मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग 

ढाई अक्षर प्रेम का...  

माझ्या वाचक मित्रांसाठी मी परवा माझा ' एक जगावेगळा वनस्पती शास्त्रज्ञ ' हा ल्युथर बरबँक या वनस्पतींवर प्रेम करणाऱ्या वनस्पती शास्त्रज्ञाचा लेख पाठवला होता. तो वाचून मला मुंबईतील एका ज्येष्ठ व्यक्तीचा फोन आला. डॉ अकबर इनामदार हे त्यांचं नाव. ते सुफी पंथाचे असून अध्यात्मिक साधना करतात. ते मला म्हणाले की माझे एक गुरुबंधू अनेक वर्षांपासून असा प्रयोग करीत होते. डॉ कपूर हे त्यांचं नाव. ते आपल्या बागेतील झाडे, वृक्षवेलींशी बोलत असत. एकदा त्यांना काही कामासाठी दोन वर्षे कॅनडाला जावे लागले. त्यावेळी जाताना ते आपल्या माळ्याला आपल्या बागेची काळजी घेण्यासाठी सांगून गेले. माझ्या गैरहजेरीत माझ्या बागेची काळजी घे. झाडांना वेळच्या वेळी पाणी, खते आणि मशागत करत जा असे त्यांनी त्या माळ्याला सांगितले. मग ते आपल्या कामासाठी परदेशी निघून गेले. 

दोन वर्षांनी ते परत आल्यानंतर ते जेव्हा आपल्या बागेत आले तेव्हा बागेतील झाडे अक्षरशः आनंदाने नाचू लागली, डोलू लागली. त्यांना आपल्या जागेवरून हलता येत नव्हते नाहीतर त्यांनी डॉ कपूर यांना मिठीच मारली असती. डॉ कपूर यांनी झाडांना या आनंदाचे कारण विचारले. झाडे म्हणाली, ' तुम्ही परत आलात ना, म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आहे. ' डॉ कपूर म्हणाले, ' माझ्या गैरहजेरीत तुमची काही आबाळ तर झाली नाही ना ? माळ्याने तुमची व्यवस्थित काळजी घेतली ना...? ' झाडे म्हणाली, ' होय, त्याने आमची काळजी घेतली. अन्नपाणी वेळच्या वेळी दिले. पण फक्त एकाच गोष्टीची कमी होती. ' डॉ नी विचारले, ' ती कोणती ? ' झाडे म्हणाली, ' त्याने आम्हाला सगळे दिले पण प्रेम नाही दिले. तो आमच्याशी प्रेमाने कधीच बोलला नाही. कधी प्रेमाने अंगावरून हात फिरवला नाही. ' 

इथे त्या डॉ अकबर इनामदार यांनी सांगितलेला किस्सा संपला. मी सहज डॉ ना एक प्रश्न विचारला. हा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. मी म्हटलं, ' झाडं त्यांच्याशी एवढं बोलली आणि झाडांची भाषा त्यांना कशी काय कळली हे जरा अविश्वसनीयच वाटतं नाही का ? ' तेव्हा ते म्हणाले, ' माझे ते गुरुबंधू झाडांशी, त्यांच्या भावनांशी एवढे एकरूप झाले होते की त्यांना झाडांची भाषा समजू लागली होती. झाडे त्यांच्याशी आणि ते झाडांशी संवाद साधत असत. शेवटी सर्वांचा आत्मा एकच असतो. जी माणसे निसर्गाशी संवाद साधतात, एकरूप होतात, त्यांना निसर्गाची भाषा कळते. ' 

डॉ इनामदार बोलले ते अगदी बरोबर होते. आपणही निसर्गाचा एक भाग आहोत. फक्त आपण ते विसरून गेलो आहोत. त्यामुळे आपण निसर्गापासून वेगळे पडलो आहोत. प्रेम ही एक उदात्त आणि वैश्विक भावना आहे. ती झाडांना, पशुपक्ष्यांना कळते. मग मानवाचा तर प्रश्नच नाही. झाडांना आपल्यासारखं व्यक्त होता येत नसेल. पण प्रेम त्यांनाही कळतं. भाषेचं वरदान माणसाला लाभलं आहे. पण प्रेम ही अशी एक भावना आहे की जी शब्दांशिवायही व्यक्त करता येते. अनुभवता येते. ' खामोशी ' या चित्रपटात गुलज़ार यांचं एक सुंदर गाणं आहे.  

' हमने देखी है उन आखों की महकती खुशबू, हाथसे छू के इसे रिश्तोंका इल्जाम ना दो...' हे ते सुंदर गीत. या गीतात प्रेमाबद्दल सांगताना गुलजार म्हणतात 

प्यार कोई बोल नही, प्यार आवाज नही 

एक खामोशी है सुनती है कहा करती है

ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं

नूर की बूँद है सदियों से बहा करती है

सिर्फ़ एहसास है ये, रूह से महसूस करो

प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो

हम ने देखी है ...

प्रेमाचे यापेक्षा सुंदर, उदात्त आणि पवित्र वर्णन क्वचितच आढळेल. कवी म्हणतो, ' प्रेमाला व्यक्त होण्यासाठी कुठल्याही शब्दाची ध्वनीची आवश्यकता नाही. प्रेम म्हणजे एक अशा प्रकारची आगळीवेगळी शांतता. खरं तर शांतता म्हणजे आवाज, ध्वनीचा अभाव. पण ही एक अशा प्रकारची शांतता आहे की जी ऐकू शकते आणि तुम्हाला ऐकू येणार असेल तर काही सांगून सुद्धा जाते. 

' ना ये बुझती है ना रुकती है ना ठहरी है कहीं...' या ओळीत प्रेमाचे/शांततेचे केलेले वर्णन आत्म्याशी साधर्म्य दाखवणारे वाटते. मला गीतेतील एका श्लोकाची आठवण झाली. गीतेत आत्म्याबद्दल म्हटले आहे 

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥

आत्म्याला शस्त्र नष्ट करू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. पाणी त्याला भिजवू शकत नाही किंवा हवा त्यातील आर्द्रता, ओलावा शोषून घेऊ शकत नाही. कारण आत्मा हा अवयवरहीत आहे. अव्यक्त आहे. अवयव असलेल्या गोष्टीवर शस्त्र, हवा, अग्नी पाणी इ चा प्रभाव पडेल. आत्म्यावर नाही. त्याचप्रमाणे प्रेमावर म्हणजेच निरपेक्ष, निःस्वार्थी उदात्त अशा प्रेमभावनेला कोणीही नष्ट करू शकत नाही. अशी सुंदर ही प्रेमाची भावना. जणू ईश्वरीय देणगीच ! म्हणून तर पुढच्या ओळीत कवी म्हणतो, ' नूर की बूँद है सदियों से बहा करती है...' नूर म्हणजे ज्योती, प्रकाश, सौंदर्य. सुफी पंथात ' नूर ' हे परमेश्वराचे एक नाव सुद्धा आहे. याच गीतात प्रेमाबद्दल सांगताना कवी पुढे म्हणतो, ' सिर्फ अहसास है ये, रुहसे महसूस करो...' प्रेम म्हणजे फक्त जाणीव. ती अनुभवायची असते. प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं. ते देणाऱ्याला किंवा घेणाऱ्याला दिसत नाही. पण खरं प्रेम असेल तर दोघांनाही जाणवल्याशिवाय राहत नाही. तेव्हा ईश्वराएवढीच पवित्र ही प्रेमभावना आहे. कवी बी अर्थात कवी मुरलीधर गुप्ते आपल्या एका कवितेत प्रेमाबद्दल बोलताना म्हणतात, ' प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे...' 

ढीगभर आशीर्वादाचे शब्द आणि एक पाठीवरून फिरणारा हात. आशीर्वादाचे शब्द लाख उदात्त असतील. पण पाठीवरून फिरणारा प्रेमळ हात सगळे काही सांगून जातो. सांत्वनाचे, आधाराचे कोरडे शब्द पण त्यापेक्षाही एक आश्वासक प्रेमळ नजर, एखादा आपुलकीचा स्पर्श खूप काही सांगून जातो.  ' मी आहे ना...' हा भाव न सांगताही त्यात व्यक्त झालेला असतो. प्रेमाने शिकवणारे साने गुरुजी विद्यार्थ्यांना प्रिय असतात. खरा धर्म तेच आपल्याला सांगतात. ' खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे...'  कुसुमाग्रजांच्या ' कणा ' या कवितेत त्या विद्यार्थ्याला पाठीवर फक्त ' लढ...' म्हणून सांगणारा त्यांचा हात हवा असतो. 

परमेश्वराला तरी दुसरे काय हवे असते ! परमेश्वर आणि भक्त यांच्यात प्रेमाचे नाते असते. ज्या नात्यात बळजबरी असते तिथे प्रेम कुठे असते ! जिथे स्वार्थ आला तिथे प्रेम कुठे असते ! खरे प्रेम हे कधीही निव्वळ शारीरिक नसते. ते रंग,रूपावर अवलंबून नसते. आपल्या प्रिय व्यक्तीचा सगळ्या गुणदोषांसहित स्वीकार करतं ते प्रेम. कुठलीही अपेक्षा नसताना केलं जातं ते प्रेम ! 

आजकाल आपण प्रेमाचा अर्थ फार मर्यादित करून टाकला आहे. चित्रपट, मालिकांमधून दाखवले जाणारे प्रेम हेच खरे प्रेम असे आपल्याला वाटायला लागले आहे. ते बेगडी प्रेम विसरून खरं प्रेम समजून घ्यायची गरज आज कधी नव्हे इतकी जास्त आहे. आमच्या घरातील माणसे, आमचे शेजारी इथून सुरुवात करून हा प्रेमाचा परीघ विस्तारत गेला पाहिजे. आज आपण द वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असं म्हणतो. जग जवळ आलं असं म्हणतो. पण खरंच ते कितपत जवळ आलं आहे ? जे जवळ आल्यासारखं वाटतं ते आभासी तर नाही ना ! 

विश्वबंधुत्वाचा संदेश तर आपल्या संतांनी आधीच देऊन ठेवला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात

हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपणचि जाला ।।

ही खूपच उदात्त भावना आहे. तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला कदाचित वेळ लागेल. पण सुरुवात तर करू या. अन्यथा आपण कितीही शिकलो, कितीही प्रगती केली तरी जोपर्यंत आपल्या सगळ्या व्यवहारात प्रेमाचा अंतर्भाव होत नाही, तोपर्यंत सगळे निष्फळ आहे. संत कबीर म्हणतात 

पोथी पढी, जग मुआ, पंडित भया न कोय ।

ढाई अक्षर प्रेमका पढे सो पंडित होय ।।

कबीरांच्या या छोट्याश्या दोह्यात जीवनाचे सार सांगितले आहे. ज्याने प्रेम जाणले, त्याने सर्व जाणले. 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१/१/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...