उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग सव्वीस
स्वरांचा जादूगार : आर डी बर्मन
असं म्हणतात की गवयाचं पोर रडतं ते देखील सुरात ! आर डींच्या बाबतीत त्यांच्या आईवडील आणि नातेवाईकांना हा प्रत्यय आला होता. मुलाचं नाव राहुल होतं पण बेट्याचं रडणं होतं पंचम सुरात ! लहान असताना दादामुनी उर्फ अशोककुमार यांनी पाहिलं की तो सारखा ' पा पा...' म्हणतो आहे. त्यामुळे या राहुलचं नामकरण झालं पंचम. हेच आपले पंचमदा उर्फ प्रख्यात संगीतकार आर डी बर्मन. आर डिंजवळ जन्मजात संगीताची प्रतिभा होती. वडील एस डी बर्मन तर प्रख्यात संगीतकार होतेच, पण हा बापसे बेटा सवाई होता हे त्यानं पुढे सिद्ध केलंच !
एस डी बर्मन जेव्हा कलकत्याहून मुंबईला आले तेव्हा राहुल फक्त पाच वर्षांचा होता. त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी त्याची रवानगी पुन्हा कलकत्याला केली. राहुल शाळेत तर जायचा, पण अभ्यासात त्याचे लक्ष फारसे लागत नव्हते. मित्रांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी भटकणे, सायकल चालवणे, पोहणे या गोष्टीत त्याला गोडी होती. एकदा शाळेतील एका कार्यक्रमात त्याने स्टेजवर माऊथ ऑर्गन इतक्या सफाईदारपणे वाजवून दाखवला की सगळेच चाट झाले. हे जेव्हा एस डींना कळले, तेव्हा त्यांनी त्याला विचारले की तुला नेमकं काय करायचं आहे, अभ्यास की संगीत ? मोठेपणी तू कोण होणार आहेस ? तेव्हा लहानग्या राहुलने जे उत्तर दिले ते त्याच्या आत्मविश्वासाची साक्ष देणारे होते. तो म्हणाला, ' मला संगीतकार व्हायचं आहे आणि मी तुमच्यापेक्षा मोठा संगीतकार होणार. ' राहुलचे हे उद्गार सार्थ ठरले. तो जन्मजात प्रतिभेचं लेणंच घेऊन जन्माला आला होता.
या प्रसंगानंतर एस डींचा राहुलकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी त्याला रीतसर शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी शिकवणीची व्यवस्था केली. ब्रजेन विश्वास यांच्याकडे तबला आणि उस्ताद अली अकबर खान यांच्याकडे त्याने सरोद वादनाचे धडे घेतले. असं म्हणतात की राहुल केवळ नऊ वर्षांचा असताना त्याने ' ऐ मेरी टोपी पलट के.. ' ही धून तयार केली होती. तिचा वापर एस डींनी ' फंटूश ' चित्रपटात केला. त्याच्या लहानपणीच त्याने तयार केलेल्या ' सर जो तेरा टकराये... ' या गीताच्या चालीचा उपयोग एस डींनी गुरुदत्तच्या ' प्यासा ' या चित्रपटात केला. हे गाणं आजही लोकांच्या ओठांवर आहे. आर डी वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच आपल्या वडिलांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. पण त्यांनी आपल्या स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली आणि पुढे स्वतःची संगीतकार म्हणून स्वतंत्र ओळख. भारतीय शास्त्रीय संगीताला पाश्चात्य संगीताची जोड देऊन त्यांनी भारतीय संगीताला एक वेगळी ओळख मिळवून दिली.
आर डींनी हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त बंगाली, तामिळ, तेलगू, मराठी गाण्यांनाही संगीत दिलं. या दरम्यान त्यांनी स्वतःही अनेक गाणी गायली. त्यांचं ' शोले ' तील ' मेहबूबा ' हे गीत कोण विसरू शकेल ? त्यांनी संगीतात अनेक नवीन प्रयोग केले. अनेक नवीन वाद्ये आणली. तर काही आवाजांसाठी अगदी दैनंदिन वापरातील वस्तूंचा देखील वापर केला. त्यांना आगगाडीच्या लयीत, ढगांच्या गगडाटात, पानांच्या सळसळीत संगीताची धून, लय, ताल इ दिसत असे. त्याचा वापर ते आपल्या संगीतात खुबीने करत. संगीतकार म्हणून त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट होता ' छोटे नबाब ' पण ' तिसरी मंजिल ' या चित्रपटाने त्यांना एक यशस्वी संगीतकार म्हणून ओळख मिळवून दिली. या दरम्यान आपल्या वडिलांचे सहाय्यक म्हणून ते काम करीतच राहिले.
१९६९ मध्ये राजेश खन्ना, शर्मिला टागोर यांच्या अभिनयाने नटलेला ' आराधना ' हा चित्रपट आला. या चित्रपटाच्या वेळी त्यांचे वडील आजारी होते. त्यामुळे ' आराधना ' च्या संगीताची जबाबदारी आर डींवर होती. पण त्यांनी ती इतकी सुरेख पार पाडली की या चित्रपटातील सगळी गाणी सुपरहिट झाली. चित्रपटाच्या लोकप्रियतेमध्ये या गाण्यांचा मोठा वाटा होता. पण ' आराधना ' मधील गाण्यांचा गौरव झाला तेव्हा आर डींच्या नावाचा कोणीही उल्लेख केला नाही. आर डींच्या लक्षात आलं की आपण आता स्वतंत्रपणे काम केल्याशिवाय आपली वेगळी ओळख निर्माण होणार नाही. आर डी मग संगीतकार म्हणून स्वतंत्र काम करू लागले. एक वेळ अशी आली की आर डी आणि एस डी हे केवळ पिता पुत्र न राहता एकमेकांचे स्पर्धक बनले. पण आर डींनी लवकरच लोकप्रियतेत आपल्या पित्याला मागे टाकले. पंचमदा हे संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचं नाव बनलं.
१ ऑक्टोबर १९७४ ला एस डी बर्मन यांचा वाढदिवस होता. त्यांना भेटण्यासाठी रात्री आर डी त्यांच्याकडे गेले. त्यावेळी घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना एक आश्चर्याची गोष्ट आढळून आली. ती म्हणजे एस डी, त्यांचे वडील पंचमदा यांनी संगीत दिलेली गाणी ऐकत बसले होते. संकोचाने राहुल बाहेरच थांबले. एस डी ' आपकी कसम ' आणि ' अजनबी ' या चित्रपटातील गाणी ऐकत होते. राहुल मध्ये गेल्यानंतर ते त्यांना म्हणाले, ' माझा मुलगा पंचमदा, हा माझ्यापेक्षा मोठा संगीतकार झाला आहे. मला त्याचा अतिशय अभिमान आहे. असा मुलगा लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे. गुणवत्तेच्या कसोटीवर जर माझा मुलगा माझ्यापेक्षा सरस ठरत असेल तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही. एस डींच पंचमदावर आणि पंचमदांचं आपल्या पित्यावर खूप प्रेम होतं.
किशोरकुमार, लता मंगेशकर, आशा भोसले, मो रफी आदी गायकांकडून आर डींनी गाणी गाऊन घेतली. आर डी, किशोरकुमार आणि आशा भोसले यांचा त्रिवेणी संगम तर चित्रपट रसिकांना दीर्घकाळ आनंद देत राहिला आणि पुढेही देत राहील. आर डींच संगीत, आशा भोसले आणि किशोरकुमारचा आवाज हा एका वेगळ्या स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
आर डीं चे लतादीदींशी फार जिव्हाळ्याचे नाते होते. जरी आशाताईंशी त्यांनी लग्न केले असले तरी अनेक गोष्टींबाबत दीदींचा सल्ला आर डी आवर्जून घेत. त्यांचं मन मोकळं करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे लतादीदी. लतादीदींसोबत त्यांनी जी गाणी केली, त्या गाण्यांमध्ये एक वेगळी गोडी आहे. दीदींच्या आवाजात त्यांचं संगीत खुलतं. आर डींबरोबर त्यांनी गायिलेल्या गाण्यांची संख्या आहे ३३१. प्रत्येकच गाणं सुंदर आहे. प्रत्येक गाण्याचं सौंदर्य वेगळं आहे. दीदींबरोबर हलका फुलका मूड असणारी, गंभीर मूड असणारी सगळ्या प्रकारची त्यांची गाणी आहे. आपकी कसम मधलं ' जय जय शिवशंकर ' ठेका धरायला लावतं तर तुझसे नाराज नही जिंदगी अंतर्मुख करतं. कटी पतंग मधलं ' ना कोई उमंग है.. ' या गाण्यातील भावना रसिकांच्या हृदयापर्यंत भिडल्या. ' बडा नटखट है रे..' हे गीत एक वेगळाच सात्विक आनंद प्रदान करतं. आईची ममता ओथंबून वाहते, काळजाला भिडते. आंधी चित्रपटातील गाणी तर मास्टरपीसच ! तेरे बिना जिंदगी से शिकवा, तुम आ गये हो, इस मोड से जाते हैं अशी गाणी कोण विसरू शकेल ? ' बहारोंके सपने ' मधील ' क्या जानू सजन ' हे गाणं आणि त्याचं सौंदर्य वर्णन करण्यापलीकडचं ! अशी किती आणि कोणती गाणी सांगायची ? १९४२ अ लव्ह स्टोरी हा आर डींनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. १९९४ मध्ये या अफाट प्रतिभा लाभलेल्या संगीतकाराचं हृदयविकाराने निधन झालं. पण जोपर्यंत चित्रपट संगीत आहे, तोपर्यंत आर डी उर्फ पंचमदा रसिकांच्या हृदयावर राज्य करीतच राहतील. त्यांची काही गाणी पुढे देत आहे.
- अपने प्यार के सपने ( बरसात की एक रात )
- तुने ओ रंगीले ( कुदरत )
- कस्मे वादे निभायेंगे ( कस्मे वादे )
- हमे और जिनेकी ( अगर तुम ना होते )
- बंगले के पीछे ( समाधी )
- तेरे लिये पलकोकी चादर ( हरजाई )
- सावन के झुले पडे ( जुर्माना )
- दिल से दिल मिलनेका ( चरित्रहीन )
- चाहे रहो दूर ( दो चोर )
- जिया ना लागे मोरा ( बुड्ढा मिल गया )
- जिने का दिन ( गोमती के किनारे )
( क्रमशः पुढील भाग रविवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१४/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा