उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग चौतीस
अप्रतिम गीते देणारा संगीतकार : रवी
गायक बनण्याच्या ओढीनं १९५०-५२ च्या सुमारास दिल्लीहून एक तरुण मुंबईत आला. खरं तर तर त्याचा दहावीनंतर इलेक्ट्रिशियनचा कोर्स झाला होता. वडिलांनी लग्नही करून दिले होते आणि पोस्ट अँड टेलिग्राम मध्ये त्याला नोकरीही मिळाली होती. पण डोक्यातली संगीताची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या घरच्यांचा, पत्नीचा निरोप घेऊन आणि डोळ्यात स्वप्नं घेऊन तो मुंबईला आला. मुंबईत तसं त्याचं कोणीच नव्हतं. खिशात पैसे नव्हते. दिवसा संगीतकारांचे उंबरठे झिजवायचे, मिळेल ते काम करायचं, कधी कधी फॅन दुरुस्तीसारखेही काम करायचं आणि रात्री गोरेगाव किंवा मालाड सारख्या एखाद्या स्टेशनवर आपली पथारी टाकायची हा त्याचा दिनक्रम होता. पहाटे पहाटे रेल्वे स्टेशनवरचे विक्रेते पावाचे उरलेले तुकडे कमी किमतीत विकायचे. ते घ्यायचे. पाणी पिऊन तहान भूक भागवायची असा त्याचा दिनक्रम होता. 'आनंदमठ ' चित्रपटाच्या वेळी ' वंदे मातरम ' या गीताच्या वेळी कोरसमध्ये गाण्याची त्याला संधी मिळाली. तो सगळ्यांबरोबर गात होता, तरीही त्याच्यातला स्पार्क आणि त्याच्या आवाजातलं वेगळेपणा हेमंत कुमारांनी ओळखला आणि त्याला आपल्याकडे सहायक म्हणून घेतले. इथूनच त्याच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात झाली.
हेमंतदांकडे काम करत असताना तो बऱ्याच गोष्टी शिकला. तसे शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण त्याने घेतले नव्हते. पण संगीत त्याच्या रक्तातच होते. या मुलाचं नाव होतं रवीशंकर शर्मा. ३मार्च १९२६ चा दिल्लीतला त्याचा जन्म. वडील भजनं गायचे. ते संस्कार त्याच्यावर आपोआपच होत गेले. स्वतःच हार्मोनियम वाजवायला शिकला. पुढे मात्र हेमंतदांकडे आल्यावर चिकाटीने अनेक गोष्टी शिकला. अनेक वाद्ये शिकला. संगीतातले बारकावे आत्मसात केले. या मुलाची संगीतावरील अविचल निष्ठा, प्रामाणिकपणा, प्रतिभा इ गोष्टी पाहून हेमंतदा खुश झाले. तो त्यांचे बरेच काम सांभाळायचा. या काळात त्याने काही चित्रपटांसाठी गीतं लिहिली तर काही चित्रपटात पार्श्वगायन केले. ' नागीन ' चित्रपटाला हेमंत कुमार यांचं संगीत होतं. त्यातील लोकप्रिय झालेली बीनची धून, तिची कल्पना आणि जनक खरं तर हा रवी. पण त्या गोष्टीचे श्रेय कल्याणजींकडे गेले. पण रवीची संगीतातील प्रतिभा हेमंतदांनी ओळखली होती आणि मग त्यांनी या हरहुन्नरी मुलाकडे त्यांच्याकडे संगीत दिग्दर्शनासाठी येणाऱ्या काही चित्रपटांची जबाबदारी सोपवायला सुरुवात केली.
संगीतकार म्हणून खऱ्या अर्थाने गाजलेला रवीचा पहिला चित्रपट म्हणजे ' वचन '. या चित्रपटातील आशा भोसलेंच्या आवाजातील ' चंदामामा दूर के...' हे अंगाईगीत खूप गाजले. याच चित्रपटातील युगलगीत ' जब लिया हाथ में हाथ..' हे गीतही लोकप्रिय झाले. पुढे मग संगीतकार म्हणून रवींना अनेक चित्रपट मिळाले. हे चित्रपट सुपरहिट झाले आणि त्यातील गाणीही. चौदहवी का चांद, दो बदन, आँखे, हमराज आदी चित्रपटांना फिल्मफेअर चे नामांकन मिळाले. १९६१ मध्ये ' घराना ' आणि १९६५ मध्ये ' खानदान ' या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कार मिळाला. १९८२ मध्ये ' निकाह ' चित्रपटातील गाण्यासाठी गायिका आणि त्या चित्रपटाची नायिका सलमा आगा हिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला. ही सगळी किमया रवींची.
एकेका गाण्यासाठी ते अफाट मेहनत घ्यायचे. निकाह मधील दिल के अरमान आंसूंओमे बह गये ' हे गाणं त्यांनी सोळा वेगवेगळ्या प्रकारे सलमा आगा कडून गाऊन घेतलं होतं तर ' गुमराह ' मधील ' चलो एक बार फिर से...' या गाण्यासाठी त्यांनी तब्बल ३१ वेगवेगळ्या चाली रचल्या होत्या. त्यामुळेच अशी सदाबहार गाणी रसिकांना मिळू शकली. ' चौदहवी का चांद हो..' या सुप्रसिद्ध गाण्याची कल्पना त्यांना एकदा रात्री घरी परतत असताना आकाशातील चतुर्दशीचा चंद्र पाहून सुचली. वहिदा रहमान शांत निजली आहे आणि गुरुदत्त तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहतो आहे. अशा वेळी त्याच्या मनात कोणते विचार येतील हे त्यांनी या गाण्यातून व्यक्त केले. या गाण्याची पहिली ओळच त्यांनी लिहिली पण पुढचं गाणं शकील बदायुनी यांनी केवळ दहा मिनिटात पूर्ण केलं.
वचन, गुमराह, घराना, गृहस्थी, चिराग कहाँ रोशनी कहाँ आदी कृष्णधवल चित्रपटांपासून सुरु झालेला हा सिलसिला दस लाख, आँखे, वक्त, काजल, हमराज, नीलकमल, खानदान, एक फुल दो माली, सगाई, शहनाई इ चित्रपटापर्यंत चालला. मो रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, महेंद्र कपूर इ जवळपास सर्व नामवंत गायकांकडून त्यांनी गीतं गाऊन घेतली. चौदहवी का चांद हो, ऐ मेरी जोहराजबी, बाबुलकी दुवाए लेती जा, हुस्नवाले तेरा जवाब नही, चलो एक बार फिरसे, गैरोंपे करम अपनो पे सीतम, सौ बार जनम लेंगे अशी कितीतरी हिट गाणी रवींच्या नावावर आहेत. असे म्हटले जाते की गायिका म्हणून आपली पहिली पसंती त्यांनी आशा भोसलेंना दिली. असे असले तरी लतादीदींच्या आवाजातील त्यांनी केलेली गाणी अजरामर आहेत. त्यातीलच काही लोकप्रिय गाणी आता देणार आहे.
लतादीदींच्या आवाजातील दोन मास्टरपीस असलेल्या गाण्यांचा आधी उल्लेख करतो.
त्यातील पहिले म्हणजे आँखे चित्रपटातील ' मिलती हैं जिंदगी में मोहोब्बत कभी कभी. याच चित्रपटातील गैरोंपे करम अपनो पे सितम आणि मोरी सून ले अरज बनवारी ही गाणी सुद्धा अप्रतिम आहेत.
दुसरं सुपरहिट गाणं म्हणजे ' खानदान ' मधलं ' तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा..' या गीतासाठी लतादीदींना फिल्मफेअर अवार्ड मिळालं आणि संगीतकार म्हणून रवी यांना सुद्धा. '
टॉवर हाऊस ' चित्रपटातील ' ऐ मेरे दिले नादान, तू गमसे ना घबराना ' हे उदास मनाला आधार देणारं अप्रतिम गाणं आहे.
' भरोसा ' चित्रपटातील ' वो दिल कहाँ से लावू तेरी याद जो भुला दे...' हे आणि महेंद्र कपूर यांच्यासोबत गायलेलं ' आज की मुलाकात बस इतनी ' हे युगलगीत ही दोन्ही गाणी अप्रतिम आहेत.
' लो आ गयी उनकी याद, वो नहीं आये ' हे बदन चित्रपटातलं गाणं विरहिणीचं दुःख जिवंत करतं. काही सुंदर गाण्यांचा फक्त उल्लेख करून पुढे जाऊ या. ' किसी ने आज मोहोब्बत को आजमाया हैं ' ( एक साल ), कल के चांद आज के सपने ( नयी राहें ) हे आईने मुलासाठी म्हटलेलं गाणं. त्यातील आईमधील वात्सल्याची भावना थेट श्रोत्यांच्या काळजात उतरते. याच चित्रपटात लतादीदी आणि हेमंत कुमार यांचं ' ये झुमते नजारे ' हे सुंदर युगलगीत आहे. ' घुंघट ' या चित्रपटात तीन अप्रतिम गाणी दीदींच्या आवाजात आहेत. मेरी छम छम बाजे पायलिया, लागे ना मोरा जिया, मेरी पत राखो गिरिधारी ही ती गाणी.
' नजराना ' चित्रपटात दीदींनी गायलेलं ' मेले हैं चिरागोंके, रंगीन दिवाली हैं ..' या दीदींच्या आवाजातील चैतन्यमय आणि आनंददायी गाण्यानं चित्रपट सुरु होतो. मनावर जणू सुरांची सुखद बरसात होते. ' नयी रोशनी ' या चित्रपटात दीदींच्या आवाजात एक सुंदर गाणं आहे. अशोक कुमार यांच्या मित्राची मुलगी माला सिन्हा त्यांच्यासोबत राहत असते. अशोक कुमार उदास असताना तिच्या तोंडी घातलेले हे सुंदर सांत्वनपर गाणं जीवनातील तत्वज्ञान सहज सांगून जाते. या गाण्याची वेगळी चाल, साधे सोपे शब्द आपल्याला एका वेगळ्याच मूडमध्ये घेऊन जातात. ते गाणं आहे ' सपने हैं सपने, कब हुए अपने,,'
' दो कलियां ' चित्रपटातील दोन सुंदर गाण्यांचा उल्लेख करून थांबू या. यातील पहिले अप्रतिम गाणं आहे ' बच्चे मन के सच्चे..' या गाण्यातील बाल कलाकार नितु सिंग आहे. हे गीत म्हणताना ती फार गोड आणि निरागस दिसते. लहान मुलीच्या आवाजातील निरागसता, कोमलता दीदींच्या स्वरांनी मूर्तिमंत उभी केली आहे. गाण्याची चाल तर अप्रतिमच ! शब्द किती सुंदर...
इन्सान जब तक बच्चा हैं, तब तक समझो सच्चा हैं
जो जो उसकी उमर बढे, मन पर झूठ का मैल चढे ...
आणि दुसरं अप्रतिम गीत आहे. लतादीदी आणि मो रफींच्या आवाजातील ' तुम्हारी नजर क्यों खफा हो गयी ...' हे गीतही प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
रवींचं कोणतंही गाणं ऐकताना कधीच शिळं वाटत नाही. अर्थपूर्ण शब्दरचना, सुरेख चाल, मोजक्याच भारतीय वाद्यांचा सुरेख मेळ यामुळे रवी यांची गाणी नेहमी ताजी आणि रसरशीत वाटतात . मल्याळी भाषा अपरिचित असताना देखील अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना त्याने संगीत दिले आणि ते चित्रपट सुपरहिट ठरले. तिथे ' बॉंबे रवी ' या नावाने ते ओळखले जात. आपलं नाणं खणखणीत असेल तर ते कुठेही वाजतंच हे रवींनी सिद्ध केलं. उंचपुरा बांधा, मृदू आवाजातील बोलणं, दुसऱ्यांचा नेहमी सन्मान करणं हे रवींचे विशेष गुण होते. ' पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो उस जैसा..' असा त्यांचा स्वभाव. पण पाण्याप्रमाणे सर्व रंगात मिसळून जाताना देखील आपलं वेगळेपण त्यांनी जपले. चित्रपट जगतात राहूनही आपला साधेपणा त्यांनी जपला. ७ मार्च २०१२ रोजी हा गुणी संगीतकार आपल्यातून निघून गेला. पण त्यांची सदाबहार गाणी सदैव आपली सोबत करतील.
पुन्हा भेटू या पुढच्या भागात. ' आज की मुलाकात बस इतनी ...'
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०२/०६/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा. )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा