मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग एक संवाद बाबासाहेबांशी...

उगवतीचे रंग 

एक संवाद बाबासाहेबांशी... 

आदरणीय बाबासाहेब, 

प्रथम आपल्याला मानाचा मुजरा ! खरं म्हणजे तुम्हाला भेटण्याची,तुमच्याशी बोलण्याची आणि तुमचा पदस्पर्श करून आशीर्वाद घेण्याची इच्छा होती. पण ते सगळं अपूर्णच राहिलं. तुम्ही इतक्या लगेच निरोप घ्याल असं वाटलं नाही. म्हणून आता पत्रातूनच आपल्याशी संवाद साधतो. पत्र हे भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. आपण जरी आता देहरूपाने आमच्यात नसलात तरी आपली ओजस्वी वाणी, पल्लेदार लेखणी आणि शिवमय आठवणी आमच्यासोबत आहेतच. पुढच्या अनेक पिढ्या हा वारसा जपतील. त्यावर पोसल्या जातील हा विश्वास आहे. 

तुमच्या अजोड, अद्वितीय कार्याचा गौरव कोणी केला नाही ! अगदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या सगळ्यांनी तुमची मुक्तकंठाने स्तुती केली. तुमचं कार्यच इतकं अफाट आहे की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील.  मागच्या वर्षी  तुमचा ९९ वा वाढदिवस झाला. आम्हाला तुमचा केवढा अभिमान... ! म्हटलं बाबासाहेब आता शंभरीत पदार्पण करता आहेत. आशाताई ( भोसले ) आणि राज ठाकरे तुमच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित होते.  आशाताई आता जवळपास नव्वदीच्या घरात आणि आपण तर १०० व्या वर्षात पदार्पण केलेले ! दोघांचाही उत्साह लाजवाब. तरुणालाही लाजवेल असा. म्हणून तर राजसाहेब जे म्हणाले ते अगदी बरोबर होतं. ते म्हणाले, ' आशाताई, बाबासाहेब यांच्यासारख्या लोकांसाठी वय हा केवळ मोजण्याचा आकडा असतो म्हणजे फक्त त्यांचं शारीरिक वय मोजण्याचं साधन. पण अशी लोकं कधीच म्हातारी होत नाहीत. ' आपणही कधी म्हातारे नव्हताच ! 

लोक वय झालं म्हणजे एखाद्याला ' म्हातारा ' या अर्थाने वृद्ध म्हणतात. पण ' वृद्ध ' शब्दाचा अर्थ ते कधी समजून घेतच नाहीत. वृद्धी म्हणजे वाढ. अनुभवाने ज्याच्या ज्ञानात, शहाणपणात वाढ होत जाते तो वृद्ध ! त्याचा वयाने वृद्ध होण्याशी संबंध नसतो. आपण असे ' वृद्ध ' होता. माहिती, ज्ञान, अनुभव, शहाणपणा यांचे मोठं आणि न संपणारं गाठोडं आपल्याजवळ होतं. वय वाढत होतं पण आपल्या नवनवीन संकल्प करण्यात खंडणा नव्हती. शिवकथा आपल्याला अखिल ब्रह्माण्डात पोहोचवायची होती. आपण लावलेले हे रोपटे नक्कीच आभाळापर्यंत पोहोचेल. मोगरा फुलेल आणि त्याचा सुगंध दशदिशा व्यापून टाकेल एवढे कार्य आपण केले आहे. पन्नाशी साठीत आमच्यासारख्याने पदार्पण केले की आम्ही म्हणतो ' बस, आता आमच्याने काही होणार नाही. वय झालं आता...' पण खरी म्हातारी होतात ती आमच्यासारखी मंडळी आणि म्हातारपणाला, वयाला वाकुल्या दाखवणारी तुमच्यासारखी माणसं असतात चिरतरुण ! काळ सुद्धा तुमच्यापुढे नतमस्तक होतो. 

साधारणपणे तीनेक वर्षांपूर्वी मी आपल्याला  व्यासपीठावर पाहिलं. डॉ चित्रलेखा पुरंदरे यांच्या अविनाश धर्माधिकारी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाचं निमित्त होतं. त्यावेळी आपलं वय ९६/९७ असावं. कार्यक्रम भरगच्च होता. तीनसाडेतीन तास चालला. पण आपण व्यासपीठावर जे सुरुवातीपासून बसला होता, ते त्या वयातही शेवटपर्यंत जागेवरून हलला नाहीत. एवढेच नाही तर कार्यक्रमाच्या अखेरीस आपण आपलं मनोगत देखील व्यक्त केलंत. आपल्या भाषणात काही शिवकालीन ऐतिहासिक संदर्भ ओघानेच येणार होते. त्याप्रमाणे ते आलेही. पण पूर्वी आपल्या व्याख्यानात असायचा तोच आवेश त्यात होता. इतिहासातल्या सगळ्या तारखा आपल्या बोलण्यातून जिवंत होत होत्या. एकही तारीख, संदर्भ चुकत नव्हता. तुम्ही चुकला असतात तरी वयाच्या हिशेबाने ते क्षम्यच होतं ! कोणी काही म्हटलं नसतं. पण ते तुमच्याकडून होणे नव्हते. सकाळी काय जेवलो हे संध्याकाळी न आठवणारे आम्ही तुमची ही अफाट स्मरणशक्ती पाहून चकित झालो नसतो तरच नवल !

' छत्रपती श्री शिवाजी महाराज ' या द्वादश अक्षरी मंत्राने आपलं संपूर्ण जीवन व्यापून टाकले होते. हाच मंत्र आपला ध्यास, आपला श्वास झाला. शिवाजी महाराजांच्या आठवणीशिवाय गेला असेल असा आपल्या आयुष्यातील एकही दिवस तर सोडाच पण एक क्षणही नसेल. महाराजांची आपल्याला क्षणभरही विस्मृती झाली नाही. शिवचरित्राने आपण भारले गेलात आणि हेच भारलेपण आपण इतरांना मुक्तहस्ते वाटत सुटलात. कधी आपल्या वाणीने तर कधी आपल्या  लेखणीने. ' बोले तैसा चाले...' याचे आपण मूर्तिमंत उदाहरण होतात. आपण जे बोललात तेच केलेत आणि जे केलेत तेच बोललात. आपण इतिहासाचे थोर अभ्यासक होता. पण आपण तसे कधीच म्हणवून घेतले नाही. शिवशाहीर म्हणवून घेण्यातच धन्यता मानली. पण आपल्या शाहिरीची जादू अशी होती की तिने शिवचरित्र घराघरात पोहोचवले. ' जाणता राजा ' प्रत्यक्ष रंगमंचावर प्रकटला ! जनतेने ' याची देही याची डोळा ' हा सोहळा पाहिला. केवढं हे भाग्य ! शिवसृष्टीचेही स्वप्न साकार होते आहे. 

बाबासाहेब, एवढे सगळे करताना आपण कोणतीही अवास्तव विधाने केली नाहीत हे आपले मोठेपण.  ' मी सांगतो तेच शिवचरित्र बरोबर. माझे शब्द अखेरचे. मी सांगतो तोच इतिहास...' अशी आपली भूमिका कधीच नव्हती. पण ज्यांना कुणाला शिवचरित्राचा अभ्यास करायचा असेल, त्याला आपल्याला ओलांडून पुढे जाता येणार हे निश्चित ! शिवचरित्र हे एखाद्या अथांग सागराप्रमाणे आहे. जो जो यात बुडी मारेल त्याच्या हाताला मोती, रत्ने लागतील एवढे निश्चित. आपणही पाणबुड्या होऊन या अथांग समुद्रात आपले आयुष्य व्यतीत केले आणि हाताला लागलेले मौल्यवान मोती, रत्ने इतरांना मुक्तहस्ताने वाटून मोकळे झालात. आपण सांगितले की जो जो या शिवचरित्राचा अभ्यास करील, त्याला जीवन जगण्याचा मार्ग सापडेल, त्याचे जीवन धन्य होईल. 

मी कॉलेजात असताना माझ्या हातात एकदा आपले ' राजा शिवछत्रपती ' हे पुस्तक आले. अगदी योगायोगाने. मी ते सहज म्हणून वाचायला सुरुवात केली. पण आपल्या शब्दात एवढी जादू होती की मी ते पुस्तक पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवू शकलो नाही. खरे तर त्या काळात बाबुराव अर्नाळकरांची बरीच पुस्तके मी वाचली होती आणि वाचतही होतो. त्यांच्या ' मंदारमाला ', ' झुंजारमाला ', आदी प्रकारच्या रहस्यकथांनी तरुणाईला वेड लावले होते. झुंजारमाला मधील ' झुंजार ' नायक मला खूप आवडला होता. त्याच्या करामती, कारनामे झपाटून टाकत होते. पण तशातच ' राजा शिवछत्रपती ' हाती लागले आणि त्यांच्या चरित्राने मला भारून टाकले. काल्पनिक झुंजार पेक्षा खऱ्याखुऱ्या ' झुंजार ' नायकाने आमच्या मनाची पकड घेतली. आणि तो नायक म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज ! अंधारात प्रकाश दाखवणारा, निराश झालेल्या, पिचलेल्या मनांना आणि मनगटांना बळ देणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी महाराज. शिवरायांच्या जीवनात कितीतरी त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे, निराश करणारे प्रसंग आले पण राजांची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रचंड होती. त्यांनी त्या सगळ्या प्रसंगांवर मात केली. आज थोड्या थोड्या लहानसहान किरकोळ कारणांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरण करणाऱ्यांनी या शिवचरित्राचे पारायण केले पाहिजे. पारायण करणे म्हणजे केवळ पुन्हा पुन्हा वाचणे अपेक्षित नाही. ते चरित्र आणि चारित्र्यअंगी बाणवणे म्हणजे पारायण ! त्याप्रमाणे आपले चारित्र्य घडवणे म्हणजे पारायण. हे आपण आम्हाला शिकवले. 

आपल्या व्याख्यानातून इतिहासातले प्रसंग सजीव होत असत. तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वी झालेल्या लढाया, युद्धप्रसंग डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहात ही आपली बोलण्यातील ताकद होती. पण आपल्या वाणीतील आणि लेखनातील हा ओज, हे तेज उगीच आलेले नव्हते. अगदी लहानपणी आपल्या वडिलांचा हात धरून केलेली आपली गडकिल्ल्यांची भ्रमंती, त्यांच्याकडून ऐकलेला प्रेरणादायी इतिहास याला कारणीभूत होते. पुढे यात आपण आपल्या अभ्यासाची भर टाकली. पुण्याच्या इतिहास संशोधक मंडळात तब्बल दहा वर्षे गुरुवर्य ग ह खरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संशोधन केलेत. पायी, सायकलवरून गडकिल्ल्यांची भ्रमंती तर किती केलीत त्याची मोजदादच नाही. आपल्याच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे आपण तब्बल दोन लक्ष मैलांचा प्रवास सायकलवरून हिंडून केलात. महाराष्ट्रात असलेल्या साधारण ४५० किल्ल्यांपैकी पावणे तीनशे किल्ले तरी आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलेत. त्यांचा अभ्यास केलात. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याला कपटाने स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथून महाराज कसे सुटले, ते कोणत्या मार्गाने महाराष्ट्रात आलेत याचा अभ्यास करण्यासाठी, शोध घेण्यासाठी आपण कित्येक दिवस आग्र्यापासूनचा रस्ता पायी तुडवलात. आपल्या या परिश्रमांना तोड नाही. 

' अभ्यासोनि प्रकटावे ' या समर्थांच्या उक्तीचे आपण शब्दशः पालन केलेत. हा अभ्यास, ही साधना, हे तप आपल्या वाणीतून, लेखनातून साकार होऊन प्रकटले. तिकीट काढून ऐकायला जावं अशा व्याख्यानमालेची किमया आपण साधलीत. आपण शिवचरित्रावर थोडीथोडकी नव्हेत तर तब्बल बारा हजारावर व्याख्याने दिलीत. बारा हजाराला ३६५ ने भागून पाहिले तर ३२ वर्षे येतात. म्हणजे ३२ वर्षे आपण व्याख्याने दिलीत. मनामनात शिवचरित्राची पेरणी केलीत. प्रचंड लेखन केले. यातून पुढे आपल्याला पैसाही मिळाला. पण पुस्तक लेखनातून मिळालेले, व्याख्यानमालेतून मिळालेले पैसे आपण मुक्तहस्ताने समाजकार्य करणाऱ्या संस्थांना वाटून टाकले. आपण ' वक्ता दशसहस्रेषु ' तर होताच पण ' दाता भवती वा न वा..' असे दातेही आपण झालात. हे आपले सगळे कार्य पाहिले म्हणजे थक्क व्हायला होते. आपला देह चंदन झाला. चंदनासारखा झिजला. हे चंदन उगाळले तर शिवचरित्राचाच पवित्र गंध येतो. कविवर्य बा भ बोरकरांच्या शब्दांत सांगायचे तर... 

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

असे आपले जीवन आहे. बहुत काय लिहावे. आपल्याबद्दल एवढेच म्हणतो की ' या सम हा. ' आपल्या भावना खऱ्या असल्या, त्यामध्ये तळमळ असली तर त्या अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचतात असे म्हटले जाते. मलाही म्हणूनच माझ्या या भावना आपल्यापर्यंत पोहोचतील असा विश्वास आहे. आपल्याला मानाचा मुजरा. कृपया आपण तो स्वीकारावा. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२३/११/२०२१

प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२

( लेख आवडल्यास नावासहित पुढे पाठवावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...