मुख्य सामग्रीवर वगळा

माणसं तशी चांगली असतात...

 उगवतीचे रंग 

माणसं तशी चांगली असतात... 


परवा मी दोन माणसांना 

माझ्या घराजवळून जाताना पाहिलं 

दोघं आपसात बोलत चालली होती. 

एक दुसऱ्याला म्हणत होता... 

' त्याच्या डोळ्यात पाणी आलं 

मी त्याला म्हटलं तुला काही हवं का ? ' 

त्या माणसांचं एवढंच बोलणं मला ऐकू आलं 

ती कोणाबद्दल बोलत होती 

मला काहीच माहीत नव्हतं. 

पण एवढं मात्र कळलं होतं की 

माणसं तशी चांगली असतात. ।। १ ।।


मला आठवला दुर्योधन 

महाभारतातला खलनायक 

कळत होतं त्यालाही की 

करतो आहोत आपण पांडवांवर अन्याय. 

तसा कृष्णाला म्हणालाही होता एकदा 

मी काय करू तूच सांग 

तू बोलतोस ते कळतंय रे मला 

पण मला तशी बुद्धीच होत नाही. 

दुर्योधनालाही आपल्या चुका कळत असतात  

कारण माणसं तशी चांगली असतात. ।। २ ।। 


धृतराष्ट्राचे तरी काय वेगळे होते 

त्याच्याकडे तर सत्ता, संपत्ती, विवेक,विचार सगळे होते 

पांडुपुत्र त्याचे देखील होतेच ना कोणीतरी 

नेत्रहीन असला तरी नव्हते का कळत सगळे !

दुर्योधन शकुनीला जरी असे स्वार्थापायी मूक संमती 

द्रौपदीच्या आर्त हाका त्याचेही हृदय भेदतात 

कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ४ ।।


रावण काय फक्त दुष्ट होता ? 

तो तर होता ज्ञानी, गुणी, शूर आणि पराक्रमी 

सीतेला उचलून नेताना तिच्या आर्त हाकांनी 

नसेल का त्याचे मन द्रवले !

मला तर नक्कीच वाटते की 

रावणासारख्या महापुरुषालाही करत असाव्यात 

अपराधीपणाच्या भावना अस्वस्थ 

असे विचार उगीचच मनात येऊन जातात 

कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ४ ।। 


वाल्ह्या कोळीही करत होता वाटमारी 

निष्पापांची लुटालूट आणि हत्येची सदैव तयारी 

कुटुंबासाठी जरी होती व्यवस्था सारी 

पण ठाऊक होते त्यालाही की 

निष्पापांची हत्या ही गोष्ट नाही बरी. 

नारदांनी सांगतात त्या गोष्टी 

वाल्ह्याला मनापासून पटतात. 

कारण माणसं तशी चांगली असतात.  ।। ५ ।। 


एखादी किरण बेदी करते 

तुरुंगातील कैद्यांसाठी काम 

तुरुंगातील वाट चुकलेल्या कैद्यांना 

एखादे विनोबा सांगतात समजावून  

आणि पाजतात गीतेचे मधुघट 

तुरुंगातील कैदी विनोबा आणि बेदींचं ऐकतात 

कारण माणसं कुठेतरी चांगली असतात. ।। ६ ।। 


सतत सुरु असते माणसांच्या मनात 

युद्ध चांगल्या आणि वाईट विचारांचे 

श्रेयस आणि प्रेयसचे 

जी माणसं ऐकतात 

आपल्या मनाचा आतला आवाज 

आणि करतात वाईट गोष्टींचा त्याग 

चांगल्या विचारांचाच आसरा ती घेत असतात 

कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ७ ।।


वाईट गोष्टी असतात तशा दिसायला आकर्षक 

सुंदरीचे रूप घेणाऱ्या चेटकिणीसारख्या 

आणि चांगल्या गोष्टी असतात साध्यासुध्या 

दिसायला नसतीलही आकर्षक 

पण अंतिमतः आपले हितच करतात 

बरीच माणसे त्याच करतात 

कारण माणसं तशी चांगली असतात. ।। ८ ।।

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१६/०२/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया कविता नावासहित शेअर करावी ) 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...