उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग पंधरा )
हे तो प्रचितीचे बोलणे...
जे आर डी उद्योगपती होते, दानशूर होते, देशभक्त होते. नानाविध देश फिरून तेथील उद्योगजगताचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणून ते जे काही बोलत त्यामागे त्यांचा अनुभव होता, तपश्चर्या होती. समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे
हे तो प्रचितीचे बोलणे ।
आधीं केलें मग सांगितले ।
मानेल तरी पाहिजे घेतलें ।
कोणी येकें ।।
आधीं केलें मग सांगितले ।
मानेल तरी पाहिजे घेतलें ।
कोणी येकें ।।
असे हे अनुभवाचे आणि ज्ञानाचे बोल होते. टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष म्हणून ते सुमारे बावन्न वर्षे या पदावर होते. एक प्रचंड मोठा खाजगी उद्योगसमूह चालविण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. शिवाय भारतात एअर मेल आणि विमानसेवेची सुरुवात त्यांनी केली होती. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना वेळोवेळी विविध ठिकाणी व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाई. जे आर डीं जवळ जरी लाक्षणिक अर्थाने पदवी नव्हती, तरी तिची उणीव त्यांनी आपल्या व्यापक आणि विस्तृत वाचनाने आणि वेळोवेळी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून भरून काढली होती. विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती त्यांची भाषणे उत्सुकतेने ऐकत असत.
एवढा अनुभव पाठीशी असला तरी जे आर डी आपल्या व्याख्यानाची तयारी केल्याशिवाय कधीही व्याख्यानाला उभे राहत नसत. समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे ' अभ्यासोनि प्रकटावे ' अशी त्यांची बोलण्याची पद्धत होती. व्याख्यानाला उभे राहण्यापूर्वी आपले भाषण ते लिहून काढत. त्यांच्या भाषणात देशभक्ती, देशबांधवांविषयीची तळमळ जागोजागी डोकावते. त्यांनी केलेल्या भाषणांचा संग्रह ' कीनोट ' या नावाने प्रसिद्ध आहे. जे आर डीं ना अधिक जाणून घ्यायचे असेल तर जिज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे. वक्तृत्वाचा अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा जे आर डींची भाषणे मार्गदर्शक ठरावीत अशीच आहेत.
जे आर डीं ना १९८१ मध्ये ' डॉक्टर ऑफ लॉज ' ही सन्माननीय पदवी प्रदान केली. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक ठरावे असे आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे सारांश रूपाने आपण पाहणार आहोत.
" मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा दोन गोष्टींमुळे मी व्यथित झालो होतो. पहिले म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशातील बहुतेक जनता दारिद्र्यात जीवन कंठत होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशातील नवउद्योजकांना यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. देशाच्या विकासात त्यांचा सहभाग असेल आणि त्यात माझाही वाटा असेल असे माझे स्वप्न होते. त्याकाळात स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे महात्मा गांधी, पं नेहरू, सरदार पटेल यासारख्या महान नेत्यांशी माझा परिचय होता. त्यांचे कार्य पाहून देशासाठी आपणही स्वातंत्र्ययुद्धात स्वतःला झोकून द्यावे असे मला वाटत होते. पण नंतर तो माझा पिंड नाही हे मला जाणवले. त्या काळापासून आजवर राजकारण इतक्या अधोगतीला गेले आहे, की मी राजकारणात गेलो नाही याची मला अजिबात खंत वाटत नाही.
काही मोजके नेते सोडले तर स्वातंत्र्यानंतर नेमके काय करायचे आहे याचा विचार फारसा कोणी केलेला दिसला नाही. गांधीजी ग्रामीण विकासाच्या योजनांचा पुरस्कार करत होते. पण जगामध्ये होणाऱ्या औद्योगिक क्रांतीच्या वाढत्या रेट्यापुढे या गोष्टी टिकणार नाहीत हे मला जाणवत होते. नेहरूंना साम्यवादी रशियाचा आर्थिक विकासाचा मार्ग अनुसरायचा होता. पण मला मात्र एक मोठा उद्योगसमूह चालवण्याचा अनुभव असल्याने आणि देशोदेशीची उद्योग आणि अर्थव्यवस्था जवळून पाहिल्याने मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारी विकासनीती अपेक्षित होती. इतर उद्योगपतींच्या साहाय्याने मी ' बॉंबे प्लॅन ' बनवण्यात पुढाकार घेतला. पण ही भांडवलशाही योजना म्हणून त्यातील काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले.
सरकारच्या पंचवार्षिक योजनांनी अपेक्षित विकासाचा वेग गाठला नाही. त्या योजना अधिकाधिक यशस्वी कशा होतील याबद्दल मी जेव्हा जेव्हा पंडित नेहरूंशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्यांनी एकतर मौन स्वीकारले किंवा खिडकीबाहेर पाहणे पसंत केले. त्यामानाने सरदार पटेल माझ्या बोलण्याशी सहमत होत असत.
वाढती लोकसंख्या ही समस्या नसून सामर्थ्य आहे असा पं नेहरूंसह काही नेत्यांचा समज असल्याने मी त्याबाबत वारंवार इशारे देऊनही लोकसंख्या वाढ रोखण्याचे उपाय अमलात आणले गेले नाहीत. त्यामुळे आर्थिक विकास होऊनही त्याची फळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
सरकारने लहान उद्योगांऐवजी मोठ्या अवजड उद्योगांवर अवास्तव भर दिला. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊ शकली नाही. पुढील काही वर्षात सरकारी भांडवलशाही अपयशी ठरते आहे, हे कळूनही वीज, कोळसा, वाहतूक हे पायाभूत उद्योग अनुभव नसलेल्या शासकीय यंत्रणेकडे सोपवले गेले. त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीचे गंभीर परिणाम होत गेले. खाजगी उद्योग करू पाहणाऱ्यांवर बरीच बंधने लादण्यात आली. नियंत्रणे आणि परवाने यांच्या जंजाळातून मार्ग काढणे कठीण झाल्याने त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन भ्रष्टाचाराच्या मार्गाचा अवलंब करावा लागला.
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान हे देश बेचिराख झाले. पण त्यांनी प्रत्यक्ष परिणाम शकणारी आर्थिक धोरणे मोठ्या धडाक्याने राबवली आणि आर्थिक प्रगतीचा आणि विकासाचा मोठा पल्ला गाठला. माझ्यासारख्या हजारो लोकांच्या मनात आपल्या देशाची ही वाटचाल पाहून खिन्नता दाटून येते. या देशातील लोकांची संपन्न सुखी जीवनाची स्वप्ने अपूर्ण आहेत. या आव्हानांना, समस्यांना पूर्वीइतक्या तडफेने सामोरे जाणे मला जमणार नाही. पण असे स्वप्न पाहणारे कोट्यवधी तरुण भारतमातेने जन्माला घातले आहेत. ते नक्कीच हे स्वप्न साकार करतील. "
जे आर डींची ही भाषणाची तयारी, देशासाठी वाटणारी कळकळ आपल्याला त्यांच्यातील एक जबाबदार नागरिकाचे दर्शन घडवते. आपल्या माणसांनीही अशीच तयारी करावी असे त्यांना वाटत असे. द रा पेंडसे हे टाटा अँड सन्स मध्ये अर्थतज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून कार्यरत होते. एकदा त्यांना एका आंतरराष्ट्रीय परिषदेत भाषणासाठी आमंत्रित केले गेले होते. हे जेव्हा जे आर डींना ;कळले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पेंडसेंना आपल्या ऑफिसात बोलावून घेतले आणि तुमच्या भाषणाची एक लिखित प्रत मला द्या असे म्हटले. तेव्हा पेंडसेंनी मी भाषण लिहीत नाही. ऐनवेळी बोलू शकतो असे सांगितले. जे आर डी म्हणाले, ' अहो, तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांसमोर बोलणार तेव्हा तयारी करूनच बोला. तुमच्या ज्ञानाबद्दल आणि क्षमतेबद्दल मला शंका नाही. पण आपण कसे बोलतो हे निदान बघा तरी. म्हणजे तुम्हाला वाटले तर त्यात सुधारणा करता येतील. ' असे म्हणून जे आर डींनी त्यांना आपल्याकडील टेपरेकॉर्डर दिला आणि त्यावर आपल्या भाषणाची तयारी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पेंडसेंनी आपल्या भाषणाची तयारी केली. पुढे त्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांचे भाषण झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. पेंडसेंच्या डोळ्यांसमोर जे आर डींचा हसरा चेहरा आला. त्यांनी मनोमन जे आर डींचे आभार मानले.
( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१०/०३/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा