मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग तेवीस

  उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग तेवीस 

आद्य संगीतकार हुस्नलाल भगतराम आणि लतादीदी 

संगीतकार हुस्नलाल भगतराम ही संगीतकारांची आद्य जोडी.  त्यांच्यापासूनच हिंदी चित्रपट सृष्टीत संगीतकारांनी जोडीने संगीत देण्याची परंपरा सुरु झाली म्हणून त्यांना आद्य संगीतकार म्हटले जाते. हे दोघेही सख्खे भाऊ. भगतराम त्यांच्यातले मोठे. दोघेही भाऊ संगीताचे पक्के प्रेमी. त्यांच्या घरातच ही परंपरा. त्यांचा मोठा भाऊ अमरनाथ तर त्याकाळी लाहोरमधला प्रसिद्ध संगीतकार. या दोघांचा जन्म पंजाबमध्ये झाला. हुस्नलाल व्हायोलिन उत्तम वाजवत तर भगतराम हार्मोनियम. या दोघांनी पं दिलीप चंद्र वेदी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. आपल्या मोठ्या भावाकडून म्हणजे अमरनाथ यांच्याकडूनही त्यांनी संगीतातले बारकावे आत्मसात केले. याशिवाय संगीतकार श्यामसुंदर यांच्याकडे देखील शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. श्यामसुंदर हे आपल्या संगीतात मटक्याच्या ठेक्याचा वापर करीत. त्यांचं हे वैशिष्ट्य दोघा भावांना खूप आवडायचं. पुढे त्याचा वापर त्यांनी आपल्या संगीतात केला. लोकसंगीताचीही त्यांना उत्तम जाण होती. त्यांच्या संगीतावर पंजाबी लोकसंगीताचा प्रभाव दिसून येतो. मुंबईला येण्यापूर्वी हुस्नलाल यांचे व्हायोलिन वादनाचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम लाहोर, अमृतसर, दिल्ली इ ठिकाणी झाले होते. तेथील मैफली त्यांनी गाजवल्या होत्या. 

आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या सांगण्यावरून १९४३ मध्ये हुस्नलाल भगतराम मुंबईच्या चित्रपटसृष्टीत आपले नशीब अजमावण्यासाठी दाखल झाले. प्रभात थिएटरच्या ' चाँद ' या चित्रपटाला संगीत देण्याची जबाबदारी पहिल्यांदा त्यांच्यावर आली. ' दो दिलोंको ये दुनिया मिलने ही नही देती  ..' हे त्यांचं या चित्रपटातलं गाणं अतिशय लोकप्रिय झालं. पुढे त्यांनी प्रभातच्याच ' हम एक हैं ' या चित्रपटाला संगीत दिलं. या चित्रपटाने चित्रपटसृष्टीला तीन नवीन कलाकार दिले. गुरुदासपूर/लाहोरचा देव आनंद, पेशावरचा रहमान आणि मंगलोरचा गुरुदत्त. त्यांना मग एकामागून एक चित्रपट मिळतच गेले. पुढे त्यांनी ' मिर्झा साहिब ' या चित्रपटाला संगीत दिलं. या चित्रपटातील ' आ जा तुझे अफसाना जुदाई का सुनाये ' आणि ' हाथ सीने पे जो रख दो ' ही गाणी आजही आवडीने ऐकली जातात. या जोडीने अनेक गायकांना पुढे येण्याची संधी दिली. त्यात सुरैय्या, गीतादत्त, मुकेश,  मो. रफी, तलत मेहमूद , आशा भोसले, सुमन कल्याणपूर यासारख्या गुणी गायकांचा समावेश आहे. सुरैय्या ही अभिनेत्री आणि गायिकाही होती. या जोडीने सुरैय्याकडून नऊ चित्रपटात एकूण साठ गाणी गाऊन घेतली. आजच्या पिढीतील लोकांना सुरैय्याचे नाव आणि तिची गाणी फारशी ठाऊक नाहीत. पण त्या काळात चित्रपट रसिकांच्या ओठांवर तिची गाणी होती.  वो पास रहे या दूर रहे...( बडी बहन ), इसका क्या मतलब हैं  (सनम ), बेकरार हैं कोई.. ( शमा परवाना ) या सारखी सुरैय्याची गाणी अविस्मरणीय आहेत. 

मो रफी या अत्यंत गुणी आणि प्रतिभावान गायकाला पुढे आणण्याचे श्रेय निश्चितच हुस्नलाल भगतराम या जोडीला दिले पाहिजे. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर आलेल्या ' बापू की अमर कहानी ' या चित्रपटातील ' सुनो सुनो ऐ दुनियावालों ...' या गीताने मो. रफींना लोकप्रियता मिळवून दिली. याच सुमारास आलेल्या ' प्यार की जीत ' या चित्रपटातील त्यांची गाणी प्रचंड गाजली. या चित्रपटातील मो. रफींनी गायलेलं ' एक दिल के टुकडे हजार हुए ...' हे गाणं तर लोकांच्या ओठांवर असायचं. प्रेमभंग झालेल्या तरुण तरुणींच्या भावना व्यक्त करणारं हे त्यांचं गीत प्रचंड गाजलं. 

लतादीदी आणि हुस्नलाल भगतराम यांचा संबंध साधारणपणे १९४९ पासून आला. तो १९५७ पर्यंत कायम होता. या आठ वर्षांच्या कालावधीत या संगीतकार जोडीने लतादीदींकडून साधारणपणे २५ पेक्षा अधिक चित्रपटातून शंभराहून अधिक गाणी गाऊन घेतली. लतादीदींच्या गाण्यातली शास्त्रीय संगीताची बैठक, नितळ पारदर्शी आवाज असलेला गोड गळा या दोघांनाही खूप आवडला. लतादीदींच्या गायकीला पैलू पडणारे जे संगीतकार आहेत, त्यात हुस्नलाल भगतराम यांचंही नाव आदराने आपल्याला घ्यावं लागेल. हुस्नलाल हे एखादी रचना सुरुवातीला दीदींना आपल्या व्हायोलिन किंवा हार्मोनियमवर वाजवून दाखवत असत. पुढे तीच रचना फक्त एकदा ऐकल्यानंतर अधिक सुंदर होऊन दीदींच्या गळ्यातून बाहेर पडत असे. १९४९ मध्ये आलेल्या ' बडी बहन ' या चित्रपटातील लतादीदींनी प्रेमलातासोबत गायीलेलं ' चूप चूप खडे हो...' या गाण्यानं तर लोकप्रियतेचा कळस गाठला.  आताच्या भाषेत सांगायचं तर हे गाणं ब्लॉकबस्टर ठरलं. तशी तर बडी बहन या चित्रपटात आठ गीतं होती. ती आठही गाणी गाजली. पण ' चूप चूप खडे हो...' ची जादू वेगळीच होती. या गाण्यातील सुरुवातीचे हार्मोनियमचे सूर तर आपल्याला ठेका धरायला लावतात. या गीताची लोकप्रियता एवढी होती की  १९७५-७६ मध्ये राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदबुवा आफळे यांनी त्यांच्या कीर्तनात या गीताची प्रशंसा करून त्याच्या चालीवर एक भक्तिगीतही सादर केले होते.  

दीदींच्या कोवळया आवाजातील ' दर्द ' हुस्नलाल भगतराम यांनी बाहेर आणून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवला. ते दोघेही दीदींच्या गायकीने भारावलेले होतेच. दीदींच्या या गाण्यातील दर्दभरे आलाप रसिकांना भावविभोर करतात. त्यातील काही गाणी अशी सांगता येतील. जो दिल में ( बडी बहन  ), जिगर के टुकडे किये ( सरताज ), मोहब्बत में हंसी, जुदाई की खबर ( आँसू  ), लूट गयी ( जलतरंग ), दिल ही तो हैं  ( आधी रात ), ठहर ओ जानेवाले ( बिरह की रात ), दर्द -ए - जुदाई ( छोटी भाभी ). आंसू चित्रपटातील ' आँखो का तारा प्राणो से प्यारा ' या गाण्यात हुस्नलाल भगतराम या जोडीने वाजवलेली सतार आणि व्हायोलिन यांचं संगीत तर अप्रतिमच.  गाण्यांची ही यादी खूप मोठी होऊ शकते पण लेखाची मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला  कुठे तरी थांबावे लागते. 

दीदींची आनंदी, खेळकर मूड असणारी गाणी पण भरपूर आहेत. ही गाणी आपल्याला एक वेगळा आनंद प्रदान करतात. ही गाणी साध्या चालीची असली तरी त्यात कमालीचा गोडवा आहे.  यातील काही लोकप्रिय गाणी अशी आहेत. तेरी अंखिया ( सावन भादो ),  काहे धीरे ( राखी ), वो आए बहारें ( अफसाना ), तेरी गली में ( फर्माईश ) या सगळ्यात राजा हरिश्चंद्र या चित्रपटातील ' गोरी गोरी चांदनी ' हे गाणं तर अप्रतिमच ! साधी सोपी चाल आणि मधुर संगीत. दीदींचा आवाज तर जणू मखमली मुलायम... ! त्यातील गोडवा ऐकूनच अनुभवावा. 

हुस्नलाल भगतराम या जोडीने लतादीदी आणि मो. रफी यांच्याकडून गाऊन घेतलेली युगलगीते तर केवळ अप्रतिम अशीच आहेत. जरा तुमने देखा ( जलतरंग ), छोटासा फसाना हैं ( बीरहा की रात ), पास आके हुए ( मीनाबाजार ), हमे दुनिया को दिल ( आधी रात  ), दिल देके दिल लिया ( स्टेज ), तू चंदा मैं चाँदनी ( राजा हरिश्चंद्र ), दिन प्यार के आणि सून मेरे साजना ही ' आंसू ' चित्रपटातील गीते त्यांच्या अजरामर युगलगीतांपैकी काही. सुप्रसिद्ध संगीतकार खैय्याम हे सुरुवातीला हुस्नलाल भगतराम यांच्याकडे सहायक म्हणून काम करत होते. ' सून साजना ' हे पहाडी धून वर आधारित असलेलं गाणं खैय्याम यांचंही अतिशय आवडतं होतं.  

अनेक चित्रपटांना सुमधुर संगीत देणाऱ्या आणि अनेक गायकांना पुढे आणणाऱ्या या गुणी हुस्नलाल भगतराम यांचा १९६० चा नंतरचा काळ मात्र अतिशय विपन्नावस्थेत गेला. काही धूर्त, स्वार्थी आणि कपटी लोकांनी त्यांना हेतुपुरस्सर डावललं. त्यांनीच संगीत दिलेल्या ' आदिल-ए-जहांगीर ' या चित्रपटात लतादीदी आणि तलत मेहमूद यांनी गायलेलं एक सुंदर गाणं आहे. ' ऐ मेरी जिंदगी तुझे ढुंढू कहाँ ...' असाच प्रश्न त्यांनाही आपल्या जीवनाला विचारावासा वाटला असेल. 

( क्रमशः पुढील भाग रविवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 
०७/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा ) 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...