मुख्य सामग्रीवर वगळा

अंतर...

उगवतीचे रंग 

अंतर...  

माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. त्या लग्नाचं आमंत्रण आणि पत्रिका देण्यासाठी ते अगदी उभ्या उभ्या माझ्या घरी येऊन गेले. त्यांना म्हटलं, ' अहो, दोन मिनिट बसा तरी. ' ते म्हणाले, ' छे छे, बसायला वेळच नाही. या एवढ्या पत्रिका वाटायच्या आहेत. जवळच्या लोकांनाच फक्त देतो आहे. बाहेरगावच्या पाठवून झाल्या. आता काही ठिकाणी जायचं आहे. तेवढं ' उरकून ' घेतो. ' 

किती अंतर पडलं माणसामाणसांमध्ये ! जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही जे आमंत्रण प्रेमाने द्यायचं असतं, ते असं ' उरकून ' घ्यावं लागतं. मग ज्यांना आमंत्रण दिलं आहे ती मंडळीही लग्नाला जाताना ' आता आमंत्रण आलंच आहे तर जावं लागेल. संबंध पडतात ना..' या भावनेने जाताना दिसतात. एकंदरीत सगळाच उपचार झाला आहे.  याला कारण म्हणजे आपल्यात पडलेलं अंतर. आजकाल ' अंतर ' या शब्दाचा वापर मोठा मजेशीर होताना दिसतो आहे. लोक रांगेत उभे असतील तर एकमेकांमध्ये ' अंतर ' ठेवायला सांगितले जाते. मराठी शब्द ' सामाजिक अंतर ' हा आहे पण त्यापेक्षाही सोशल डिस्टन्स हे इंग्रजी शब्द आपल्या अधिक परिचयाचे झाले आहेत. 

तसेही लोकांमध्ये, समाजात विविध कारणाने ' अंतर ' पडलेच होते. आता करोना आला आणि त्याने माणसामाणसात अजूनच अंतर पाडले. शारीरिक अंतर काही कारणाने भलेही असू द्या पण जेव्हा मनामनात अंतर पडतं, तेव्हा खरंच माणूस माणसापासून दूर जातो. 

' अंतर ' या शब्दाला विविध अर्थ आणि छटा आहेत.  असमानता, फरक, दूरता हे तर अर्थ आहेतच. पण रहस्य, मत, कसूर, तफावत, मन, हृदय इ अर्थ पण संदर्भानुसार होतात. ' भक्तीचे अंतर अतिगूढ...' यात रहस्य हा अर्थ घेता येतो. आपले अंतर ( मत ) कृपया स्पष्ट करावे. अंतर ( हृदय, मन ) उजळून निघावे. माझ्या सेवेत काही अंतर राहिले असेल तर कृपया क्षमा करावी. या वाक्यात ' अंतर ' या शब्दाचा ' कसूर ' असा होता. तू असं केल्याने असं कितीसं  अंतर ( फरक ) पडणार आहे ? जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती आपल्याला म्हणते, ' मला अंतर तर देणार नाहीस ना ? ' इथं अंतर देणे म्हणजे दूर लोटणे. असे अनेक आणि विविध अर्थ, छटा अंतर या शब्दाला आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ' अंतर ' या शब्दाच्या अर्थात, छटांमध्ये बरेच अंतर आहे. 

माणसाचं ' माणूसपण ' या नव्या युगात हरवून गेलं. औद्योगिक, वैज्ञानिक प्रगती झाली. माणसाच्या हातात पैसा आला खरा, पण एकंदरीत माणूसच या व्यवस्थेचा एक भाग होऊन गेला. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तो एक चालतेबोलते यंत्र झाला. या गोष्टीला आजची औद्योगिक, भांडवलशाही व्यवस्था कारणीभूत आहे असं मला वाटतं कारण या व्यवस्थेत माणूस महत्वाचा उरला नाही. महत्वाचं झालं आहे ते उत्पादन. या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी माणूस नाहीच. माणसाची गरज नसेल तर ही व्यवस्था माणसाला सरळ बाहेर फेकते. ' आता कंपनीला तुमची गरज नाही. तुम्ही जाऊ शकता...' असे सरळ सरळ सांगता येते. माणूस कधी नव्हे तो केवढा असुरक्षित झाला आहे. इथे त्याचा, त्याच्या मनाचा विचार करायला कोणालाच वेळ नाही. 

दोन आंदोलनं नुकतीच आपण पाहिली. एक शेतकऱ्यांचं आणि दुसरं अजूनही सुरु एस टी कर्मचाऱ्यांचं. ही सगळी जी काही व्यवस्था नावाची गोष्ट आहे, तिला त्यांच्यातला ' माणूस ' फार उशिरा दिसला. मग ते केंद्र असो की राज्य. या सगळ्यात राजकारणही आहे. ते आपण तूर्त बाजूला ठेवू. या व्यवस्थेलामात्र  नाईलाजाने त्यांच्या ' माणूसपणाची ' दखल घ्यावी लागली, जी आधीच घ्यायला हवी होती.  एक आंदोलन मिटलं आहे तर दुसरं अजूनही सुरूच आहे. ' व्यवस्था ' नावाच्या या यंत्रात माणूस मात्र पिळवटून निघतो आहे. 

जो समाजाला योग्य दिशेने नेतो तो नेता. पण आजकाल समाजाला दिशेचं दिग्दर्शन करणाऱ्यांचीच दिशा चुकलेली आहे. ते काय योग्य दिशा दाखवणार ! स्वातंत्र्यपूर्व काळातले आणि काही काळ नंतरही असणारे ध्येयवादी, त्यागी, आदर्श नेते आता राहिले नाहीत. भ्रष्टाचारी, तुरुंगात जाऊन आलेले, वेगवेगळे आरोप असणारे विविध लोक सन्मानाची पदे भूषवताना दिसतात. समाजाची मानसिकताही बदलली आहे. हे नेते सांगतील तीच समाजाला योग्य दिशा वाटते. त्या मार्गाने समाज जाताना दिसतो आहे. सगळ्याच गोष्टीत फार ' अंतर ' पडलं आहे. 

नात्यांमध्येही अंतर पडलं आहे. वृद्ध आईवडील माझ्याकडेच का ? तुझ्याकडे का नाही ? दोनतीन मुलं असतील तर वर्षातले काही महिने प्रत्येकाकडे त्यांची विभागणी केली जाते. कुठेतरी ऐकलेलं ' आईवडील माझ्याकडे नाहीत, मी आईवडिलांकडे राहतो...' ही भावना केवढी उदात्त आहे ! 

समाजाच्या आर्थिक परिस्थितीत केवढी विषमता आली आहे ! नुकताच प्रसिद्ध झालेला आर्थिक असमानता अहवाल सांगतो की देशातील निम्म्या लोकांची वार्षिक कमाई फक्त ५०००० रु आहे. देशातील पन्नास टक्के लोकांकडे देशातील संपत्तीच्या फक्त १३% संपत्ती आहे. तर आश्चर्य म्हणजे फक्त एक टक्का लोकांच्या हातात देशातील २२%संपत्ती एकवटली आहे. हे आकडे पुरेसे बोलके आहेत.

 इंटरनेट, मोबाईल मुळे जवळची माणसे दूर गेली आहेत. लांबची माणसे ' आभासी ' पद्धतीने जवळ आली आहेत. घरात असणाऱ्या चार माणसांची तोंड त्यामुळे चार दिशांना झाली आहेत. माणसामाणसातील अंतर वाढते आहे. 

लोकांमध्ये सामाजिक अंतर पडलं आहे, आर्थिक अंतर पडलं आहे. जातीजातीत, मनामनात माणूस विभागला गेला आहे. समाजाची एकसंध असणारी वीण उसवत चालली आहे. ती जास्त उसवण्याआधी त्यासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. अन्यथा पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. असं म्हणतात की श्रीकृष्णाला मिळालेल्या शापामुळे त्याचे यदुकुळातील वंशज आपसातच लढून संपले. आपल्यावरही आपसात लढून असे संपण्याची वेळ तर येणार नाही ना अशी भीती आजच्या या वातावरणामुळे निर्माण झाली आहे. त्यासाठी मने सांधणे गरजेचे आहे. एकमेकांना समजून घेणे महत्वाचे आहे. या समाज व्यवस्थेतील प्रत्येकच घटक महत्वाचा आहे. हे त्याचे महत्व जेव्हा आम्ही समजून घेऊ, तेव्हाच या समाजाला एकसंध करण्याच्या दिशेने आपले पहिले पाऊल पडेल. नाहीतर आमच्यातील अंतर वाढतच जाईल. त्यासाठी हे अंतर जोडणारा मनामनांचा सेतू आम्हाला उभारावा लागेल. इंग्रजीत त्यासाठी एक छान वाक्प्रचार आहे ' ब्रीज द गॅप.  '  

अंतर कमी होण्यासाठी ' अंतरात ' डोकावून पाहावं लागेल. त्यासाठी हे मानवा ' अंतरातील ज्ञानदिवा मालवू नको रे... ' एवढेच सांगावेसे वाटते. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१५/१२/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...