मुख्य सामग्रीवर वगळा

याचसाठी केला होता अट्टाहास...

 उगवतीचे रंग 

याचसाठी केला होता अट्टाहास... 

सोशल मीडिया म्हणजे दुधारी शस्त्र आहे. त्याचा आपण चांगला किंवा वाईट,जसा आपण वापर करू तसा करता येईल. काय करायचे हे आपल्या हातात असते. खरे म्हणजे ही सगळी वाक्ये आता आपली तोंडपाठ झाली आहेत. पण तरीही सत्य ते सत्यच ! ते पुन्हा सांगितले तर काय बिघडले ? म्हणून वाचक आता याबाबत मला क्षमा करतील. तर मंडळी, नमनालाच घडाभर तेल न वापरता सुरुवातच करतो विषयाला. 

झालं असं की परवा मला कुणीतरी एक व्हिडीओ पाठवला होता. तुम्ही म्हणाल आता यात काय विशेष ! आम्हालाही रोज शेकड्यानी व्हिडीओ येत असतात. बरोबर आहे तुमचे. पण मंडळी त्यातले फार थोडे व्हिडीओ असे असतात की जे आपल्याला काहीतरी सांगून जातात, शिकवून जातात. आपल्या हृदयाला स्पर्शून जातात. असाच एक व्हिडिओ मी पाहिला होता. त्यात एका सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाला निरोप देतानाचा हृदयस्पर्शी प्रसंग दाखवला होता. तो व्हिडीओ पाहून मला डॉ राधाकृष्णन यांना निरोप देतानाही त्यांची गाडी विद्यार्थ्यांनी स्वतः ओढली होती या त्यांच्या जीवनातील प्रसंगाची आठवण झाली. मलाही माझ्या जीवनात घडलेल्या काही प्रसंगांची आठवण झाली. 

झाले असे की मी चाळीसगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत असताना, माझी नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून निवड झाली. केंद्र सरकारच्या वतीने माझे पोस्टींग बीड जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात करण्यात आले. त्या वेळी नवोदय विद्यालये नुकतीच सुरु झाली होती. ग्रामीण भागातील गरीब परंतु हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण सहज उपलब्ध व्हावे हा उदात्त हेतू त्यामागे होता. विद्यालये नुकतीच सुरु झाल्याने बऱ्याच ठिकाणी शाळांच्या इमारती नव्हत्या किंवा दुसरीकडे कुठेतरी त्या तात्पुरत्या भरवल्या जात होत्या. मी बीडला गेलो तेव्हा तेथेही अशीच परिस्थिती होती. 

बीड जिल्ह्यातील नवोदय विद्यालय तेव्हा केज तालुक्यातील धनेगाव येथे मांजरा प्रोजेक्ट साठी तात्पुरत्या उभारलेल्या इमारतीत भरवले जाणार होते. अजून कशालाच सुरुवात नव्हती. साधारणपणे एक महिना मला बीड शहरातील रेस्ट हाऊसमध्ये मिळालेल्या एका खोलीत काढावा लागला. तोपर्यंत शाळेची इतर व्यवस्था होत होती. अखेर साधारणपणे एका महिन्यानंतर शाळा त्या धनेगाव येथील मांजरा प्रोजेक्टमधील छोट्या वसाहतीत भरू लागली. खाण्यापिण्याचे, राहण्याचे सगळेच हाल होते. माझ्यानंतर काही इतर शिक्षकही रुजू झाले. तेही ही परिस्थिती पाहून आपले कसे होणार या चिंतेत पडले होते. अशा परिस्थितीत आमच्यापैकी काही शिक्षकांनी पुन्हा आपापल्या पूर्वीच्या शाळेत परत जाऊ देण्यासाठी अर्ज केला होता. पण शाळा नियमित सुरु झाली आणि आम्ही त्या वातावरणात रमून गेलो. केलेल्या त्या अर्जाबद्दल विसरूनही गेलो. 

बीड जिल्ह्यातील खेड्यांमधून गरीब शेतकऱ्यांची मुले मुली परीक्षा पास होऊन नवोदय विद्यालयात मोठ्या हौसेने आणि आशेने आली होती. त्या मुलांना तिथे चांगल्या प्रकारचे शिक्षण, जेवण, राहण्याची सुविधा आदी गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. गुर्जर म्हणून आमच्या शाळेचे प्रिन्सिपॉल होते. ते शिस्तप्रिय, स्वभावाने कडक होते. शाळेतील सर्व गोष्टींवर त्यांची करडी नजर असायची. जिल्हाधिकारी हे शाळेचे अध्यक्ष होते. त्यावेळी श्रीनिवास पाटील हे बीडचे जिल्हाधिकारी होते. त्यांची शाळेला व्हिजिट होत असे. 

शाळा नियमित सुरु झाली. विद्यार्थ्यांचे निष्पाप, निरागस चेहरे आम्हाला घरची आठवण होऊ देत नसत. त्यांच्या चेहऱ्यावर शिकण्याची उत्सुकता असे. आईवडिलांपासून दूर असल्याने आम्ही शाळेतील शिक्षकच त्यांचे आईबाप झालो होतो. त्यांना रागावत होतो आणि प्रेमही लावत होतो. मुलांना सकाळी नाश्ता, दुपारी, रात्री ताजे जेवण दिले जायचे. सकाळ संध्याकाळ ग्राऊंडवर निरनिराळे मैदानी खेळ, कवायत इ घेतले जायचे. मुले खुश होती. त्यांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पालनपोषण उत्तम रीतीने होत होते. 

विद्यालय निवासी असल्याने शिक्षक, इतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक आदींची एक टीमच कार्यरत होती. वांगीकर नावाचे आमचे एक लेखनिक होते. मिलिटरीतून निवृत्त झालेले सोनवणे म्हणून एक सुरक्षा रक्षक होते. ते बरेच सिनियर होते. पण सर्वांना फार जीव लावायचे. आम्ही त्यांना आदराने मेजर म्हणून हाक मारायचो. मुलांचे जेवण आईच्या मायेने बनवणारे आचारी होते. अशी सगळी टीम एकमेकांच्या सहकार्याने काम करायची. रात्री थोडा वेळ एकत्र येऊन सर्वांच्या सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या. कधी कधी गावाकडे जाणे आवश्यक असले तर प्रिन्सिपॉल सरांच्या परवानगीने रजा घेऊन आळीपाळीने एकदुसऱ्याला जाता यायचे. एकदा तर शाळेचे प्रिन्सिपॉल गुर्जर यांना काही कामानिमित्त सलग पंधरावीस दिवस रजा घेऊन गावी जावे लागले होते. त्या वेळी शाळेची सगळी जबाबदारी सिनियर या नात्याने माझ्यावर आली होती. ती जबाबदारी माझ्याकडून उत्तम पार पडली. सुदैवाने काही अडचण आली नाही. 

आता शाळा छान चालली होती. मुले अभ्यासात, खेळात प्रगती करत होती. मुलांना अवांतर परीक्षेतही चांगले गुण मिळत होते. सांस्कृतिक कार्यक्रमात मुले भाग घेत होती. असे सगळे सुरळीत सुरु असताना अचानक एके दिवशी एक धक्कादायक गोष्ट घडली. आम्ही सुरुवातीला परत आमच्या शाळेत जाण्यासाठी जो अर्ज केला होता, तो अचानक मंजूर होऊन आला होता. पण प्रिन्सिपॉल सरांनी आम्हाला त्याबद्दल सांगितले नाही. त्यांनी फक्त आम्हाला तयारी करायला सांगितले. आम्ही आमचे सगळे सामान घेऊन तयार झालो. शाळेच्या मैदानावर सगळी मुले जमली होती. त्यांना सांगण्यात आले की सरांची आता बदली झाली आहे. आम्हाला तर हे सगळे पाहून धक्काच बसला. आम्ही आता खरे तर त्या वातावरणात रमून गेलो होतो. पण आता पर्याय नव्हता. 

मुलांच्या डोळ्यांना धारा लागल्या. सगळ्या कर्मचाऱ्यांचे, शिक्षकांचे डोळे पाणावले. मेजर सोनवणे, लेखनिक वांगीकर आदी मंडळी गळ्यात पडून रडायला लागली. मुलं मुली, कर्मचारी सगळे पाणावलेल्या डोळ्यांनी, दाटून आलेल्या कंठानी आम्हाला सांगत होते. ' सर, जाऊ नका. आमचं काही चुकलं का. सर, परत या...' त्या दिवशी रक्ताच्या नात्यापलीकडची नाती, प्रेम, माया आम्ही अनुभवली. आम्ही जीपमध्ये बसलो. गाडी आम्हाला घेऊन निघाली. गाडी आता थांबणार नव्हती. मुलं गाडीच्या मागे बरीच अंतर आम्हाला निरोप देण्यासाठी आली. गाडी आता पुढे वेगाने जात होती आणि आमचा जीव मागेच शाळेत घोटाळत होता. पुढे अनेक दिवस त्या शाळेतील विद्यार्थ्यांची अधूनमधून पत्रे, शिक्षकांचे फोन येत राहिले. मी शिक्षक नसतो तर हे प्रेम अनुभवायला मिळाले असते का ? 

पुढे आमच्या शाळेतून निवृत्त झाल्यानांतरही हाच अनुभव आला. अनेक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका पाया पडून आशीर्वाद घेऊ लागल्या. ' सर, निवृत्त झालात तरी अधूनमधून शाळेत येत चला. आम्हाला भेटण्यासाठी येत चला. ' असे ते सांगत होते. सगळ्यांचे पाणावलेले डोळे खूप काही सांगून जात होते. ज्या शाळेत ३५ वर्षे सेवा केली त्या शाळेचा निरोप घेताना गलबलून येत होते. पण सेवानिवृत्ती अटळ असते. कुठेतरी थांबावे लागते. 

आपलं जीवन ही सुद्धा अशीच एक शाळा आहे. इथे विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळे भेटतात. आपण त्यांना प्रेम द्यायचे असते. जीव लावायचा असतो. तेच प्रेम, तोच आदर त्यांच्याकडूनही अनेक पटींनी आपल्याला परत मिळतो. या जीवनाच्या शाळेत विद्यार्थी असतात आपली मुले. आपले नातेवाईक, समाजातील मान्यवर व्यक्ती पालकाच्या भूमिकेत असतात. आपले मित्र असतात आपले सहकारी शिक्षक. आपली नीतिमूल्ये, संस्कार असतात आपले प्रिन्सिपॉल. ते आपल्याला आपल्या हातून वाईट कृती करण्यापासून परावृत्त करतात. शिक्षकाला निवृत्तीच्या प्रसंगी जसा पाणावलेल्या डोळ्यांनी भावपूर्ण निरोप मिळतो, तसाच निरोप आपल्या आयुष्याच्या अखेरीस सगळ्यांनी आपल्याला द्यावा. ' सर, परत या...' या सारखी वाक्ये आपल्याही वाट्याला यावीत. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर ' याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. '  आयुष्यात कठोर मेहनत, कष्ट, सगळ्यांना दिलेले प्रेम या मुळे आयुष्याच्या अखेरीचा दिवस ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचे तर ' सोनियाचा दिन ' होऊ शकतो. कृतकृत्यता, कृतार्थता वाट्याला येऊ शकते. त्यापासून मिळणाऱ्या समाधानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. 

संत कबीर म्हणतात

कबीरा, जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोये ।

ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोये ।।

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२३/०१/२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...