उगवतीचे रंग
मागे वळून पाहताना...
लवकरच २०२१ ला आपण निरोप देणार आहोत. अशा वेळी साहजिकच मनात या वर्षी घडलेल्या भल्याबुऱ्या घटनांचा विचार येतो. सिंह सुद्धा पुढे जाताना मागे वळून पाहतो. आपणही बघायला हवे. मागच्या पाऊलखुणा पुढची वाट प्रशस्त करत असतात. घडून गेलेल्या घटना पुढच्या वाटचालीची दिशा दाखवतात. त्या दृष्टीने २०२१ हे वर्ष खूपच वेगळे आहे. हे एक स्थित्यंतराचे वर्ष आहे. २०१९ मध्ये सुरु झालेला कोरोना नावाचा महाभयंकर आजार आपली अशुभ दृष्टी २०२० आणि २०२१ या वर्षांवरही टाकून गेला. या सगळ्या दोन वर्षांच्या कालावधीत बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या वर्षात घडलेल्या घटनांनी आपल्याला अनेक नवनवीन धडे दिले आहेत. अर्थात या वर्षात सगळेच वाईट होते असे नाही. वाईटातूनही चांगले घडते. निराशेच्या काळ्या ढगाला सुद्धा आशेची रुपेरी किनार असते. हे वर्ष त्यामुळे आपल्याला खूप काही शिकवून पण गेले.
या वर्षात मिळालेला सगळ्यात पहिला धडा म्हणजे ' राजा, रात्र वैऱ्याची आहे. सावध राहा ' हा इशारा. कोरोना आला त्याप्रमाणे त्याचे व्हेरियंट्स आले. ओमायक्रॉन आला. अजूनही पुढे त्याची ही पिलावळ वेगवेगळी रूपे घेऊन आपल्यासमोर प्रकटणार आहे. त्यासाठी मुखपट्टी, सामाजिक अंतर, लसीकरण आदी आयुधे आपल्या भात्यात कायमस्वरूपी परजून ठेवावी लागणार आहेत. आपल्या सगळ्यांना या गोष्टी चांगल्या प्रकारे माहिती आहेत.
कोरोनाच्या कालावधीत माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या आणि मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या मानवी प्रवृत्ती आपण पाहिल्या. बऱ्याचशा लोकांना केवळ ताप वगैरे सारखे आजार असले तरी कोरोनाच्या भीतीने पछाडले होते. त्यातील काहींना दवाखान्यात कोरोनाचे पेशंट म्हणून दाखल केले गेले. रेमडेसिवीर सारखी भयानक इंजेक्शने आणि स्टिरॉइड्स दिली गेली. काही पेशंट्स सुदैवाने बरे झाले. पण बरेचसे पेशंट्स चुकीच्या औषधोपचाराने दगावले. जे वाचले त्यांना या औषधांच्या आणि कोरोना पश्चातच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आहे. या सगळ्या कालावधीत संबंधितांनी हात धुवून घेतले. हॉस्पिटल्सनी लाखो रुपयांची बिले पेशंटच्या माथी मारली. पण या कालावधीत सेवाभावनेने रोग्यांना, गावी जाणाऱ्यांना, उपाशी राहणाऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक हातही पुढे आले. त्यांनी माणुसकी अजून जिवंत असल्याचा प्रत्यय आणून दिला.
या वर उल्लेख केलेल्या गोष्टी आपल्याला दुसरा एक महत्वाचा धडा देतात. तो म्हणजे किरकोळ कारणांवरून घाबरून जाऊ नका. तुम्हाला झालेला आजार म्हणजे सर्दी, ताप, थंडी इ सामान्यही नेहमीचा आजार असू शकेल. अगदी कोरोनाही असला तरी फारसे घाबरण्याचे कारण नाही. लस घेतली असेल तर त्यापासून होणारा त्रास प्राणघातक निश्चितच ठरणार नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढवणे. अलीकडे प्रत्येक बऱ्याचशा औषधांच्या आणि खाद्यपदार्थांच्या जाहिराती इम्युनिटी वाढवणाऱ्या म्हणून केल्या जात आहेत. पण त्यात फारसे तथ्य असत नाही. प्रतिकारशक्ती ही दुकानांमध्ये विकत मिळत नाही. ती आपल्याला आपल्या शरीरात विकसित करावी लागेल. ही प्रतिकारशक्ती नियमितपणे केलेल्या व्यायामातून, आहारातून आणि आरोग्यदायी जीवनशैलीतून आपल्याला वाढवता येईल.
या कालावधीत सर्वात जास्त नुकसान झाले ते विद्यार्थ्यांचे. शाळेला, गुरुजनांचा प्रत्यक्ष मार्गदर्शनाला, आपल्या मित्रांच्या सहवासाला, शाळेतील स्पर्धा, परीक्षा, कार्यक्रम इ च्या वातावरणाला ते पारखे झाले. मुलांचे डोळे, कान आणि शाळेतील खडू, फळा यांचे एक वेगळे अविभाज्य नाते असते. त्यांची परस्पर प्रतिक्रिया घडत असते. त्याला मुलं पारखी झाली. या गोष्टींना पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण पुढे आले. शाळेतले शिक्षक तेच, मुलेही तीच. पण ती बसली आता मोबाईल वा लॅपटॉप समोर. शाळेत असल्याचा ' फील ' यावा म्हणून अगदी गणवेशही मुले घालून बसली. पण शेवटी आभासी ते आभासीच. त्याला खऱ्याची सर कशी येईल ? पण आता पुढील काळात वेळ पडली तर हाच ' आभासी ' शिक्षणाचा मार्ग आपल्याला आपलासा करावा लागणार आहे या गोष्टीची जाणीव या वर्षाने करून दिली.
या वर्षात पेट्रोल, डिझेलचे भाव दिवसागणिक वाढतच गेले. दर कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांकडे अंगुलीनिर्देश केला. सर्वसामान्यांची परवड मात्र होतच राहिली. महागाई पण वाढतच राहिली. या सगळ्या गोष्टींनी आपल्याला असा धडा दिला की बाबारे हे असं होतंच राहणार आहे हे तू गृहीत धरून चल. पेट्रोल, डिझेलवरच्या वाहनांवरचे अवलंबित्व हळूहळू का होईना कमी करावे लागणार आहे. पण या सगळ्या गोष्टींना काही एक वेळ लागणार आहे. या वर्षात शेतकऱ्यांचा संप, एस टी कामगारांचा संप हे प्रदीर्घ लढे आपण पाहिले. आरक्षणाच्या प्रश्नासाठीचे मोर्चे पाहिले. पुतळ्यांची दुःखदायक विटंबना आणि त्यावरून पेटलेला वाद आपण अनुभवाला. शेतकऱ्यांचे पुराने, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. या सगळ्या गोष्टीत सामान्य माणसाला सहन करण्यापलीकडे फारसे काही हातात नसते. तो मनातून अस्वस्थ असतो, दुःखी असतो. हे सगळे होत असताना आपले जवळपास सगळेच राजकीय नेते एकमेकांवर क्षुद्र आरोप करण्यात मश्गुल होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी कोणाला फारसे काही देणेघेणे नव्हते. हे सगळं अस्वस्थ करणारं आहे.
शेतकऱ्यांचा संप, एस टी कामगारांचा संप हे प्रदीर्घ लढे या वर्षाने पाहिले. प्रवासासाठी ज्याच्याजवळ स्वतःचे काही साधन नाही अशा सर्वसामान्य माणसाची मात्र फार कुचंबणा या कालावधीत झाली. रेल्वे प्रवासालाही मर्यादा आल्या. केवळ आरक्षण केलेल्यानाच प्रवास करता येऊ लागला. दिवाळीच्या सुमाराला सगळे काही सुरळीत होते आहे असा निःश्वास आपण सोडतो न सोडतो तोच पुन्हा नवीन आलेल्या नवीन व्हेरियंटने आपली चिंता वाढवली. पण मी वर म्हटल्याप्रमाणे या वर्षाने आपल्याला खूप काही गोष्टी शिकवल्या.
जीवन हे क्षणभंगुर आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. पण त्याचा प्रत्यय या वर्षांनी आणून दिला. आपल्यासोबत असणारी जिवलग माणसे, नातेवाईक, मित्रमंडळी यांना आपण गमावून बसलो. कालपर्यंत ही माणसे आपल्यासोबत होती. पण कोरोनामुळे काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. अनेक चांगल्या जिवलगांना आपण कायमचे दुरावलो. ही सल, दुःख, वेदना प्रत्येकाच्या मनात आहे. पण यातूनच आपल्याला सावरायचे आहे. जीवन कोणासाठी थांबत नाही. पुढे पुढे जात राहते. या जीवनाच्या वाटचालीत जे आपल्यासोबत आहेत, त्यांना हिंमत द्यायची आहे, सावरायचे आहे. आपलं आणि त्यांचं जगणं सगळं विसरून आनंदी करायचं आहे.
आपल्याला उत्तम आरोग्याचं महत्व जाणवून दिलं. स्वच्छतेचं महत्व आपल्या लक्षात आलं. आपल्या अवतीभवती असणाऱ्या प्रियजनांच्या मिळणाऱ्या सहवासाचं महत्व आपल्याला कळलं. त्यांना जपायला हवं. निसर्ग किती महत्वाचा आहे, त्यालाही जपायला हवं. कारण निसर्ग असेल तरच आपणही असू. आपल्या गरजा खरं तर किती कमी गोष्टीतही भागू शकतात हेही आपण शिकलो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संकटं येतच राहणार. त्यांना घाबरून जाऊ नका. धीराने आणि धाडसाने तोंड द्या हेही आपण शिकलो. आपल्यातील ज्येष्ठांना विचारले तर ते आपल्याला सांगतील की त्यांनी आतापर्यंतच्या आयुष्यातही जीवनाचे जेवढे विविध रंग पाहिले नसतील तेवढे या दोनतीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी पाहिले आहेत. या वेगवेगळ्या अनुभवांनी आपल्याला समृद्ध केले आहे. शिकवले आहे. आपण जर शिकणार नसू तर आपला विनाश निश्चित आहे.
एका शाळेत अपंग मुलांची धावण्याची शर्यत एकदा आयोजित केलेली असते. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या दृष्टीने अपंग असतो. पण तरीही ते धावतात. अशा या त्यांच्या शर्यतीत एक छोटा अपंग मुलगा अडखळून पडतो. सगळी पळणारी मुलं थांबतात. एक छोटी मुलगी त्याच्या जवळ जाऊन विचारते, ' तुला फार लागलं तर नाही ना ? 'सगळी मुलं त्या पडलेल्या मुलाला मोठ्या प्रयत्नाने उभं करतात. सगळे एकमेकांचा हात धरून सीमारेषेकडे येऊ लागतात. आता सगळे प्रेक्षक उभे राहतात. टाळ्यांचा कडकडाट करतात ? कोण जिंकलेलं असतं शर्यत ? म्हटलं तर सगळेच ! एकमेकांच्या मदतीशिवाय हे अंतर पार करणे, ही शर्यत जिंकणे शक्य नाही हे त्या चिमुकल्यांना कळलेलं असतं. त्यांना जे कळलं आपल्याला ते कळेल का ? असं झालं तर आपण येणाऱ्या नवीन वर्षाला आनंदाने सामोरे जाऊ, त्यामुळे नवीन उत्साहाने नववर्षाला सामोरे जाऊ या. सगळे सोबत असतील तर संकटांची फिकीर करण्याचे कारण नाही. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचं तर
कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाळ
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल.
आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२१/१२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा