उगवतीचे रंग
तात्या आणि सोमनाथ...
कधी कधी आपल्याला अत्यंत साधी वाटणारी माणसेही काही तरी शिकवून जातात. आपण नेहमी वरच्या रंगरूपाला भुलणारी माणसं. पण कधी कधी वरवरचे हे रंगरूप फसवं पण असू शकतं. संत चोखामेळा म्हणतात, ' ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा...' हेअगदी खरे आहे. कधी कधी बाजारात आपण भाजी घ्यायला जातो. तेथे पाणी मारलेल्या भाज्या, रासायनिक खते वापरून वाढवलेल्या भाज्या किंवा हायब्रीड भाज्या अगदी हिरव्यागार, ताज्या टवटवीत दिसतात. पण आरोग्याच्या दृष्टीने त्या चांगल्या नसतात. याउलट सेंद्रिय भाज्या, गावाराणी भाज्या दिसायला आकर्षक दिसत नाहीत पण त्या आरोग्याला चांगल्या असतात. अशीच माझी गाठ अगदी साध्या दिसणाऱ्या , फारसे न शिकलेल्या माणसांच्या एका जोडीशी पडली.
झाले असे की काही दिवसांपूर्वी मी माझ्या घराच्या दुरुस्तीचे थोडेसे काम काढले होते. जुना किचन ओटा पाडून नवीन करायचा होता आणि इतरही काही किरकोळ कामे होती. या कामासाठी मी माझ्या परिचयातल्या सोमनाथ नावाच्या मिस्त्रीला बोलावलं होतं. चाळीसगाव जवळच असलेले तांबोळे नावाचे त्याचे गाव. तिथून तो कामासाठी यायचा. सकाळी नऊ साडेनऊलाच सोमनाथ मिस्त्री आणि त्याची माणसे कामासाठी हजर व्हायची. दोन तीन दिवसानंतर किचन ओट्याचे मोजमाप करण्यासाठी सोमनाथ मिस्त्रीसोबत एक मध्यम उंची आणि सडपातळ बांधा असलेली एक व्यक्ती होती. अंगात अगदी साधे, इस्त्री न केलेले पण स्वच्छ सुती कपडे त्यांनी घातले होते. पांढरा शर्ट आणि पांढरा पायजमा. त्यांच्या डोक्यावरचे केस पांढरे झाले होते. वर्ण गौर होता. चेहऱ्यावर तेज होते. त्यांचे वय किमान साठ पासष्ट वर्षे तरी असावे असे वाटत होते. सोमनाथ मिस्त्री मोजमाप करत असताना मधून मधून त्या व्यक्तीला काहीतरी विचारीत होता. बोलताना तो त्यांना तात्या असे संबोधत होता. तात्यांचे बोलणे जरा खेड्यातील बोलीभाषेतच होते. पण बोलताना त्यांचा अनुभव, हुशारी सहज लक्षात येत होती.
मग मी सोमनाथ मिस्त्रीला विचारले की हे कोण ? तो म्हणाला, ' हे तात्या. माझ्याच गावी राहतात. गवंडी काम करतात. बऱ्याच वेळा काही जास्तीचे काम असले की मी त्यांना बोलावून घेतो. ' बांधकामाची पूर्वतयारी आणि विटा, वाळू,सिमेंट इ आवश्यक ते बांधकाम साहित्य मागवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तात्या कामासाठी नियमितपणे येऊ लागले. तात्या ज्या पद्धतीने काम करीत ती पाहून मी थक्क झालो.
आल्यापासून तात्या कामाला जी सुरुवात करीत ती न थकता ते सतत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करत असत. आल्यावर एकदा आणि एकदा चार वाजता असे दोनच वेळा ते चहा घेत घ्यायचे. तोही त्यांना दिला तर ! त्यांची मागणी नसायची. दुपारी एक दीडच्या सुमारास सगळे कारागीर जेवण करत आणि काही वेळ विश्रांती घेत असताना तात्या काहीतरी काम करीत असत. मी त्यांना विचारलं, ' तात्या, तुम्ही जेवत नाही का ? ' तात्या हसतमुखाने उत्तर देत, 'सर, मी एकवेळच जेवण करतो. सकाळी घरून निघताना थोडा नाश्ता करून निघतो. मग काही खात नाही. मी जर दुपारी जेवलो तर माझ्याने काम होणार नाही. ' आपलं काम संपवून घरी गेल्यावर संध्याकाळी अंघोळ वगैरे करून तात्या जेवण घेत असत.
मला सोमनाथ मिस्त्री, तात्या यांच्यासारख्या कष्ट करून प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तींबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे. मी अशा लोकांशी सलगी करून त्यांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून माणसं मला कळत जातात. पाणबुड्याने समुद्रात डुबकी मारून कधी कधी त्याच्या हाताला मोती लागावे तसे काही अनमोल मोती हाती लागतात. कधी कधी जगण्याचं रहस्यही उलगडतं. त्यांच्या वागण्याबोलण्यातून असा एखादा संदेश ही मंडळी नकळत देऊन जातात की शाळा कॉलेजातील शिक्षण फिके पडावे. कोणाकडून काय शिकायला मिळेल ते सांगता येत नाही. आपले डोळे, कान मात्र उघडे असावेत.
तात्या काम करीत असताना मी निरीक्षण करीत असे. तात्या प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक करीत. दोन दोन वेळा मोजमाप घेणे, त्यांना जे साहित्य वापरायचे त्याची काळजीपूर्वक पाहणी करून घेणे, उत्तम असेल ते वापरणे अशी त्यांच्या कामाची पद्धत होती. किचन ओट्यावरच्या टाईल्स बसवताना आपल्या कामातील तात्यांची एकाग्रता मी पाहिली. बाहेरच्या भिंतीला ढोलपुरी टाईल्स बसवताना त्यांनी त्याच एकाग्रतेने काम केले. कुठेही त्यांनी आपल्या कामाच्या दर्जाशी तडजोड केली नाही. किचन ओट्याला ग्रॅनाईट बसवताना त्यांनी ज्या तन्मयतेने काम केले ते पाहून मी थक्क झालो. तो ग्रॅनाइटचा दगड घासताना त्यांनी त्यावर अनेक तास घालवले. एक डोळा बारीक करून तो ग्रॅनाईट ते प्रत्येक बाजून बघत असत. शिवाय वेळोवेळी त्यावर हात फिरवून तो अपेक्षित तेवढा गुळगुळीत झाला आहे ना याची ते खात्री करून घेत. या वेळी तात्यांना असं असं करा म्हणून सांगणारं कोणी नव्हतं. सोमनाथ मिस्त्री किंवा मी त्यांच्या मागे त्यासाठी उभे नव्हतो. त्यांनी आपल्या कामाशी थोडी तडजोड केली असती तरी त्यांना कोणी काही म्हटलं नसतं. या प्रसंगी मला परमेश्वराची मूर्ती मोठ्या एकाग्रतेने घडवणाऱ्या कारागिराची गोष्ट नकळत आठवून गेली. तो कारागीर देवाची मूर्ती घडवताना स्वतःच्या समाधानासाठी काम करीत होता.
मी एकदा त्यांना म्हटलं, ' तात्या, तुम्ही खूप मेहनत घेत आहात, अतिशय मन लावून काम करत आहात. एवढं कोणी करत नाही. ' तात्या हसायचे. ते म्हणायचे, ' सर, आपण चांगलंच काम करायला हवं. घरमालक आपल्या भरवश्यावर असतो. मी काम चांगलं नाही केलं तर आज कदाचित तो काही म्हणणार नाही. पण पुढे जेव्हा त्याच्या हे लक्षात येईल तेव्हा तो आयुष्यभर माझ्या नावाने शिव्या देईल. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझे काम कसे तरी केले तर माझ्या मनालाच समाधान वाटणार नाही. म्हणून काम चांगलेच करायला हवे. ' हे सगळे तात्या त्यांच्या बोलीभाषेत सांगत होते पण त्यातील चांगले विचार, नीतिमूल्यं शिकलेल्यानी देखील धडा घ्यावा अशी होती. तात्या फारसे शाळेत गेले नव्हते. लेखन, वाचन त्यांना फारसे येत नव्हते पण आयुष्याच्या बिन भिंतींच्या शाळेत ते जे शिकले होते ते भल्या भल्या शिकलेल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते.
आपले काम संपत आल्यावर याच तात्यांनी बरेच परिश्रम घेऊन उरलेल्या ग्रॅनाइटपासून एक सुंदर पोळपाट तयार केला. ते तो तयार करत असताना मी त्यांना विचारले, ' तात्या, तुम्ही हे काय करीत आहात ? ' तात्या नेहमीप्रमाणेच हसतमुखाने उद्गारले, ' सर, मी ताईंना देण्यासाठी एक गिफ्ट करतो आहे. ' जाताना तात्यांनी तो सुबक पोळपाट माझ्या सौ ना भेट दिला. तात्यांचे कपडे स्वच्छ, शुभ्र असले तरी इस्त्री केलेले नव्हते. त्यावर काही सुरकुत्या पडल्या होत्या. पण तात्यांचं मन मात्र तसंच स्वच्छ, नितळ, पारदर्शक होतं. त्यात कोणतीही अढी किंवा सुरकुती नव्हती. त्यांच्या मनाची हीच प्रसन्नता, पारदर्शकता त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती.
सोमनाथ मिस्त्री कधी कधी माझ्याकडे काम करीत असे तर कधी हाताखालच्या लोकांना सूचना देऊन तो दुसऱ्या कामाला जाई. सकाळी येताना तो तात्यांना आपल्यासोबत गाडीवर घेऊन येत असे आणि संध्याकाळी जाताना सोबत घेऊन जाई. बरेचदा वेळ असला की मी सोमनाथ मिस्त्रीसोबत गप्पा मारत असे. सोमनाथ जरी सातवी आठवी पर्यंत शिकलेला असला तरी त्याचे इतिहासाचे ज्ञान चांगले होते असे मला आढळून आले. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास त्याला चांगलाच ज्ञात होता. त्याला मी त्याबद्दल मी विचारले. तेव्हा तो म्हणाला, ' सर, मला वाचनाची अतिशय आवड होती. एखादा वर्तमानपत्राचा किंवा रद्दीतला कागद जरी मिळाला तरी मी तो अधाशासारखा वाचत असे. चालू घडामोडींचेही त्याला चांगले ज्ञान होते. फक्त घरच्या परिस्थितीमुळे त्याला जास्त शिकता आले नव्हते.
सोमनाथ मिस्त्री दिसायला तसा देखणा, उंचपुरा आणि पिळदार शरीर असलेला होता. सोमनाथ मिस्त्रीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. तो सकाळी येताना जेवढा फ्रेश असायचा तेवढाच फ्रेश संध्याकाळी परत जाताना असायचा. मला त्याचा हेवा वाटायचा. त्या कालावधीत माझ्या आरोग्याच्या तक्रारी खूपच वाढल्या होत्या. पोटाच्या तक्रारी, अंगदुखी, डोकेदुखी इ नी मला हैराण केले होते. काही टेस्ट केल्यानंतर डॉ नी कोलेस्टेरॉल वाढल्याचे मला सांगितले होते. त्यावेळी सोमनाथ मिस्त्री आणि तात्यांचे एवढे कष्ट करूनही आणि साधे भाकरी चटणीचे जेवण घेऊनही सदैव ताजेतवाने राहणे मला आश्चर्यचकित करणारे होते. एकदा मी सोमनाथ मिस्त्रींना विचारलेच, ' मिस्त्री, तुम्ही नेहमी अगदी फ्रेश दिसता. सकाळी येताना जेवढे फ्रेश असता तेवढेच फ्रेश संध्याकाळी. काय रहस्य आहे ? '
यावर सोमनाथ मिस्त्रीने जे उत्तर दिले त्याने माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. जेमतेम सातवी आठवी शिकलेल्या या माणसाचे आयुष्याच्या बाबतीतले आणि व्यवहाराचे ज्ञान उत्तम होते. सोमनाथ मला म्हणाला, ' सर, पूर्वी मी जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जात होतो. पण आता जमत नाही. पण रोज सकाळी मी पाच वाजता उठतो. आस्था चॅनेल पाहतो. रामदेव बाबांनी सांगितल्याप्रमाणे योग, प्राणायाम करतो. एकही दिवस हे चुकत नाही. भस्रिका, कपालभाती आणि अनुलोम विलोम या प्राणायामाच्या प्रकारांमुळे अगदी फ्रेश वाटते. शिवाय जास्त तेलकट, तिखट, मसालेदार खात नाही. रोज घरचेच जेवण जेवतो.' मला त्याचे फार कौतुक वाटले.
त्याने सांगितलेल्या या गोष्टी मला माहित नव्हत्या असे नाही. पण आपली अवस्था बऱ्याच वेळा कळते पण वळत नाही अशी होते. आम्ही सुशिक्षित माणसे वेळ नाही या नावाखाली व्यायामाला वेळ द्यायचे टाळतो. शारीरिक कष्टही फारसे होत नाहीत. शिवाय अलीकडे हॉटेलिंगचे प्रमाण शहरातील सुशिक्षित वर्गात खूप वाढले आहे. त्यामुळे साहजिकच आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमनाथ नकळत मला काहीतरी शिकवून गेला होता. मी पूर्वीही योग, प्राणायाम इ करीत होतो पण त्यात नियमितता नव्हती. आता मात्र दररोज सकाळी उठून योग, प्राणायाम नियमितपणे करतो आहे.
सगळे काम संपल्यावर मी सोमनाथ आणि तात्यांना खास घरी बोलावून त्यांचा आदरसत्कार केला. सोमनाथ आणि त्याच्या मुलाला वाचनाची आवड असल्यामुळे मी माझी दोन पुस्तके त्याला भेट दिली आणि तात्यांचा शाल देऊन सत्कार केला. मोठमोठ्या लोकांचा सत्कार तर कोणीही करेल पण या अशा मंडळींचाही गौरव होणे आवश्यक आहे. माझ्या या सत्कारामुळे आणि प्रेमामुळे ही मंडळी अक्षरशः भारावून गेली. मी काही फार केले नव्हते. त्यांनी नकळत मला जी काही अमूल्य शिकवण दिली होती त्याचा कुठेतरी उतराई होण्याचा हा प्रयत्न होता. त्यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी काम केले होते पण असा आनंददायी अनुभव त्यांना पहिल्यांदाच आला होता. अजूनही ती मंडळी कधी या भागात काही कामासाठी आली तर मला भेटायला आवर्जून येतात.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३/१२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा