मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सोळा )

  उगवतीचे रंग

विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग सोळा )

' मूर्ती ' घडवणारा शिल्पकार

एखादा मूर्ती घडवणारा शिल्पकार असतो, तो ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवतो. त्या दगडात ती मूर्ती लपलेली असतेच. शिल्पकार फक्त नको असलेला भाग काढून टाकतो आणि सुंदर शिल्प तयार होतं. एखादा जवाहिऱ्या एखाद्या मौल्यवान हिऱ्याला पैलू पडतो. मूळचाच तेजस्वी असलेला हिरा आता अधिक तेजाने लखलखतो. जे आर डी ही अशा प्रकारची व्यक्ती होती. दगडातून मूर्ती घडवणारा शिल्पकार किंवा हिऱ्याला पैलू पाडणारा जवाहिऱ्या. त्यांच्या सहवासात जी जी माणसे आली, ती ती त्यांच्या व्यक्तिमत्वाने अशा तऱ्हेने प्रभावित झाली की त्यांचे आयुष्य बदलून गेले. या भागात अशाच काही व्यक्तींची माहिती आपण घेऊ या.

प्रख्यात लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती या पूर्वाश्रमीच्या सुधा कुलकर्णी. त्या बंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाची ही गोष्ट. कॉलेजच्या नोटीसबोर्डवर एक नोटीस लागलेली होती. पुण्याच्या प्रख्यात टेल्को कंपनीत काही शिकाऊ इंजिनिअर्सची भरती करायची आहे. त्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावा. पुढे त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष दिले होते. सर्वात शेवटी एक टीप दिलेली होती. या पदासाठी स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नयेत. सुधा कुलकर्णी ही कोणत्याही तडजोडी न स्वीकारता अभ्यास करणारी आणि सतत आपली पहिली रँक टिकवून ठेवणारी एक बुद्धिमान तरुणी होती. नोटीसबोर्डावरची ही नोटीस पाहिल्यावर तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.

आजच्या या स्त्री पुरुष समानतेच्या युगात स्त्रियांना ही संधी का नाकारली जावी हे तिला कळू शकले नाही. टेल्को ही टाटांची कंपनी आहे हे तिला माहीत होते. त्या कंपनीचे प्रमुख निश्चितच जे आर डी टाटा असणार असे वाटल्यामुळे तिने सरळ जे आर डीं ना त्या सात्विक संतापात एक पत्र लिहिले. पोलाद, स्टील, केमिकल्स इ क्षेत्रात काम करणारे आणि आपल्या वेगळ्या गुणवत्तेने आणि कार्यपद्धतीने देशविदेशात आपला ठसा उमटवणारे टाटा स्त्रियांना संधी का नाकारतात ? स्त्रियांना संधीच दिली गेली नाही, तर त्या आपली गुणवत्ता कशी सिद्ध करू शकतील ? अशा रीतीने सुधाचा सात्विक संताप त्या पत्रात प्रकट झाला होता. आपल्याला संधी तर मिळणार नाही, पण पत्र तर पाठवून देऊ या असा विचार करून तिने पत्र पोस्टात टाकले आणि ती त्याबद्दल विसरूनही गेली. पण आठ दिवसांनी एक आश्चर्य घडले. तिला चक्क टेल्कोकडून मुलाखतीसाठी बोलावणे आले होते एवढेच नव्हे तर जाण्यायेण्याचे प्रथम वर्गाचे भाडेही देण्यात येणार होते. तिला खूप आनंद झाला. नोकरी मिळेल न मिळेल पण पुणे ट्रीप तर होईल, असा विचार करून ती मुलाखतीसाठी गेली.

जे आर डींच्या गुणग्राहकतेने सुधासारख्या तरुणीमध्ये असलेला स्पार्क हेरला होता. लक्ष घालून इतर उमेदवारांसोबत तिलाही कॉल लेटर पाठवायला लावले होते. ती जेव्हा मुलाखतीसाठी असलेल्या केबिनमध्ये शिरली तेव्हा तिच्याकडे पाहून ' हीच ती जे आर डींना पत्र पाठवणारी मुलगी ' अशी कुजबुज आणि तिच्याकडे चमत्कारिक पद्धतीने पाहणाऱ्या नजरा तिला दिसल्या. आता आपल्याला नोकरी मिळणार नाहीच याची तिला खात्री झाली आणि तिची सगळी भीती कुठल्या कुठे पळाली. न घाबरता तिने मुलाखत दिली. तिची सडेतोड मुलाखत पाहून तिची टेल्कोमध्ये निवड झाली आणि तिच्यामुळे इतर तरुणींसाठी टाटांच्या कंपन्यांचे प्रवेशद्वार उघडले.

पुढे कामानिमित्ताने कधी कधी जे आर डींची तिची भेट होई. तेव्हा या एवढ्या मोठ्या माणसाला आपण असे पत्र लिहिले याची बोच कुठेतरी तिच्या मनामध्ये असे. पण जे आर डी म्हणजे निर्मळ मनाचा माणूस. जणू वाहती गंगा. त्यांच्या मनात काहीच राहत नसे. त्यांच्या हसऱ्या निळ्या डोळ्यात राग, द्वेष कुठेच नसायचा. एकदा मुंबईला बॉंबे हाऊसमध्ये काम करत असताना आपले काम संपल्यानंतर त्या खाली थांबल्या होत्या. त्याच वेळेस जे आर डींचे तिथे आगमन झाले. त्यांनी विचारले की काम संपल्यानंतरही तुम्ही येथे का थांबला आहात ? तेव्हा त्यांनी सांगितले की माझे पती श्री नारायण मूर्ती मला नेण्यासाठी येणार आहेत. त्यांची वाट पाहत मी थांबली आहे. तेव्हा जे आर डी स्वतः नारायण मूर्ती येईपर्यंत त्यांच्याजवळ थांबले. एवढी मोठी व्यक्ती आपल्याबरोबर थांबल्याने सुधा मूर्तींना भरून आले. पुढे नारायण मूर्ती आल्यावर जे आर डींनी त्यांना ' वेळेवर येत जा, आपल्या पत्नीला वाट पाहायला लावू नका ' असा सल्ला दिला.

पुढे नारायण मूर्तींनी स्वतःची कंपनी सुरु करायची ठरवल्यानंतर सुधा मूर्तींनी टेल्को सोडण्याचे ठरवले. तेव्हा त्या जे आर डींना भेटल्या. त्यांना म्हणाल्या, ' माझे पती नवीन कंपनी सुरु करीत आहेत. ती कितपत चालेल हे माहित नाही. पण त्यासाठी मला मात्र ही नोकरी सोडावी लागत आहे. ' त्यावेळी जे आर डींनी त्यांना फार सुंदर उत्तर दिले. त्या उत्तराचे आपणही सर्वांनी मनन करावे असे ते आहे. ते म्हणाले, ' सुरुवातीलाच अशी नकारात्मक भाषा बोलू नका. तुमचे पती नवीन कंपनी सुरु करीत आहेत, तर तुम्हाला तिच्या यशाबद्दल खात्री असली पाहिजे. तुम्हीच जर साशंक असलात तर, पुढची वाटचाल कशी होईल ? दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी नफ्यात आल्यानंतर आपल्या यशात समाजाचाही वाटा असतो हे विसरू नका आणि जे आपल्याला समाजाकडून मिळाले त्याची परतफेड कशी करता येईल, याचाही विचार करा.

सुधा मूर्तीना जे आर डींचे हे शब्द कुठेतरी खोल मनामध्ये स्पर्श करून गेले. त्यांनी आपल्या इन्फोसिसच्या कार्यालयात दोन प्रतिमा लावल्या. एक जमशेटजी टाटांची आणि दुसरी हसऱ्या निळ्या डोळ्यांच्या जे आर डींची. जे आर डींचे वागणे, बोलणे त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले. पुढे सुधा मूर्तीनी जे आर डींना आवडणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांच्या विकासासाठी आणि इतरही अनेक क्षेत्रात खूप मोलाचे काम केले. अशा रीतीने जे आर डीं प्रमाणे त्यांनीही समाजाला त्याचा वाटा परत देण्याचा प्रयत्न केला. जे आर डींमुळे सुधा कुलकर्णींना पुण्यात नोकरी मिळाली. पतीची भेटही पुण्यातच झाली. त्यांच्या कंपनीची वाटचाल जे आर डींच्या सल्ल्याप्रमाणे झाली. अशा रीतीने सुधा कुलकर्णींची ( सुधा )मूर्ती घडवण्यात जे आर डींचा मोठा वाटा आहे.

पुढे त्यांच्या सहवासात मिनू मसानी आले आणि त्यांचे कायमचे मित्र बनून गेले. मिनू मसानी हे अत्यंत कुशाग्र बुद्धी लाभलेले विद्वान आणि विचारवंत. त्यांना जे आर डींनी टाटामध्ये निमंत्रित केले. पुढे काही कारणाने मसानींना राजकारणात जावे लागले, तेव्हा जे आर डींनी त्यांना काम करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून टाटामधील पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. पण पुढे त्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना टाटामध्ये सल्लागार पदावर नेमले. त्यांच्या चरितार्थाची सोय केली. जे आर डीं आणि टाटांवर क्रिएशन ऑफ वेल्थ, बियॉंड द लास्ट ब्लु माऊंटन, कीनॊट, टच ऑफ ग्रेटनेस यासारखी अनेक लोकप्रिय पुस्तके लिहिणारे आर एम लाला हे कॅन्सरने आजारी झाल्याचे जेव्हा जे आर डींना कळले, तेव्हा त्यांनी लालांना उपचारासाठी अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था केली.

जे आर डीं नंतर पुढे टाटा अँड सन्सचे चेअरमन झालेल्या रतन टाटांची ही गोष्ट. अगदी सुरुवातीला ट्रान्झिस्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवणाऱ्या नेल्को कंपनीचे ते प्रमुख होते. पुढे काही कारणाने ही कंपनी तोट्यात गेली. त्या कंपनीच्या संचालक मंडळांनी श्री रतन टाटांवर याचा ठपका ठेवून त्यांना जबाबदार ठरवले. पण जे आर डींच्या अनुभवी नजरेने हे हेरले होते की या कंपनीच्या नुकसानीसाठी आधीच्या काही वर्षांचा गलथानपणा आणि चुका कारणीभूत होत्या. म्हणून त्यांनी सर्व संचालकांना ही गोष्ट समजावून सांगून श्री रतन टाटांना अधिक वेळ द्यायला हवा हे पटवून दिले. त्याचप्रमाणे येणारे युग हे इलेक्ट्रॉनिक्सचे आहे. त्यासाठी येणाऱ्या काळाची पावले ओळखून आपण तयार राहायला हवे असा सल्ला रतन टाटांना दिला. जे आर डींच्या या सल्ल्यामुळे रतन टाटांना प्रोत्साहन मिळाले. पुढे त्यांनी ही नेल्को कंपनी नफ्यात आणून दाखवली.

अशा रीतीने माणसांना समजून देणे, त्यांना प्रसंगी योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्यातील गुणांना वाव मिळेल अशा रीतीने त्यांना तयार करणे आणि त्यांच्याकडून पुढे उत्कृष्ट काम करून घेणे यामध्ये जे आर डींचा हातखंडा होता. त्यांच्या परिसस्पर्शाने माणसे बदलून गेली. हिऱ्याला पैलू पडले. ओबडधोबड दगडातून आपल्याला हवी तशी ' मूर्ती ' घडवणारा हा शिल्पकार होता.

( क्रमशः पुढील भाग रविवारी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१२/०३/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
सुधा मूर्ती आणि जे आर डी 
















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...