उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंद घन : लता मंगेशकर - भाग दहा
शिकण्यातून समृद्ध होत गेलेली गायकी...
लता मंगेशकर... ! बस नाम ही काफी है...! पण हे काही जादूने झालं नाही. ज्या देवानं गळ्यात गंधार दिला, ती देवदत्त देणगी जपली, फुलवली आणि खुलवली ती लतादीदींनी. म्हणून तर या नावात काही खास आहे. मिळेल तिथून त्या शिकत गेल्या. मधमाशी जसा फुलाफुलातून मध गोळा करते, तशी गुणग्राहकता दीदींजवळ होती. प्रत्येकाकडून त्या शिकत गेल्या, समृद्ध होत गेल्या. त्यातून त्यांच्या गायकीला परिपूर्णता येत गेली. आज ज्या लतादीदी आपल्याला दिसतात त्या अशा घडल्या आहेत.
किती शिकल्या हो दीदी ? औपचारिक शिक्षणाचं म्हणाल तर काहीच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दीदी केवळ अडीच दिवस शाळेत गेल्या होत्या. लहानपणी त्या सांगलीच्या शाळेत गेल्या. पहिल्याच दिवशी आपल्या गायकीची ओळख त्यांनी शाळेतल्या बाईंना आणि शिक्षकांना करून दिली. हिरा कुठेही गेला तरी चमकणारच...! तसेच झाले. बाईंनी या सुरेल गाणाऱ्या मुलीची ओळख सगळ्यांना करून दिली. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गडबड झाली. घरात मोठी असणारी लता आपल्या छोट्या बहिणीला आपल्यासोबत शाळेत घेऊन गेली. पण बाईंनी सांगितले की इथे या छोट्या मुलीला आणता येणार नाही. छोट्या लताचा स्वाभिमान जागृत होता. चक्क दीनानाथांच्या मुलीला सांगता की शाळेत बहिणीला आणता येणार नाही ! असे असेल तर मग असली शाळाच नको ! दीदी त्यानंतर शाळेत गेल्या नाहीत. हे झाले औपचारिक शिक्षणाचे. पण त्यांचं अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे शाळा कॉलेजात न जाता त्यांनी घेतलं त्याला मर्यादा नाही.
त्यांच्या घरात विठ्ठल नावाचा एक नोकर होता. तो काहीतरी पाचवी सहावी झालेला होता. दीदींनी त्याच्याकडूनच अक्षरओळख करून घेतली. जुजबी वाचायला यायला लागलं. लिहिणं आत्मसात केलं. एकदा वाचन लेखन यायला लागलं म्हटल्यावर एकलव्याच्या भूमिकेतून त्यांनी स्वतःच पुढचे शिक्षण घेतले. मिळतील ती पुस्तके अधाशासारखी वाचली. अनेक प्रख्यात लेखक, कवींची पुस्तके वाचली. त्यांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता अभ्यासली. त्या बहुश्रुत झाल्या. या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या गायनात, वाचनात, लेखनात पडलेले आपल्याला दिसते.
शाळाकॉलेजात गेला म्हणजेच माणूस विद्वान होतो असे कुठे आहे ! शिकण्याची उर्मी असेल तर तुम्ही कुठेही शिकू शकता. सभोवतालचे जग म्हणजे सगळं काही शिकवणारी एक मोठी शाळा आहे. अनेक मासिकापुस्तकातून दीदींचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. अनेक प्रसंगी त्यांची भाषणे झाली आहेत. त्या लिहितात सुंदर, बोलतात सुंदर. बोलण्यात नम्रता, माधुर्य, थोरांचा आदर जागोजागी डोकावतो. त्यांनी आळंदी येथील साहित्य संमेलनात ( १९९६ ) उदघाटक म्हणून केलेले भाषण याची साक्ष देते. केवळ तेच असे नाही तर इतरही अनेक प्रसंगी त्यांनी केलेली भाषणे त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. त्यांची काही भाषणे आणि लेख परचुरे प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ' स्वरसाधना ' या पुस्तकात उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी ती अवश्य अभ्यासावीत. त्यांची भाषणे, त्यांचे लेख त्यांच्या व्यासंगाचा परिचय देतात.
संगीत क्षेत्रातही त्या अशाच मिळेल तेथून शिकत गेल्या. लता मंगेशकर या नावाला वलय प्राप्त होण्यापूर्वीची ती त्यांची साधना आहे, तपश्चर्या आहे. दीदी अनेक गायक, संगीतकारांकडून तर शिकल्याच पण ज्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकायला मिळाले नाही, त्यांच्याकडूनही एकलव्याप्रमाणे विद्या आत्मसात केली. बडे गुलाम अली खान म्हणजे म्हणजे संगीतातले दीदींचे आदर्श. बडे गुलाम अली खान म्हणजे दीदींच्या मते साक्षात संगीत. त्यांच्यात काही उणीवच नव्हती. भारदस्त कसलेला आवाज. शास्त्रीय संगीतातला कोणताही राग असो किंवा ठुमरी, दादरा, ख्याल असो सगळं कसं त्यांच्या कंठातून परिपूर्ण होऊनच बाहेर पडे. त्यांना गुरुस्थानी मानून दीदींनी त्यांच्याकडून अभिजात शास्त्रीय संगीतातले बारकावे केवळ त्यांना ऐकून, पाहून आत्मसात केले.
अशा या गुरूंनी एकदा आपल्या या शिष्येला जवळ बसवून गायला लावले आणि कौतुकही केले. लतादीदी त्यांच्या प्रत्यक्ष शिष्या नसल्या तरी बडे गुलाम अली खान साहेबांचा त्यांच्यावर खूप जीव होता. कोणतीही अपेक्षा नसलेले स्वार्थाच्या पलीकडचे हे नाते या गुरुशिष्यांचे होते. बडे गुलाम अली खान जेव्हा खूप आजारी होते, तेव्हा त्यांनी दीदींना भेटायला बोलावलं. ते त्यावेळी हैदराबादला होते. दीदी त्यांना भेटण्यासाठी मुंबईहून निघाल्या. पण या अनोख्या गुरुशिष्यांची भेट होऊ शकली नाही. अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा हा महान सम्राट हे जग सोडून निघून गेला होता.
संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडूनही दीदी संगीताचे धडे घेत असतानाचा एक प्रसंग आहे. एकदा दीदींचे गाणे रेकॉर्ड करण्यासाठी ते दोघे लोकलने गोरेगावच्या फिल्मिस्तान स्टुडिओत जात होते. एका स्टेशनवर प्रख्यात अभिनेते दिलीपकुमार त्यांच्या डब्यात शिरले. त्यावेळी अनिल विश्वास यांनी दीदींची ओळख दिलीपकुमार यांना करून दिली. दीदींच्या आवाजाची त्यांच्याजवळ मुक्तकंठाने तारीफ केली. दिलीपकुमार यांनी दीदींना आपादमस्तक न्याहाळले. दीदींची गायनातील प्रतिभा, त्यांची क्षमता यांचा त्यांना अंदाज नव्हता. त्यावेळी मराठी गायकांच्या गाण्यात ' दाल चावल की बू आती हैं ' असे उद्गार दिलीपकुमार यांनी काढले. दिलीपकुमार यांच्या बोलण्याचा अर्थ होता की मराठी गायकांना हिंदी, उर्दूचे उच्चारण नीट जमत नाही. त्यांचे हे शब्द दीदींना जिव्हारी लागले. त्यांनी त्याच क्षणी हिंदी आणि उर्दूवर प्रभुत्व मिळवण्याचा निश्चय केला. त्यासाठी एका मौलवीजींची त्यांनी शिकवणी सुरु केली. शायरी, गजला आणि त्यातील हिंदी आणि उर्दू शब्दांचे उच्चार ते दीदींकडून करवून घेत. गजलांचा अर्थ देखील समजावून सांगत असत.
या शिकण्यातून दीदींची गायकी समृद्ध होत गेली आहे. दीदींचे हिंदी आणि उर्दूचे उच्चार प्रमाण मानले जातात एवढी प्रगती त्यांनी केली. हे सगळं दिलीपकुमार यांना दाखवण्यासाठी त्यांनी केलं नाही तर आपल्यामध्ये ज्या उणीवा आहेत, त्या दूर करण्याच्या निश्चयाने त्या शिकल्या. पुढे याच अभिनयाचा बादशहा असलेल्या दिलीपकुमार उर्फ युसुफमियाँ यांच्याशी दीदींचं एवढं जवळचं नातं निर्माण झालं की ते त्यांना बहीण मानायला लागले. आपण एकतरी गीत दीदींबरोबर गावं ही त्यांची इच्छा होती. ती दीदींनी पूर्ण केली. १९५७ मध्ये आलेल्या राम मुसाफिर या चित्रपटात या दोघांनी गायिलेले ' काहे जिया जाय ' हे ते गीत.
दिलीपकुमार सध्या आजारी आहेत. त्यांचं वय ९८ वर्षांचं आहे. स्मृतीभ्रंश वयानुसार झाला आहे. फारसे कोणाला ओळखत नाहीत. काही वर्षांपूर्वी दीदी त्यांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी गेल्या होत्या. दीदी दिलीपकुमार यांच्या बेडजवळ बसल्या. दिलीपकुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायराबानू यांना आपले पती दीदींना ओळखतील याची खात्री नव्हती. त्यांनी त्यांना विचारलं, ' युसूफजी, क्या आप इन्हे पहचानते हैं ? ' त्यावर दिलीपकुमार यांनी मंद स्मित केलं. दीदींचा हात तशाही शक्तिहीन अवस्थेत हाती घेतला आणि त्यांच्या तोंडून ' काहे जिया जाय ... ' या गाण्याचे शब्द बाहेर पडू लागले. दिलीपकुमार यांनी आपल्या जीवनात प्रसिद्धी, ऐश्वर्य सारं सारं उपभोगलं होतं. पण आता त्या सगळ्या गोष्टी भूतकाळाचा एक भाग झाल्या होत्या. दिलीपकुमार यांच्या हृदयात मात्र ' काहे जिया जाय ' च्या रूपाने दीदींची स्मृती जागृत होती. ही दीदींच्या स्वरांची जादू.. !
दीदींची नवनवीन शिकण्याची वृत्ती कधीच कमी झाली नाही. आपल्याला सगळं येतं आहे. आता काही शिकण्याची आवश्यकता नाही अशी त्यांची भूमिका कधीच नव्हती. जसं त्या हिंदी, उर्दू शिकल्या तसंच अविनाशजी व्यास यांच्याकडून तिने गुजरातीही शिकून घेतलं. एकदा हृदयनाथ मंगेशकरांनी अशी कल्पना मांडली की आपण भगवदगीता आणि ज्ञानेश्वरांचे अभंग इंग्रजी निवेदनासहित ध्वनिमुद्रित करू या. हृदयनाथ हे व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. ते संत साहित्याचे उत्तम अभ्यासकही आहेत. सुप्रसिद्ध लेखक आणि संत साहित्याचे जाणकार गो नी दांडेकरांशी त्यांचे घरोब्याचे संबंध. गीता आणि ज्ञानेश्वरांचे अभंग करायचे ठरवल्यावर दीदींनी गो नी दांडेकर उर्फ अप्पांना संस्कृत शिकवण्याची विनंती केली. त्यांनीही ती आनंदाने मान्य केली. त्यासाठी ते खास पुण्याहून मुंबईला यायचे. संस्कृत श्लोक दीदींकडून वाचून घेणे, त्यांचे अर्थ समजावून देणे, संस्कृत शब्दांचे, श्लोकांचे निर्दोष उच्चार दीदींकडून करून घेणे इ गोष्टी त्यांनी आनंदाने आणि दीदींच्या प्रेमाखातर केल्या. दीदी कोणाकडून आणि काय काय शिकल्या याची यादी खूप मोठी होईल. पण ज्या व्यक्तीत जे जे चांगले गुण आहेत, ते ते त्यांनी घेतले. गुरुदत्तांनी चोवीस गुरु केले होते. एकनाथी भागवतात संत एकनाथ महाराज त्याबद्दल सांगताना म्हणतात
जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥
याच न्यायाने दीदी प्रत्येकाकडून शिकत गेल्या.
पुढील भागात दीदींची सहनशक्ती, जिद्द आणि चिकाटी याबद्दल माहिती घेऊ या.
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०७/०४/२०२१
[प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा