उगवतीचे रंग
भारतरत्नावली
आनंद घन : लता मंगेशकर - भाग बारा
गाणं हाच धर्म...
एखादी व्यक्ती आपल्या पदार्पणातच त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील वातावरण कसे बदलून टाकू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे लतादीदी. त्यांनी जेव्हा चित्रपट संगीत क्षेत्रात पदार्पण केले, तेव्हा स्त्री गायिकांसाठीची गाणी स्त्रियांच्या पट्टीत केली जायची. तिला काळी चार किंवा काळी पाच असे म्हटले जाते. ही गाणी खालच्या पट्टीत असल्याने जरी चांगली झाली, तरी प्रभावी होत नसत. ते गाणं जर युगलगीत असेल तर पुरुष गायकाची पंचाईत व्हायची कारण त्यालाही खालच्या पट्टीत गावं लागत असे. संगीतकारांना ही मर्यादा सांभाळूनच गाणी स्वरबद्ध करावी लागत. पण मास्टर हृदयनाथ यांच्याकडून मंगेशकर भावंडाना जो संगीताचा दैवी वारसा मिळाला होता, त्यामुळे ती सगळी भावंडे कोणत्याही पट्टीत सहजपणे गाऊ शकत. दीदींचा स्वर पांढरी दोन म्हणजे पुरुष गायकांसाठी असलेली आवाजाची पट्टी पण स्त्रियांच्या दृष्टीने गायला खूपच कठीण असा आहे. पण दीदींच्या आवाजाचं वैशिष्ट्य हे की त्या कोणत्याही पट्टीत गात असल्या तरी सूर, आवाजाचा पोत बिघडत नाही. दीदी या चित्रपट संगीताच्या क्षेत्रात आल्यापासून चित्रपट संगीताचे रुपरंगच पार पालटले. ' सौतेला भाई ' या १९६२ मध्ये आलेल्या चित्रपटात दीदींनी संगीतकार अनिल विश्वास यांच्या निर्देशनाखाली म्हटलेले ' जा मै तोसे नाही बोलू...' हे गाणं, शंकर जयकिशन यांच्याकडे गायीलेलं ' अजी रुठकर अब .. ' हे गाणं, जंगली चित्रपटातलं ' एहसान तेरा होगा मुझपर... ' किंवा जिस देश में गंगा बहती हैं या चित्रपटातील ' आ अब लौट चले ' यासारखी अनेक गाणी त्याची साक्ष देतात.
गाणं कोणतंही असो, ते जीव ओतून गाणं हे दीदींचं वैशिष्ट्य. त्यातील परिस्थितीशी त्या एकरूप होतात. त्यासाठी त्यांना कितीही कष्ट पडले तरी ते सहन करण्याची त्यांची आनंदाने तयारी असते. ' मुघल-ए-आझम ' हा १९६० साली आलेला एक ऐतिहासिक चित्रपट. या चित्रपटात सौंदर्य सम्राज्ञी मधुबाला आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्याचा आणि अभिनयाचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. त्या चित्रपटातील ' प्यार किया तो डरना क्या ' या गाण्याच्या वेळचा हा किस्सा. त्या काळी ध्वनिमुद्रणाचं तंत्र आजच्या एवढं प्रगत नव्हतं. रंगमहाल स्टुडिओमध्ये शहेनशहा अकबराच्या दरबाराचा सेट उभारला होता. त्या ठिकाणी या गाण्याचं चित्रीकरण व्हायचं होतं.
तेव्हाचे स्टुडिओ साऊंड प्रूफ नसल्यामुळे रेकॉर्डिंग चांगले होण्यासाठी ठिकठिकाणी कांबळी ताणून लावली होती. स्टुडिओला एखाद्या तंबूचे रूप आले होते. दोनच माईकची व्यवस्था होती. एक गायकांसाठी आणि दुसरा वादकांसाठी. या गाण्यात जो कोरस होता तो प्रतिध्वनी स्वरूपात. त्याची खास वेगळी व्यवस्था नसल्यामुळे एक माईक प्रतिध्वनीसाठी बाथरूममध्ये लावला होता. कोरस गाणारे गायक तेथून गात होते. गीताच्या दुसऱ्या अंतरात दीदींच्या आवाजातही प्रतिध्वनी हवा होता. त्यासाठी दीदींना कोण कसरत करावी लागत असे ! पहिला अंतरा गाऊन झाल्यावर दीदींना हळुवारपणे पावलांचा आवाज न करता बाथरूममध्ये जाऊन दुसरा अंतरा गावा लागत होता. अनेक वेळा या गीताचं रिटेक झालं पण दीदींनी न कंटाळता प्रत्येक वेळी गाणं म्हटलं. प्रत्येक वेळी मात्र आवाजात तेच माधुर्य, तीच आवाजाची फेक यात कुठेही तसूभर फरक पडला नाही. याच चित्रपटातील ' मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे..' ही दीदींच्या आवाजातील ठुमरी मधुबालाचा अभिनय आणि दीदींचा मधुर स्वर यामुळे कायमची अमर झाली आहे.
' महल ' चित्रपटातील अत्यंत गाजलेल्या ' आयेगा आनेवाला ' या गीताचाही असाच मनोरंजक किस्सा आहे. या गीताचे संगीतकार होते खेमचंद प्रकाश. त्यांनी दीदींना हे गीत पुन्हा पुन्हा अनेक वेळेला गायला लावलं. या गाण्यात गंमत अशी आहे की नायकाला ( अशोक कुमार ) ला नायिकेचा आत्मा ( मधुबाला ) संदेश घेऊन येतो. मधुबाला रात्रीच्या वेळी हातात मेणबत्ती घेऊन लांबून येते. ती लांबून चालत येत असल्याने आवाजही लांबून येत येत हळू हळू मोठा होत जातो असा परिणाम गाण्यात साधायचा होता. त्या काळात असे करण्याचे प्रगत तंत्र नसल्याने लतादीदींना माइकपासून खूप दूर उभं करण्यात आलं होतं. मायक्रोफोनची तीव्रता वाढवून दीदींना ते लांबूनच गात येण्यास सांगितले गेले. त्या कडव्यात पाच ओळी होत्या. त्या ओळी संपेपर्यंत त्या विशिष्ट वेळेत तेवढे अंतर पार करण्याची कसरत दीदींना करावी लागली. पण त्यांनी गात असताना आवाज, स्वरांची लय बिघडू न देता सहजपणे हे अवघड काम पार पाडले. आज या गोष्टी आपल्याला ऐकायला छान आणि सोप्या वाटतात, पण त्या करणे तेवढेच कठीण होते.
१९५४ मध्ये ' अमर ' हा चित्रपट आला. चित्रपटात दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्यावर ' तेरे सदके बलम, ना करे कोई गम...' हे गाणे चित्रित व्हायचे होते. प्रख्यात संगीतकार नौशाद यांचं संगीत होतं. या गाण्याच्या वेळी दीदींची तब्येत ठीक नव्हती. हे गाणं म्हणताना दीदींना एक मुरकी घ्यायची होती. ती हवी तशी जमत नव्हती. गाण्याची अनेकदा तालीमही झाली होती. प्रत्यक्ष ध्वनिमुद्रणाच्या वेळी ती मुरकी दीदींना जमून जाईल असं नौशाद यांना वाटत होतं पण तीनदा रिटेक करूनही ती मुरकी हवी तशी जमेना. पुढच्या प्रयत्नात ती मुरकी घेताना प्रकृती बरी नसल्याने दीदींची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर त्यांनी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा त्यांचे पहिले वाक्य होते, ' नौशादसाब, मैं वो मुरकी नही ले पायी. ' ही होती दीदींची आपल्या कामावरील निष्ठा आणि समर्पण !
दीदींचा आणखी एक किस्सा नौशाद यांनी सांगितला तो बैजू बावरा या चित्रपटातील ' मोहें भूल गये सावरिया ' या गाण्याच्या वेळचा. दीदी हे गीत गात असताना त्यांनी सुरुवातीचा मुखडा आणि अंतरा अतिशय सुंदर म्हटला. पण गात असताना दीदी अचानक थांबल्या. नौशादसाहेब तेव्हा ऑर्केस्ट्राचं संचलन करत होते. त्यांना सगळे थांबल्याचे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी दीदींकडे वळून पाहिलं. दीदी जवळच्या एका स्टुलावर बसलेल्या होत्या. त्यांचे डोळे भरून आले होते. नौशादसाहेबाना म्हणाल्या, ' तुम्ही गाण्याला जी चाल लावली, ती मला कुठल्या कुठे घेऊन गेली. भावनाविश्वात मी हरवून गेले होते. ' यावर नौशाद म्हणाले, ' ये तो राग भैरव की कमाल हैं और आप की लगन और निष्ठा. '
दीदींवर एकाधिकारशाहीचा आरोप केला जातो. मक्तेदारीचा आरोप केला जातो. पण दीदी केवळ पंधरा वर्षांच्या असतानाची एक घटना आपण पाहू. त्यावेळी मास्टर दीनानाथांचे द्वितीय वर्षश्राद्ध होते. त्यावेळी दीनानाथांची हमीर रागात रचलेली एक रचना दीदींनी गायिली. तेव्हा मास्टर दीनानाथांचे गुरु वझेबुवा तेथे उपस्थित होते. त्यावेळी तीन सप्तकात सहजतेने विहरणारी दीदींची तान ऐकून वझेबुवा इतके भावविभोर झाले की त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, ' ही तान घेताना दुसऱ्या कुठल्याही गायिकेला उभा जन्म काढावा लागला असता. ही मुलगी अशीच गात आणि शिकत राहिली तर ती दुसऱ्या कोणालाही या क्षेत्रात टिकू देणार नाही. ' गायनाचार्य वझेबुवांचे हे उद्गार दीदी केवळ पंधरा वर्षांच्या असतानाचे आहेत. त्यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप होऊ लागला, त्याच्या पंचवीस वर्षे आधी काढलेले.
वझेबुवांचे उद्गार अक्षरशः खरे ठरले. मोठमोठे संगीतकार दीदींनी आपल्याकडे गावे म्हणून तिष्ठत राहू लागले. हे संगीतकार लतादीदी येण्यापूर्वीही संगीत क्षेत्रात होते. पण त्यांच्या उत्तमोत्तम रचना दीदींनी संगीतक्षेत्रात पदार्पण केल्यानंतरच निर्माण झाल्या. ' मोहें पनघट पे नंदलाल ...' या आपल्या रचनेबद्दल नौशाद म्हणतात, ' लता, तू गाते आहेस म्हणून तर मी ही ट्यून बनवली आहे. तुझ्याशिवाय दुसरं कोणी हे गीत गाऊ शकत नाही. '
संगीतकार सलील चौधरी म्हणतात, ' मी इतक्या कठीण चाली बांधतो की त्या तुझ्याशिवाय दुसरं कोणी गाऊच शकत नाही. ' तर प्रख्यात संगीतकार मदन मोहन म्हणतात, ' तू आहेस म्हणून ही गाणी बनवतोय, नाहीतर बनवणारच नाही. ' तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणतात, ' आम्ही तर फक्त एक आणा काम करतो. दीदी त्याला सोळा आणे बनवतात. ' दीदींची आपल्या गाण्याबरोबर असलेली तन्मयता, गाताना त्या विशिष्ट भूमिकेत जाणं दुसऱ्या शब्दात सांगायचं तर परकाया प्रवेश करणं या त्यांच्या गुणांनी त्यांना महान गायिका बनवलं आहे. त्यांची नक्कल करणे कठीण आहे. निर्मळ, नितळ पाण्याची नक्कल करणार तरी कशी ? दीदींचा स्वर म्हणजे परीस आहे. ज्या गाण्याला त्याचा स्पर्श झाला, त्या गाण्याचं सोनं झालं.
काही लोकांना दीदी जिद्दी,हट्टी वाटतात. कोणाला त्या किंचित निष्ठूरही वाटू शकतात. पण त्यामागे त्यांचा हा उद्देश असतो की आपले गाणे केवळ उच्च दर्जाचेच व्हावे. त्याच्याशी यत्किंचितही तडजोड करायची त्यांची तयारी नसते. जे रसिकांना द्यायचं ते शंभर टक्के द्यायचं, जीव ओतून द्यायचं, नाहीतर नाही द्यायचं ही त्यांची भूमिका असते. आपण प्रथितयश गायिका आहोत, आपण कसेही म्हटले तरी धकून जाईल ही भावना त्यांच्या मनाला कधीच शिवत नाही. त्या म्हणतात, ' गाणं माझ्या लेखी रोजच्या पूजेपेक्षा कमी नाही. प्रत्येक गीत गाताना मी त्यात पूर्ण हरवून जाते. असं झालं तरच ती पूजा होती अन्यथा ते गीत फक्त ' गायलं ' जातं.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१०/०४/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा