उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग चोवीस
सफल होगी तेरी आराधना ... ( एस डी बर्मन आणि लता मंगेशकर )
एस डी बर्मन यांचा जन्म १९०६ मध्ये सध्या बांगला देशात असलेल्या कोमिल्ला या गावी झाला. ते राजघराण्याशी संबंधीत होते. पण राजघराण्याची शान, दिमाख आदी गोष्टींचा त्याग करून त्यांनी आपले जीवनध्येय म्हणून संगीताची निवड केली. त्यांचा हा निर्णय त्यांच्या घराण्यातील सदस्यांना पसंत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याच्याशी असलेले आपले संबंध तोडले आणि आपले जीवन संगीतासाठी समर्पित केले. पुढे एक वेळ अशी आली की हाच राजपरिवार त्यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला एवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्यांनी मिळवली. कलकत्ता विश्वविद्यालयातून बी ए ची पदवी घेतल्यानंतर ते १९३३ पासून ते १९७५ पर्यंत बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. शास्त्रीय संगीताचे त्यांनी रीतसर शिक्षण घेतले. चित्रपटसंगीत हे शास्त्रीय संगीत प्रदर्शन करण्याची किंवा त्यातील कौशल्य दाखवण्याची योग्य जागा नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते.
आपल्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी घर सोडले आणि ते आसाम, त्रिपुरा, मणिपूरच्या जंगलांमधून भटकत राहिले. या दरम्यान या जंगलातील विविध प्रजातींच्या लोकांमध्ये राहून त्यांनी लोकगीतातले बारकावे आत्मसात केले. त्यामुळे त्यांच्या संगीतात शास्त्रीय संगीत, लोकगीते, भारतीय आणि पाश्चात्य संगीत यांचा सुरेख मेळ आढळतो. १९३० च्या दशकात कलकत्याला त्यांनी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. कलकत्त्यात त्यांना संगीतकार म्हणून ' सचिन कारता ', मुंबईत ' बर्मनदा ', बांगला देश आणि पश्चिम बंगाल मध्ये 'शोचिन देव बोर्मन ' तर सिनेजगतात ' एस डी बर्मन ' अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात. १९४४ मध्ये ते मुंबईत आले आणि आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर लवकरच एक प्रथितयश संगीतकार म्हणून त्यांनी नाव मिळवले.
त्यांचे संगीत इतके प्रभावी होते की त्यामुळे दाखवल्या जाणाऱ्या दृश्याची परिणामकारकता अनेक पटींनी वाढे. ' प्यासा ' चित्रपटातलं ' ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है..." हे गुरुदत्तवर चित्रित असंच एक गीत. श्वेतधवल स्वरूपातील. ना वाद्यांचा ठणठणाट, ना भव्यदिव्य सेट्स, कमालीचा साधेपणा सगळ्या वातावरणात भरून राहिला आहे. मो. रफींच्या हळुवार सुरांनी गाण्याची सुरुवात होते. पण सचिनदांच्या संगीतामुळे ते इतकं प्रभावी झालं आहे की थेट रसिकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतं. ' नौ दो ग्यारह 'मधलं किशोरकुमार यांनी गायलेलं ' हम हैं राही प्यार के हम से कुछ न बोलिये...' किती साधे सोपे बोल. पण आजही हे गाणं एव्हरग्रीन आहे. सचिनदांच्या संगीतावर असलेला लोकगीतांचा प्रभाव, गाण्याची शास्त्रीय संगीतावर आधारित बैठक आणि त्यांची त्यांची अप्रतिम गोडवा असलेली संगीत रचना या गोष्टींचा स्पर्श होऊन गाणं अक्षरशः जिवंत होत असे.
सचिनदा आपली गाणी निवडून त्यांना संगीत देत. गीताचे शब्द पाहून त्यांना संगीतसाज चढवला जात असे अशा काळात सचिनदांनी संगीताच्या बोलावर गाणी लिहिली जाण्याची प्रथा सुरु केली. त्यांच्या संगीताचे वैशिष्ट्य हे की एका गाण्यातील त्यांनी दिलेले संगीत किंवा रचना दुसऱ्या कोणत्याही गाण्यात रिपीट होत नसे. लतादीदींनी सचिनदांबरोबर १८२ गाणी गायली आहेत. १९५३-५४ मध्ये लतादीदींनी त्यांच्या संगीतनिर्देशनात ' मिस इंडिया ' या चित्रपटातलं ' ओ मेरे सजना आ जा ' हे गीत गायलं. गाणं तर ध्वनिमुद्रित झालं होतं पण सगळ्यांना असं वाटत होतं की हे गाणं खूप सॉफ्ट झालं आहे. सचिनदांनी मग ते गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पुन्हा दीदींना बोलावलं. त्यावेळी दीदींकडे इतर गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाची रांगच लागलेली होती. तेव्हा ' मी आता लगेच येऊ शकणार नाही, मला दोन तीन दिवसांची मुदत द्या ' असा निरोप दीदींनी त्यांना पाठवला. त्यांनी तशी मुदत दिली सुद्धा.
पण काही लोकांनी सचिनदांना दीदींबद्दल नको ते सांगितले आणि आता त्या तुमच्यासाठी गाणार नाहीत असं सांगितलं. परस्परांबद्दल असे गैरसमज झाल्याने खरोखरच काही काळ या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यांच्या या दुराव्याच्या काळात काही नियतकालिकांनी त्यात आणखी भर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातला एक किस्सा असा. बर्मनदा असं म्हणाले की मीच लताला गाणं शिकवलंय असं काही नियतकालिकात म्हटलं होतं. ' जर असं असेल तर मग बर्मनदा दुसरी लता का नाही निर्माण करत ? ' असंही दीदींचं म्हणणं म्हणून त्यांनी छापलं होतं. पण या दोन्ही कलाकारांची महानता अशी होती की त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे तडजोडीचे, संवादाचे दरवाजे नेहमीच खुले राहिले. दरम्यानच्या काळात सचिनदांनी आशा भोसले, गीता दत्त, किशोरकुमार या कलाकारांना घेऊन काही अप्रतिम गाण्यांची निर्मिती केली. सचिनदांनी आपली सर्वोत्कृष्ट गाणी आशा भोसलेंना दिली की लता दीदींना यावर चित्रपट रसिकांचा नेहमीच वाद होतो. पण लता दीदी असो की आशाताई, दोघांचीही गाणी पाहिली असता, त्यात डावं उजवं करणं कठीण आहे हे जाणवतं. जे खरे रसिक असतात ते असल्या वादात पडण्यापेक्षा गाण्यांचा आनंद घेण्यात धन्यता मानतात.
विजय आनंद यांनी दीदींजवळ येऊन आपल्या चित्रपटासाठी त्यांनी गाणं गावं अशी विनंती केली. तेव्हा हा दुरावा दूर होण्यास सुरुवात झाली. दीदींनी मग ' हम दोनो ' या चित्रपटासाठी ' अल्ला तेरो नाम.. ' हे गीत गायलं. त्यावेळी या गाण्याचे संगीतकार जयदेव हे सचिनदांचे सहायक होते. त्यानंतर बिमलदांच्या ' बंदिनी ' चित्रपटासाठी दीदींनी काही गाणी म्हटली. त्यात ' मोरा गोरा अंग लै ले..' , ' जोगी जबसे तू आया ..' या सारखी अप्रतिम गाणी आहेत. पुढे मग बर्मनदांचा मुलगा राहुल ( आर डी / पंचम ) हा आपल्या पहिल्या चित्रपटासाठी दीदींनी गावे म्हणून त्यांच्याकडे आला. बर्मनदांच्या मनात दीदींबद्दल नेहमीच जिव्हाळा होता. दिदींनाही आपल्या दोघातला दुरावा संपावा असे मनापासून वाटत होते. त्यानंतर एकदा बर्मनदांचा फोन दीदींना आला. त्यांनी दीदींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. त्याप्रमाणे दीदी गेल्या. बर्मनदा गप्पांच्या ओघात म्हणाले, ' लोता, तुम हमारे लिये क्यूँ नही गाता ? ' दीदी म्हणाल्या, ' ऐसा तो कुछ नही.' बर्मनदा म्हणाले, ' नही हैं ना ? तो भूल जाओ सब कुछ. हम भी भूल गया हैं . अब तुम मेरे लिये गायेगा ना ? ' दीदींनी तात्काळ हो म्हटले आणि अशा तऱ्हेने हा दुरावा संपुष्टात आला.
हा दुरावा जर संपुष्टात आला नसता तर चित्रपट रसिक कित्येक अप्रतिम गाण्यांना मुकले असते. तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, आराधना, शर्मिली, तेरे मेरे सपने, अभिमान, चुपके चुपके...' या चित्रपटातील गाण्यांची निर्मिती झालीच नसती. सचिनदांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात ' आराधना ' या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. सचिनदांचं १९७५ मध्ये मुंबईत निधन झालं. त्यावेळी ते ६९ वर्षांचे होते. पण चित्रपट सृष्टी त्यांचं संगीतातील योगदान कधीही विसरणार नाही.
लतादीदी आणि बर्मनदा यांच्या सगळ्या गाण्यांचा उल्लेख करण्याचा मोह होतो इतकी ती सगळी अप्रतिम आहेत. जणू प्रत्येक गाणं म्हणजे मोठ्या मेहनतीनं घडवलेला बावनकशी सोन्याचा दागिना ! काही मोजक्या गाण्यांचा उल्लेख करून थांबतो. यात काही युगलगीतंही आहेत.
कोरा कागज था .. ( आराधना )
- अब के सजन सावन में ( चुपके चुपके )
- तेरी बिंदिया रे ( अभिमान )
- आज फिर जीने की .. ( गाईड )
- आसमा के नीचे.. ( ज्वेल थीफ )
- मैंने कहा फुलों से.. ( मिली )
- बागोमे बहार हैं ( आराधना )
- तेरे मेरे मिलन की .. ( अभिमान )
- चुपके चुपके चल री .. ( चुपके चुपके )
- गाता रहे मेरा दिल.. ( गाईड )
- रंगीला रे ( प्रेमपुजारी )
- अब तो हैं तुमसे ( अभिमान )
- लिखा हैं 'तेरी आँखोंमे ( तीन देवीयां )
- खिलते हैं गुल यहाँ ( शर्मिली )
- पिया तोसे नैना लागे रे ( गाईड )
- गाता रहे मेरा दिल ( गाईड )
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०९/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा