उगवतीचे रंग
समर्पित जीवनाचा आदर्श : माँ उर्फ मीरा अल्फासा ( उत्तरार्ध )
मीरा अल्फासा उर्फ माँ उर्फ माताजी या योगी अरविंदांच्या कार्याचा एक अविभाज्य भाग आहेत. समर्पित आणि कृतार्थ जीवनाचा आदर्श म्हणजे माताजी. श्रीअरविंदांच्या तोंडून एकदा त्यांच्यासाठी ' मदर ' हे शब्द उस्फुर्तपणे ओठांवर आले आणि त्या क्षणापासून त्या सर्वांच्याच माताजी झाल्या. एखाद्या व्यक्तीला मदर, माँ किंवा माताजी ही उपाधी उस्फुर्तपणे प्राप्त होणे ही किती भाग्याची गोष्ट ! कदाचित ही उपाधी प्राप्त करणे सोपे असू शकते पण ती निभावणे महाकठीण. पण माताजींनी ही उपाधी सार्थ ठरवली. त्या सर्वांच्याच आई झाल्या.
श्रीअरविंदांच्या आश्रमात माताजींचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक तासनतास न कंटाळता तिष्ठत उभे असत. त्यांची एक नजर, एक प्रेमळ कटाक्ष, एक प्रेमळ स्मित, आशीर्वादाचा पाठीवर फिरणारा हात यासाठी साधक आसुसलेले असत. त्यांची प्रेमळ नजर, आश्वासक हास्य, धीराचा पाठीवर फिरणारा हात दुःखितांचं दुःख हरण करी. त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला की साधक धन्य होत. जणू जगातील काहीतरी मौल्यवान गोष्ट आपण प्राप्त केली आहे अशीच त्या साधकाची भावना असे. कशामुळे आले माताजींच्या अंगी हे सामर्थ्य ? कशामुळे लाभले त्यांना एवढे मोठेपण ?
मीरा अल्फासा, एक फ्रेंच युवती. आपला सगळा पूर्वेतिहास विसरून, आपला देश, आपली माणसे सोडून भारतात येते, पॉण्डेचेरीला स्थायिक होते. कुठलीही भौतिक अपेक्षा न ठेवता समर्पित भावनेने योगी अरविंदांच्या जीवनकार्यात मोलाचा वाटा उचलते आणि जात-पात, धर्म, प्रांत, भाषा यासारख्या गोष्टींचा कुठलाही विचार न करता सर्वांना आईच्या मायेने वागवते यातच त्यांच्या मोठेपणाचे रहस्य दडलेले आहे. अर्थात माताजींच्या या मोठेपणाला त्यांच्या कठोर साधनेची सुद्धा जोड होती हे ओघाने आलेच. १९२० मध्ये जेव्हा माताजी पुन्हा पॉंडीला आल्या त्या कधीही परत न जाण्यासाठी. श्रीअरविंदांच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. पण १९२० ते १९२६ हा माताजींच्या साधनेचा काळ होता. या काळात त्यांनी अंतर्मुख होऊन कठोर साधना केली.
हळूहळू आश्रमातील साधकांचा ओघ वाढू लागला. याच कालावधीत श्रीअरविंदांनी आपल्या साधनेसाठी, उद्दिष्टपूर्तीसाठीअधिकाधिक एकांतवासात जाण्यास सुरुवात केली. या काळात आश्रमाची जबाबदारी माताजींच्या खांद्यावर आली. साधकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणे त्यांनी सुरु केले. एकीकडे आपली साधना आणि दुसरीकडे आश्रमाची व्यवस्था अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली.
२४ नोव्हेंबर १९२६ हा योगी अरविंदांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा दिवस. श्रीअरविंदांच्या साधनेची फलप्राप्ती म्हणून या दिवशी एक दिव्य उच्चशक्ती खाली प्रकटली. श्रीअरविंदांनी या शक्तीला ' अधिमानस ' असे म्हटले आहे. या शक्तीहूनही आणखी एक दिव्य शक्ती आहे. तिला ते ' अतिमानस ' असे म्हणत. पुढे ही शक्तीदेखील श्रीअरविंदांनी साधनेच्या द्वारा प्राप्त केली. माताजींनी २४ नोव्हेंबर या दिवसाला ' विजयदिन ' असे म्हटले. श्रीअरविंदांना जे महत्वाचे कार्य करायचे होते त्या कार्यातील हे यश म्हणजे एक महत्वाची पायरी होती. म्हणूनच माताजींच्या दृष्टीने तो विजयदिन होता. हा दिवस श्रीअरविंदांचा ' सिद्धीदिन ' म्हणूनही मानला जातो. या दिवसांपासून श्रीअरविंद पूर्णपणे एकांतवासात गेले आणि आता आश्रमाची जबाबदारी आणि साधकांना मार्गदर्शन करण्याचे काम पूर्णपणाने माताजींवर आले.
माताजींच्या अधिपत्याखाली श्रीअरविंद आश्रमाची रीतसर स्थापना झाली. सुरुवातीला केवळ २४ साधक असलेल्या या आश्रमाची साधक संख्या लवकरच २००० पर्यंत जाऊन पोहोचली. यावरून माताजींच्या कार्याचा आवाका किती प्रचंड होता हे आपल्या लक्षात येईल.
संगीत आणि चित्रकला हे माताजींचे अतिशय आवडते विषय होते. हे विषय म्हणजे स्वतःच्या प्रकटीकरणाचे माध्यम आहेत. मूर्ताकडून ते अमूर्ताकडे घेऊन जातात. संगीत आणि चित्रकला म्हणजे आत्म्याचे कान आणि डोळे आहेत असे त्या म्हणायच्या. त्या स्वतः उत्तम पेंटिंग्ज करत. पियानो वाजवत. गणितज्ञ असलेल्या माताजींना फळ्यावर गणिती आकडेमोड करायलाही आवडे.
श्रीअरविंदांचा आश्रम समर्थपणे चालवत असताना अनेक कसोटीचे प्रसंग आले. माताजी धीरोदात्तपणे अशा प्रसंगांना सामोऱ्या गेल्या. श्रीअरविंदांच्या अनुपस्थितीत माताजींवर नाही नाही ते आरोप करणारेही काही लोक होते. परदेशातून आलेली स्त्री एखादी स्त्री आश्रमात येऊन राहते, माताजी म्हणवते आणि श्रीअरविंदांची जागा घेऊ पाहते ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती. माताजींना अशा आरोपांमुळे दुःख जरूर झाले पण त्या जराही विचलित झाल्या नाहीत. आपल्या कामावर आणि ध्येयावर त्यांची अढळ निष्ठा होती. सर्वात महत्वाचे म्हणजे योगी अरविंद आणि त्यांच्या तत्वज्ञानावर त्यांची निष्ठा होती. श्रीअरविंदांची शिकवणुकच मानवजातीला उन्नतीकडे, प्रकाशाकडे घेऊन जाईल यावर त्यांचा दृढ विश्वास होता. तुमचा हेतू शुद्ध असेल, आपल्या कामावर दृढ विश्वास असेल आणि कितीही संकटे आली तरी दृढनिश्चयाने तुम्ही आपले काम सुरु ठेवले तर अशा दुष्ट शक्तीही पराजित होतात हे माताजींनी आपल्या उदाहरणाने दाखवून दिले.
एकदा कोणीतरी श्रीअरविंदांच्या आश्रमावर भानामतीचा प्रयोग केला. बाहेरून दगड येऊन आश्रमावर आदळू लागले. अनेक दिवस तपास करून काही हाती लागले नाही. पोलीस देखील शोध लावण्यास असमर्थ ठरले. गुढविद्येच्या जाणकार असलेल्या माताजींनी ही करणी ओळखली, थांबवली. ज्याने ती केली होती, त्याने अंथरूण धरले. तो मरायला टेकला. तो माणूस, त्याचे नातेवाईक माताजींना शरण आले. माताजींनी उदार अंतःकरणाने त्यांना क्षमा केली.
आश्रम चालवत असताना अनेक लोक माताजींकडे आश्रमासाठी देणग्या घेऊन येत असत. पण आश्रमासाठी घेण्यात येणारा पैसा शुद्ध मार्गानेच मिळवलेला असावा. दान देताना त्या व्यक्तीचा हेतू प्रामाणिक असावा यावर माताजींचा कटाक्ष असे. एकदा कलकत्त्याहून एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती आश्रमाला देणगी म्हणून आपल्यासोबत लाखो रुपये घेऊन आला. माताजींनी मात्र त्या माणसाचे पैसे घेतले नाहीत. त्या माणसाने गैरमार्गाने कमावलेले हे धन होते. आपल्या पापाचे ओझे हलके करावे या भावनेतून तो पॉंडीला आला होता. साधनेचं तेज अंगी असलेल्या निर्मळ मनाच्या माताजींनी त्या व्यक्तीची ही कमाई हा पापाचा भाग आहे हे ओळखले. त्यांनी त्या माणसाला नकार दिला. केवढा हा निस्पृहपणा ! आज अनेक मंदिरांच्या दानपेट्या उघड्या करून बसणाऱ्या आणि वाटेल त्याचे वाटेल ते दान स्वीकारणाऱ्या लोकांनी माताजींचे हे उदाहरण डोळ्यापुढे ठेवण्यासारखे आहे.
माताजी पंच्याण्णव वर्षांचे कृतार्थ आयुष्य जगल्या. सुमारे पस्तीस वर्षे त्या श्रीअरविंदांच्या सहवासात होत्या. श्रीअरविंदांच्या स्वप्नातली देवभूमी साकार करण्याचे महान कार्य माताजींनी केले. १९५१ मध्ये माताजींनी श्रीअरविंद आंतरराष्ट्रीय विद्यापीठ केंद्र स्थापन केले. या शिक्षणकेंद्राचे कार्य श्रीअरविंदांच्या शैक्षणिक तत्वानुसार आणि श्रीअरविंद आणि माताजी यांनी घालून दिलेल्या रुपरेषेनुसार चालते. येथे अनेक विषय, अनेक भाषा शिकवल्या जातात. येथील विद्यार्थी जगात कुठेही गेला तरी त्याच्या वेगळेपणामुळे तो उठून दिसतो.
श्रीअरविंदांच्या कल्पनेतील देवभूमी साकारताना माताजींनी २८ फेब्रुवारी १९६८ या दिवशी ऑरोव्हिल म्हणजेच उषानगरीची स्थापना केली. जगातील कोणत्याही देशाचा नागरिक येथे येऊन साधना करू शकतो. हे मानवतेचे मंदिर आहे. सतत विकसित होणारी, उमलणारी ही तारुण्याची, ताजेपणाची नगरी आहे. देवत्वाची ज्याला आस आहे अशी कोणतीही व्यक्ती येथे येऊन आपले ध्येय गाठू शकते. या नगरीची उभारणी करताना जगातील अनेक देशांची माती, श्रीअरविंद आश्रमाची माती या उषानगरीत मिसळलेली आहे.
१७ नोव्हेंबर १९७३ या दिवशी माताजींनी या जगाचा निरोप घेतला. आज स्थूल देहाने जरी माताजी आपल्यात नसल्या तरी या योगिनीचे प्रकाशरूपी अस्तित्व श्रीअरविंद आश्रमात आहे. त्यांच्या कार्याचा सुगंध दरवळतो आहे. त्यांचे स्मरण करणाऱ्या साधकांना प्रकाशाची वाट त्या आजही दाखवीत आहेत. श्रीमाताजींनी परमेश्वराला केलेली प्रार्थना आपणही करू या -
' आम्हाला योद्धे बनव. तेच होण्याची आमची आकांक्षा आहे.
नवीन उदयाला येणाऱ्या भविष्यकाळाचे,
टिकून राहू पाहणाऱ्या भूतकाळाविरुद्ध
जे महान युद्ध होणार आहे त्यामध्ये
आम्ही लढून यशस्वी व्हावे.
म्हणजे नवीन निर्माण होणाऱ्या गोष्टींचा
स्वीकार करण्यास आम्ही पात्र होऊ. '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२५/०२/२०२२
vdeshpande414@gmail.com
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा