते शिवचरित्रावर अतिशय उत्तम व्याख्याने देत असत. गेल्या वर्षी कोरोनाने त्यांचे निधन झाले. काही वर्षे ते बंगलोरला नोकरीच्या निमित्ताने होते. आपल्याला कानडी भाषा आली पाहिजे म्हणून मोठ्या प्रयत्नाने त्यांनी कानडी भाषेचे अध्ययन केले आणि कामापुरती तरी ती भाषा त्यांनी आत्मसात केली. ही भाषा शिकताना त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. केवळ आपल्याला ती भाषा आली पाहिजे या उद्देशाने ते ही भाषा शिकले. चांगल्या गोष्टी अशा निरपेक्षपणे करायला आपण कधी शिकणार ? प्रत्येकच वेळी काहीतरी फायदा होईल म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा ती चांगली आहे म्हणून करणे कधीही चांगले.
तर मंडळी, निरपेक्ष, निर्भेळ आनंदासाठी वाचन करू या. आपण वाचू या, दुसऱ्याला वाचवू या. आपल्या हातात एवढे तर आहेच...!
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०४/०२/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा