मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग छत्तीस

 उगवतीचे रंग 

 भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग छत्तीस 

संगीतकार गुलाम मोहम्मद आणि उषा खन्ना 

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे लता मंगेशकर यांची कारकीर्द प्रदीर्घ आहे. त्यांनी जवळपास पावणे दोनशे संगीतकारांच्या निर्देशनात २३ पेक्षा अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. सर्वच संगीतकारांबद्दल लिहिणे शक्य नाही. आपण साधारणपणे महत्वाच्या संगीतकारांबद्दल माहिती घेत आहोत. आतापर्यंत आपण अठरा संगीतकारांबद्दल सविस्तर माहिती घेतली.  आजच्या या भागात आपण संगीतकार गुलाम मोहम्मद आणि उषा खन्ना या दोन संगीतकारांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू या. 

गुलाम मोहम्मद 

साधारणपणे संगीतकार गुलाम मोहम्मद म्हटले की पाकिजा, मिर्झा गालिब ही चित्रपटांचे दोन ठळक नावे आपल्या डोळ्यासमोर येतात. या चित्रपटांसोबतच शमा, अंबर, शिशा, दिल-ए-नादान, कुंदन आदी सुमारे ३५ चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. राजस्थानातील बिकानेर येथे जन्मलेल्या गुलाम मोहम्मद यांचे वडील जनाब नबी बक्ष हे उत्तम तबलावादक होते. त्यामुळे संगीताची आवड गुलाम मोहम्मद यांना आपल्या वडिलांकडूनच आली होती. मुंबईला आल्यानंतर त्यांनी संगीतकार नौशाद यांच्याकडे बरीच वर्षे सहायक म्हणून काम केले. गुलाम मोहम्मद यांचा स्वभाव साधा सरळ होता. प्रसिद्धीची कोणतीही हाव न धरता निरलसपणे आपले काम करणे हेच त्यांना माहिती होते. 

गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या ' पाकिजा ' या चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटाची कहाणी समजून घेण्यासारखी आहे. आपल्याला कदाचित कल्पना नसेल की  चित्रपट तयार  होण्यासाठी सुमारे चौदा वर्षे लागली. या चित्रपटाच्या संगीतासाठी आणि गीतांसाठी गुलाम मोहम्मद यांनी अक्षरशः रक्ताचे पाणी केले. आपल्याला 'मौसम हैं आशिकाना ' हे गाणं आठवत असेल. या गाण्याची सुरुवात आठवते का ? नसेल तर यु ट्यूबवर या गाण्याचा व्हिडीओ जरूर पहा. या गाण्याच्या सुरुवातीला नदीकाठी झाडावरून उडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकू येतो. हा आवाज आपल्याला हवा तसा रेकॉर्ड करण्यासाठी गुलाम मोहम्मद रोज सकाळी सगळा लवाजमा घेऊन तब्बल २१ दिवस त्या ठिकाणी गेले. ' युहीं कोई मिल गया था ' या गाण्याच्या शेवटी आगगाडीच्या शिट्टीचा अतिशय समर्पक वापर केलेला आठवतो का ? त्या गाण्याचाच ती एक भाग बनून गेली आहे इतका सुंदर तिचा वापर आहे. गाणं थेट काळजापर्यंत पोहोचतं. या सगळ्या गाण्यांमध्ये लोकसंगीताचा आणि भारतीय पारंपारिक वाद्यांचा वापर अतिशय कुशलतेने केलेला आहे. गुलाम मोहम्मद यांनी ढोलक, मटका, डफ, खंजिरी, चिमटा अशा तालवाद्यांना आपल्या चित्रपट संगीतातून लोकप्रिय बनवले. 

' मौसम हैं आशिकाना, ऐ दिल कहीं से उनको ऐसेमे ढुंढ लाना ' या गीताच्या काव्यातलं सौंदर्य तर पहा. यातले ' मौसम ', ' आशिकाना ' हे शब्द किती अप्रतिम आहेत. त्यांचा शब्दशः अर्थ सांगून त्यातली खुमारी नाही कळणार. ती फक्त जाणून घ्यायची गोष्ट आहे. आणि पुढची ओळ तर बघा. ' कहना की रुत जवां हैं और हम तडप रहे हैं ' यातील ' कहना की रुत जवां हैं ' यातील सौंदर्य निसर्गप्रेमीच उत्तम प्रकारे समजू शकतील. ही एका विरहिणीची व्यथा आहे. लतादीदींचा सुरेल स्वर ही व्यथा जिवंत करून ती थेट आपल्यापर्यंत पोहोचवतो. ' पाकिजा ' जेवढा मीनाकुमारीच्या अभिनयाने नटला आहे, तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तो लतादीदींच्या स्वरांनी जिवंत झाला आहे. या गाण्यातल्या गुलाम मोहम्मद यांच्या संगीतात खरोखरच माणसाला त्यांच्या संगीताचा गुलाम बनवण्याचं सामर्थ्य आहे. या गीतातलं लतादीदींच्या आवाजातलं सौंदर्य, माधुर्य ही अनुभवण्याची गोष्ट आहे. एखादा मनोहारी धबधबा कोसळत असावा आणि त्याच्या खाली त्याचे तुषार अंगावर झेलत आपण नखशिखान्त न्हाऊन  निघावं तशी या सुरांची जादू आहे. 

अतिशय सुमधुर संगीताने नटलेला हा चित्रपट जेव्हा चौदा वर्षांनी पूर्ण झाला तेव्हा त्या चित्रपटाचं रसिकांनी केलेलं स्वागत पाहण्याचं भाग्य गुलाम मोहम्मद यांच्या नशिबी नव्हतं. १७ मार्च १९६८ ला गुलाम मोहम्मद यांचं निधन झालं. गुलाम मोहम्मद यांच्या निधनानंतर या चित्रपटातील उर्वरित गाणी आणि त्याचं पार्श्वसंगीत नौशाद यांनी तयार केलं. हा चित्रपट ४ फेब्रुवारी १९७२ ला प्रदर्शित झाला. त्याच्या गाण्यांनी आणि संगीताने लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड तोडले. मौसम हैं आशिकाना, चलते चलते यूही कोई मिल गया था, थारे रहियो ओ बांके यार, इन्ही लोगोने, चलो दिलदार चलो, तीरे नजर देखेंगे ही सगळीच गाणी प्रचंड गाजली. या सोबतच गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या ' अंबर ' चित्रपटातील ' हम तुम ये बहार देखो ', ' आसमा वाले तेरी दुनियासि...' हे लतादीदींनी तलत महमूद बरोबर गायलेलं ' लैला मजनू ' मधील युगलगीत, ' अंबर ' मधील ' दुनियां  में नही कोई यार ', ' दो बिछडे हुए दिल ' हे शायर चित्रपटातलं लतादीदींनी जी एम दुराणी यांच्याबरोबर गायलेलं गीत, शिकायत क्या करू ' हे ' कुंदन ' या चित्रपटातलं गाणं अशी अनेक गाणी लोकप्रिय झाली. गुलाम मोहम्मद यांच्या संगीत निर्देशनात लतादीदींनी ७३ गाणी गायली आहेत. 

उषा खन्ना 

ज्या काळात शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, खैय्याम, ओ पी नय्यर यांच्यासारखे दिग्गज संगीतकार आपल्या संगीताने हिंदी चित्रपट सृष्टीची दुनिया उजळून टाकत होते, त्याच काळात उषा खन्ना नावाची एक तरुणी संगीत क्षेत्रात आपले पाय रोवू पाहत होती. तिच्यासाठी हे काम अजिबात सोपे नव्हते. एक तर या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी ! त्यात एखादी स्त्री जेव्हा आपले कर्तृत्व दाखवू पाहते तेव्हा साहजिकच बघणारांच्या भुवया उंचावल्या जायच्या आणि तिला काय जमणार, एवढ्या पुरुष संगीतकारांपुढे तिचा काय निभाव लागणार अशी हेटाळणीही तिला सहन करावी लागली. 

उषा खन्ना ही गायक बनण्याच्या ओढीनं ग्वाल्हेर मधून मुंबईत आलेली एक तरुणी. तिचे वडील मनोहर खन्ना हे ग्वाल्हेर संस्थानात नोकरी करत. त्यांना गाण्याची आणि काव्यलेखनाची अतिशय आवड होती. उषाला संगीताचा हा वारसा आपल्या वडिलांकडूनच मिळाला होता. तिचे वडील उत्तम गझल लिहीत. ती गाणी म्हणायची, वडिलांच्या कवितांना चाली लावायची. आपणही गायक व्हावे असं तिला वाटायचं. त्याच ओढीनं ती मुंबईला आली होती. 

प्रख्यात गीतकार इंदीवर यांच्याशी तिची ओळख झाली होती. इंदीवर तिला फिल्मिस्तानचे प्रमुख, निर्माते आणि दिग्दर्शक शशिधर मुखर्जी यांच्याकडे घेऊन गेले. ' ही मुलगी उत्तम गाते ' असे त्यांना सांगितले. शशिधर मुखर्जींनी क्षणभर त्या लाजऱ्याबुजऱ्या तरुणीकडे पाहिले. त्या काळात लता मंगेशकर आणि आशा भोसले या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. मुखर्जी तिला म्हणाले, ' तू लता आणि आशा यांच्यापेक्षा चांगली गाऊ शकतेस का ? ' या प्रश्नाने डोळ्यात गायक बनण्याची स्वप्नं घेऊन आलेली ती तरुणी हादरली. ती काहीच बोलली नाही. मुखर्जी म्हणाले, ' मग चित्रपट सृष्टीत येऊन तू काय करणार ? ' या प्रश्नालाही तिच्याजवळ उत्तर नव्हते. मग मुखर्जी म्हणाले, ' गाण्याच्या क्षेत्रात लता, आशा यांची बरोबरी कोणी करू शकत नाही, संगीत क्षेत्रात मात्र तशी परिस्थिती नाही. या क्षेत्रात कोणी का पुढे येत नाही ? ' त्यांच्या या बोलण्याने जवळ उभे असलेले इंदीवर मात्र सुखावले. तो धागा पकडून ते म्हणाले, या मुलीला संगीतातही गती आहे. तेव्हा शशिधर मुखर्जींनी तिला काही गाणी म्हणण्यास सांगितले. तिने जीव ओतून एक दोन गाणी, गझला सादर केल्या. तिच्या गाण्यातील, सूर, ताल, लय इ गोष्टी पाहून मुखर्जी प्रभावित झाले. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी या सर्वस्वी नवख्या तरुणीवर सोपवली. 

तो चित्रपट होता ' दिल देके देखो ' आणि वर्ष होते १९५९. शम्मी कपूर, आशा पारेख यांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटातील सगळी गाणी अतिशय लोकप्रिय झाली. दिल देके देखो, यार चुलबुला हैं, बोलो बोलो कुछ तो बोलो, बडे हैं दिल के काले, हम और तुम और ये समा, प्यार की कसम न देखो ऐसे प्यारसे सारखी गाणी तरुणाईच्या ओठांवर रुळू लागली. काही लोकांना तर हे संगीत ओ पी नय्यर यांचेच असावे असेही वाटून गेले. कारण एक महिला संगीतकार असे संगीतकार असे लोकप्रिय संगीत देऊ शकते हे लोकांना खरे वाटले नाही. पण उषा खन्ना हे खणखणीत नाणं होतं. तुमचं नाणं खणखणीत असेल तर ते वाजतंच ! मग उषा खन्ना यांना एकामागून एक चित्रपट मिळत गेले. १९६१ मध्ये आलेल्या ' हम हिंदुस्तानी ' या चित्रपटातील सगळी गाणी लोकांना आवडली. या चित्रपटातील ' छोडो कल की बाते, कल की बात पुरानी..' या गाण्याला तर देशभक्तीपर गीताचा दर्जा मिळाला. हे गीत आजही तेवढेच लोकप्रिय आहे. याच चित्रपटातली निली निली घटा भिगी भिगी हवा, मांझी मेरी किस्मत जी चाहे, हम जिधर चले तो, बलमा मोरी लट उलझा दे अशी एकापेक्षा एक सरस गाणी गाजली. 

पुढे कामाच्या निमित्ताने  उषा यांचा परिचय निर्माते, दिग्दर्शक आणि गीतकार सावनकुमार टाक यांच्याशी झाला.  पडद्याआडच्या या संबंधाचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रूपांतर विवाहात झाले. सावनकुमार यांचे सौतन, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, हवस, डाकबंगला आदी चित्रपटांना उषा यांनी संगीत दिले. सावनकुमार यांच्याशी फार काळ त्यांचं जमलं नाही. पुढे उषा यांनी इतरही चित्रपट केले. त्यात निशान, शबनम, आओ प्यार करे, एक सपेरा एक लुटेरा, इन्साफ, दादा यासारखे अनेक चित्रपट केले. अर्थपूर्ण गीतांना तितकीच सुमधुर चाल हे या चित्रपट गीतांचे वैशिष्ट्य होते. ऐ मेरे हमसफर मुझको पहचान ले मैं वही हूँ, दिल के तुकडे तुकडे कर के मुस्कुराते चल दिये, चांदको क्या मालूम चाहता हैं उसे कोई चकोर, अपने लिये जिये तो क्या जिये, बरखा रानी जरा जमके बरसो आदी गाणी लोकप्रिय ठरली. 

१९८० नंतर उषा खन्ना यांनी संगीत दिलेल्या  ' सौतन ' या चित्रपटातील गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. शायद मेरी शादी का खयाल दिल में आया हैं, जिंदगी प्यार का गीत हैं , मैं 'तेरी छोटी बहना हू ही सगळीच गाणी तरुणतरुणींच्या ओठांवर आली. त्याशिवाय बिन फेरे हम तेरे इ चित्रपटातील त्यांची गाणीही गाजली. २००३ मध्ये त्यांनी संगीत दिलेला ' दिल परदेसी हो गया ' हा आलेला शेवटचा चित्रपट. त्यांच्या आणखी काही लोकप्रिय गाण्यांचा उल्लेख करायचा तर तेरी गलियोंमे ना रखेंगे कदम, राही मिल गये राहोमे, मधुबन खुशबू देता हैं, अजनबी कौन हो तुम, चांद के पास जो सितारा हैं, प्यार तो सपना हैं दर्द ही अपना हैं  अशी काही गाणी सांगता येतील. सर्वच गाण्यांचा उल्लेख शक्य नाही. लतादीदींनी सुमारे ७८ गाणी उषा खन्ना यांच्या संगीत निर्देशनात गायली आहेत. त्यांना २०१९-२० चा प्रतिष्ठित असा ' लता मंगेशकर ' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 

( क्रमशः पुढील भाग बुधवारी ) 

©विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०६/०६/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

लता मंगेशकर आणि उषा खन्ना 

संगीतकार गुलाम मोहम्मद 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...