उगवतीचे रंग
तुफानातील दीप : डॉ टायरॉन हेज
कीटकनाशकं आणि तणनाशकं यांचा वापर आपल्याकडे अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. ही उत्पादनं निर्माण करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाची उपयुक्तता पटवून देऊन ते वापरण्यासाठी राजी करतात. परंतु टण आणि कीटक यांचा नाश करतानाच ही रसायनं मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर भयंकर घातक परिणाम करतात याची जाणीव बहुतेकांना असत नाही. स्वित्झर्लंडमधील सिंजेटा ही अशीच उत्पादनं निर्माण करणारी बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी. या कंपनीने निर्माण केलेले अट्रॅझिन हे तणनाशक अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. त्याचा वापर केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातील इतर अनेक देशात आणि आपल्या भारतातही ऊस आणि मका पिकवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. या अट्राझीनच्या वापराबद्दल आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दल संशोधन करून जगाला त्याचे दुष्परिणाम पटवून दिले ते अमेरिकेतील कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ डॉ टायरॉन हेज यांनी. त्यांच्या या लढ्याची कहाणी मोठी रोचक आहे.
फारसे शिक्षण न घेतलेल्या कृष्णवर्णीय आईवडिलांच्या पोटी टायरॉन यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. अमेरिकेत कृष्णवर्णीय माणसांना वर्णभेदाचे चटके सोसावे लागत होते. मात्र अशाही परिस्थितीत आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे असे टायरॉन यांच्या आईवडिलांना वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी त्याला प्रोत्साहनही दिले. टायरॉन मुळातच हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आला होता. शिक्षणात चमक दाखवल्याने त्याची निवड सहावीनंतर एका हुशार मुलांच्या शाळेत करण्यात आली. या शाळेत काळे आणि गोरे विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत होते. टायरॉन कृष्णवर्णीय असल्याने त्याला गोरे मित्र तर जवळ करत नव्हतेच पण त्याची हुशारी पाहून हा काय विशेष करणार आहे असे कृष्णवर्णीय मुलांना वाटायचे. त्यामुळे त्याला त्याच्या कृष्णवर्णीय मित्रांनीही दूर लोटले. टायरॉन यांच्या संवेदनशील मनाला या गोष्टीमुळे यातना होत होत्या पण त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून विज्ञान शाखेचे उच्च शिक्षण घ्यायचे असे आपले ध्येय ठरवले.
इतर मुलांपेक्षा टायरॉन यांची आवड वेगळी होती. त्यांचे मित्र ज्यावेळी निरनिराळ्या खेळांमध्ये दंग असत तेव्हा ते आपल्या घरासमोरील झाडे, प्राणी, पशुपक्षी यांचे निरीक्षण करत. उंदीर, साप, पाली, बेडूक आणि सरडे यांच्याबद्दल त्यांना कुतूहल होते. ते तासनतास त्यांचे निरीक्षण करीत. कधी कधी आपल्या घराच्या व्हरांड्यात आणून त्यांच्यावर प्रयोग करत. जणू ती त्यांची पहिली प्रयोगशाळा होती. बेडूक हा त्यांच्या अभ्यासाचा खास आवडता विषय होता.
पुढील शिक्षणासाठी ते बोस्टनला आले आणि हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. बोस्टन हे मोठे शहर. तिथे राहण्याचा खर्च, लोकांची वर्णद्वेषी वागणूक या गोष्टी त्यांना अस्वस्थ करीत होत्या. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी काही तरी काम करणे आवश्यक होते. विद्यापीठातील प्रयोगशाळेत त्यांना परीक्षानळ्या धुण्याचे काम मिळाले. प्रयोगशाळेत काही शिकता येईल अशी त्यांना आशा होती. पण तसे काही झाले नाही. या कालावधीत ते एकटे पडले. मनात निराशा दाटून आली. या काळात दोन व्यक्तींनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यापैकी एक होती त्यांच्याच वर्गात शिकणारी कॅथी किम नावाची विद्यार्थिनी आणि दुसरी व्यक्ती होती हार्वर्ड विद्यापीठातच प्राध्यापक ब्रूस वाल्डमन. प्रा ब्रूस वाल्डमन यांनी टायरॉन यांची गुणवत्ता हेरली होती. टायरॉन हे पुढे निश्चितपणे एक मोठे नामवंत शास्त्रज्ञ होतील असा विश्वास प्रा ब्रूस यांना होता. कॅथी सुद्धा टायरॉन यांना धीर देण्याबरोबरच त्यांना होता होईल ती मदत करत होती.
प्रा ब्रूस हे बेडकांवरच संशोधन करत होते. त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत टायरॉन यांना मदतनीस म्हणून ठेवले. आता आपल्या आवडीचे काम करायला मिळाल्याने टायरॉनही खुश होते. येथे त्यांच्या संशोधनालाही गती मिळाली. बेडकांवरील संशोधन करून त्यांनी पी एच डी साठी आपला प्रबंध सादर केला. विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट प्रदान केली. याच दरम्यान त्यांचा आणि कॅथीचा विवाह झाला आणि टायरॉन यांच्या जीवनात काही सुखाचे दिवस आले. आता याच विद्यापीठाने त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. जीवशास्त्र शिकवणारे जे मोजके कृष्णवर्णीय प्राध्यापक होते त्यात आता टायरॉन यांची सन्मानाने गणना होऊ लागली. त्यांनी लवकरच आपल्या गुणवत्तेच्या आधारावर सर्वोत्कृष्ट प्राध्यापक म्हणून नाव कमावले.
त्याच सुमारास अमेरिकेत आपली कृषी उत्पादने मोठया प्रमाणावर विकणाऱ्या सिंजेटा या बहुराष्ट्रीय कंपनीच्या नजरेत डॉ टायरॉन यांचे संशोधन कार्य आले. कीटकनाशके आणि तणनाशके यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपले उत्पादन पर्यावरणास हानिकारक नाही हे सिद्ध करावे लागे. त्यासाठी सिंजेटा कंपनीने शास्त्रज्ञ म्हणून मोठ्या पगारावर डॉ टायरॉन यांना आमंत्रित केले. डॉ टायरॉन यांनाही ही आपल्या संशोधनासाठी सुसंधी वाटली. आपले विद्यापीठातील कार्य सोडून आता डॉ टायरॉन सिंजेटा कंपनीत संशोधन करू लागले. पण हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले की कंपनी अट्रॅझिन नावाचे जे तणनाशक बनवत होती त्याचा विपरीत परिणाम बेडकांवर होत होता.
त्यांनी दोन प्रकारे बेडकांचे निरीक्षण केले. एका भांड्यात साधे पाणी घेऊन त्यात काही बेडूक सोडले. दुसऱ्या एका भांड्यात अट्रॅझिनयुक्त पाणी घेऊन त्यात काही बेडूक सोडले. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर त्यांना आढळून आले की ज्या पाण्यात अट्रॅझिन होते, त्या पाण्यातील बेडकांच्या शरीरात काही बदल होत आहेत. अधिक प्रयोगांती त्यांना कळले की अट्रॅझिनच्या वापरामुळे नर बेडकांमध्ये मादी बेडकांसारखी लक्षणे दिसत आहेत. त्या बेडकांचे रूपांतर अशा बेडकांमध्ये झाले होते की ते ना धड नर राहिले ना धड मादी. त्यांची प्रजोत्पादनाची क्षमताच नष्ट झाली होती.
आपले हे निष्कर्ष जेव्हा त्यांनी सिंजेटा कंपनीच्या अधिकारी आणि शास्त्रज्ञांसमोर मांडले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कंपनी हे दुष्परिणाम मान्य करायला तयारच नव्हती. त्यांनी धूर्तपणे टायरॉन यांना आणखी प्रयोग करायला सांगितले. त्यासाठी अधिक निधी पुरवण्याचे आमिष दाखवले. टायरॉन यांनी कंपनीची खात्री पटवून देण्यासाठी आणखी संशोधन करून त्याच निष्कर्षांची पुष्टी केली. या दरम्यान कंपनीने इतर शास्त्रज्ञांना निधी पुरवून आपल्याला हवे तसे निष्कर्ष संशोधनातून काढायला लावले. सिंजेटा कंपनी अनेक विद्यापीठांनाही संशोधनासाठी निधी पुरवत होती. पैसे देऊन शास्त्रज्ञ विकत घेणे आणि आपल्याला अनुकूल असे निष्कर्ष त्यांच्याकडून काढून घेणे हे उद्योग कंपनी करत होती कारण तिला आपल्या मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडायचे नव्हते.
डॉ टायरॉन यांनी कंपनीच्या इच्छेप्रमाणे काम करण्यास नकार दिला. त्यांनी कंपनी सोडली आणि लोकांना अट्रॅझिनच्या दुष्परिणामांबद्दल जागृत करण्याचे ठरवले. गावोगावी जाऊन विद्यार्थी, प्राध्यापक, शेतकरी आदींसमोर व्याख्याने दिली. यामुळे महाबलाढ्य सिंजेटा कंपनी हादरली. तिने साम, दाम, दंड, भेद या सगळ्या नीती डॉ टायरॉन यांच्या विरुद्ध वापरल्या पण टायरॉन बधले नाहीत. त्यांनी आपले जागृतीचे आणि संशोधनाचे कार्य सुरूच ठेवले. त्यांचे बेडकांवरील संशोधन जगप्रसिद्ध ' नेचर ' या मासिकात प्रकाशित होऊन जगभर पोहोचले.
प्रयोगशाळेतच बेडकांचे निरीक्षण करण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन आपल्या संशोधनाची पुष्टी करायचे ठरवले. त्यातही त्यांना आपले आधीचे निष्कर्षच बरोबर असल्याचे आढळून आले. त्यांनी मग हेच प्रयोग उंदरांवर करून पाहायचे ठरवले. या उंदरांवरील प्रयोगातून धक्कादायक निष्कर्ष त्यांच्या हाती आले. त्यातून त्यांना कळले की माणसाच्या शरीरात जर अट्रॅझिनयुक्त पाणी गेले तर पुरुषांना प्रोस्टेटचा कर्करोग आणि स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सरचे अलीकडे वाढलेले प्रमाण ही बाब अधोरेखित करते. यातील आश्चर्याची गोष्ट अशी की स्त्रियांच्या स्तनाच्या कर्करोगावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या एका औषधाची निर्मिती ही सिंजेटा कंपनीच करीत होती. म्हणजे अट्रॅझिनच्या विक्रीतून नफा कमावणे आणि त्याच्याच वापरातून निर्माण होणाऱ्या कर्करोगावरील औषध उत्पादन करून त्यातूनही नफा कमावणे असा दुहेरी खेळ ही कंपनी खेळत होती.
टायरॉन यांनी कंपनीचे हे रूप जगासमोर आणून कंपनीला उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. कंपनीने मग अतिशय खालची पातळी गाठून डॉ टायरॉन यांचे वैयक्तिक चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. पण डॉ टायरॉन आपल्या सिद्धांतांवर ठाम होते. ते कोणत्याही आमिषांना, दडपणाला बळी पडले नाहीत. अमेरिकेतील पाणीपुरवठा करणाऱ्या पंधरा कंपन्यांनी सिंजेटा आणि अट्रॅझिन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध न्यायालयात दावा ठोकला. या न्यायालयाने अट्रॅझिन निर्माण करणाऱ्या कंपन्यांना जबर दंड ठोठावला. एक प्रकारे डॉ टायरॉन यांचा हा विजय होता.
डॉ टायरॉन यांचा लढा आजही सुरूच आहे. त्याचे सुपरिणाम दिसत आहेत. अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण विभागाने अट्रॅझिनच्या वापरावर काही निर्बंध लादले आहेत आणि त्याच्या वापराचा पुनर्विचार सर्वानी करावा असे आवाहन केले आहे.
डॉ टायरॉन तरुणांना दिलेल्या आपल्या संदेशात म्हणतात, ' विज्ञान ही सत्यापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया आहे. वैज्ञानिक होणं ही फक्त करिअरची संधी नसून जीवनाचा घेतलेला शोध आहे, सत्याकडे होणारी वाटचाल आहे. ' ते पुढे म्हणतात, ' माझ्या जडणघडणीत माझ्या आईवडिलांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. वडिलांनी मला शिकवलं आहे की काही बक्षीस मिळेल या आशेने योग्य गोष्ट करू नको आणि काहीतरी शिक्षा होईल या भीतीने अयोग्य गोष्ट करण्याचे टाळू नको. तात्पर्य म्हणजे एखादी गोष्ट करणे जर योग्य असेल तर ती योग्य आहे म्हणूनच कर. बक्षिसाच्या किंवा कोणी चांगले म्हणेल म्हणून करू नको. आणि एखादी गोष्ट करणे अयोग्य असेल तर भीतीपोटी ती टाळण्यापेक्षा ती अयोग्यच आहे म्हणून करू नकोस. '
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०२/०२/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा