उगवतीचे रंग
समर्पित जीवनाचा आदर्श : माँ उर्फ मीरा अल्फासा ( पूर्वार्ध )
( परवा म्हणजे २१ फेब्रुवारीला माँ उर्फ मीरा अल्फासा यांची जयंती होती. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचं हे यथाशक्ती केलेलं स्मरण )
आपण सगळ्यांनी योगी अरविंद यांचे नाव ऐकले असेल. योगी अरविंद म्हणजे अरविंद घोष. पूर्वाश्रमीच्या आपल्या आयुष्यात जहाल क्रांतिकारी विचारांचे असणारे अरविंद घोष पुढे काही काळानंतर आपल्या आध्यात्मिक ध्येयपूर्तीसाठी राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ सोडून पॉंडिचेरीला स्थायिक झाले. त्यांचे आध्यात्मिक कार्य एवढे महान आणि प्रभावी होते की मीरा अल्फासा ही पॅरिसमध्ये जन्मलेली तरुणी सातासमुद्रापार भारतात आली आणि नंतर अरविंदांच्या कार्याने प्रभावित होऊन कायमस्वरूपी पॉण्डेचेरीला स्थायिक झाली. मीरा अल्फासा या विवाहित होत्या. त्यांचे पती पॉल रिचर्ड यांच्यासोबत त्या भारतात आल्या. योगी अरविंद यांचे कोणतेही चरित्र मीरा अल्फासा उर्फ माँ यांचा उल्लेख केल्याशिवाय लिहिले जाऊ शकत नाही एवढे त्यांचे कार्य महान आहे.
मीरा अल्फासा यांचे पती पॉल रिचर्ड हे एक महान फ्रेंच विचारवंत आणि विद्वान होते. ते देखील योगी अरविंदांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनीच अरविंदांना तत्त्वज्ञानविषयक एखादे नियतकालिक सुरु करा असे सुचवले होते. त्याप्रमाणे अरविंदांनी ' आर्य ' हे नियतकालिक सुरु केले. यावेळी पॉल रिचर्ड यांची मोठीच मदत अरविंदांना झाली. पण पहिले महायुद्ध सुरु झाल्यानंतर पॉल यांना फ्रान्सला परत जावे लागले आणि ' आर्य ' ची सगळीच जबाबदारी श्री अरविंदांवर पडली. पण या नियतकालिकाच्या माध्यमातून प्रचंड लेखन श्री अरविंदांनी केले.
मीरा अल्फासा यांची अतिशय प्रेरक कहाणी आज आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मीरा अल्फासा म्हटलं की मला स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदितांची आठवण येते. मार्गारेट नोबल उर्फ भगिनी निवेदिता आणि मीरा अल्फासा यांच्या कार्यात तसे बरेच साम्य आहे. स्वामी विवेकानंदांचे कार्य भगिनी निवेदितांनी पुढे चालवले तशाच पद्धतीने मीरा अल्फासा यांनी योगी अरविंदांचे, पण मीरा अल्फासा यांचे वैशिष्ट्य असे की योगी अरविंद त्यांना त्यांची योग्यता ओळखून सुरुवातीपासून माँ म्हणत. पुढे मग सगळे त्यांना त्याच नावाने हाक मारू लागले. त्या हजारोंच्या माँ बनल्या. त्यांचे हजारो लोक अनुयायी झाले. त्यांची योग्यताही तशीच होती.
फ्रान्समध्ये २१ फेब्रुवारी १८७८ मध्ये मीरा अल्फासा यांचा जन्म झाला. लहान वयापासूनच त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आध्यात्मिक अनुभूती होऊ लागली. आपण मुळात या जगातले नसून दुसऱ्या जगातून काहीतरी कार्य करण्यासाठी या पृथीवर आलो आहोत असे त्यांना वाटायचे. जेव्हा त्यांच्या वयातील इतर मुले मुली खेळण्यात मग्न असत तेव्हा ही छोटी मीरा आपल्या खुर्चीत तासनतास एकाग्र एकचित्त होऊन बसायची. तिच्या आईला वाटायचं की इतर मुलींप्रमाणे आपल्या मुलीने खेळावं, उड्या माराव्या, खोड्या कराव्या. पण मीराचं वागणं वेगळंच होतं. कुठलीतरी दिव्य शक्ती आपलं संरक्षण करते, आपल्या पाठीशी उभी आहे हे मीराला जाणवत होतं. एकदा तर असं झालं की एका टेकडीवर गेल्या असताना त्यांचा पाय घसरला आणि उंचावरून त्या खाली पडल्या. त्यांना असं जाणवलं की कोणत्या तरी शक्तीनं आपल्याला अलगद झेललं. त्यांना खरचटण्यापलीकडे फारसं काही झालं नाही.
लहानपणी एक स्वप्न त्यांना नेहमी पडायचं. आपण आकाशात उंच उडतो आहोत असं त्यांना दिसायचं. आपल्या अंगात एक सोन्याचा झगा असून तो झगा हळूहळू मोठा होऊन खालच्या सगळ्या भूभागावर सावली धरतो आहे आणि त्या झग्याच्या सावलीत लहानथोर, गरीब सगळे आश्रयाला येताहेत असं दृश्य त्यांच्या डोळ्यापुढे येई. त्या झग्याला स्पर्श करताच लोकांचं दुःख नाहीसं होऊन सगळीकडे आनंदीआनंद होई. हे स्वप्न वारंवार पाहिल्याने आपला जन्म लोकांचं दुःख दूर करण्यासाठीच झाला आहे आणि तेच आपलं जीवनध्येय आहे ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली.
तेरा वर्षांच्या होईपर्यंत मीरा यांना अनेक गूढविद्या अवगत झाल्या. २० वर्षांच्या तरुण वयात मानवी जीवनाची अनेक रहस्ये त्यांना ज्ञात झाली. अशातच त्यांच्या वाचनात स्वामी विवेकानंदांचे एक पुस्तक आले. या पुस्तकाने त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी दिली. मग भारताकडे त्या आकर्षित झाल्या त्या कायमचाच. मीरा यांच्या जीवनावर श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या एक नातेवाईक असलेल्या शलोमी अल्फासा त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात की मीरा यांना अनेकवेळा आपल्या डोळ्यासमोर एका सुंदर सावळ्या वर्णाच्या पुरुषाची आकृती दिसत असे. कृष्णभक्ती आणि कृष्णप्रेमातुन मीरा यांनी श्रीकृष्णाशी संबंधित अनेक पौराणिक ग्रंथांचा पुढे सखोल अभ्यास केला. योगायोग म्हणजे त्यांचे मीरा हे नाव आपल्याकडील कृष्णभक्त असलेल्या मीरेशी मिळतेजुळते आहे.
२९ मार्च १९१४ ला त्या पॉण्डेचेरीच्या महर्षी अरविंदांच्या आश्रमात आल्या. त्यावेळी त्यांनी अरविंदांना प्रथमच पाहिले. आपल्याला स्वप्नात किंवा नेहमी डोळ्यासमोर दिसणाऱ्या कृष्णाची आकृती म्हणजे हीच व्यक्ती याची प्रचिती त्यांना अरविंदांना भेटल्यानंतर आली. भौतिक दृष्टीने त्यांची आणि योगी अरविंद यांची ही प्रथम भेट असली तरी आध्यात्मिक दृष्ट्या यापूर्वी आपण अनेकदा भेटलो आहोत याची खूण त्यांना पटली. त्यांना त्या आश्रमातील वातावरण एवढे आवडले की त्यांनी तिथेच राहण्याचा निश्चय केला. पण पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांना पॉंडी सोडून जपानला जावे लागले. जपानला गेल्यानंतर योगायोगाने त्यांची तेथे रवींद्रनाथ टागोरांशी भेट झाली.
योगी अरविंदांच्या ओढीने त्या २४ नोव्हेंबर १९२० ला भारतात परतल्या आणि योगी अरविंदांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले. अनेक देश फिरलेल्या आणि सधन युरोपियन कुटुंबातून आलेल्या मीरा यांनी भारत हीच आपली कर्मभूमी मानली. नंतर त्या कधीही भारत किंवा पॉण्डेचेरी सोडून कुठेही गेल्या नाहीत.
मीरा यांचे जीवन म्हणजे प्रकाशाकडे असलेली मानवाची वाटचाल. कृष्ण माझे जीवन व्यापून राहिले आहेत. तेच मला दिशा दाखवतात, मार्गदर्शन करतात असे त्या म्हणत. त्यांचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला पण नंतर हिंदू धर्माचा स्वीकार करून एक समर्पित जीवन त्या जगल्या. अनेक हिंदू धर्मग्रंथांचे सखोल अध्ययन त्यांनी केले. प्रचंड लेखनही केले. योगी अरविंद जेव्हा आपल्या एकांतवासात आणि साधनेत मग्न होते तेव्हा अरविंदांच्या आश्रमाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. योगी अरविंदांनी ५ डिसेंबर १९५० ला आपला देह ठेवल्यानंतर आश्रमाची जबाबदारी पूर्णपणे माँवर आली आणि त्यांनी ती नुसतीच समर्थपणे सांभाळली असे नाही तर आश्रमाच्या कार्याला एक विशिष्ट दिशा दिली. आश्रमातील त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा पुढील भागात घेऊ या. ( उत्तरार्ध शुक्रवारी )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२३/०२/२०२२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा