उगवतीचे रंग
गावोगावीचे दिलीपकुमार...
नुकतेच ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे दुःखद निधन झाले. दिलीपकुमार म्हणजे अभिनयाचा बादशहा. त्याचा पडद्यावरचा वावर म्हणजे जणू एका प्रसन्न, सुसंकृत आणि अभिजात अशा व्यक्तिमत्वाचा वावर. दिलीपकुमार याचा अभिनय कधी कंटाळवाणा झाला नाही. पूर्वी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन त्याचे काही चित्रपट पहिले. क्वचित टीव्हीवरही. पण असं कधी वाटलं नाही की आपण हा चित्रपट पाहण्यात वेळ वाया घालवला. त्याचे गाणे असो वा अभिनय. अगदी ' नैन लड गयी है...' पासून तर विधाता, क्रांती, कर्मा सगळ्या चित्रपटातील गाणी डोळ्यांसमोर येतात आणि उभा राहतो तो दिलीपकुमारचा अभिनय. तर असा हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. पडद्यावर वावरणाऱ्या कलाकारांनाही पडद्याआड जावंच लागतं ही अटळ नियती आहे.
मी लेखाचं शीर्षक दिलं आहे गावोगावचे दिलीपकुमार. आणि मी या मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांच्यावर का लिहितो आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तुमचं बरोबर आहे. पण काय करणार राहवलं नाही म्हणून काही वाक्य लिहिली. ज्या व्यक्तीने आपल्याला आनंदाचे काही क्षण दिले अशा व्यक्तींबद्दल काही तरी लिहिणं म्हणजे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणंच आहे, नाही का ? नाही तर ते माझे असे कोण लागून गेले की मी त्यांच्यावर लिहावं ? किशोरकुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, मो. रफी, मुकेश, मन्नाडे या सारखे थोर गायक आपले कोणी थोडेच लागतात ? त्यांच्याशी आपलं रक्ताचं नसलं तरी जिव्हाळ्याचं नातं असतंच ना...! त्यातूनच आपण त्यांच्याबद्दल लिहितो. त्यांनी जो आनंद आपल्याला भरभरून दिला, त्याबद्दल कुठेतरी आपण रसिक म्हणून त्यांचं देणं लागतोच.
म्हणून दिलीपसाहेबांबद्दल दोन चार वाक्यं लिहिली इतकंच. मंडळी, खरं तर मला सांगायचं आहे ते वेगळंच. जरा समजून घ्याल ना मला ? गैरसमज करू नका. म्हणजे बघा असं झालं की आपले दिलीपसाहेब गेले त्यानंतर टीव्हीवरच्या सगळ्या चॅनलवर त्यांच्याबद्दल बोललं गेलं. झाडून सगळ्या वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल लेख आले. नाना पाटेकर, नासिरुद्दीन शहा आणि आणखी बड्या बड्या मंडळींनी आणि इतरही लेखकांनी दिलीपकुमार यांच्यावर भरपूर लिहिलं, सांगितलं. अर्थात ती व्यक्ती होतीच तशी. पण मंडळी सहज म्हणून माझ्या मनात आलं की असे अनेक दिलीपकुमार गावोगावी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्याबद्दल कोणी फारसं बोललं नाही, फारशी चर्चा केली नाही की त्यांच्याबद्दल विशेष असं कुठे काही लिहून आलं नाही.
थोडं माझं म्हणणं अधिक स्पष्ट करतो. जवळपास दोन वर्षे झाली कोरोना नावाचा अनाहूत पाहुणा आपल्यामध्ये येऊन. या पाहुण्यानं पाहता पाहता अवघं विश्व पादाक्रांत केलं. त्याला पाहुणा अशासाठी म्हटलं की तो अचानक न कळवता एखाद्या आगंतुक पाहुण्यासारखा आला. जा म्हटल्यानं जाणारा हा पाहुणा नव्हताच. सुरुवातीला छोटा वाटणारा हा पाहुणा संत तुकारामांच्या शब्दात सांगायचं झालं तर अणुरेणिया थोकडा होता पण नंतर तो आकाशाएवढा झाला. विश्वरूप दर्शन घडवलं त्यानं. यमाचा जसा यमपाश असतो, तसा याचाही अदृश्य असा यमपाश होता. त्यात तो हळूहळू एकेक करत अनेकांच्या गळ्याभोवती पाश आवळत गेला. मग या पाहुण्याचं खरं स्वरूप लक्षात यायला लागलं. मग आम्ही आपली ठेवणीत ठेवलेली अस्त्र परजली. पण वार तरी कोणावर करणार ? दिसायला तर हवा ना तो...! त्यामुळे बरेचसे वार हवेत गेले. जेव्हा भान आलं तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
या पाहुण्याशी दुसऱ्या शब्दात सांगायचं तर शत्रूशी लढणं तसं कठीणच होतं. जो कोणी त्याच्याशी लढेल त्याला बाधा होणं अटळ होतं. तरीही आमचे गावोगावचे दिलीपकुमार उभे राहिले. ' दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये...' असं म्हणत. ही एक आरपारची लढाई होती. या लढाईत कोण नव्हतं ! डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक, सेवाभावी संघटना आणि लोक. हे सगळे कंबर कसून उभे ठाकले न दिसणाऱ्या शत्रूच्या विरोघात. खूप जणांनी त्याच्याशी यशस्वी लढा दिला. इतरांना त्याच्यापासून वाचवले. पण असं करताना काही जण धारातीर्थी पडले. आपल्या प्राणांची आहुती देऊन त्यांनी आपल्या प्रियजनांचे रक्षण केले होते. पीडितांची सेवा केली होती.
काहीजण असेही होते की ते कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात प्रत्यक्ष सैनिक म्हणून सहभागी नव्हते पण समाजाला आपल्या वाणीतून, लेखणीतून संदेश देत होते. जनजागृती करत होते. ते कोरोनाच्या विरोधात नव्हते लढत. ते त्यांचं काम करत होते. पण त्यांचं काम हे समाजासाठी मोलाचं होतं. सुमंत टेकाडे यांच्यासारखी व्यक्ती शिवरायांच्या जीवनावर आपल्या ओजस्वी वाणीने भाष्य करून लोकांमध्ये नवचेतना निर्माण करत होती. एखादा तळमळीने शिकवणारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवत होता. एखादा लेखक, कवी आपल्या लेखनातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करीत होता. पण कोरोनाने अशा व्यक्तींभोवती सुद्धा आपले पाश करकचून आवळले. त्यांचा काही दोष नसताना त्यांना आपल्यातून हिरावून नेले.
आईवडील म्हणजे आपल्या मुलांसाठी अवघे विश्व असतात. जीवनात येणारे पूर, वादळे, ऊन, पाऊस यांची धग लागून आपल्या मुलांचे बाल्य करपून जाऊ नये म्हणून सगळी ऊन, पाऊस, वादळे ती आपल्या अंगावर घेत असतात. आपण लावलेलं रोपटं करपू नये म्हणून जीवापाड जपत असतात. आपल्या चिमण्यांच्या मुखात दोन सुखाचे घास जावेत यासाठी रक्ताचं पाणी करत असतात. पण हेच आईवडिलांचं प्रेमळ छत्र सुद्धा निष्ठुर कोरोना नावाच्या राक्षसानं या छोट्या निष्पाप जीवांपासून हिरावून घेतलं. मुलं निराधार झाली. कोणी आपली आई गमावली तर कोणी त्यांचे लाडके बाबा. कोण्या अभागी जीवांनी तर या दोघांना गमावलं. घरं उघडी पडली, संसार मोडून पडले, जवळचे होते नव्हते ते पैसे संपले, चिमणे जीव पोरके झाले. कोणा सत्यवानाला आपल्या सावित्रीला गमवावे लागले तर कोणा सावित्रीचा सत्यवान तिला सोडून गेला. यमाने तरी सत्यवानाचे प्राण परत दिले होते. पण हा कोरोनारूपी राक्षस यमापेक्षाही भयंकर निघाला.
दिलीपकुमार तर वार्धक्याने गेले. पण कोरोना गावोगावच्या अशा अनेक दिलीपकुमारांना अकाली घेऊन गेला. त्यांच्याबद्दल कोणी लिहिलं नाही, फारसं बोललं नाही. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्या स्वातंत्र्य यज्ञात अनेक आहुत्या पडल्या. ज्या क्रांतिकारकांची नावं माहित होती, त्यांची नोंद इतिहासानं घेतली. पण असेही हजारो, लाखो होते की ज्यांची नावं माहिती नव्हती. त्यांचीही आहुती पडली. अशीच आहुती गावोगावच्या दिलीपकुमारांची पडली आहे. हे दिलीपकुमार आपल्या प्रसिद्ध दिलीपकुमार सारखे अभिनेते नव्हते. पण जीवनाच्या लढाईत त्यांनी प्राणपणानं जी आपली भूमिका पार पाडली ती काही कमी महत्वाची नव्हती. त्यांच्याबद्दल बोलणं, लिहिणं , कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना आकार देणं हे आज आपलं परमकर्तव्य आहे असं मला वाटतं. अशा वेळी कविवर्य बा भ बोरकरांची कविता ' तेथे कर माझे जुळती ' मला आठवते.
यज्ञी ज्यांनी देऊन निज शीर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमीवर
नाही चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती.
या अशा सगळ्या गावोगावच्या दिलीपकुमारांना ही शब्दसुमनांजली...!
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/०७/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा