मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग निरामय जीवनाचे रहस्य...

उगवतीचे रंग 

निरामय जीवनाचे रहस्य... 

सर्वेत्र सुखिनः संतु, सर्वे सन्तु निरामयाः ।

सर्वे भद्राणी पश्यन्तु, मा कश्चित दुःखमापनुयात ।।

ही उपनिषदातील प्रार्थना आहे. खऱ्या अर्थाने वैश्विक. धर्म, वंश, वर्ण, जातपात या सगळ्यांच्या पलीकडे जाणारी. सगळे सुखी, आनंदी होवोत. कुणीही दुःखी राहू नये, सर्वांचे कल्याण होवो असा सुंदर अर्थ या प्रार्थनेचा आहे. कोणीही व्यक्ती आपल्या सेवेतून झाली किंवा कोणा ज्येष्ठ व्यक्तीचा वाढदिवस असला की आपण त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यात बऱ्याच वेळा ' निरामय ' या शब्दाचा वापर केलेला असतो. मग निरामय आयुष्य म्हणजे नेमके काय ? 

निरामय म्हणजे निरोगी, आनंदी. ज्ञानेश्वरीतही माऊलींनी या शब्दाचा वापर केला आहे. ' मग निरामय भरीत । पावती पद अच्युत । ' असे दुसऱ्या अध्यायात माऊली म्हणतात. तर संत तुकाराम महाराज देखील  'आनंद अद्वय नित्य निरामय । जेकां निज- ध्येय योगियांचें ।' असे म्हणतात. नित्य आनंदी राहणे हे योगियांचे ध्येय  आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. पण जसे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू योगी हो तसे आपणही योगीच असतो. कर्मयोग आचरणारे. मग आपणही हे निरामय जीवन जगू शकतो का हा प्रश्न आहे आणि अर्थातच या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. याच प्रश्नाचे उत्तर पुढील विवेचनात देण्याचा प्रयत्न केला आहे. 

परवा सहज म्हणून एक न्यूज चॅनल लावले. पाहतो तो त्यावर एक मुलाखत सुरु होती. तळवलकर्स जिमचे संचालक मधुकर तळवलकर यांची मुलाखत होती ती. मी उत्सुकता म्हणून पहात होतो. ज्यांची मुलाखत घेतली जात होती ते मधुकर तळवलकर नव्वदीच्या घरातले. पण त्यांची सुदृढ अंगकाठी, प्रसन्न चेहरा, तारखेसह मागील वर्षांच्या आठवणी सांगताना त्यांच्या स्मरणशक्तीचा येणारा प्रत्यय इ गोष्टी पहिल्या तर ते नव्वदीच्या घरात आहेत यावर विश्वास बसणे कठीण जात होते. त्यांची मुलाखत जसजशी ऐकत गेलो, तसतसे आश्चर्याचे एकेक धक्के बसत होते. 

आपल्या तारुण्यात फक्त ४७ किलो वजन असणाऱ्या मधुकररावांनी बऱ्याच उशिरा जिम जॉईन केली. पण निर्धार पक्का होता. लोकमान्य टिळकांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता. टिळकांनी जसे कॉलेज, अभ्यास इ गोष्टी सोडून एक वर्ष आपल्या प्रकृतीसाठी दिले, त्याप्रमाणेच तळवलकर यांनीही आपल्या प्रकृतीसाठी वेळ दिला. ४७ किलोवरून आपले वजन तब्ब्ल सत्तर किलोपर्यंत त्यांनी वाढवले. त्यांना सुरुवातीला स्वतःचे कमी असलेले वजन आणि अतिशय कृश असलेली शरीरयष्टी यामुळे त्यांना सुरुवातीला जो न्यूनगंड निर्माण झाला होता, तो यामुळे ते कमी करू शकले. त्यांनी केवळ स्वतःचे आरोग्य सुधारले असे नाही तर आपल्या जिमच्या देशातील विविध शहरांमध्ये अनेक शाखा सुरु करून तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली. 

आज वयाच्या ८८ व्या वर्षीही ते न चुकता व्यायाम करतात. दररोज सात तास झोप घेतात. दोन जेवणांच्या मध्ये काहीही खात नाही. पण आरोग्य चांगले असल्यामुळे जीवनाचा आनंद चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. तळवलकर यांच्या मते आपण शंभर ते एकशेवीस वर्षांपर्यंत आरोग्यदायी जीवन जगू शकतो. त्यासाठी योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि नियमित व्यायाम या गोष्टी आवश्यक आहेत. जीवन जगण्यासाठी आनंदी जीवनशैली अंगीकारणे महत्वाचे आहे. डोक्यावर आईस फॅक्टरी, जिभेवर शुगर फॅक्टरी आणि हृदय किंवा मन सॅटिसफॅक्टरी या तीन फॅक्टरी आपल्यापैकी प्रत्येकाजवळ असल्या तर आपण उत्तम प्रकारे जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. 

त्यांनी मुलाखतीच्या वेळी उपस्थित असणाऱ्यांना आपली जन्मतारीख माहिती आहे का असे विचारले. आपली जन्मतारीख अर्थातच प्रत्येकाला माहित असते. मग त्यांनी मृत्यूची तारीख माहिती आहे का असे लोकांना विचारले. अर्थातच ती तारीख कोणालाही माहिती नाही. याचाच अर्थ विधात्याने किती आणि कसे जगायचे हे आपल्या हातात ठेवले आहे. आपली जीवनशैली योग्य असेल, तिला योग्य आहारविहार आणि व्यायामाची जोड असेल तर निश्चितपणे आपल्याला दीर्घायुषी होता येईल. 

त्यांच्या मते कोणत्याही वयात आपल्याला आपले आरोग्य सुधारण्यासाठी व्यायामाला सुरुवात करता येते.  त्यासाठी निर्धार आणि नियमित व्यायाम करणे महत्वाचे. आठवड्यातून किमान पाच दिवस तरी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला पाहिजे. या त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तशा सर्वसामान्य आहेत, सर्वांना माहित आहेत. फक्त आपली सर्वसामान्यांची प्रवृत्ती बरेचदा आळसामुळे व्यायाम टाळण्याची असते. प्रत्येकाने जिममध्येच गेले पाहिजे असे नाही. आपण घरी देखील योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार आदी व्यायाम करू शकतो. फिरायला जाणे, घरातील छोटीमोठी कामे करणे, स्वतःच्या छंदांसाठी वेळ देणे या गोष्टीदेखील करता येतील.  ज्यांना काही गंभीर आजार आहेत, अशा व्यक्ती आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करू शकतात. आपल्या वागण्याबोलण्यातून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. जे आपण देऊ ते परत आपल्याकडे येते. आपण इतरांना आनंद दिला तर तोच आनंद शतपटीने आपल्याकडे परत येईल. 

त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती शंभर ते एकशेवीस वर्षे जगू शकते या गोष्टीवर आजची परिस्थिती पाहता विश्वास बसणे कठीण होते. पण ती वस्तुस्थिती आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जपानमध्ये आहेत. बऱ्याचश्या व्यक्ती या शंभरच्या पुढे आयुर्मान असणाऱ्या आहेत. आपण आंतरजालावर जर शोधले तर शंभर वर्षांच्या पुढे देखील आरोग्यदायी जीवन जगलेल्या अनेक व्यक्तींची माहिती आपल्याला मिळू शकते. अशा अनेक व्यक्तींची नोंद गिनीज बुकात झाली आहे. यातील बऱ्याचश्या व्यक्ती निसर्गनियमानुसार आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या आहेत. त्या सर्वसामान्य आहेत, ग्रामीण भागात राहणाऱ्या आहेत. आनंदी राहणे, सतत कार्यरत राहणे हे त्यांचे स्वभावविशेष आहेत. 

 ' इकिगाई ' या पुस्तकात अशा प्रकारच्या व्यक्तींचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. जिज्ञासूंनी ते पुस्तक अवश्य वाचावे असे आहे. जपानमधील प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने ' इकिगाई ' म्हणजे जीवन जगण्याचा उद्देश ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला कशासाठी जगायचे, आपल्या जगण्याचा नेमका उद्देश काय किंवा आपल्याला काय साध्य करायचे आहे याची स्पष्ट कल्पना प्रत्येक व्यक्तीला असली पाहिजे. नुसतेच निरुद्देश असलेले जीवन काय उपयोगाचे ! ज्याच्या जीवनाचा, जगण्याचा काही एक उद्देश असेल, तो निश्चितपणे त्याच्या पूर्ततेसाठी आयुष्यभर झटेल आणि नैसर्गिकपणे तो दीर्घायुषीदेखील होईल. 

जपानमधल्या या सर्व व्यक्ती दीर्घोद्योगी आहेत. जोपर्यंत आपल्याकडून होईल तोपर्यंत कार्यरत राहणे हा त्यांच्या स्वभावाचा, जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. ' निवृत्त ' होणे किंवा इंग्रजीतला रिटायर होणे या अर्थाचा शब्दच त्यांच्या भाषेत नाही. कारण होण्याची कल्पनाच त्यांच्याकडे नाही. अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणे, काही ना काही तरी करून स्वतःला त्यात गुंतवून घेणे हे त्यांच्या स्वभावात नैसर्गिकपणे आलेले आहे. जपानी लोक आनंदी आणि मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. ते स्वतःवर आणि इतरांवरही प्रेम करतात. त्यांच्या आरोग्यदायी जीवनशैलीचे आणखी एक रहस्य म्हणजे ते आपल्याला जेवढी भूक असेल त्याच्या ऐंशी टक्केच जेवण घेतात. जसजसे वय वाढत जाते, तसतसा ते आपला आहारही कमी घेत असतात. 

आपल्याकडे तर ही मिताहाराची कल्पना फार पूर्वीपासून आहे. आपला जेवताना म्हणावयाचा श्लोक ' उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म..' हेच सांगतो. जगण्यासाठी खायचं आहे, खाण्यासाठी जगायचं नाही हा यातील गर्भित अर्थ आहे. भुकेपेक्षा दोन घास कमी खा असे आपल्याकडे पूर्वीपासून सांगितले जाते. पण आपण या सल्ल्याकडे सपशेल दुर्लक्ष करून आवडलेल्या गोष्टींवर आडवा हात मारतो. जपानी लोक ताज्या भाज्या, फळे यांचा जास्तीत जास्त समावेश आपल्या आहारात करतात. तळलेल्या पदार्थांपेक्षा उकडून घेतलेल्या भाज्या, अन्नपदार्थ ते आहारात घेतात. ते चहा भरपूर पितात. पण आपण पितो तसा नाही. ते ग्रीन टी घेतात. ग्रीन टी हा अँटिऑक्सिडंट असतो, तो उत्साह आणि आरोग्यदायी असतो. 

आपणही सगळे आपल्या जीवनात अशा जीवनशैलीचा अंगीकार करू या. आपले जीवनाचे ध्येय म्हणजेच आपल्याला कशासाठी जगायचे तेही निश्चित करू या. ही फक्त तरुणांनीच ठरवायची अशी गोष्ट नाही. त्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. मी सेवानिवृत्तीनंतर देखील माझ्या ध्येयाचा पाठपुरावा करू शकतो. जीवनाचा उद्देश ठरवून त्याकडे वाटचाल करू शकतो. तो उद्देश ज्ञानप्राप्तीचा, परमेश्वर प्राप्तीचा, आरोग्य प्राप्तीचा, समाजसेवेचा, एखाद्या समाजोपयोगी कार्यात स्वतःला व्यस्त ठेवण्याचा असा कोणताही असू शकतो. 

रामायणकाळात गृहस्थाश्रमातील आपली कर्तव्ये व्यवस्थित पूर्ण करून लोक वानप्रस्थाश्रम स्वीकारत असत. पण तो निरुद्देशी नसायचा. ही मंडळी अरण्यात जायची. अरण्यात विविध ऋषींचे आश्रम असायचे. अशा आश्रमांमध्ये राहून वानप्रस्थाश्रम स्वीकारलेले पतिपत्नी आपल्या आयुष्यभर मिळवलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कौशल्यांचा फायदा गुरुकुलात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना करून देत असत. त्यात त्यांचे आणि समाजाचेही हित आपोआप साधले जात असे. आज जरी ही गोष्ट तशा प्रकारे करता येणे शक्य नसले तरी आपण अशाच प्रकारच्या काहीतरी समाजोपयोगी कार्यात भाग घेऊन स्वतःचा वेळ तर सदुपयोगी लावू शकतो पण आपल्यावर समाजाचे जे देणे असते, त्यातूनही काही अंशी उतराई होऊ शकतो. 

आपणा सर्वांना निरामय, आनंदी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा ! 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०७/०७/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...