मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग अकरा

  उगवतीचे रंग

भारतरत्नावली

आनंद घन : लता मंगेशकर - भाग अकरा

सहनशीलतेची परीक्षा...

लतादीदी म्हणजे संयम, शांती आणि अपार सहनशक्ती. त्यांचे हे गुण त्यांच्या अगदी कारकिर्दींच्या आरंभापासून लक्षात येतात. गळ्यामध्ये असलेल्या दैवी सुरांची जोपासना करताना त्यांचे यासारखे त्यांचे गुण म्हणजे सोने पे सुहागा ठरले.

१९४७ चे वर्ष. स्वातंत्र्य नुकतेच पदरात पडले आहे. अजून देश स्थिरस्थावर झाला नाही. नुकतीच फाळणी झालेली. फाळणीच्या जखमा आणि चटके देशानं सोसलेले. माणसाचा माणसावर असलेला विश्वास उडावा असे वातावरण. मंगेशकर कुटुंब तर दीनानाथांच्या पाठीमागे उघडं पडलेलं. जगण्यासाठीचा संघर्ष अटळ. पण तत्वाची, सत्याची कास सोडली नाही. जगण्याची मूल्ये कोणत्याही परिस्थितीत हरवू द्यायची नाहीत हे प्राणापलीकडे जपलेलं ब्रीद. दीनानाथांच्या पहिल्या वर्षश्राद्धाच्या वेळी त्यांच्या पिंडाला कावळा शिवेना, तेव्हा मंगेशकर भावंडांनी शपथ घेतली की आयुष्यात संगीताशिवाय दुसरं काही करणार नाही. आणि आपल्या पित्याला लहानपणी दिलेलं वचन या भावंडांनी आयुष्यभर पाळलं. संगीताशिवाय त्यांनी दुसरं काही केलं नाही. पण जे काही केलं त्यामुळे आपल्या मात्यापित्यांचं नाव उज्वल केलं. भारतीय चित्रपट संगीताला एक वेगळी ओळख आणि उंची प्राप्त करून दिली.

मास्टर दीनानाथांची ज्येष्ठ कन्या परिस्थितीशी झगडते आहे. तिला आपल्या कुटुंबाला तर सावरायचे आहेच पण गायन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळखही निर्माण करायची आहे. त्या काळातही काही माणसांच्या काळजात अपार माया होती. दीनानाथांचा एके काळचा सहकारी पापा बुलबुले या परिस्थितीशी संघर्ष करू पाहणाऱ्या मुलीला काम मिळावं म्हणून मुंबईच्या स्टुडिओत घेऊन गेला आहे. या स्टुडिओत नवीन चित्रपटांच्या गाण्यांची ध्वनिमुद्रण करण्याचं काम सुरु आहे. संगीतकार हरिश्चंद्र बाली आणि त्यांचे साथीदार तिथे उपस्थित आहे. तिथे ही मुलगी गेली आहे. सतरा अठरा वर्षांचं वय. काळीसावळी पण चेहऱ्यानं तरतरीत. अनुभव कमी असला तरी तिच्या आतमध्ये दडला आहे प्रचंड आत्मविश्वास. त्या ठिकाणी तिला गायला सांगितलं जातं . तिचा स्वच्छ, निर्मळ आवाज सगळ्यांनाच भुरळ घालतो.

चित्रपटात जसा एखादा पाहुणा कलाकार असतो, तसाच एक पाहुणा कलाकार त्या वेळी तिथे उपस्थित असतो. तो नंतर चित्रपटात येत नाही पण आपली भूमिका मात्र प्रामाणिकपणे निभावतो. या व्यक्तीचं नाव आहे. पठाण. या पठाणसाहेबांचे आणि मास्टरजी उर्फ गुलाम हैदर यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गुलाम हैदर म्हणजे त्यावेळच्या शास्त्रीय आणि चित्रपट संगीत क्षेत्रातलं आदरणीय नाव. ते म्हणजे संगीतकारांचे संगीतकार. या गुलाम हैदर साहेबांना चित्रपटासाठी एखादी नवीन गायिका हवी असते. तसं त्यांनी पठाणांना सांगून ठेवलं असतं. या पठाणसाहेबानी लतादीदींचं गाणं ऐकलं आणि गुलाम हैदर यांनी सांगितलेलं त्यांना एकदम क्लिक झालं. त्यांनी गुलाम हैदर साहेबांना या नव्या गायिकेबद्दल कळवलं. लतादीदींना काही काळ ज्या मास्टर अमानत अलींनी संगीत शिकवलं त्यांचे आणि गुलाम हैदर यांचेही चांगले संबंध होतेच. त्या अमानत अलींनी सुद्धा दीदींची शिफारस गुलाम हैदर यांच्याकडे केलेलीच होती. झालं. गुलाम हैदर यांच्याकडून दीदींना बोलावणं आलं.

नाना चौक ते गोरेगाव असा लोकलने प्रवास करून दीदी फिल्मिस्तान स्टुडिओत दिलेल्या वेळेत पोहोचल्या आहेत. पांढरा रंग त्यांचा अतिशय आवडता. त्याच पांढऱ्या रंगाची साडी, लांबसडक आणि काळ्याभोर केसांच्या घातलेल्या दोन वेण्या, तरतरीत चेहरा असे व्यक्तिमत्व असलेल्या दीदी तेथे दाखल झाल्या आहेत. स्टुडिओचे दार बंद आहे. आतमध्ये बहुधा गाण्यांचं रेकॉर्डिंग सुरु असावं. सकाळपासून तिथे गेलेल्या दीदी संध्याकाळ झाली तरी तिथे थांबून आहेत. पण गुलाम हैदर कधीही बाहेर येऊ शकतील. गुलाम हैदर आणि दीदी या दोघांमध्ये आता फक्त दाराचाच अडसर आहे. गुलाम अलींचे आतमधले काम आटोपले. दरवाजा उघडला. गुलाम अली बाहेर आले. गुलाम अलींच्या रूपाने जणू भविष्यातील चित्रपट सृष्टीच्या संगीताचा दरवाजा दीदींसाठी उघडला आहे.

गुलाम अलींचं रुबाबदार खानदानी व्यक्तिमत्व आहे. उत्तम पोशाख, बोलका चेहरा, मोठे पाणीदार डोळे आणि उर्दूमिश्रित रसाळ हिंदी बोलणं समोरच्या व्यक्तीवर छाप पाडणारं आहे. ते दीदींना आत बोलवतात. सकाळपासून स्टुडिओत असलेले गुलाम हैदर उर्फ मास्टरजी आता थकल्यामुळे आरामात रेलून बसले आहेत. दीदींना सांगतात, ' गाओ बेटी. ' दीदी गायला सुरुवात करतात. ते गोड सुरेल स्वर मास्टरजीना एवढे प्रभावित करतात की ते ताठ होऊन बसतात. त्यांचं समाधान होत नाही. ' और सुनाओ बेटी...' अशी फर्माईश होते. दीदी गात राहतात. दीदींचा दीर्घ दमसास, निर्मळ आवाज, स्पष्ट उच्चार, सुरेल ताना मास्टरजीना प्रभावित करतात. त्या काळी सुरैया, शमशाद बेगम, नूरजहाँ, राजकुमारी, जोहराबाई अंबालेवाली, अमीरबाई कर्नाटकी या सारख्या एकापेक्षा एक सरस अशा गायिका शास्त्रीय संगीतात आणि हिंदी चित्रपटात प्रख्यात होत्या. त्या मानाने समोर बसलेली ही कोवळी मुलगी वयाने, अनुभवाने कमी होती. पण तिची संगीताची जाण, प्रतिभा बिनतोड होती. गायनात आत्मविश्वास होता. मास्टरजींसारख्या महान संगीतकारासमोर गातानाही ही गायिका मोठ्या आत्मविश्वासाने गात होती. मास्टरजी म्हणजे हिऱ्याची पारख असलेला जवाहिऱ्याच जणू. आपल्या हाती हे अनमोल रत्न आलं आहे हे त्यांनी जाणलं. आता या रत्नाला त्याचं योग्य स्थान मिळवून देणं आणि त्याला पैलू पाडणं हे काम त्यांना करायचं होतं.

मास्तरजीनी त्याच दिवशी दीदींचं एक गाणं रेकॉर्ड केलं. विख्यात दिग्दर्शक आणि निर्माते एस मुखर्जी त्यावेळी ' शहीद ' या चित्रपटाची निर्मिती करीत होते. या चित्रपटात कामिनी कौशल ही अभिनेत्री काम करत होती. गुलाम हैदर यांनी हे रेकॉर्ड केलेलं गाणं एस मुखर्जींना ऐकवलं. पण एस मुखर्जी म्हणाले, ' या मुलीचा आवाज कोवळा आहे, तो चित्रपटातल्या अभिनेत्रीला शोभणारा नाही. ' झाले. गाणे नापसंत झाले. पण मास्टरजीना एस मुखर्जींचा हा अभिप्राय आवडला नाही. ते त्यांना म्हणाले, ' तुम्ही मोठी चूक करताय. मी आजच सांगून ठेवतो की एक दिवस असा येईल की हा आवाज चित्रपट सृष्टीवर राज्य करेल. ' मास्टरजींचे शब्द भविष्यात अक्षरशः खरे ठरले. पुढील काळात अभिनेत्री आपल्या भूमिकेसाठी दीदींच्या गाण्याचीच मागणी करू लागल्या. दीदींची गाणी असली तर चित्रपट चालतो याची जाणीव निर्मात्यांना, दिग्दर्शकांना झाली. दीदींच्या घरासमोर निर्मात्यांच्या रांगा लागल्या. पण हे सगळे एकाएकी झाले नाही. त्यामागे दीदींची मोठी तपश्चर्या होती.

एस मुखर्जींचे उद्गार ऐकून दीदी निराश झाल्या का, खचल्या का ? छे..! एवढ्या किरकोळ घटनेने निराश होण्याकरता ही मुलगी जन्माला आलेली नव्हती. आपल्या मात्यापित्यांचा आशीर्वाद आणि परमेश्वरावर असलेला तिचा विश्वास तिचा आत्मविश्वास कमी होऊ देणार नव्हता. मास्टरजी तिला म्हणाले, ' बेटी, आओ मेरे साथ. ' ते तिला गोरेगाव स्टेशनवर घेऊन गेले. प्लॅटफॉर्मवर शांतता असते. त्यांच्या हातात सिगारेटची केस असते. त्यावर ते ताल धरतात आणि एक तर्ज गाऊन दाखवतात. तिला म्हणतात, ' बेटी, अब गाकर दिखाओ. ' जणू त्यांना तिची पुन्हा परीक्षा घ्यायची असते. ती मुलगी त्यांच्या अपेक्षेपेक्षा सुंदर गाऊन दाखवते. मास्टरजी खूष होतात. तिला आपल्यासोबत पुन्हा स्टुडिओत घेऊन जातात.

स्टुडिओमध्ये खेमचंदजी प्रकाश हे संगीत दिग्दर्शक उपस्थित असतात. खेमबाबू बॉंबे टॉकीजच्या एका चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करीत असतात. पुन्हा दीदींना गायले सांगितले जाते. पण खेमबाबूंना दीदींचा आवाज खूप आवडतो आणि ते त्यांच्या चित्रपटासाठी दीदींच्या आवाजातील गाणं रेकॉर्ड करतात. इथे एक गमतीची गोष्ट घडते. खेमबाबू ज्या चित्रपटाची निर्मिती करत असतात, त्या चित्रपटाची नायिका कामिनी कौशल असते. ज्या शहीद चित्रपटात कामिनी कौशलच्या भूमिकेसाठी दीदींचा आवाज नाकारला जातो, त्याच कामिनी कौशलसाठी आता दीदींचा आवाज वापरला जातो. पुढच्या काळात एक गोष्ट घडते. जे जे रसिक ' शहीद ' चित्रपट पाहतात, त्यांच्यामध्ये आपसात चर्चा होते. ती म्हणजे ' याच चित्रपटासाठी दीदींचा आवाज नाकारला गेला होता बरं का ...! ' म्हणजे रसिकांना शहीद लक्षात राहतो ते दीदींना चित्रपटात गाणं दिलं नाही म्हणून... ! एवढी त्यांच्या आवाजाची जादू असते.

पुढील काळात गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास आणि नौशाद यासारख्या केवळ संगीत क्षेत्रातच नाही तर मनानेही मोठ्या असलेल्या या माणसांनी ' लता ' नावाच्या हिऱ्याला पैलू पाडले. गुलाम हैदर यांनी दीदींना सांगितले की पडद्यावर बोल कोणावर चित्रित होणार आहेत, गाण्याचे बोल, त्यातून व्यक्त होणारा अर्थ इ गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. बीटवर येणाऱ्या बोलांवर ज्यादा जोर द्यावा. केवळ उत्तम संगीताची जाण असून चालत नाही. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे दीदी मीनाकुमारी पासून ते मधुबालापर्यंत आणि पद्मिनी कोल्हापुरे पासून माधुरी दीक्षितपर्यंत सर्व अभिनेत्रींना त्यांच्या अभिनय आणि व्यक्तिमत्वाला साजेसा आवाज देऊ शकल्या. संगीतकार अनिल विश्वास यांनीही दीदींना महत्वाच्या गोष्टी आवाजाबद्दल सांगितल्या. प्रत्येक संगीतकाराकडून त्या शिकत गेल्या. त्यांचं गाणं त्यातूनच फुलत गेलं, खुलत गेलं. रसिकांच्या मनाचा ठाव घेऊ लागलं.

( क्रमशः पुढील भाग रविवारी )

©️विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
०९/०४/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा }
संगीतकार गुलाम हैदर आणि लता मंगेशकर 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...