प्रसिद्ध गीतकार
आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या सर्वात जास्त गाण्यांची संख्या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत आहे. त्यांनी एकूण २५० चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. या साऱ्यातून हिंदी चित्रपट संगीताचा एक मोठा इतिहासच घडत गेला. या सर्व वाटचालीत दीदींच्या अमृतमय स्वरांची साथ त्यांना लाभली. इंडियन क्लासिकल, वेस्टर्न म्युझिक, फोक, डिस्को असे सारे प्रकार या जोडीने हाताळले. सावन का महीना (मिलन),
दिल विल प्यार व्यार (शागीर्द), कैसे रहू चूप (इंतकाम), जो मैं चली
(जल बिन मछली), एक प्यार का
नगमा है (शोर, मुकेश साथ), चाबी खो जाय (बॉबी),
डफलीवाले (सरगम), तेरे मेरे बीच में (एक दुजे के
लिये), यशोदा का नंदलाला (संजोग),
मैं तेरी दुश्मन (नगीना) अशी दीदींचीअनेक अवीट गोडीची गाणी त्यांच्याबरोबर आहेत. लतादीदींनी या संगीतकार जोडीसाठी सर्वात जास्त म्हणजे सुमारे सातशेच्या वर गाणी गायली आहेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांनी कोणताही चित्रपट किंवा गाणं कधीही नाकारलं नाही. त्यांनी जसे उत्तम दर्जाचे चित्रपट केले, तसे सुमार दर्जाच्या चित्रपटांनाही संगीत दिलं. काही रसिकांचं म्हणणं आहे की बॉबी चित्रपटानंतर त्यांच्या संगीताचा दर्जा पूर्वीसारखा राहिला नाही. पण क्लासेस आणि मासेस अशी दोन्ही प्रकारच्या रसिकांना भावतील अशी गाणी त्यांनी दिली. लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत आणि प्रेमगीतांपासून विरहगीतांपर्यंत अफाट रेंज असलेली शेकडो विविधरंगी गाणी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं वैशिष्ट्य.
सती सावित्री (१९६४), लुटेरा (१९६५), इंतकाम (१९६८), शराफत (१९७०), अभिनेत्री (१९७१), मेरा गांव मेरा देश (१९७१), जल बिन मछली,
राजा जानी (१९०२), बॉबी (१९७३), सत्यम शिवम सुंदरम, एक दुजे के
लिए....अशा अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत देऊन रसिकांना अजरामर गाणी दिली. प्यारेलालजी म्हणतात की लता मंगेशकर या आवाजाला पेलवणार
नाही अशी चालच नाही, उलट त्यांची क्षमता,त्यांच्या आवाजाची रेंज एवढी विलक्षण आहे की ती रेंज
पाहून आमच्यासारख्या संगीतकारांनी अनेक प्रयोग केले. एरवी जी गाणी जन्माला
आलीच नसती अशी शेकडो गाणी केवळ लता मंगेशकरांमुळे जन्माला आली आहेत. संगीत बदलत गेलं, लोकांची रुची बदलत गेली, परंतु अनेक वर्षे गाण्यांमध्ये लताजींचा स्वर मात्र कायम राहिला. लता मंगेशकर, मो. रफी, किशोरकुमार, मुकेश यासारख्या गायकांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीताचं सोनं केलं. प्यारेलालजींनी व्हायोलिन वादनाचे धडे सुरुवातीच्या काळात अँथनी गोन्साल्विस यांच्याकडून घेतले होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून ' अमर अकबर अँथनी ' चित्रपटातलं ' माय नेम इज अँथनी गोन्साल्विस ' हे गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं. आज प्यारेलालजी ८० वर्षांचे झाले आहेत. पण त्यांची तब्येत उत्तम आहे. या वादक, संगीतकार, सिम्फनी अरेंजर, संगीत संयोजक आदी अनेक गुणांनी मंडित हे असलेलं व्यक्तिमत्व साधे, मनमोकळे आणि मितभाषी आहे.
त्यांची काही लोकप्रिय गाणी पुढे देत आहे.
हसता हुवा नूरानी चेहरा ( पारसमणी ), सुनो सजना ( आये दिन बहार के ), उडके पवन के ( शागीर्द ), सावन का महिना ( मिलन ), बिंदिया चमकेगी ( दो रास्ते ), आ जाने जा ( इंतकाम ), मन क्यूँ बहका ( उत्सव ), अखियों को रहने दे ( बॉबी ), इक प्यार का नगमा हैं ( शोर ), अच्छा तो हम चलते हैं ( आन मिलो सजना ), सोला बरस की बाली उमर ( एक दुजे के लिये ), सत्यम शिवम सुंदरम ( सत्यम शिवम सुंदरम ), ढल गया दिन ( हमजोली ), शिशा हो या दिल हो ( आशा ), हाय हाय ये मजबुरी ( रोटी कपडा और मकान ), कोयल बोली दुनिया डोली ( सरगम ), हम बने तुम बने ( एक दुजे के लिये ), दिल विल प्यार ( शागीर्द ), ना जा कहीं अब न जा ( मेरे हमदम मेरे दोस्त ), भोर भये पनघट पे ( सत्यम शिवम सुंदरम ), झिलमिल सितारों का आंगन होगा ( जीवन मृत्यू )
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१६/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा