उगवतीचे रंग
चांदणे शब्दफुलांचे...
नारायण श्रीपाद राजहंस...! बस नामही काफी हैं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान बाळगणाऱ्या रसिकांना नारायणराव राजहंस म्हणजेच ' बालगंधर्व ' हे सांगावं लागत नाही. ' बालगंधर्व म्हणजे मराठी रसिकांच्या ' मर्मबंधातली ठेव ' ! बालगंधर्व म्हणजे मराठी नाट्यरसिकांचा, संगीतप्रेमींचा एक हळवा कोपरा ! या भूलोकीच्या गंधर्वावर अनेक पुस्तके लिहिली गेली. डॉक्युमेंटरीज,चित्रपट निघाला. ज्यांनी बालगंधर्वांना पाहिले, ऐकले अशा भाग्यवान लोकांपैकी फारच थोडे लोक आता हयात असतील. मी बालगंधर्वांना पाहिले किंवा ऐकले नाही. पण त्यांच्याबद्दल जेव्हा काही वाचायला मिळालं ते वाचलं. सुबोध भावेंनी भूमिका साकारलेला बालगंधर्व चित्रपट पाहिला. पुण्यातल्या रसिकांचं बालगंधर्व रंगमंदिराचं प्रेम अनुभवलं. कधी संधी मिळाली तर बालगंधर्वला जाऊन काही नाटकं पाहण्याचा आनंद घेतला. बालगंधर्व आणि मी यांच्यातलं नातं एवढंच मर्यादित ! मला ना गाता येत ना नाट्यसृष्टीशी मी कुठल्या तरी अंगाने निगडित ! पण या महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राबाहेरचा जो तमाम मराठी रसिक आहे ना त्यांचा मी एक छोटासा प्रतिनिधी म्हणून निश्चितच या विषयावर आपल्याशी संवाद साधू शकतो.
याच महाराष्ट्रात जसे बालगंधर्व होऊन गेले, तसा आणखीही एक गंधर्व होऊन गेला. तो शब्दगंधर्व ! रसिकराज ! समस्त मराठी रसिक आणि कलाकार यांच्यात ' आपुलकीचा ' पूल बांधणारा. या शब्दगंधर्वाचं नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात तुमचे आणि माझे पुलं आणि सर्वांचे लाडके भाई. बालगंधर्व हा जसा मराठी चित्र/नाट्य रसिकांचा हळवा कोपरा आहे तसाच एक कोपरा आहे या ' भाईचा. ' मराठी रसिकांच्या मनातली जागा अशा काही काही निवडक माणसांनी आरक्षित केली आहे. कोणी जर म्हटले की मी तुम्हाला अमुक एक इतकी रक्कम देतो, पण तुमच्या मनातील ही जागा मला द्या तरी माझा मराठी माणूस सगळं काही द्यायला तयार होईल पण बालगंधर्व, पुलंसारखी माणसे म्हणजे त्याचं दैवत ! तो ती जागा कशी देईल !
याच पुलं आणि बालगंधर्व यांच्यामध्ये संबंधाचा एक नाजूक पूल आहे. पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर पुलंच्या पुढाकारानं उभं राहिलं. त्याच्या उदघाटनाचा पडदा साक्षात बालगंधर्वांच्या हाताने वर गेला. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात ते काही उगीच नाही. याच पुण्यात लोकमान्य टिळकांनी बालगंधर्वांचं गाणं ऐकलं. त्यांचा अभिनय आणि गायकी पाहून लोकमान्यांनीच त्यांना ' बालगंधर्व ' हा किताब दिला. जसे बाळ गंगाधर टिळक हे ' लोकमान्य ' म्हणूनच प्रसिद्धी पावले तसेच त्यांनी ज्यांचा बालगंधर्व म्हणून उल्लेख केला ते नारायण श्रीपाद राजहंस ' बालगंधर्व ' म्हणूनच जगद्विख्यात झाले.
कोण होते हे बालगंधर्व ? रंगभूमीवरील गायक ? नट ? स्त्री भूमिका करणारे कलाकार ? हे सगळे तर ते होतेच पण बालगंधर्व म्हणजे रंगभूमीवरचं मूर्तिमंत सौंदर्य ! रंगभूमीला पडलेले सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे बालगंधर्व ! रंगभूमीला जर मानवी अवतार घेऊन काही सांगायचे झाले असते तर ती निःसंशय बालगंधर्वाच्या रूपानेच आपले मनोगत व्यक्त करती झाली असती. बालगंधर्व ज्या पद्धतीने रंगभूमीवर वावरले त्याला तोड नाही. ज्या काळात स्त्रियांनी रंगभूमीवर काम करणे कमीपणा मानला जात असे त्या काळात त्यांनी रंगभूमी आपल्या स्त्री भूमिकेने अलंकृत केली. त्यांनी ज्या काही स्त्री भूमिका केल्या त्यात त्यांचे वागणे, बोलणे, चालणे, हसणे, लाजणे या सगळ्या गोष्टी इतक्या अप्रतिम होत्या की त्या भूमिका तेवढया ताकदीने साकारणे एखाद्या स्त्री कलाकाराला देखील शक्य झाले नसते.
आचार्य अत्रे त्यांच्या स्त्री भूमिकांबद्दल बोलताना म्हणाले होते पुरुषाने केलेल्या स्त्रीच्या सर्वात सुंदर भूमिका म्हणजे बालगंधर्वांच्या भूमिका. स्त्री वेशात एवढा सुंदर पुरुष कधीच दिसला नव्हता. गायन म्हणजे ज्यांचा आत्मा होता अशा भास्करबुवा बखलेंचे शिष्योत्तम म्हणजे बालगंधर्व. बालगंधर्व म्हणजे महाराष्ट्रातील सुरांचे साक्षात कैलास लेणे ! बालगंधर्वांनी सूरांचाच मळा फुलवला. सूरच पेरले. सुरांचं अमाप पीक आलं. ते पसा पसा भरून रसिकांना वाटत राहिले. ही ओंजळ कधीही रिकामी झाली नाही.
' आपुलकी ' या पुलंच्या पुस्तकात बालगंधर्वांवर एक लेख आहे. मला वाटतं हा लेख लिहिताना पुलंच्या लेखणीने नेहमीची नर्मविनोदी शैली सोडून ज्ञानेश्वर माऊलींच्या ' मोगरा फुलला ' सारखी सुंदर सुगंधी शब्दफुलांची बरसात केली. एखादे कारंजे मनमोहक अशा पद्धतीने थुई थुई नाचत असताना अशा या कारंजाखाली आपण बसलो की त्याचे तुषार आपल्यावर अमृतजलाचा जो शिडकावा करतात, त्या वर्षावात तो लेख वाचताना मी जणू न्हाऊन निघालो. कोजागिरीचे मनमोहक चांदणे मी अनुभवले. असं वाटलं की साक्षात पुलं ओंजळभरून शब्दफुलांची बरसात बालगंधर्वांवर करताहेत. मी त्या प्रसंगी हजर आहे. त्या फुलांचा गंध माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तोच गंध तुमच्यापर्यंत थोडासा तुमच्यापर्यंत पोहोचवता आला तर पोहोचवावा म्हणून हा हृदयसंवाद !
संगीत हा अनेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. जीवनात संगीत नसते तर आपले जीवन किती निरस झाले असते याची कल्पना करवत नाही. संगीताबद्दल बोलताना पुलं एक सुरेख वाक्य लिहून जातात. ते म्हणतात, ' संगीताला मी माझ्या उपकारकर्त्याच्या जागी मानतो. ' आपण जन्मल्यापासून गाणी, संगीत ऐकत असतो, त्याच्या प्रेमातही पडतो. पण पुलंसारखा अवलिया सहज लिहून जातो की संगीताला मी माझ्या उपकारकर्त्याच्या जागी मानतो. बालगंधर्वांबद्दल आणि त्यांच्या गायकीबद्दल बोलताना ते म्हणतात की आता बालगंधर्व हे कोणा एका व्यक्तीचे नाव राहत नाही. एका गायकीचे ते नाव होते. त्याबद्दल बोलताना पुलं पुढे म्हणतात, ' नाटकाला अनुरूप अशी ती गायकी होती. शब्द आणि सूर यांना जवळ जवळ ठेवणारी होती. त्यांच्यातले अंतर फार दूर राहू नये, अर्थाशी फारकत होऊ नये अशी खबरदारी घेणारी होती. पण त्यात अनेक अशी छोटी छोटी, इतकी गुप्त दारे होती, की ती जाणूनबुजून बंद ठेवलेली होती. नव्या पिढीला तर त्या शब्दांचे कुठल्या नाट्यप्रसंगांशी नाते जमले होते तेही ठाऊक नाही. तरीही गाण्याची नजर असलेली ही तरुण मंडळी त्या सूरलयीच्या लीलेने मोहून जातात. याचा अर्थच असा की एका सगुणरूप गायकीने आता निर्गुणाच्या दिशेने यात्रा सुरु केली आहे. '
वरील परिच्छेदातील शेवटच्या वाक्याने मला मोहून टाकले. आपला परमेश्वराच्या शोधाचा प्रवास सुद्धा सगुणाकडून निर्गुणाकडे होत असतो. तसाच बालगंधर्व नावाची व्यक्ती आणि त्यांच्या गायकीचा प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडे होतो आहे ! खरं आहे. कालाच्या ओघात व्यक्ती आणि तिचे व्यक्तिमत्व विरून जाते. पण अशा काही गोष्टी असतात की ज्या चिरंतन असतात. त्या कालजयी असतात. रामायणकाळात प्रभू रामचंद्र मानवी अवतारात होते. महाभारत काळात भगवान श्रीकृष्ण. काळाच्या ओघात ' रामही गेले, कृष्णही गेले...' पण गेले ते सगुण अवतारातील राम आणि कृष्ण. त्यांचं कार्य, त्यांची शिकवण मात्र चिरंतन आहे. त्या शिकवणुकीत, त्या चरित्रात शिवाजी जन्माला घालण्याची ताकद आहे. अशीच गायकी बालगंधर्वांची ! पुलंनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख संगीताची साधना करू पाहणाऱ्या नवगायकांना सुद्धा मार्गदर्शक ठरेल असाच आहे.
याच लेखात पुलं पुढे म्हणतात, ' मी सुदैवाने अनेक तोलामोलाचे गायक ऐकले आहेत. प्रत्येकाचे गाणे ऐकताना मला सतत एक वाटत आले आहे. ते हे की हे कलावंत आपल्या गाण्यातून काहीतरी सिद्ध करायला बसतात. कुणी लयकारीवरची हुकूमत दाखवतो, कुणी चीज आणि राग यांचे शुद्धत्व जपल्याच्या तोऱ्यात असतो. कुणी आपल्या घराण्यातले जडजवाहीर पुढे ठेवून श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहतो. कुणी रियाझाचे आपण किती प्रचंड डोंगर उपसले आहेत ते पहा असे ध्वनित करत असतो, कुणी आपल्या गळ्यातून सुरावलीच्या फुलबाज्या उडवून दिपवत असतो - कुणी काही,कुणी काही. पण प्रत्येक जण अधूनमधून का होईना काही तरी गाण्यातले किंवा गाण्याबाहेरचेही सिद्ध करू पाहत असतो, मैफिल यशस्वी करण्याची जिद्द असते. कुणावर तरी मात करण्याची ईर्षा दिसते. '
यातच बालगंधर्वांबद्दल बोलताना पुलं पुढे म्हणतात, ' बालगंधर्वांचे गाणे ऐकताना मात्र मला सतत एक गोष्ट जाणवत आली आहे, ती म्हणजे ते फक्त गायला बसत. यापलीकडे काहीही सिद्ध करायला बसत नसत. चारी दिशांच्या पाखरांनी एखाद्या वृक्षावर भूरूभरू येऊन बसावे तशी ती सुरांची पाखरे त्यांच्या हृद-कदंबावर येऊन बसत आणि गाणे सुरु होई. गाणारा देह हे केवळ एक साधन. त्या गाण्यातून त्यांना घराणे वगैरे काहीही सिद्ध करायचे नसे. येथे गाणाराच गाणे होऊन जायचा. त्या गाण्याला म्हटले तर परंपरा होती, म्हटले तर नव्हती. '
बालगंधर्वांच्या गायकीबद्दल बोलताना पुलं पुढे म्हणतात, ' ज्यांना त्या गाण्याच्या मोठेपणाची खूण पटली त्यांनी मात्र घराण्याबिराण्याचा अहंकार बाजूला सारून ती गाणीच नव्हे तर गायकीही स्वीकारली. अल्लादियाँ खां साहेबांचे चिरंजीव मरहूम मंजीखांसाहेब, बालगंधर्वांची पदे गाताना अंत्रोळी घराण्याची चीज गायल्यासारखेच रमून जात. आग्रेवाले निसारहुसेनखां ' भूषण संसारा ' फार मजेत गात असत. अहमदजान थिरकवाँ खांसाहेबांसारखे तबला नवाज नारायणरावांचे ' मम सुखाची ठेव ' सुरु झाल्यावर स्वतःलाच सुखाची ठेव सापडल्यासारखे त्या रूपकात एकरूप व्हायचे. असे किती गायक आणि वादक आठवावे ? डोंगरातल्या झऱ्याचे पाणी जसे कुणीही ओंजळ भरून घ्यावे आणि तृप्त व्हावे, त्या झऱ्यावर जसा कुणा एकट्याचा मालकी हक्क नसतो, तसेच या बालगंधर्वांच्या गायकीचे आहे. साध्या लावणीपासून ते अंत्रोळी घराण्याच्या गायकीपर्यंत जे पाहावे ते त्यात दिसल्यासारखे वाटते. तरीही ते गाणे झऱ्यासारखे स्वयंभू, झऱ्यासारखे थुयथुयणारे. इथे जणू निर्मळ सुरांचे सौंदर्य माहेराला आले आहे. आणि माहेर म्हणजे काय ? जिथे स्वकुलतारकसुतांना मन मानेल तसे आनंदात बागडायला मिळते ते माहेर ! '
शब्दगंधर्व पुलंनी स्वरगंधर्वाची बांधलेली ही पूजा आहे. आता बालगंधर्व असते तर त्यांच्या मुखातून ' मम आत्मा गमला..' सारखी एखादी तान सहज बाहेर पडली असती.
काय अप्रतिम शब्द आहेत पुलंचे ! त्यातील सौंदर्य बघा ! बालगंधर्वांचे गाणे कसे ? झऱ्यासारखे निर्मळ ! त्यांच्या गाण्यात जणू ' सुरांचे सौंदर्य माहेराला आले..' माहेर कशाला म्हणायचे ? जिथे मन मानेल तसे आनंदाने बागडायला मिळते ते... ' मी बापडा यावर अधिक काय बोलणार ! शब्दफुलांचं चांदणं बरसतं आहे. आपण त्यात न्हाऊन घ्यावं. पवित्र व्हावं, पावन व्हावं, ' पुलकित ' व्हावं...!
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१७/०१/२०२२
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा