मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदघन : लता मंगेशकर - भाग बावीस

  उगवतीचे रंग 

भारतरत्नावली 

आनंदघन : लता मंगेशकर - भाग बावीस 

सलिलदा : अवीट गोडीची गाणी देणारा संगीतकार 

१९७८-७९ चा काळ होता. मी पुणे विद्यापीठात ( आताचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ )शिकायला होतो. आमचे क्लासेस संपले की आम्ही जयकर ग्रंथालयात अभ्यासासाठी जात असू. जयकर ग्रंथालयासमोरचा रस्ता ओलांडला की काही अंतरावर निसर्गरम्य अशा झाडीत लपलेले एक कँटीन होते. तिथे आम्ही अधूनमधून चहा किंवा नाष्टा घेण्यासाठी जात असू. त्या कॅंटीनमध्ये जुन्या गाण्यांची रेकॉर्ड लावलेली असे. मी गेल्यावर बहुतेक वेळा मला ' माया ' चित्रपटातलं ' तस्वीर तेरी दिल में जिस दिन से उतारी हैं ' हे गाणं ऐकायला मिळे. या गाण्यात अशी काही जादू होती की अभ्यासाने, वाचनाने आलेला सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जात असे. त्या कॅंटीनमध्ये सगळी तरुणाईच गोळा व्हायची. प्रत्येकाचेच वय कोणाची ना कोणाची ' तस्वीर तेरे दिल में ...' घेऊन फिरण्याचं. त्यामुळे अशी गाणी ऐकण्यात एक वेगळीच गोडी आणि खुमारी असायची. या गाण्यात भव्य सेट्स नाहीत, अभिनय करणाऱ्यांच्या अंगावर झकपक कपडे नाहीत. आहेत ते चेहऱ्यावरचे सुंदर, नैसर्गिक हावभाव आणि लता मंगेशकर आणि रफीसाहेबांचा मनावर गारुड करणारा आवाज आणि सलिलदांचं कर्णमधुर संगीत. पुढे कधी या गाण्यावर, या गायक आणि संगीतकारांवर आपण लिहू असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. तसं झालं आणि आज मी या गाण्याबद्दल लिहितो आहे. 

मागील भागात संगीतकार अनिल विश्वास यांच्या लतादीदींबरोबरच्या गाण्यांच्या आपण आढावा घेतला. अनिल विश्वास हे बंगाली संगीतकार होते, तसेच आजच्या भागात ज्यांच्या संगीताबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ते सलील चौधरी अर्थात सलिलदा हे देखील बंगालचेच. बंगालच्या मातीने क्रांतिकारक, महापुरुष आणि अनेक महान कलाकारांना जन्म दिला. या सगळ्यांचे आपल्या देशासाठी मोठे योगदान आहे. 

सलिलदांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२३ मध्ये प. बंगालमधील सोनारपूर मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे कल होता. बासरी हे त्यांचे अतिशय आवडते वाद्य होते. त्याबरोबरच ते व्हायोलिन, पियानो आदी वाद्यही वाजवायला शिकले. विविध प्रांतातील लोककला आणि लोकसंगीत हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय. ते मिळून तेथून शिकण्यासाठी ते आपल्या घरातून महिनोंमहिने गायब होत असत. अशा वेळी वेगवेगळ्या खेड्यात ते जाऊन राहत असत. तेथील लोकगीते, संगीत इ चा सखोल अभ्यास करत. त्यात त्यांना तहान, भूक, झोप  इ चे सुद्धा भान राहत नसे. कुठल्याही गोष्टीचे वेड हे असे असते. ते भारतातील विविध प्रांतात फिरले. आसाम, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, तामिळ, तेलगू इ विविध प्रांत आणि भाषांतील लोकसंगीताचे सखोल ज्ञान त्यांनी प्राप्त केले होते. या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या संगीतात उमटलेले आपल्याला दिसते. संगीताला खरोखरच भाषा नसते. बंगाली आणि हिंदीबरोबरच मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड, गुजराती, आसामी इ विविध भाषातील अनेक चित्रपटांना सलिलदांनी संगीत दिलं आहे. 

मुंबईत येण्यापूर्वी ते कोलकत्यात स्थायिक होते. अनिल विश्वास यांच्याप्रमाणेच सलिलदा हे अष्टपैलू कलाकार होते. ते संगीतकार तर होतेच पण त्याबरोबरच गीतकार, लेखक आणि उत्तम समीक्षक देखील होते. त्यांच्या संगीतावर बंगाली संगीतासोबतच पंजाबी संगीत तसेच पाश्चात्य सिम्फनी आणि हार्मनी यांचाही प्रभाव पडलेला होता. सलिलदांनी बंगालमध्ये लिहिलेली गाणी बंगालमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे ती लतादीदींनी गायली आहेत. लतादीदी या सलिलदांच्या आवडत्या गायिका. बंगाली गीतांच्या चालींवर हिंदी शब्द बसवून ' ओ सजना, बरखा बहार आई...' इतना न तू मुझसे प्यार बढा, तस्वीर 'तेरी दिलमे.., जारे उड जा रे पंछी यासारखी लोकप्रिय गाणी सलिलदांनी केली. लतादीदींबरोबर १२८ गाणी सलिलदांनी केली. 

सलिलदा हे प्रयोगशील संगीतकार होते. त्यांच्या संगीतात सुरांचे माधुर्य तर असायचेच पण त्यासोबतच शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आदींचा सुरेख संगम असायचा. त्यांच्या रचना गाण्यासाठी अत्यंत कठीण असत. लतादीदी, किशोरकुमार, मो. रफी, मुकेश ,मान्ना डे यांच्यासारखे  प्रतिभावान गायक या संगीताला न्याय देऊ शकत. प्रसिद्ध सतारवादक रविशंकरजी देखील सलिलदांच्या रचना या अत्यंत जटिल असतात असे म्हणत. ' अन्नदाता ' या चित्रपटातलं एक गाणं ' गुजर जाए दिन दिन...' हे अत्यंत कठीण गाणं होतं. हे गाणं किशोरकुमार गाणार होते पण सलिलदांना ते या गाण्याला न्याय देऊ शकतील असे वाटत नव्हते. पण किशोरकुमारांनी फक्त एकदाच त्याची चाल ऐकल्यानंतर स्टुडिओत ज्या प्रकारे हे गाणे गाऊन दाखवले ते पाहून सलिलदा आश्चर्यचकित झाले. आपल्याला ते गीत  यु ट्यूबवर पाहता येईल. 

असाच एक ' हाफ टिकट ' या चित्रपटातील गाण्याचा मजेशीर किस्सा आहे. ' आके सीधी लगी दिल पे कटरीया ' हे गाणं ध्वनिमुद्रित करायचं होतं. या चित्रपटात किशोरकुमार हे स्त्री वेशात अभिनय करत होते. ते आणि प्राण या जोडीवर हे गाणं चित्रित होणार होतं. हे गाणं लतादीदी आणि किशोरकुमार या दोघांच्या आवाजात रेकॉर्ड करायचं ठरलं होतं. ध्वनिमुद्रणाच्या वेळी लतादीदी वेळेवर स्टुडिओत पोहोचू शकल्या नाहीत. तेव्हा वेळ असल्याने किशोरकुमार त्यांच्या आवाजातील गाणं देखील तशीच नक्कल करून गुणगुणायला लागले. हे सलिलदांनी ऐकलं. किशोरकुमार यांनी हे गीत ( दीदींच्या आवाजातील ) देखील आपल्याला म्हणू द्यावं अशी सलिलदांना गळ घातली. तसे सलिलदा कोणाचे ऐकणारे नव्हते पण किशोरकुमार यांनी त्यांना यासाठी राजी केलं आणि ते गाणं मग मेल आणि फिमेल अशा दोन्ही आवाजात किशोरकुमार यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं. त्यांचं गाणं ऐकून सगळेच चाट पडले. आजही हे गाणं किशोरकुमार यांच्या चाहत्यांचं आवडतं आहे. 

लतादीदींबरोबर सलिलदांचं संगीत खुलत असे. लतादीदी आणि सलिलदा ही जोडी असली की गाणं हिट होणारच हे जणू ठरलेलं होतं. १९५० ते १९७० च्या दोन दशकात या जोडीने अनेक सुपरहिट गाणी दिली. ' परख ' चित्रपटातील ' ओ सजना, बरखा बहार आई...' हे मूळ बंगाली गीताच्या चालीवर रचलेलं सलिलदांचं गीत अतिशय लोकप्रिय झालं. हे मूळ बंगाली गीत  ( ना जेओ ना.. ) सलिलदांचं होतं. ती रचना सुरुवातीला कोणालाच आवडली नव्हती. सलिलदांनी हे गीत आधी दीदींना ऐकवलं होतं आणि दीदींना ते आवडलं. पण स्वतः सलिलदा देखील या गाण्याबाबत समाधानी नव्हते. परंतु दीदींच्या आग्रहाखातर त्यांनी हे गीत लिहिलं. आश्चर्य म्हणजे ध्वनिमुद्रणाच्या केवळ पंधरा मिनिट आधी त्यांनी या गीताचे अंतरे लिहिले, चाल पूर्ण केली, ऑर्केस्ट्राला सरगम लिहून दिली आणि एक अजरामर असं अवीट गोडीचं गीत जन्माला आलं. या गाण्यात केवळ दोनच कडवी आहेत. परंतु त्याचं वैशिष्ट्य असं की दोन्ही कडव्यांची चाल वेगळी आहे. पहिलं कडवं थोड्याशा उंच स्वरात तर दुसरं कडवं किंचित खालच्या पट्टीत आहे. 

या गाण्याची चाल सलिलदांना कशी सुचली हे देखील मनोरंजक आहे. पावसात गाडी चालवत असताना गाडीच्या वायपर्सचा जो आवाज होत होता त्यावरून त्यांना ही चाल सुचली असं म्हटलं जातं. या गाण्यात पं जयराम आचार्य यांनी सतारीचे मधुर स्वर छेडले आहेत. हे गाणं दीदींच्या आवाजात ऐकताना खरोखरंच पावसाच्या सरी सुरांच्या रूपाने आपल्या अंगावर कोसळत आहेत आणि खरोखरच ' बरखा बहार आई ' असं वाटतं. अशी असते प्रतिभावंतांच्या संगीतातील, कलेतील जादू ! ' जागो मोहन प्यारे ' या चित्रपटातील ' जागो, मोहन प्यारे...' हे गीत सलिलदांनी भैरवी रागात दीदींसाठी रचलं. दीदींच्या कोमल, नितळ, निर्मळ स्वरांनी या गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली आहे. 

' अन्नदाता ' या १९७४ मध्ये आलेल्या चित्रपटात दीदींचे एक अप्रतिम गाणं आहे. योगेश यांनी ते लिहिलं आहे. गीताचे बोल अत्यंत अप्रतिम आणि अर्थपूर्ण आहेत ! 

रातों के साये घने, जब बोझ दिल पर बने 
ना तो जले बाती, ना हो कोई साथी 
फिर भी ना डर, अगर बुझे दिए, 
सहर तो हैं तेरे लिए. 

कितीही अडचणी समोर उभ्या ठाकल्या तरी न घाबरता विश्वास ठेवून पुढे चालत राहा. कारण या रात्रीच्या अंधकारानंतर तुझ्यासमोर एक लखलखती, तेजस्वी पहाट ( सहर ) उभी आहे. अवघड वाट व्यक्त करणारी या गाण्यातील तीन कडवी आणि या अवघड वेळी स्वतःच स्वतःला शक्ती देणारा, आत्मविश्वास देणारा दीदींचा आवाज आपल्याला आश्वस्त करतो. आज सगळ्या जगावर कोरोनाचं भीषण सावट असताना अशी गाणी नक्कीच आपल्याला बळ देतात. या गाण्यातील शेवटच्या कडव्याआधी असणारा छोटासा कोरस आणि दीदींचं गुणगुणणं या गोष्टी गाण्याला एक वेगळंच परिमाण देतात. सलिलदांची अप्रतिम संगीत रचना आणि गीताच्या बोलातील  व्याकुळता, कणखरपणा, आश्वासकता हे सगळं रसिकांच्या थेट हृदयापर्यंत दीदींचा आवाज पोहोचवतो.  केवळ ऐकत राहावं असंहे गाणं. आपल्यातली मरगळ घालवून उत्साहानं काठोकाठ भरणारं ...!

सर्वच गाण्यांचा उल्लेख करणं शक्य नाही तरीही सलिलदा आणि दीदींची काही गाजलेली गाणी नमुन्यादाखल देत आहे. आ जा रे मै तो कबसे खडी इस पार ( मधुमती ), सावन की रातों में ऐसा भी होता हैं ( प्रेम पत्र ), परबत काटे, सागर पाटे महल बनायें हमने ( डॉ बीघा जमीन ), आ आरे मितवा (आनंद महल ), मिला हैं किसी का झुमका ( परख  ), जिया जाये ना ( आनंद ), हलके हलके चलो सांवरे ( तांगेवाली ), जब उजियारा छाये ( जागते रहो  ), रजनीगंधा फुल तुम्हारे ( रजनीगंधा ), तस्वीर 'तेरी दिल मे ( माया ), दिल तडप तडप कह रहा हैं  ( मधुमती ) 

आपल्याला आश्चर्य वाटेल पण सलिलदांनी काही मराठी गाण्यांना सुद्धा संगीत दिलं आहे. ही गाणी लतादीदींनीच म्हटली आहेत. ' सुनबाई ' या १९६२ मध्ये आलेल्या एकमेव मराठी चित्रपटाला सलिलदांनी संगीत दिलं होतं. त्यातील तीन गाणी लतादीदींच्या आवाजात तर एक गाणं आशा भोसलेंच्या आवाजात आहे. ही गाणी ऐकायला फार गोड वाटतात.  प्रीत फुले माझी सोनेरी, तुझा सहवास प्रिया, प्रीतीविना सुकूनी जाई ही ती गाणी. रसिक ही गाणी यु ट्यूबवर ऐकू शकतात. 

( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी ) 
©️ विश्वास  देशपांडे,चाळीसगाव 
०५/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )





















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...