उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग पंचवीस
दीदींचा मदनभैया अर्थात संगीतकार मदन मोहन
लहानपणी रेडिओवरची गाणी ऐकणं म्हणजे संगीताची मेजवानीच असायची. रेडिओ सिलोन, ऑल इंडिया रेडिओ, विविध भारती या चॅनेल्स वर गाण्यांचे एकापेक्षा एक बहारदार असे कार्यक्रम असायचे. ' ये ऑल इंडिया रेडिओ की उर्दू सर्व्हिस हैं ...' अशा भारदस्त आवाजांनी कार्यक्रम सुरु व्हायचा. ' आइये, अब सुनते हैं लता मंगेशकर का गाया हुआ गीत. फिल्म का नाम है अनपढ, गीत के बोल लिखे हैं राजा मेहंदी अली खानने और इसकी धून बनायी हैं मदन मोहनने. ' आणि मग गाणं सुरु व्हायचं. धून, फनकार, तर्ज, नगमा इ उर्दू शब्द ऐकून ऐकून कळायला लागले होते. तेव्हापासून मदन मोहन यांचं नाव एक संगीतकार म्हणून कानावर पडत होतं. पण संगीतकार म्हणजे नेमकं काय, तो काय करतो, त्याचं अशा गीतांमध्ये काय योगदान असतं ते आताशा नीट कळायला लागलं आहे.
संगीतकार मदन मोहन यांच्याबरोबर लतादीदींनी त्यांची सर्वोत्कृष्ट गाणी गायली आहेत असं म्हटलं जातं. मदन मोहन यांच्यासोबत गायलेल्या गाण्यांची एकूण संख्या २१० आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ' आपकी नजरोनें समझा प्यार के काबील मुझे..' या अनपढ चित्रपटातल्या गाण्याचा हा किस्सा आहे. ' अनपढ ' चित्रपटातील एका गाण्यासाठी मदन मोहन अनेक महिने रियाज करत होते. चाल लावण्याचा प्रयत्न करत होते. मोहन कुमार हे या चित्रपटाचे निर्माते होते. त्यांना काही केल्या या गीताची चाल पसंत पडेना. शेवटी गीतकार राजा मेहंदी अली खान आणि मदन मोहन यांनी केवळ दहा मिनिटात एक गाणे तयार केले. आणि ते गाणं होतं ' आपकी नजरोनें समझा ...' या गाण्यानं लोकप्रियतेचा कळस गाठला. लतादीदींना या गाण्यासाठी फिल्मफेअर अवार्ड मिळालं. ज्यांच्या व्यक्तिमत्वाला दैवी प्रतिभेचा परिसस्पर्श झाला आहे अशी ही सगळी मंडळी..! जे हातात घेतलं, त्याचं सोनंच केलं. महान संगीतकार नौशाद यांनी मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेल्या या गीताबद्दल म्हटलं होतं, ' ये गीत अगर मुझे मिल जाए तो इस गीत पर मेरा सारा संगीत न्योछावर हैं . ' याचाच अर्थ मदन मोहन यांचं संगीतकार म्हणून असलेलं मोठेपण त्यांनी मान्य केलं होतं.
मदन मोहन हे बॉंबे टॉकीजचे मालक रायबहादूर चुनीलाल कोहली यांचे सुपुत्र. पण फिल्मिस्तान मध्ये असलेल्या या पित्याला आपला पुत्र मात्र या क्षेत्रात यावा असे अजिबात वाटत नव्हते. पण नियतीच्या मनात या त्यांच्या मुलाला सर्वोत्कृष्ट संगीतकार करण्याचे जणू ठरलेलेच होते. सुरुवातीला खुशालचेंडू वाटणारा हा ' बडे बापका बेटा ' नंतर आपण निवडलेल्या मार्गानेच गेला. तो ही ' बडा ' झाला पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर. एक संगीतकार, गझलांचा बादशहा म्हणून त्याने जो लौकिक मिळवला, तो भल्याभल्यानाही अप्राप्य होता. मदन मोहन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोन वर्षे सैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून नोकरी केली. पण मनातली संगीताची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. लष्करातल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते लखनौ आकाशवाणीवर सहायक म्हणून काम करू लागले. या ठिकाणी त्यांचा परिचय बेगम अख्तर, उस्ताद फैयाज खान, उस्ताद अली अकबर खान, तलत महमूद यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांशी आला. मदन मोहन यांनी तसं पाहिलं तर शास्त्रीय संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण आकाशवाणीवरील कार्यक्रमांना ते संगीत देऊ लागले. याच काळात शास्त्रीय संगीतातील राग, बंदिश, गजला इ मधील बारकावे त्यांनी सहज निरीक्षणातून आत्मसात केले. त्यांचा आवाजही चांगला होता. याच काळात त्यांनी आपल्या आपल्या आवाजात काही गजल ध्वनिमुद्रित केल्या.
पुढे त्यांनी आकाशवाणीवरील नोकरीचाही राजीनामा दिला आणि संगीत क्षेत्रात काही स्वतंत्र कार्य करण्याच्या उद्देशाने ते मुंबईला आले. प्रख्यात संगीतकार गुलाम हैदर यांच्या सांगण्यावरून त्यांनी लतादीदींसोबत एक युगलगीतही गायलं. पण दुर्दैवाने या गीताचा चित्रपटात समावेश होऊ शकला नाही. पण त्याच वेळेला लतादीदींच्या आवाजाने ते प्रभावित झाले होते. पुढे त्यांनी संगीत दिलेला ' आँखें ' हा पहिला चित्रपट आला. पण इच्छा असूनही काही कारणांमुळे दीदींना त्यातील गीतं गाता आली नाहीत. पण त्यानंतर मदन मोहन दीदींकडे गेले. त्यांना त्यांनी म्हटलं, ' आपण म्हटलेलं पहिलं गाणं भावाबहिणाच्या नात्याचं होतं, आपण आता यापुढे भाऊ बहीण म्हणूनच राहू या. ' दीदींनी आनंदाने होकार दिला. मदन मोहन दिदींचे प्रिय मदन भैय्या झाले. दोघांनीही आयुष्यभर हे नातं जपलं. चित्रपट सृष्टीच्या मोहमयी, बेगडी दुनियेत असं निखळ, शुद्ध प्रेमाचं नातं जपणाऱ्या व्यक्ती अभावानेच आढळतील. रक्षाबंधनाच्या दिवशी मदन मोहन न चुकता दीदींकडे जात असत.
मदन मोहन हे गजलांचे सर्वश्रेष्ठ कम्पोजर मानले जातात. संगीतविश्वातील महान संगीतकार देखील त्यांचं हे मोठेपण मान्य करतात. त्यातील नौशाद यांचं उदाहरण वर आलेलंच आहे. संगीतकार खैय्याम त्यांच्याबद्दल म्हणतात, ' संगीतातील साऱ्या विविधतांचे त्यांना ज्ञान होते. त्यांच्या संगीत रचना म्हणजे श्रोत्यांसाठी अनमोल खजिनाच ! ' लतादीदी तर त्यांना ' गजलोंका बादशहा ' म्हणत. लतादीदींबरोबर त्यांच्या एकापेक्षा एक सरस अशा गजल आहेत. १९५८ मध्ये आलेल्या ' अदालत ' चित्रपटातील ' यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिये...' या गीताला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ' अनपढ ' मधील ' आपकी नजरोनें समझा ...', ' हैं इसीमे प्यार की आबरू..' या सारख्या गजल कोण विसरू शकेल ? ' मेरा साया ' मधील ' नैनो में बदरा छाये...', तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा..' ही गाणी तर ब्लॉकबस्टर ठरली. १९६७ मध्ये एकदा दीदींना विचारलं गेलं की त्या वर्षी त्यांनी गायिलेली सर्वोत्कृष्ट गाणी कोणती ? त्यांनी ज्या गाण्यांची नावं सांगितली त्यात दोन गाणी फक्त एकाच संगीतकाराची होती. ती दोन गाणी होती, ' लग जा गले के फिर ये हंसी रात ..' आणि ' बैरन नींद न आये..' ही गाणी होती मदन मोहन यांची. अन्य संगीतकारांच प्रत्येकी एखादे दुसरे गाणे होते.
' वो कौन थी ' मधील ' लग जा गले के फिर ये हसीं रात ... ' आणि ' नैना बरसे रिमझिम रिमझिम...' या गाण्यांनी तर लोकप्रियतेचा कळस गाठला. गाण्यांसाठी रसिकांनी चित्रपट डोक्यावर घेतला. दीदींचा गोड कोवळा आवाज एखाद्या प्रेमिकेला साजेसा होता. काही रसिक तर गमतीने असं म्हणू लागले की पडद्यावरील भुतांना सुद्धा लताचाच आवाज चालतो. दुसरा आवाज त्यांना सुटच होत नाही. या अप्रतिम गीतांबद्दल मदन मोहन यांना फिल्मफेअर वा अन्य पुरस्कार मिळणे अपेक्षितच होते. पण दुर्दैवाने तो मिळाला नाही. मदन मोहन हे अत्यंत स्वाभिमानी होते. कोणापुढे पुरस्कारासाठी झुकणे वा लाचार होणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. ते आपल्या पुढील कामात गढून गेले. लतादीदींनी त्यांना फोन केला आणि म्हणाल्या, ' मदन भैय्या, ' वो कौन थी ' ची गाणी इतकी सुंदर झाली की तुम्हाला पुरस्कार मिळेलच असे मला वाटले होते. ' त्यावर मदन मोहन उत्तरले, ' माझ्या दीदीला असं वाटलं ना की मला पुरस्कार मिळायला हवा होता, मग मला मिळाला. अन्य पुरस्काराची जरूर नाही. '
रेडिओ लखनौवर काम करताना मदन मोहन यांचा संबंध बरकत अली आणि बेगम अख्तर यांसारख्या गायकांशी आला होता. त्यांच्या शैलीचा प्रभाव मदन मोहन यांच्यावर होताच. ' मैने रंग दी आज चुनरिया ', ' जिया ले गयो जी मोरा सांवरिया ', नैनों मी बदरा छाये ' या सारख्या गाण्यांवर बरकत अलींचा प्रभाव दिसून येतो. तर ' उनको ये शिकायत हैं ', आज सोचा तो आंसू भर आये ', आपकी नजरोने समझा ', हैं इसीमे प्यार की आबरू ', हम प्यार में जलने वालों को..' या गाण्यांवर बेगम अख्तर यांच्या गायकीचा प्रभाव दिसून येतो असं म्हटलं जातं. त्यांच्या ' भाई भाई ' या चित्रपटातील 'कदर जाने ना...' या गीताने तर बेगम अख्तर इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी दूरध्वनी ( तेव्हा ट्रंककॉल ) करून मदन मोहन यांचे अभिनंदन केले.
लतादीदी आणि मदन मोहन यांचे भावाबहिणीचे नाते मदन मोहन यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिले. वीर झारा हा यश चोपडांचा चित्रपट २००४ मध्ये आला. मदन मोहन यांचे निधन १४ जुलै १९७५ ला झाले. वीर झारा चित्रपटात एकूण अकरा गाणी आहेत. त्यातील आठ गाण्यांना लतादीदींचा आवाज आहे. या गाण्यांना संगीत आहे मदन मोहन यांचे ! आश्चर्य वाटलं ना... ! तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे ? मदन मोहन गेल्यानंतर चक्क तीस वर्षांनी त्यांचं संगीत ? होय, पण हे खरं आहे. मदन मोहन यांनी त्यांना सुचलेल्या शेकडो धून टेपरेकॉर्डवर रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. त्यांचा मुलगा संजीव कोहली याची इच्छा होती की आपल्या वडिलांनी अशा एखाद्या चित्रपटाला संगीत द्यावे की ज्यात सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी हे महान कलाकार असतील. पण मदन मोहन असताना त्याची ही इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही. यश चोपडा जेव्हा नवीन चित्रपट निर्मिती करत आहेत हे त्याला समजले, तेव्हा तो आपल्या पित्याच्या रेकॉर्ड केलेल्या काही धून, रचना घेऊन त्यांच्याकडे गेला. त्यांना त्या ऐकवल्या. त्यांनाही त्या पसंत पडल्या. त्यातील काही रचनांचा वापर त्यांनी या चित्रपटात केला. या चित्रपटातील गाण्यांसाठी मदन मोहन यांना मरणोत्तर फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मदनभैय्याना पुरस्कार मिळावा अशी दिदींची इच्छा होती. ती अशा प्रकारे पूर्ण झाली. या चित्रपटात दीदींच्या आवाजातील गाणी अशी आहेत ' तेरे लिये..', ' दो पल ..', ' तेरे कुर्बान जावा ', तुम पास आ रहे हो..', ' ऐसा देस हैं मेरा..', ' हम तो भाई जैसे है..', ' जाने क्यों ..', ' ये हम आ गये ..'
तसं तर मदन मोहन आणि लतादीदींची सगळीच गीते गाजलेली आहेत. पण काही गीते नमुन्यादाखल या ठिकाणी देऊन थांबतो.
- बैरन नींद न आये.. ( चाचा झिंदाबाद )
- सपने में सजन से दो बातें ( गेट वे ऑफ इंडिया )
- उनको ये शिकायत हैं ( अदालत )
- हम प्यार में जलने वालों को ( जेलर )
- मेरी आँखोंसे कोई नींद .. ( पूजा के फुल )
- आपकी नजरोनें समझा ( अनपढ )
- वो भुली दास्तां ( संजोग )
- जरा सी आहट होती हैं ( हकीकत )
- वो चूप रहे तो.. ( जहाँआरा )
- प्रीतम दरस दिखाओ ( चाचा झिंदाबाद ) मन्ना डे यांच्यासोबत
- तेरी चमकती आँखों के आगे ( छोटे बाबू ) तलत महमूद
- ऐ सनम आज ये कसम खाये ( जहाँआरा ) तलत महमूद
- तेरी आँखो के सिवा ( चिराग ) मो. रफी
- दिल ढुंढता हैं ( मौसम ) भूपेंद्र
- दो घडी वो पास बैठे ( गेट वे ऑफ इंडिया ) मो. रफी
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१२/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा