मुख्य सामग्रीवर वगळा

जंगल ...

उगवतीचे रंग 

जंगल ... 

' जंगल ' एक तीन अक्षरी शब्द ! हा शब्द प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण करतो. जंगलात राहणारा आदिवासी असेल तर जंगल त्याचे घर आहे. जंगलातील त्याचे झोपडीवजा असलेलं घर, निरनिराळ्या झाडांपासून मिळणारे उत्पन्न, शिकार इ पासून त्याची होणारी उपजीविका त्याला आठवेल. जंगलात पावसाने, विजांनी केलेले घनघोर तांडव त्याला आठवेल. त्याच्या अनेक सुखद,  दुःखद स्मृती जंगलाशी निगडित असू शकतील. शहरात राहणारा तुमच्या माझ्यासारखा माणूस असेल तर जंगल हे त्याच्यासाठी आकर्षणाचे, पर्यटनाचे ठिकाण होऊ शकेल. 

रोजच्या कंटाळवाण्या, धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा आला की मग दोनचार दिवस आपल्याला जंगलाची वाट धरावीशी वाटते. मग वेळ काढून आपण जंगलात भ्रमंती करून येतो. जंगलातून जाणारा रस्ता मनाला किती सुखावतो नाही ! उंचच उंच वाढलेली झाडे, जंगलातील रस्त्यावर पडणारी त्यांची दाट, घनगर्द सावली, मधूनच येणारे पशुपक्ष्यांचे आवाज, पक्षी आणि प्राण्यांचे होणारे दर्शन या सगळ्या गोष्टी आपल्याला सुखावून जातात. आपण एखाद्या गाडीतून, बसमधून प्रवास करत असतो. सोबत आपली मित्रमंडळी किंवा कुटुंबातील सदस्य असतात. मग जंगलाची सफर आपल्याला अतिशय आवडते. रस्त्यात कुठेतरी हॉटेल्स, ढाबे असतात. तेथील जेवणावर आपण ताव मारतो. जंगलात मिळणारा रानमेवा, फळं आदी गोष्टी घेऊन घरी येतो आणि काही दिवसांसाठी तरी जंगल हा विषय आपल्यासाठी संपून जातो. पण ही जंगलाची आपण केलेली सुरक्षित सफर असते, सहल असते. म्हणूनच ती आपल्याला प्रिय असते. 

आता कल्पना करा की तसंच घनदाट जंगल आहे. आपल्याला जंगलात जायचं आहे. पण कसं ? एकटं ! तिथे आपल्यासोबत माणसे असणार नाहीत. जंगलातून जाणारी सुरक्षित सडक, रस्त्याने लागणारी हॉटेल्स, ढाबे इ नाहीत. हा प्रवास फक्त आपल्याला एकट्यालाच करायचा असेल. इथे तुमच्याजवळ असेल तेवढीच शिदोरी उपयोगी पडणार आहे. या जंगलात आपल्याला हरीण, वानरं,ससे यासारखे प्राणी जसे दृष्टीस पडतील तसेच वाघ, सिंह, लांडगे, तरस आदी हिंस्त्र प्राणी पण भेटतील. विषारी साप, विंचू जागोजागी आढळतील. काट्यांनी आपले पाय रक्तबंबाळ होण्याची शक्यता आहे. मग चलताय ना या जंगलात ? 

तुमचं उत्तर मला माहिती आहे. या असल्या भीतीदायक जंगलातून कोण प्रवास करील ? आपल्याला जंगल तर हवं पण ते सुरक्षित. दोन दिवसांपुरतं. मी ही जी दोन प्रकारच्या जंगलाची उदाहरणं दिली आहेत, ती प्रतिकात्मक आहेत. आपल्या मनाचं प्रतीक म्हणजे ही जंगलं. पहिलं जंगल सुरक्षित, सर्वांच्या बरोबर मार्गक्रमण करण्याचं आहे. आणि दुसरं जंगल असुरक्षित. एकट्यानेच प्रवास करायचं आहे. पहिलं जंगल ही बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे तर दुसरं जंगल ही मनाच्या आत उतरण्याची प्रक्रिया. 

या दुसऱ्या प्रकारच्या जंगलात म्हणजे मनात शिरण्याची सुरवात जेव्हा आपण करतो तेव्हा ती अतिशय कठीण गोष्ट असते. या जंगलात प्रवेश करताच आपल्याला काम, क्रोध आदी हिंस्त्र प्राणी भेटतात. आपण त्यांच्या तावडीत सापडतो. आपल्याला त्यांच्या तावडीतून सुटता आले नाही तर कधी कधी ते आपली शिकार करतात. लोभ, मोह आपल्याला त्यांच्या जाळ्यात करकचून बांधू पाहतात. वासनांचे सर्प, विकारांच्या इंगळ्या, स्वार्थाचं मोहक रूप घेतलेल्या अरण्यातील राक्षसी आपला बळी घ्यायला तयारच असतात. 

रामायणातल्या सुरसा राक्षसिणीची गोष्ट आठवते ? हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र उल्लंघून लंकेला जाण्यासाठी निघालेला असतो, तेव्हा सुरसा ही नागमाता त्याची वाट अडवते. ती त्याला भक्ष्य बनवण्याचा प्रयत्न करते. हनुमान त्यापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराचा आकार विशाल करत जातो, पण तो जेवढा मोठा होईल, तेवढे मोठे सुरसाचे तोंड होते. शेवटी हनुमान आपला आकार लहान करतो, आणि तिला वंदन करून तिच्या तोंडातून सुरक्षितपणे बाहेर पडतो. सुरसा त्याला पुढील कार्यात सफलतेचा आशीर्वाद देते. 

अगदी तसंच या जंगलातून पार पडायचं असेल तर आपल्याला हनुमान व्हावं लागेल. हनुमानाची बुद्धिमत्ता, चपळाई, प्रसंगावधान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान होता आलं पाहिजे. लहान व्हायचं म्हणजे शरीराने लहान नाही. नम्र व्हायचं. अहं टाकून द्यायचा. मगच या जंगलात उतरायचं. असं झाला तर या मनरूपी जंगलातून आपण सुरक्षित बाहेर पडू शकू. 

या जंगलात आपल्याला वाटमारी करणारे वाल्या कोळ्यासारखे लुटारू भेटतील. ते आपली वाट अडवतील. तुमच्याजवळ काय आहे ते लुटून घेण्याचा प्रयत्न करतील. नाही दिलं तर तुम्हाला मारायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत. वाल्या कोळी हे प्रतीक आहे. वाल्या कोळी म्हणजे कोण ? इथं वाल्या कोळी म्हणजे आपणच. पण याच जंगलात वाल्या कोळ्याला उपदेश करणारे सप्तऋषी, महर्षी नारद सुद्धा आपल्याला भेटतील. त्यांचा उपदेश ऐकून आपल्यालाही आपल्या वागण्याचा पश्चाताप होईल. तो झाला पाहिजे. नाहीतर ऋषींचा उपदेश व्यर्थ जाईल. वाल्या हा आयुष्यभर वाल्याच राहील. ही ' स्व ' कडे जाण्याची प्रक्रिया आहे. एक सुंदर असे सुफी वाक्य आहे, ' मी परमेश्वराला शोधू लागलो तेव्हा मला माझा शोध लागला आणि मी जेव्हा माझा शोध घेऊ लागलो तेव्हा मला परमेश्वर समजला. ' 

वाल्या कोळ्यासारखं सगळं टाकून तपश्चर्येला बसाल तर ऊन, वादळ, पाऊस, हिंस्त्र प्राणी आदींना तोंड द्यायची तयारी ठेवावी लागेल. अंगाभोवती मुंग्यांचं वारूळ तयार होईल. ते तुम्हाला पूर्णपणे वेढून टाकेल. पण अविचल राहिलात तर साधना सफल होईल. एके दिवशी महर्षी येतील. तुम्हाला हाक मारतील. त्यावेळी अंगाभोवतीचं वारूळ नष्ट झालेलं असेल. वाल्या कोळी नष्ट झालेला असेल. प्रकटेल तो वाल्मिकी असेल. लखलखीत तेज घेऊन महर्षी वाल्मिकी प्रकटतील. जगाला ज्ञानाचा प्रकाश दाखवतील. जगाला रामायण सांगतील ! जंगल मंगल होईल. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

०४/०१/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...