उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकवीस
दीदींना स्वतःची ओळख मिळवून देणारा संगीतकार : अनिल विश्वास
भारतीय चित्रपटसृष्टीतील सिनेसंगीतात संगीतकार अनिल विश्वास आणि लतादीदी यांच्या सुरांचे एक अनोखे पर्व आहे. ' अनोखा प्यार ' या चित्रपटापासून सुरु झालेला हा प्रवास दोघांच्या सुमारे १२३ सदाबहार गाण्यांनी पूर्ण झाला.
बंगाल मधील बारिसाल हे अनिल विश्वास यांचे गाव. आता ते बांगला देशात आहे. अनिलदांना संगीताचा आणि गायनाचा वारसा आपल्या मात्यापित्यांकडून मिळाला. सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष हे अनिलदांचे मित्र आणि मेव्हणे सुद्धा होते. अनिलदांची बहीण पारुल ही पन्नालाल घोष यांना दिलेली होती. कलकत्त्यात अनिलदांनी काही काळ आपल्या या बहीण मेव्हण्यांच्या घरी काढला. कलकत्त्यात ' रंगमहल ' थिएटरशी ते निगडित होते. तेथे त्यांनी अभिनेता, पार्श्वगायक आणि सहायक संगीतकार म्हणून अनेक नाटकांमधून कामे केली. ते देशभक्तीपर गीतेही लिहीत असत. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना क्रांतिकारकांशी संबंधित असावेत म्हणून अटकही केली आणि काही काळ त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. अनिलदांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं . ते उत्तम गायक, वादक,नट, संगीतकार आणि कवी देखील होते. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि प्रतिभा लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. एखादी गोष्ट फक्त एकदाच ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात राहत असे. त्यांची आई छान गाणी म्हणत असे. तिच्या आवडीचा प्रभाव अर्थातच त्यांच्यावर होता. एकदा त्यांच्या आईची बंदिशी लिहिलेली वही हरवली. आईला खूप खूप हळहळ वाटली पण आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी आईला पुन्हा त्या सगळ्या बंदिशी लिहून दिल्या. त्यांच्या या असामान्य प्रतिभेमुळे लोक त्यांना ' श्रुतिधर ' म्हणजे एकदाच ऐकलेले लक्षात ठेवणारा म्हणत.
जिथून जे जे काही नवीन शिकायला मिळेल ते ते शिकून घेण्याची त्यांची वृत्ती होती. अनेक संगीतकार आणि गुरूंकडून अनेक गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. पण कोणाचेही शिष्यत्व त्यांनी पत्करले नाही. त्यामुळे अमुक एका घराण्याचे गायक किंवा संगीतकार असा शिक्का त्यांच्यावर बसला नाही. संगीतातल्या सगळ्याच प्रकारांवर त्यांची हुकमत होती. संगीतातले ठुमरी, ख्याल, दादरा, वैष्णव संकीर्तन, रवींद्र संगीत यातील प्रत्येक गोष्ट त्यांना अवगत होती. असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व पुढे आपले नशीब अजमावण्यासाठी मुंबईत आले. त्यांची मुंबईतील सुरुवातीची वर्षे म्हणजे संघर्षाचा काळ होता. या दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं. पण १९४२ मध्ये आलेल्या ' किस्मत ' चित्रपटाने खऱ्या अर्थाने त्यांची किस्मत बदलवून टाकली. किस्मत मधील सगळीच गाणी लोकप्रिय झाली.
अनिलदांचं एका वाक्यात वर्णन करायचं झाल्यास अनिलदा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हती तर एक चालतीबोलती संस्था होती. असं करता येईल. त्यांनी अनेक गायकांना पुढे आणलं, त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला. पुढे अनिलदांच्या संगीत निर्देशनात निरनिराळ्या ७६ गायकांनी गाणी गायली. अनिलदा यांचं हिंदी चित्रपट संगीतात पदार्पण होण्यापूर्वी हिंदी चित्रपट संगीतावर नाट्यसंगीत, भक्तिसंगीत आदींचा पगडा होता. अनिलदांनी ही पारंपरिक चौकट भेदून हिंदी चित्रपटसंगीताला सुद्धा आपली ओळख मिळवून दिली. या अर्थाने ते हिंदी चित्रपट संगीताचे भीष्म पितामह मानले जातात.
अमीरबाई कर्नाटकी, पारुल घोष, मीना कपूर, राजकुमारी, तलत महमूद, मुकेश, लता मंगेशकर आदी गायकांना त्यांनी आपली स्वतःची ओळख मिळवून दिली. त्यांना चित्रपट सृष्टीत स्थिरस्थावर करण्यात मोठा वाटा उचलला. मुकेश यांच्या गाण्यावर त्या काळातले प्रसिद्ध गायक कुंदनलाल सहगल यांचा प्रभाव होता. अनिलदांनी मुकेश यांना सहगलच्या प्रभावापासून मुक्त केलं. तू मुकेश आहेस आणि मुकेशसारखंच गा असं त्यांना समजावून सांगितलं. त्यांनी मुकेश यांना दिलेलं पहिलं गाणं होतं ' दिल जलता हैं तो जलने दे...' या गाण्यानं अफाट लोकप्रियता मिळवली आणि चित्रपटसृष्टीला मुकेश नावाचा गायक मिळाला. अशाच प्रकारची भूमिका अनिलदांनी लतादीदींबाबत बजावली. १९४६/४७ च्या सुमारास गुलाम हैदर यांनी दीदींची ओळख अनिल विश्वास यांच्याशी करून दिली. वयाच्या केवळ १३/१४ व्या वर्षांपासून घराची जबाबदारी पडलेल्या या गुणी गायिकेवर अनिलदांनी मोठ्या भावासारखी माया केली. ते दीदींना ' लतिके ' म्हणून हाक मारत.
त्याकाळी मल्लिका-ए-तरन्नुम म्हणजेच प्रख्यात गायिका नूरजहाँ प्रसिद्धीच्या शिखरावर होती. लतादीदींच्या गायकीवर सुद्धा नूरजहाँचा प्रभाव होता. अनिलदांनी लतादीदींना नूरजहाँच्या प्रभावापासून मुक्त केलं. तू लता आहेस आणि लता सारखीच गा हा सल्ला त्यांनी दीदींना दिला. दीदींना त्यांच्या शुद्ध, सात्विक, नितळ आणि पारदर्शक आवाजाची ओळख पटवून दिली. अनिलदांकडून दीदींनी एक गाण्याच्या संदर्भातील अनेक गोष्टी आत्मसात केल्या. त्यातील एक म्हणजे दोन शब्दांच्या मध्ये श्वास घेताना हलकेच मायक्रोफोनपासून दूर जावं, श्वास घेऊन पुन्हा लगेच परत येऊन गाणं सुरु ठेवावं. ही गोष्ट ऐकायला जेवढी सोपी वाटते तेवढीच करायला कठीण आहे. माईकवर गाताना त्यापासून दूर जाताना शेवटचा स्वर जरासा जोरानं आणि पुन्हा परत येताना पहिला स्वर किंवा शब्द जरा जोर देऊन उच्चारावा हा कानमंत्र अनिलदांनी लतादीदींना दिला. त्याचे त्यांनी कसोशीने पालन केले. अशा प्रकारे गाणं हे दीदींच्या गाण्याचं वैशिष्ट्य बनलं. लतादीदींच्या मुळातच दीर्घ असलेल्या श्वासाला अनिलदांची शिकवण अतिशय पूरक ठरली.
गाण्याच्या सादरीकरणात स्वरांच्या कोमलतेला अतिशय महत्व असतं. गाण्याचा पहिलाच स्वर जर जोरानं माईकवर आदळला तर सुरांचा गोडवा कमी होण्याची शक्यता असते. गाताना सुरुवात कशी करावी आणि प्रत्येक ओळ कशी मालवत न्यावी ( फेड इन ) हेही अनिलदांनी दीदींना शिकवलं. सुरुवात कशा प्रकारे हलकेच करावी आणि गीताच्या अखेरच्या सुरातही त्याची कोमलता आणि माधुर्य कसे टिकवून ठेवावे हा प्रत्येक गायकासाठी आवश्यक असणारा यशाचा गुरुमंत्र अनिलदांनी त्यांना दिला. स्पष्ट शब्दोच्चार, सूर,ताल, लय आदींचे महत्व अनिलदांनी समजावून दिले. ' अनोखा प्यार ' या चित्रपटात अभिनेत्री नर्गिससाठीची गाणी मीना कपूर यांनी म्हटली होती. पण त्यानंतर मात्र आपल्या प्रत्येक चित्रपटातील नायिकेचे गाणे अनिलदांनी फक्त दीदींसाठी राखून ठेवले. दोघांनी हिंदी सिनेसंगीत क्षेत्रात अशी काही बहार आणली की क्या कहने ..... शिकवणारा गुरु जर अनिल विश्वास आणि शिकणारी शिष्या जर लता मंगेशकर असली तर मग जे निर्माण होणार होतं ते केवळ दिव्य स्वर्गीयच असणार होतं .... गजरे, तराना, बेकसूर, जलती निशानी, आरजू, बडी बहू, फरेब, लाडली, नाझ, मेहमान, सौतेला भाई आणि इतर अनेक चित्रपटात या जोडीने जी सुरांची लयलूट केली ती आजदेखील रसिकांना तितकीच आकर्षित करते.
तशी तर वर सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे अनिलदांच्या संगीतनिर्देशनात दीदींनी १२३ गाणी आहेत. त्यातील काही गाण्यांचा नमुन्यादाखल आढावा घेऊ या. मन मे किसी कि प्रीत बसा ले ( आराम ), बदली 'तेरी नजर तो नजारे बदल गये ( बडी बहू ), रूठ के तुम तो चल दिये ( जलती निशानी ), एक दिलका लगाना बाकी था ( अनोखा प्यार ), बरस बरस बदली भी बरस गयी ( गजरे ), जाना ना दिल से दूर ( आरजू ), तुम ही कहो मेरा मन क्यूँ ना रहे उदास ( गर्ल्स स्कुल ) अशी एकापेक्षा एक सरस अशी गाणी लतादीदी आणि अनिलदा या जोडीने चित्रपट रसिकांना दिली.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०२/०५/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा