मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ जोनास साक : मानवतेचा पुजारी

उगवतीचे रंग 

डॉ जोनास साक : मानवतेचा पुजारी 

' विटामिन जिंदगी ' हे ललित कुमार यांचे पुस्तक वाचायला नुकतीच सुरवात केली आहे. काही प्रकरणे वाचून झाली. ललितचं आयुष्य म्हणजे नियतीशी केलेला एक यशस्वी संघर्ष आहे. लहानपणीच पोलिओसारख्या दुर्धर आजारानं त्यांना सर्वसामान्यांपेक्षा वेगळं केलं. नियतीनं कठोर परीक्षा घेतली पण त्यांनी आपलं मनोबल आणि परिश्रम यांच्या जोरावर स्वतःला चारचौघांपेक्षा वेगळं सिद्ध केलं. त्यांच्या या जीवनप्रवासाची कहाणी सांगतं ' विटामिन जिंदगी ' हे पुस्तक. या पुस्तकाचं नावही जरा आगळंवेगळं आहे. आपल्या शरीराला जशी जीवनसत्त्वांची आवश्यकता असते, तशीच आपल्या मनालाही आशा, आत्मविश्वास, जिद्द, हिंमत आणि प्रेरणा यासारख्या जीवनसत्त्वांची गरज असते. म्हणूनच या पुस्तकाचं नाव ' विटामिन जिंदगी. ' 

या पुस्तकाच्या सुरुवातीला ललित यांनी डॉ जोनास साक यांची थोडक्यात माहिती दिली आहे. ती माहिती मी वाचली आणि या डॉ जोनास यांच्याबद्दल जाणून घ्यायची मला उत्सुकता लागली. कोण होते हे डॉ जोनास साक ? हाच तो ध्येयवेडा माणूस की ज्याने पोलिओवरची लस शोधून काढली आणि करोडो बालकांचे प्राण वाचवले. पण त्याच्याबद्दल जाणून घेताना मला अशी काही माहिती मिळाली की या दिव्य व्यक्तिमत्त्वाबद्दल माझा आदर अधिक वाढला आणि मी मनापासून त्याला प्रणाम केला. त्याबद्दल मी सांगणारच आहे पण आधी थोडी पोलिओची पार्श्वभूमी जाणून घेऊ या. 

पोलिओ हा सुद्धा आजच्या कोरोनाप्रमाणे व्हायरसमुळे होणारा एक आजार. या रोगाचे विषाणू मज्जासंस्थेवरच हल्ला करतात आणि आंशिक किंवा पूर्ण पक्षाघात होऊ शकतो. या रोगाला लहान मुले मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. पोलिओग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातून, दूषित पाण्यातून या रोगाचा व्हायरस मानवी शरीरात शिरकाव करू शकतो. आज भारतात पोलिओ रुग्ण नाहीत. २०११ पासून भारतात एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही म्हणून २०१४ मध्ये भारत हे पोलिओमुक्त राष्ट्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तरी लहान मुलांना हा डोस आवर्जून दिला जातो. कारण भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये या रोगाचे जिवाणू सक्रिय असू शकतात. 

अमेरिकेत १९४० ते १९५० च्या सुमारास पोलिओमुळे अनेक बालके मृत्युमुखी पडली. लाखो बालके कायमची अपंग झाली. असं म्हटलं जातं की या सुमारास अमेरिकेला दोन महायुद्धे लढावी लागली. पहिले म्हणजे शत्रू राष्ट्रांशी आणि दुसरे म्हणजे पोलिओशी. पहिल्या महायुद्धात ( इथे शब्दशः अर्थ पहिले जागतिक महायुद्ध नव्हे ) तर अमेरिकेने विजय मिळवला पण दुसरे म्हणजे पोलिओशी लढा हे फार कठीण होते. १९५२ च्या दरम्यान एकट्या अमेरिकेत पोलिओच्या ५८००० केसेस समोर आल्या. संपूर्ण युरोपात आणि जगभर तर हे प्रमाण दरवर्षी लाखोंच्या संख्येत आढळून येत होते. 

या भयानक आजारामुळे लहान मुलांचे बालपणच करपून जात होते. या रोगामुळे येणारे अपंगत्व त्यांना जन्मभर सोबत वागवावे लागत होते. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पालक आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवायलाही घाबरत होते. यावर कोणताही परिणामकारक उपाय दृष्टीपथात येत नव्हता. अशा या भयानक आजारावर  अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ जोनास साक यांनी पोलिओवरील लस शोधून संपूर्ण मानवजातीला दिलासा दिला. 

अशिक्षित आणि सामान्य मात्यापित्यांच्या पोटी जन्मलेल्या जोनास याला शिक्षणात उत्तम गती होती. मुळातच कुशाग्र बुद्धीचे वरदान त्याला लाभले होते. सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्क मध्ये शिक्षण घेणाऱ्या या जोनासचे स्वप्न होते वकील बनण्याचे. जोनासच्या आईला वाटत होते की आपल्या मुलाने डॉ व्हावे. आई आणि मुलामध्ये याबद्दल चर्चा सुरु होती. जॉनसच्या आईने त्याला डॉ होण्याचे महत्व पटवून त्याला वकील बनण्याच्या निर्णयापासून परावृत्त केले. त्याच्या आईचा हा निर्णय योग्य ठरला कारण जोनासने पुढे महत्वपूर्ण संशोधन करून संपूर्ण जगाला पोलिओच्या धोक्यापासून मुक्त केले. 

जोनास आपल्या आईच्या आग्रहाखातर डॉ तर झालाच, त्याला त्या परीक्षेत उत्तम गुणही मिळाले पण जोनासच्या मनात काही वेगळेच होते. त्याला इतर डॉक्टरांप्रमाणे दवाखाना थाटून एकेक रुग्ण बघण्यात रस नव्हता. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी काही करता आले तर करावे अशी इच्छा त्याच्या मनात होती. त्यामुळे डॉ जोनास यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मध्ये डॉ थॉमस फ्रान्सिस यांच्याबरोबर संशोधनाचे कार्य करायला सुरुवात केली. डॉ फ्रान्सिस यांनी टाईप बी इन्फ्लुएंझाच्या व्हायरसचा विषाणू शोधण्यात यश मिळवले होते. डॉ फ्रान्सिस यांच्यासोबत काम करताना डॉ जोनास यांचे पुढील ध्येय निश्चित झाले. 

पुढे डॉ जोनास यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मध्ये नोकरीला सुरुवात केली आणि त्यासोबतच एक प्रयोगशाळा उभारून आपले संशोधन कार्यही सुरु ठेवले. योगायोगाने याच सुमारास नॅशनल फाउंडेशन फॉर इनफंटाईल पॅरालिसिसच्या हेरी विवर यांनी संपर्क साधला. त्या सुमाराला शास्त्रज्ञांना पोलिओच्या तीन प्रकारच्या व्हायरसबद्दल ज्ञान होते. हेरी विवर यांची इच्छा होती की डॉ जोनास यांनी संशोधन करून पोलिओच्या अन्य प्रकारच्या व्हायरसबद्दल माहिती मिळवावी. या संशोधनासाठी त्यांना आवश्यक ती आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात आली. पुढे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी पोलिओ निर्मूलनासाठी राबवलेल्या मोहिमेतही त्यांनी सहभाग घेतला. डॉ जोनास यांनी आता पोलिओसाठी लस बनवण्याच्या कामाला स्वतःला वाहून घेतले. 

याच सुमारास अल्बर्ट सेबीन या नावाचे शास्त्रज्ञ देखील पोलिओची लस बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पोलिओचे जिवंत विषाणू निष्क्रिय करून तोंडावाटे दिली जाणारी लस तयार करण्याच्या प्रयत्नात ते गुंतले होते. डॉ जोनास यांनी मात्र पोलिओचे मृत विषाणू इंजेक्शनद्वारा मानवी शरीरात टोचून प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. डॉ जोनास यांनी दिवसरात्र या प्रयोगासाठी स्वतःला वाहून घेतले. तीन वर्षे केलेल्या अथक परिश्रमानंतर त्यांना पोलिओची लस बनवण्यात यश मिळाले. या लसीचे सुरुवातीचे प्राण्यांवर केलेले प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी काही बालकांवर या लसीचा प्रयोग केला. नंतर १९५४ मध्ये दहा लाख बालकांवर या लसीचा प्रयोग करून तिचे निष्कर्ष अजमावण्यात आले. अत्यंत उत्साहवर्धक असे परिणाम समोर आल्यानंतर १२ एप्रिल १९५५ या दिवशी संपूर्ण जगासाठी ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याची घोषणा करण्यात आली. या सगळ्या प्रयोगांदरम्यान नॅशनल फाउंडेशन फॉर इनफंटाईल पॅरालिसिस या संस्थेला आर्थिक विपन्नावस्थेचा सामना करावा लागला परंतु डॉ जोनास यांच्या संशोधनासाठी त्यांनी पैसा कमी पडू दिला नाही. 

या पोलिओवरील यशस्वी लसीची घोषणा होताच रातोरात डॉ जोनास साक प्रकाशझोतात आले. संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. औषधे बनवणाऱ्या कंपन्यांचे लक्ष डॉ जोनास यांच्याकडे गेले नसते तरच नवल ! डॉ जोनास यांनी या लसीचे पेटंट आपल्याला द्यावे यासाठी अनेक औषध कंपन्या प्रयत्नशील होत्या. जो कोणी हे पेटंट घेईल तो केवळ काही मिनिटात अब्जाधीश बनू शकेल अशी परिस्थिती होती. पण डॉ जोनास यांनी त्या शोधाचे पेटंट घेण्यास किंवा कोणत्याही कंपनीला देण्यास नकार दिला. त्यांना एका टेलिव्हिजनवर एका मुलाखती दरम्यान एका बातमीदाराने प्रश्न विचारला की या शोधाचे पेटंट कोणाच्या नावाने आहे ? त्यावर डॉ जोनास उत्तरले, ' जनतेच्या नावाने ! सूर्याचे कोणी पेटंट घेऊ शकतो का ? ' डॉ जोनास यांना जगातील गरीब माणसापर्यंत ही लस अत्यंत कमी दरात पोहोचवायची होती. अखेरपर्यंत हा महान शास्त्रज्ञ आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे जगातील अनेक देश आज पोलिओमुक्त झाले आहेत. या देशांमध्ये भारताचा देखील समावेश आहे. 

मला डॉ जोनास यांचे खूप आश्चर्य आणि कौतुक वाटले. त्यावेळी म्हणजे १९५५ मध्ये त्यांना या शोधासाठी कमीत कमी सात बिलियन डॉलर मिळणार होते. कोणाही माणसाला एवढया पैशाचा मोह पडणे अगदी साहजिक होते. पण  त्या मोहाला बळी न पडता डॉ जोनास यांनी अखिल मानवजातीसाठी आपले संशोधन उपलब्ध करून दिले. आज पैशाच्या मोहाला बळी पडणारी माणसे पाहिली की त्या पार्श्वभूमीवर डॉ जोनास साक यांच्या मनाचा हा मोठेपणा अधिकच उठून दिसतो. डॉ जोनास यांचा २४ ऑक्टोबर हा जन्मदिवस ' आंतरराष्ट्रीय पोलिओ दिन ' म्हणून जगभर साजरा होतो. डॉ जोनास म्हणतात, ' Hope lies in dreams, in imagination, and in the courage of those who dare to make dreams into reality.' जी माणसे स्वप्नं पाहतात, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून अविरत प्रयत्नांनी ती स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याची हिंमत ठेवतात, अशा माणसांमुळेच आशेची उज्वल पहाट होते. आजच्या या घडीला देखील अशीच स्वप्ने पाहणाऱ्या माणसांची आणि ती प्रत्यक्षात आणण्याचे धैर्य दाखवून अखिल मानवजातीला दिलासा देणाऱ्या डॉ जोनास साक यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांची गरज आहे. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१६/०१/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा. ) 











 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...