मुख्य सामग्रीवर वगळा

 उगवतीचे रंग 


कवितांच्या गावा जावे... 


उगवतीचे रंग

कवितांच्यागावा जावे...

साहित्यातला एक सुंदर, नाजूक, भावनाप्रधान प्रकार म्हणजे कविता ! आद्यकवी वाल्मिकी, भवभूती, कालिदास, वेदव्यास हे सगळे संस्कृत कवी,  ज्ञानेश्वर, तुकाराम रामदास यांच्यासारखे अनेक संत कवी, पोवाडे, लावण्या आदी लिहिणारे तंत कवी या सगळ्यांपासून  ते अगदी  आजपर्यंतच्या भा रा तांबे, कुसुमाग्रज, बा भ बोरकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, संदीप खरे आदी अनेक कवींच्या कविता  रसिक मनाला रिझवत आल्या आहेत. बहिणाबाई, पद्मा गोळे, शांता शेळके, अरुणा ढेरे आदी स्त्री साहित्यिकांनी सुध्दा मराठी कवितेला समृद्ध केले आहे. मला तर कविता म्हणजे साहित्यातलं मूर्तिमंत स्त्रीरुपचं वाटतं. कधी ती शालूसारखे भरजरी वस्त्र लेऊन येते एखाद्या कुलीन घरंदाज स्त्रीसारखी. कधी कधी ती असते लंकेची पार्वती. कवी जसं ठरवेल तशी ती आपल्यापुढे येते. 


कधी ती आपल्याला कल्पनेतील गावाला घेऊन जाते. कधी आपल्या मनाला रिझवते, कधी जोजवते, कधी मनमुराद हसवते तर रडवते. कधी कधी ती कारुण्याची मूर्ती होते. कधी शहाणपणाचे दोन शब्द सांगते तर कधी कधी कठोर होऊन आसूडही ओढते. आनंदाच्या, दुःखाच्या, प्रेमाच्या, शोकाच्या, मिलनाच्या, तिरस्काराच्या, प्रार्थनेच्या, भक्तीच्या, शृंगाराच्या, शौर्याच्या अशा नानाविध रंगांनी आणि रसांनी ती  न्हालेली असते. आपल्याला फक्त रसिक व्हावं लागतं, तिच्या अंतरीचा भाव समजून घ्यावा लागतो. तो भाव तुम्हाला समजून घेता आला की ती तुम्हाला समृद्ध करीत जाते.जशी एखाद्या प्रदेशातून वाहणारी नदी तिच्या काठावरच्या प्रदेशाला समृद्ध करीत जाते. म्हणूनच ती कधी कधी काव्यगंगा, भक्तीगंगा इ नावांनी आपल्यापुढे प्रकटते. आपली समज जसजशी वाढत जाईल तसतशी ती जीवनाचं तत्वज्ञान आपल्या गळी उतरवत जाते, आपल्याही नकळत. म्हणून ज्ञानेश्वर माउलींसारख्या संतांच्या ओव्या प्रत्येक वेळी निरनिराळा अर्थ घेऊन आपल्यासमोर प्रकटतात. 


आपण जी गाणी ऐकतो, तीही एक कविताच असते. तसं कविता म्हणजे गाणंच असतं ! जीवनाचं गाणं ती गात असते. ' माझे जीवनगाणे...' मध्ये एखादा कवी बोलून जातो की ' व्यथा असो आनंद असू दे, गात पुढे मज जाणे...,ग. दि. माडगूळकरांसारखा सिद्धहस्त कवी लिहून जातो , ' दैवजात दुःखे भरता , दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...' किंवा  ' घनतिमिरी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी...' या सारख्या सुंदर कवितांचे गाणे झाले. लेक सासरी जाताना पित्याच्या हृदयात होणारी कालवाकालव, 'दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने...' ऐकणाऱ्याच्या डोळ्यात नकळत पाणी आणते. 


अशा खूप विविधरंगी कविता. किती सांगाव्यात. कधी कधी जीवन शुष्क वाटते, जीवनातला रस संपल्यासारखे वाटते, तेव्हा अशा कविता मनाला उभारी देतात. शहाणपणाचे दोन शब्द सांगतात. विंदा करंदीकरांची ' देणाऱ्याने देत जावे ...' ही अशीच एक कविता. कोणाकडून काय घेता येईल ते विंदा फार सुंदर सांगतात. 


देणार्‍याने देत जावे


"देणार्‍याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे


हिरव्या पिवळ्या माळावरुनी

सह्याद्रीच्या कड्यावरुनी

छातीसाठी ढाल घ्यावी


वेड्यापिशा ढगाकडून


वेडेपिसे आकार घ्यावे

रक्तामधल्या प्रश्नासाठी

पृथ्वीकडून होकार घ्यावे


उसळलेल्या दर्याकडून

पिसाळलेली आयाळ घ्यावी

भरलेल्या भिमेकडून

तुकोबाची माळ घ्यावी


देणार्‍याने देत जावे

घेणार्‍याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणार्‍याचे हात घ्यावे."


या कवितेतील ' हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी...' या ओळी मरगळलेल्या मनाला उभारी देणाऱ्या आहेत. पिचलेल्या मनात जोश भरणाऱ्या आहेत. कधी कधी जीवन खूपच आखीव रेखीव, साचेबद्ध होते. त्याच त्या रुटीनचा कंटाळा येतो. अशा वेळी विंदा सांगतात, ' वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे..' कधी कधी चाकोरीबद्ध आयुष्य तेवढ्यापुरतं सोडूनही द्यावं. एखाद्या ' उनाड दिवसासारखं...' कधी कधी आपले प्रश्न आपल्याला सुटत नाहीत. अशा वेळी मातीशी आपली नाळ घट्ट जोडलेली असली की पाय जमिनीवर राहतात, विचारातूनच उत्तर मिळतं. म्हणून विंदा म्हणतात, ' रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेला दर्या कधी कधी आपल्याला त्याच्या रौद्र रूपाने भयचकित करतो, पण ती भव्यता त्याच्याकडून घ्यावी. 


' भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी...' किती सुंदर ओळी ! इथे कवितेला अध्यात्माचा स्पर्श होतो. कारण जीवनामध्ये तेही आवश्यक आहे. कवितेच्या शेवटच्या ओळी तर कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. आपली प्रवृत्ती नेहमी घ्यायची असते. आपल्या हातांना नेहमीच घ्यायची सवय लागलेली असते. ती प्रक्रिया उलट सुद्धा झाली पाहिजे म्हणजेच घेणाऱ्या हातांना द्यायची पण सवय लागली पाहिजे. म्हणून ' घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे...' 


ही विंदांची कविता पाहिल्यानंतर मला आणखी एका कवितेची आठवण झाली. विंदा या कवितेत आपल्याला कोणाकडून काय घ्यायचे ते सांगतात तर ही दुसरी कविता आपल्याला ' कोणी काय द्यायचे ' ते सांगते. ही सुंदर कविता आहे दत्ता हलसगीकरांची. अप्रतिम कविता आहे. या कवितेची २२ भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. दत्ता हलसगीकरांच्या शब्दात सांगायचे तर ही त्यांची ' भाग्यवती कविता ' आहे. रायगड जिल्ह्यातल्या जांभुळपाडा या गावी अनाथ विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह चालवण्यात येत होते. या आश्रमातील मुलांच्या मदतीसाठी तेथील कल्पक संचालकांनी ही कविता मोठ्या अक्षरात तेथे लावली. येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष ही कविता वेधून घेत होती. या कवितेत कवीने केलेले आवाहन वाचकांच्या काळजाला हात घालत होते. नंतर या आश्रमाला देणग्यांचा ओघ सुरु झाला. अनाथ मुलांची सोय झाली. ही कविता अतिशय प्रसिद्ध आहे. आपल्यापैकी अनेकांनी ती वाचली, ऐकली असेल. तरी आपण तिच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद घेऊ या... या कवितेचं नाव आहे ' उंची ' 


ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत


ज्यांचे सूर जुळून आले

त्यांनी दोन गाणी द्यावीत


ज्यांच्या अंगणात झुकले ढग

त्यांनी ओंजळपाणी द्यावे


आपले श्रीमंत हृदय त्यांनी

रिते करुन भरुन घ्यावे


आभाळाएवढी ज्यांची उंची

त्यांनी थोडे खाली यावे


मातीत ज्यांचे जन्म मळले

त्यांना थोडे उचलून घ्यावे. 


कविता खूप साधी, सोपी आणि आशयघन आहे. या कवितेत कवी कोणी काय द्यायचं ते सांगतो. देण्यासाठी आणखी एक अट असते. देणारा उंचीवर असतो आणि घेणारा असतो खाली. त्याच्या ओंजळीत दान टाकण्यासाठी देणाऱ्यालाही थोडे खाली झुकावेच लागते. आकाशातले मेघ सुद्धा धरित्रीला न्हाऊ घालताना थोडे खाली झुकतात. बालकवी म्हणतात, ' थबथबली ओथंबून खाली आली, जलदाली मज दिसली सायंकाळी...' तसंच दत्ता हलसगीकर म्हणतात, ' आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे...' कशासाठी खाली यायचं ? तर ' मातीत ज्यांचे जन्म मळले..' त्यांना थोडं उचलून घेण्यासाठी. आपल्याला सर्वानाच घेऊन चालायचं आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दांत सांगायचं तर ' वर्षत सकळमंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ' भेटणं आवश्यक आहे. ती अशी आयती ' रेडिमेड ' कुठे भेटेल का ? शक्य नाही. ती सज्जनांची, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आपणच व्हायचं आहे म्हणून तर ' भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ ' आपल्याला घ्यायची आहे. 


आणखी मला आवडणाऱ्या एका सुंदर कवितेबद्दल सांगून आपण थांबू या . विदर्भातील कवी बोबडे यांची ही कविता आहे. 


देव तयास मिळो न मिळो रे ...

सागर पोहत बाहू बळाने ।।

नाव तयास ... मिळो न मिळो रे ॥ १ ॥


स्वयेच जो तेजोनिधी तरणी ॥

तदगृही दीप ... जळो न जळो रे ।। २ ॥


जो करी कर्म अहेतू निरंतर ॥

वेद तयास ... कळो न कळो रे ॥ ३ ॥


ओळख पटली ज्यास स्वतःची ॥

देव तयास ... मिळो न मिळो रे ॥ ४ ॥


फक्त चार साधे सोपे कडवे असलेली ही कविता. जगण्याचं सार सांगून जाते. ज्याच्यात सागर पोहून जाण्याची धमक आहे, त्याला नाव मिळाली काय किंवा नाही मिळाली तरी फारसा फरक पडत नाही. कारण तो कोणावर अवलंबून नसतो. जो स्वतःच स्वतःचा दीप ( अत्तदीप भव ) झाला, त्याला प्रकाशासाठी, प्रेरणा देण्यासाठी, पुढे जाण्यासाठी परप्रकाशाची आवश्यकता नाही. ' जो करी कर्म अहेतू निरंतर...' या ओळीत तर गीतेचे सारच आले आहे. आणि शेवटच्या दोन ओळी तर अप्रतिम आहेत. ज्याला ' स्व ' ची ओळख पटली त्याला देव भेटला किंवा न भेटला तरी फरक पडत नाही. परमेश्वराचे अस्तित्व सगळीकडे आहे. एक सुंदर असे सुफी वाक्य आहे, ' मी परमेश्वराला शोधू लागलो तेव्हा मला माझा शोध लागला आणि मी जेव्हा माझा शोध घेऊ लागलो तेव्हा मला परमेश्वर समजला. ' 


पण हे केव्हा होईल ? कविवर्य बा भ बोरकरांच्या शब्दात सांगायचे तर, ' जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो...' कवितेच्या गावाबद्दल सांगण्यासारखं खूप आहे. पण आणखी कधीतरी...'


© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१९/१२/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...