उगवतीचे रंग
अजूनही चांद रात आहे...
परवा मला कुणीतरी एक व्हिडीओ पाठवला. त्यात एक कुटुंब एक सण साजरा करतंय. व्हिडीओ बहुधा अमेरिकेतला असावा. त्या सणाला ते थँक्स गिव्हिंग डे म्हणतात. आपण त्याला कृतज्ञता दिन म्हणू या. साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हा सण साजरा करतात. या दिवशी राष्टीय सुटी असते. शेतीचा हंगाम निघालेला असतो. वर्षही लवकरच संपणार असते. या पार्श्वभूमीवर सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा होतो. या वेळी कुटुंबातले सर्व जण एकत्र येऊन हा सण साजरा करतात अशी पद्धत आहे. या सणाशी अनेक आख्यायिका निगडित आहेत. आपल्याला त्याच्या खोलात जायचे नाही. फक्त संदर्भ लक्षात यावा म्हणून हे सर्व सांगितलं. त्या व्हिडिओत एक तरुण मुलगा, त्याची आई आणि आजोबा अशी पात्रं आहेत. आजोबा एकटेच राहतात. मुलगा सगळ्या आधुनिक ( पण नको त्या ) गोष्टींचं वेड लागून बिघडला आहे. त्याला खाण्यासाठी चमचमीत हवं असतं. वेळ घालवण्यासाठी मोबाईल हवा आहे. झोपण्यासाठी अत्याधुनिक बेडरूम, गाद्या इ गोष्टी हव्या आहेत.
होतं असं की एकदा आजोबांच्या घरी हा थॅंक्सगिविंग कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आजोबा एकटेच राहत असल्याने आणि त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने त्यांनी त्यांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन केलेले असते. त्यांचं घरही तसं छोटेखानी. बेडरूम वगैरे लहानच. तर अशा या आजोबांच्या घरी त्यांची मुलगी म्हणजेच त्या मुलाची आई आपल्या मुलाला घेऊन जाते. आजोबांकडे केवळ जाण्याच्या कल्पनेनेच तो तरुण मुलगा नाक मुरडतो. पण आई आग्रह करते म्हणून थोड्या नाखुशीनेच तिच्याबरोबर जातो. जाताना खूप कुरकुर करतो. आजोबा दरवाजात उभे राहून प्रेमाने त्यांचं स्वागत करतात पण हा त्यांच्याकडे लक्षही देत नाही. त्याची आई त्याबद्दल आजोबांकडे दिलगिरी व्यक्त करते. नंतर त्या ठिकाणी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. पण जेवणात चिकनचा समावेश नाही म्हणून हा मुलगा जेवण करण्याचं नाकारतो. झोपण्यासाठी चांगली सोय नाही म्हणून तिथे झोपण्याचं नाकारतो. आपल्या चुलत भावंडांबरोबर खेळण्याऐवजी त्याला आयपॅड खेळण्यासाठी हवं असतं.
अशा या मुलाला आई आपल्यासोबत बाहेर येण्यासाठी सांगते. तो मोठ्या नाखुशीनेच तिच्या सोबत जातो. आईने आपल्यासोबत थोडेसे जेवण घेतलेले असते. रस्त्यावर थंडीत कुडकुडत बसलेला एक गरीब माणूस दिसतो. तो बहुधा उपाशी असावा. आई त्या मुलाला सांगते की जा आणि हे जेवण त्या माणसाला देऊन ये. मुलगा म्हणतो की हे काय जेवण आहे का ? ती व्यक्ती तर ते खाणारही नाही. पण आई आग्रहाने त्याला त्या माणसाकडे पाठवते. त्या मुलाच्या हातातलं जेवण पाहून तो रस्त्यावर बसलेला गरीब माणूस अतिशय आनंदित होतो. तो म्हणतो, ' बरं झालं तू हे जेवण आणलंस. मी उपाशी होतो. आता मी पोटभर जेवेन.' हे पाहिल्यावर त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. चेहेऱ्यावरची नकारात्मकता कमी होते. आई त्याला अजून पुढे घेऊन जाते. रस्त्याच्या कडेला एक वयस्कर स्त्री थंडीत कुडकुडत झोपलेली असते. तिच्या अंगावर पांघरूण नसते. आई त्या मुलाला सांगते की जा आणि तुझी ही स्लीपिंग बॅग त्या स्त्रीला देऊन ये. मुलगा नाखुशीने आपली स्लीपिंग बॅग त्या स्त्री जवळ घेऊन जातो. तिला सांगतो,' आंटी, ही स्लीपिंग बॅग घ्या. ' ती स्त्री खूप आनंदित होते. ती म्हणते, ' ओह, स्लीपिंग बॅग ? हे तर माझं स्वप्न होतं. '
आणखी थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना एक तरुण मुलगी भेटते. ती अत्यंत दुःखी असते. रडत असते. ती आई त्या मुलीला रडण्याचं कारण विचारते. ती मुलगी सुरवातीला सांगत नाही. पण खूप आग्रह केल्यानंतर ती सांगते. ' माझ्या फॅमिलीत आता कोणीच नाही. माझे आईवडील गेल्या वर्षी वारले. हा माझा पहिलाच कृतज्ञता दिन आहे. मी तो आनंद कोणाबरोबर साजरा करू ? ' मग ती आई आणि तो मुलगा देखील त्या तरुण मुलीला आपल्यासोबत येण्याचा आग्रह करतात. ती यायला तयार नसते कारण ती म्हणते की मला कोणावर माझे ओझे टाकायचे नाही. पण खूप आग्रह करून ते त्या मुलीला सोबत घेऊन जातात. तो मुलगा त्या मुलीला म्हणतो की आमच्या या घराला आपलेच घर समज.
या व्हिडिओचा शेवट खूपच हृदयस्पर्शी केला आहे. आईला आपल्या मुलातील हा बदल पाहून खूप आनंद होतो. ती त्याला म्हणते, ' आय एम प्राऊड ऑफ यु. आता आपण आपल्या घरी परत जाणार आहोत. तिथे तुला छान झोपता येईल. मी आता तुला तुझा आयपॅड ही परत करते आहे. ' यावर मुलगा म्हणतो, ' मॉम, मी आता इथेच राहू इच्छितो. आता मला आयपॅडही नको आहे. मला माझ्याजवळ असणाऱ्या गोष्टींची किंमत कळली आहे. ' आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ती त्याला प्रेमाने जवळ घेते. इथे व्हिडीओ संपतो. पण सुरु होतो तो आपल्या विचारशक्तीचा प्रवास. ही कथा आपल्याला अंतर्मुख करते.
हा मुलगा आजच्या पिढीतील तरुण मुलांचे प्रतिनिधित्व करतो. अशा या मुलांना खाण्याच्या, मोबाईलच्या आणि इतरही अनेक गोष्टींच्या वाईट सवयीतून बाहेर कसं काढायचं हा सगळ्याच पालकांसमोर यक्ष प्रश्न आहे. ही मुलं मनानं वाईट नाहीत. फक्त ती वाईट सवयींना बळी पडली आहेत. इंग्रजीत सांगायचं तर ऍडिक्ट झाली आहेत. मोबाईल, आयपॅड सारख्या गोष्टींनी त्यांना एकलकोंडे बनवले आहे. त्यातून बाहेर यायची त्यांची इच्छा नाही. पण आपल्याला हातपाय गाळून चालणार नाही. आपली भावी पिढी सक्षम व्हायची असेल तर त्यांना त्यातून बाहेर काढावेच लागेल. आज आपण उठसूट इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवा असे म्हणतो. इम्युनिटी हा परवलीचा शब्द झाला आहे. मुलं या सगळ्या गोष्टींबरोबर मानसिक दृष्ट्या देखील अपंग होत चालली आहेत. इम्युनिटी फक्त शारीरिकच असते असे नाही. ही इम्युनिटी मानसिक स्तरावरही वाढवायला हवी. या मुलांना मानसिक दृष्ट्या देखील सक्षम करायला हवे. त्यासाठी घर आणि शाळा या दोन्ही स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत. या व्हिडिओतली आई मुलाला मारत नाही, रागावत नाही. तिची समजावण्याची पद्धतच वेगळी आहे. ही अप्रत्यक्ष शिकवण खूपच प्रभावी ठरते.
बाहेरची परिस्थिती कधी कधी खूपच निराश करणारी असते. अवकाळी पाऊस, सतत वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर, सतत वाढणारी महागाई, करोना संपला असे वाटत असतानाच नवीन आलेला व्हेरियंट, नेत्यांची बेफिकिरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबद्दल असलेली उदासीनता, एस टी चा संप, या सगळ्यामुळे होणारी सामान्य माणसाची घुसमट. आकाशात काळे ढग दाटून आलेले असताना ढगांचा पडदा बाजूला सारून मधूनच सूर्यदर्शन होते. तेजोनिधीची सहस्त्र किरणे आसमंत उजळून टाकतात. रात्रीचं आकाश काही नेहमीच काळ्याकुट्ट ढगांनी व्यापलेलं नसतं, पौर्णिमेचा चंद्र आपल्याला उल्हसित करतो. आकाशातल्या तारका त्याही परिस्थितीत चमकत असतात. उंबरठा चित्रपटातलं गाणं फार सुंदर आहे.
सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे....
खरं तर मैफल कधीच सुनी नसते. भवतालची परिस्थिती कितीही निराशाजनक असू द्या. आपल्या अवतीभवती चंद्रतारे असतातच. फक्त आपल्याला ते पाहण्याची दृष्टी पाहिजे. मग गीत मनातून आपोआपच फुलतं. शब्द ओठांवर येतात, ' अजूनही चांदरात आहे...'
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
५/१२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा