मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग पस्तीस

उगवतीचे रंग 

 भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग पस्तीस 

' तेरे सूर और मेरे गीत ' : संगीतकार वसंत देसाई

आनंदघन लतादीदींची संगीत कारकीर्द प्रदीर्घ म्हणजे जवळपास ऐंशी वर्षांची आहे. या कारकिर्दीत त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटातील गाणी गायली. साहजिकच अगदी जुन्या ज्येष्ठ अशा संगीतकरांपासून ते अगदी आजपर्यंतच्या अनेक नवीन आणि ज्युनिअर संगीतकारांसोबत त्यांनी काम केले आहे. म्हणूनच त्यांच्या संगीत कारकिर्दीचा आढावा घेताना आपण विविध संगीतकारांबद्दल देखील सविस्तरपणे जाणून घेत आहोत. ते जाणून घेतलं नाही तर दीदींच्या गाण्यातील विविधता, सौंदर्य आपल्या लक्षात येणार नाही. या निमित्ताने त्या दिग्गज अशा संगीतकारांबद्दलही आपल्याला जाणून घ्यायला मिळतं आहे. दीदी ज्यांच्याकडे गायल्या ते कोणी सामान्य संगीतकार निश्चितच नव्हेत. त्यामुळे ते संगीतकार आणि दीदी दोन्ही महानच ! जणू हा समसमा संयोग जाहला ! आज आपण अशाच एका महान संगीतकारांबद्दल जाणून घेऊ या. 

या संगीतकारांचे नाव आहे वसंत देसाई. कोकणातल्या सुपीक आणि समृद्ध मातीने लोकमान्य टिळकांपासून अनेक थोर नररत्ने महाराष्ट्राला किंबहुना भारताला दिली. त्याच परंपरेत बसणारे आजचे संगीतकार म्हणजे वसंत देसाई. कोकणातील सावंतवाडी तालुक्यातील सोनावडे गाव. या गावी ९ जून १९१२ वसंत देसाई यांचा जन्म झाला. वसंतरावांना संगीताची आवड आणि वारसा आपल्या आईकडून मिळाला. त्यांची आई ही मालवणचे प्रसिद्ध कीर्तनकार आबा भास्कर परुळेकर यांची एकुलती एक कन्या. त्यामुळे भजन, कीर्तन, अभंग आदींचे बाळकडू वसंतरावांना लहानपणीच मिळाले. शिवाय त्या काळात गावोवावी नाटके येत असत. या नाटकातील भूमिका, संगीत आणि त्या परिसरातील लोककला आदींचा परिणाम त्यांच्यावर झाला. त्यातूनच त्यांच्यातील संगीताचं रोपटं आकार घेऊ लागलं. आपलं प्राथमिक शिक्षण कुडाळ या गावी झाल्यावर वसंतराव आपल्या काकांकडे कोल्हापूरला आले. कोल्हापूर म्हणजे महान कलाकारांचे आगर होते. 

इथेच गायन समाज देवल क्लब या संस्थेत जात असत. या ठिकाणी त्यांना शास्त्रीय संगीतातील दिग्गज उस्ताद अल्लाउद्दीन खां, उस्ताद अब्दुल करीम खां, उस्ताद मंजी खां आणि रामकृष्णबुवा वझे यांचा सहवास लाभला. शास्त्रीय संगीताचे संस्कार मिळून वसंतरावांचा मुळातला संगीतकाराचा पिंड आणखी पुष्ट झाला. तिथेच त्यांना प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली. त्या ठिकाणी संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काही काळ उमेदवारी केली. ' अयोध्येचा राजा ' या प्रभातच्या पहिल्या बोलपटात त्यांनी सहायक संगीतकार म्हणून गोविंदरावांसोबत काम केले. पुढे प्रभात फिल्म कंपनीचे पुण्यात स्थलांतर झाले आणि वसंतरावही पुण्यात आले. पुण्यात ते केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव यांच्यासारख्या संगीताच्या अभ्यासकांच्या संपर्कात आले. त्यांच्यासोबत सहायक म्हणून ते काम करू लागले. इथेच ते संगीतातले बारकावे, गाण्यातील स्वर, मुरकी, तान इ गोष्टी शिकले. प्रभातच्या गाजलेल्या ' संत ज्ञानेश्वर', ' संत सखू ' या चित्रपटातील काही चाली आणि पार्श्वसंगीत त्यांनी दिले. काही चित्रपटात भूमिकाही केल्या. वसंतरावांना शास्त्रीय संगीतात विशेष रुची असल्याने इनायत खां आणि डागर बंधू यांच्याकडे पुन्हा त्यांनी शास्त्रीय संगीताची साधना केली. 

पुढे १९३९ मध्ये वसंतराव मुंबईत राहायला आले. शिवाजी पार्कजवळ ' परिमल ' या इमारतीत ते राहत. त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ असे. वसंतरावांच्या स्वभावात कोकणातल्या हापूस आंब्याचा गोडवा आणि वागण्याबोलण्यात नारळपाण्याची गोडी आणि शीतलता होती. अत्यंत हसतमुख आणि निगर्वी असे हे व्यक्तिमत्व होते. शरीर पिळदार होते. अत्यंत घरंदाज अशा कुटुंबातून आलेल्या वसंतरावांना लहानथोर सगळ्यांबरोबरच जुळवून घेण्याची कला अवगत होती. त्यांच्याकडे शिकण्यासाठी, मार्गदर्शनासाठी आलेल्या कोणालाही त्यांनी कधी निराश केले नाही. 

व्ही शांताराम यांच्या ' शकुंतला ' ( १९४३ ) चित्रपटापासून त्यांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र संगीतकार म्हणून संगीत देण्याची संधी मिळाली. त्यानंतर जवळपास ३२ वर्षे त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांना संगीत दिले. त्याशिवाय विविध नाटके, बालगीते, समरगीते यांना उत्कृष्ट संगीत दिले. १९६२ च्या चीनच्या आक्रमणाच्या वेळी ग दि माडगूळकर यांनी लिहिलेलं ' जिंकू किंवा मरू ' हे समरगीत शाळाशाळांतून म्हटले जात होते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेप्रसंगी त्यांनी चाल दिलेली ' अमर भूपाळी ' चित्रपटातील पंडितराव नगरकर आणि लतादीदींनी म्हटलेली ' घनःश्याम सुंदरा,,,' ही भूपाळी कमालीची लोकप्रिय झाली. तिची लोकप्रियता अजूनही तशीच टिकून आहे. एवढेच काय पण भूपाळी म्हटली की ' घनःश्याम सुंदरा,,. ' आठवते. ' दो आँखे बारह हाथ ' या चित्रपटातील ' ऐ मालिक तेरे बंदे हम ' या गीताला प्रार्थनेचा दर्जा प्राप्त झाला. पाकिस्तानमधील आकाशवाणीवर आणि शाळाशाळांतून हे गीत प्रार्थना म्हणून म्हटले जाई. 

त्यांनी संगीत दिलेली ' सुंदरा मनामध्ये भरली ' ( शाहीर रामजोशी ), घनःश्याम सुंदरा, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला ( अमर भूपाळी ), छडी लागे छमछम, भरजरी ग पितांबर ( श्यामची आई ) इ अनेक मराठी चित्रपटातील गाणी कमालीची लोकप्रिय झाली.  व्ही शांताराम यांच्या बहुतेक चित्रपटांना वसंतरावांनी संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेल्या  ' श्यामची आई ' या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकगीतांचा सुंदर अविष्कारही त्यांनी घडविला. ' स्वयंवर झाले सीतेचे ' या चित्रपटासाठी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून ' हिंडोल बहार ' या मिश्र रागावर आधारित ' रम्य ही स्वर्गाहून लंका ' हे गीत गाऊन घेतले. हे गीत आजही लोकप्रिय आहे. त्यांनी संगीत दिलेल्या ' पंडित जगन्नाथ ' या नाटकाने मराठी संगीत रंगभूमीची खंडित झालेली नाट्यपरंपरा पुन्हा सुरु झाली. या नाटकातील ' जय गंगे भागीरथी ' आणि ' नयन तुझे जादूगार ' ही गीते खूप गाजली. याशिवाय जय जय गौरीशंकर, देव दीनाघरी धावला, देह देवाचे मंदिर, शाब्बास बिरबल इ नाटकांना त्यांनी संगीत दिले. 

१९५३ मध्ये ' झाशीची राणी ' या चित्रपटाच्या निमित्ताने वसंतराव इंग्लंडला जाऊन आले. त्यानंतर त्यांनी मागे पाहिले नाही. एकामागून एक दर्जेदार चित्रपट आणि बहारदार गाणी ते रसिकांना भरभरून देत राहिले. त्यांच्या चित्रपटांची नुसती नावे जरी पाहिली तरी ते आपल्या लक्षात येईल. वसंत देसाई म्हणजे अनवट मिश्र रागदारी असलेली गाणी, शास्त्रीय संगीताची बैठक असलेली पण तरीही अर्थवाही, सोप्या चालीची गीते देणारा संगीतकार !  दो आँखे बारह हाथ, गुंज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे, संपूर्ण रामायण, रामराज्य, यादे, गुड्डी, आशीर्वाद, अचानक आदी चित्रपट त्यांच्या शास्त्रीय संगीतावर, रागांवर आधारित अशा सुमधुर गाण्यांनी भरलेले आहेत. अपवाद फक्त ' अचानक ' चित्रपटाचा. कारण या चित्रपटात गाणी नाहीत. लता मंगेशकर, आशा  भोसले,मो रफी, महेंद्रकपूर आदी गायकांना तर त्यांनी संधी दिलीच पण वाणी जयराम या गायिकेला संधी देऊन तिच्याकडून गुड्डी चित्रपटातलं ' बोले रे पपीहरा ' हे गीत गाऊन घेतले. ही शास्त्रोक्त चीज त्रितालाऐवजी केहारवा रागात बांधून त्यांनी हलकीफुलकी केली.  हे गाणे  कमालीचे लोकप्रिय ठरले. अलीकडच्या काळात काही ब्रेथलेस गाण्यांबद्दल बोलले जाते. पण खरं तर त्याचा वापर वसंत देसाई यांनी पहिल्यांदा केला. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्या आवाजातील ' आशीर्वाद ' चित्रपटातील ' रेलगाडी रेलगाडी ' हे गीत म्हणजे ब्रेथलेस गाण्याचाच नमुना आहे. या बालगीताप्रमाणेच ' नीना की नानी की नाव चली हे बालगीतही लोकप्रिय झाले. ' बाप माझा ब्रह्मचारी ', इये मराठीचिये नगरी, स्वयंवर झाले सीतेचे या सारख्या चित्रपटांनी वसंतरावांना संगीताचा बादशहा हा मान मिळवून दिला.      

लतादीदींनी तब्बल ११२ गाणी त्यांच्या संगीत निर्देशनात गायली आहेत. त्यातील काही नमुन्यादाखल पाहू या 

आओ होनहार ओ प्यारे बच्चे,  ऐ मालिक तेरे बंदे हम, सैंया झुठो का बडा, उमड घुमड कर आई रे घटा, मैं जागू तू सो जा,  तक तक धूम धूम ही ' दो आँखे बारह हाथ ' चित्रपटातील लतादीदींनी गायलेली गाणी गाजली. 

नैन से नैन नाही मिलाव, मेरे ऐ दिल बता, जो तुम तोडो पिया, मुरली मनोहर, झनक झनक पायल बाजे ही लतादीदींच्या आवाजातील ' झनक झनक पायल बाजे ' या चित्रपटातील गाणी. कमालीचा गोडवा या सगळ्या गाण्यांमध्ये भरला आहे. १९५५ मधील या चित्रपटातील गाणी आजही ताजी वाटतात. 

गुंज उठी शहनाई या चित्रपटात तर एकसे एक बहारदार गाणी वसंतरावांनी दिली. ही गाणी हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आणि यश असे म्हटल्यास वावगे होणार नाही. याच चित्रपटातून वसंतरावांनी प्रख्यात शहनाई वादक बिस्मिल्ला खां यांची शहनाई लोकप्रिय केली. या चित्रपटातील मो रफी आणि लतादीदींच्या आवाजातील सगळीच गाणी सुपरहिट झाली.  तेरे सूर और मेरे गीत, अखियां भूल गयी हैं सोना, हौले हौले घूंघट पट खोले, जीवन में पिया तेरा साथ रहे, दिल का खिलौना हाये टुट गया, 'तेरी शहनाई बोले, मुझको अगर भूल जाओगे तुम...' ही सगळी एकापेक्षा सरस गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. 

तेरा खत लेके सनम, अपने सैंया से नैना ही अर्धांगिनी चित्रपटातील गाणी, एक था बचपन हे ' आशीर्वाद ' चित्रपटातील गाणं, ओ दिलदार बोलो एक बार हे ' स्कुल मास्टर ' चित्रपटातलं गीत ही सगळीच गाणी म्हणजे वसंत देसाई यांचे संगीत आणि दीदींचे  स्वर यांचे सुरेख मिश्रण आहे. संगीतातला हा ' वसंत ' बहरत आणि बरसत राहिला.  अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानाचे ते मानकरी ठरले. १९७१ मध्ये भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री ' पुरस्कारने गौरवले. समूहगीते लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. महाराष्ट्रातील शाळाशाळातून ते फिरले. संगीत शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते अविवाहित राहिले. त्यांनी आपले जीवन संगीताला वाहून घेतले होते.  या गुणी संगीतकाराचा मृत्यू मात्र दुर्दैवी आणि अपघाती झाला. २२ डिसेंबर १९७५ मध्ये मुंबईला आपल्या निवासस्थानी लिफ्टमध्ये अडकून त्यांचे दुर्दैवी निधन झाले.  पण त्यांची गाणी आणि संगीताच्या रूपाने ते अजरामर आहेत. 

( क्रमशः पुढील भाग रविवारी )

©  विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

०४/०६/२०२१

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित शेअर करावा )


                                  











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...