उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग चौदा )
दातृत्वाची गंगोत्री...
' शतेषु जायते शूरः सहस्त्रेषुच पंडितः
वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती वा न वा ୲ '
शंभर मुले जन्माला येतात तेंव्हा एक शूर जन्माला येतो. हजारांमध्ये एखादा विद्वान असतो. दहा हजारांमध्ये एखादा [चांगला] फर्डा वक्ता असतो [पण] उदार किंवा दानशूर माणूस जन्माला येतोच असे नाही. तात्पर्य दानशूर व्यक्ती अभावाने आढळतात.
या संस्कृत सुभाषितानुसार दानशूर व्यक्ती दुर्मिळ असतात. पण टाटा कुटुंबीयांमध्ये दातृत्वाचा गुण सुरुवातीपासूनच होता. अगदी जमशेटजी टाटा, त्यांची दोन्ही मुले दोराबजी आणि रतन आणि पुढे टाटा उद्योगसमूहाचे चेअरमन झालेले जे आर डी टाटा या सगळ्यांनीच दातृत्वाची परंपरा जोपासली, नव्हे पुढे नेली. समाजाचे आपण देणे लागतो, समाजाप्रती आपले काही कर्तव्य आहे ही भावना या सर्वांमध्ये प्रबळ होती. जे आर डिंजवळ तर या संस्कृत सुभाषितात सांगितलेले चारही गुण होते. ते अत्यंत साहसी होते, ज्ञानी होते, उत्तम वक्ते होते आणि दानशूरपणा तर रक्तातच होता.
जमशेटजी टाटा आणि स्वामी विवेकानंद या दोघा महापुरुषांची प्रवासादरम्यान दोनदा भेट झाली होती. भारतमातेच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हे दोघांचेही उद्दिष्ट होते. आपल्याला पाश्चात्यांनी केलेली वैज्ञानिक प्रगती आपल्या देशातील लोकांपर्यंत पोहोचवायची आहे या उदात्त हेतून एखादी वैज्ञानिक संशोधन करणारी संस्था स्थापन करावी असे जमशेटजींच्या मनात होते. तसे त्यांनी स्वामी विवेकानंदाना एकदा पत्र लिहून कळवलेही होते. त्यातूनच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही संस्था उभी राहिली. या संस्थेच्या उभारणीसाठी जमशेटजींनी आपल्या स्वतःच्या मिळकतीतून चौदा इमारतींसह विस्तारासाठी भरपूर मोकळी जमीन असलेली जागा दान दिली. पुढे त्यांच्या मुलांनी त्यांचा हा प्रकल्प प्रत्यक्षात कसा उभा राहील यासाठी प्रयत्न केले. पुढे आणखी याच तोडीची टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था टाटा कुटुंबियांच्या दातृत्वातून उभी राहिली.
टाटा उद्योगसमूहाचे जे जे म्हणून चेअरमन झाले, त्या प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक संपत्तीचा ट्रस्ट करून त्यातून लोकोपयोगी कामे केली, गरजूंना मदत केली. समाजोपयोगी अनेक संस्था उभारल्या. खेळांना आणि खेळाडूंना उत्तेजन दिले. जे आर डींनी तर यात अनेक नवीन गोष्टींची भर टाकली. कोणी त्यांच्याकडे एखादा प्रकल्प मदतीला घेऊन आला आणि तो त्यांना आवडला तर त्यासाठी ते हात न आखडता मदत करत असत. त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जाणाऱ्यांना मात्र पूर्ण तयारीनिशी जावे लागत असे. ते असे काही प्रश्न विचारत की कधी कधी समोरच्या व्यक्तींनी त्यांचा विचारही केलेला नसे. त्यातूनच त्या व्यक्तींना आपल्या प्रकल्पातील त्रुटी लक्षात येत. कधी कधी असे आपल्याकडे मदतीसाठी आलेले प्रकल्प जे आर डी आपल्या तज्ज्ञ व्यक्तींकडे विचारार्थ पाठवत. त्यांच्याकडून अहवाल मागून घेत आणि नंतर त्यावर विचार करत. पण अंतिम निर्णय मात्र जे आर डीं चाच असायचा.
आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने जे आर डी संपूर्ण जगभर फिरत असत. त्या ठिकाणी जे काही चांगले आढळेल, ते ते माझ्या देशासाठी अमलात आणता येईल का असा विचार त्यांचा असायचा. त्यात व्यवसाय किंवा फायद्यातोट्याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. खरे म्हणजे देशातील सत्ताधारी धुरिणांजवळ जी दृष्टी असायला हवा, ती जे आर डींकडे होती. एकदा फ्रान्समध्ये गेले असताना तेथे नेपोलियनने सुरु केलेली एक शिक्षणसंस्था त्यांच्या नजरेत आली. या शिक्षणसंस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे तरुण संशोधक किंवा शास्त्रज्ञ होऊनच बाहेर पडत असत. तेथील शासनात यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत असे. अशाच प्रकारची संधी आपल्या देशातील तरुणांना मिळावी असा विचार जे आर डींच्या मनात आला. त्यांनी त्या संस्थेचे प्रमुख डॉ जीन कॅपेल यांना या संदर्भात पाहणी करण्यासाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले.
त्याप्रमाणे डॉ कॅपेल भारतात आले. त्यांनी एकंदर परिस्थितीचा अभ्यास करून भारतात अशी संस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक ते बुद्धिमान तरुण आणि पोषक वातावरण असल्याची ग्वाही दिली. जे आर डींनी अशी संस्था ' नेहरू मेमोरियल ट्रस्ट' तर्फे सुरु व्हावी अशी विनंती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना केली. त्यापूर्वी जे आर डींनी स्वतः नेहरू मेमोरियल ट्रस्टला भरघोस मदत देऊन ट्रस्ट आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल याची व्यवस्था केली होती. पण इंदिरा गांधींनी मात्र अशा प्रकारची संस्था फक्त उच्च दर्जाच्या विद्यार्थ्यांसाठीच उपयोगी पडेल. त्यात गणित आणि विज्ञान यांच्या अभ्यासावर जास्त भर दिला आहे असे कारण देऊन हा प्रस्ताव फेटाळून लावला.
पुढे काही वर्षांनी मात्र जे आर डींच्या पुढाकाराने बंगलोरला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अडव्हान्स स्टडीज ही देशातील बुद्धिमान तरुणांना प्रशिक्षण देणारी संस्था उभी राहिली. केवळ अशा संस्था उभ्या करून वा त्यासाठी आवश्यक तो पैसा पुरवून भागत नसते, तर अशा संस्थेची जबाबदारी सुयोग्य व्यक्तींच्या खांद्यावर असावी लागते. सुदैवाने अशी व्यक्ती त्यांना सुप्रसिद्ध संशोधक डॉ राजा रामण्णा यांच्या रूपाने गवसली. या संस्थेसाठी जे आर डींनी सर दोराबजी ट्रस्टतर्फे पन्नास लक्ष रुपये तर टाटा स्टीलतर्फे एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि संस्थेचा आर्थिक पाया भक्कम केला.
देशामध्ये सुयोग्य सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हायचे असेल तर शिक्षण आणि उद्योगधंद्यांच्या जोडीला विविध कलागुणांचा विकास व्हायला हवा असे जे आर डींचे मत होते. अशा कलागुणांना आणि कलाकारांना उत्तेजन मिळायला हवे ही त्यांची भूमिका होती. डॉ होमी भाभा यांचे बंधू डॉ जमशेद भाभा यांना तरुणांच्या कलाविष्काराला वाव मिळून त्यांच्यामार्फत नवनवीन सृजनशील कलाप्रकारांची निर्मिती व्हावी असे वाटत होते. अशा तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना विविध कलांचे शिक्षण व प्रशिक्षण घेता येईल, अधिक संशोधन करता येईल या दृष्टीने एखादे सांस्कृतिक केंद्र स्थापन करावे असा प्रस्ताव जमशेद भाभा यांनी जे आर डीं पुढे ठेवला. जे आर डींनी या प्रस्तावावर विचार करून दोराबजी ट्रस्टतर्फे त्यांना निधी उपलब्ध करून दिला. ट्रस्टच्या इतर संचालकांना हा ट्रस्टच्या पैशांचा दुरुपयोग आहे असे वाटले पण जे आर डी मात्र आपल्या मतावर ठाम होते.
जे आर डींनी आपल्या पाठिंब्याचा हात डॉ जमशेद भाभा या उत्साही तरुणाच्या पाठीवर ठेवला आणि मुंबईत १९६९ मध्ये ' नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् ' ही प्रसिद्ध संस्था उभी राहिली. भारतीय नृत्य, नाट्य, चित्रपट, साहित्य, संगीत आदींचा वारसा जतन करणे, त्यात भर टाकणे हा या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश होता. त्याला जोडूनच कलाविष्कारासाठी टाटा थिएटरची देखणी सुंदर अशी वास्तू उभी राहिली. आजही कलेच्या प्रांतातील नवनवीन प्रयोगांचे हे आशिया खंडातील एक अग्रगण्य केंद्र आहे. अनेक कलाकारांना आणि त्यांच्या कलाप्रकारांना इथे उत्तेजन मिळते आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या प्रख्यात संस्थेच्या स्थापनेचे श्रेय जे आर डींचेच. डॉ होमी भाभा यांच्यासारख्या परदेशात संशोधन आणि अणुविज्ञानात काम करणाऱ्या शास्त्रज्ञाला ' टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ' च्या रूपाने आपल्या देशात संधी उपलब्ध झाली. त्यांनी या संस्थेत अणुऊर्जेवर प्रचंड संशोधन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण शास्त्रज्ञ या संस्थेत निर्माण झाले. पुढे जेव्हा पंतप्रधान नेहरूंच्या सूचनेवरून ऍटोमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट ही संस्था सुरु झाली. या संस्थेतर्फे अणुभट्ट्या बांधण्याचे काम सुरु झाले तेव्हा त्यासाठी जे आर डींच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेने तरुण बुद्धिमान संशोधक शास्त्रज्ञ पुरवले. पुढे या केंद्रात काम करणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण मिळावे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग संभाव्य लष्करी सुसज्जतेसाठी करता यावा म्हणून एनर्जी ऍटोमिक ट्रेनिंग सेंटर निर्माण करण्यात आले. या केंद्राला डॉ भाभांचे नाव देण्यात आले. हेच ते प्रसिद्ध भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर. पुढे १९६६ मध्ये डॉ भाभांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर प्रसिद्ध संशोधक डॉ एम जी के मेनन यांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली.
कलाकार आणि शास्त्रज्ञ यांच्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील होतकरू खेळाडूंसाठी टाटा उद्योगसमूहाने नेहमीच पुढाकार घेतला. खेळाडूंना उत्तेजन देणे, बक्षीस देणे, कामगारांना वा त्यांच्या मुलांना खेळात विशेष कामगिरी करण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे हे टाटांनी नेहमीच केले आहे. जे आर डींनी चेअरमन झाल्यानंतर लगेचच टाटा स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली. उत्तम खेळाडूंना टाटा समूहामध्ये नोकरीची संधी देऊन त्यांना त्यांच्या क्रीडा प्रकारात अधिकाधिक नैपुण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणे ही प्रथा जे आर डींनी सुरु केली. अक्षरशः शेकडो खेळाडूंनी टाटा समूहात नोकरी करून त्यांच्या दातृत्वाचा फायदा आपल्या क्रीडागुणांच्या विकासासाठी करून घेऊन आपले करिअर घडवले आहे. त्यात रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर यासारखे क्रीडापटू तर मायकेल परेरा, गीत सेठी, प्रेमचंद यासारख्या नामवंत खेळाडूंनी टाटांच्या विविध कंपन्यांत अधिकारी म्हणून सेवा दिली आहे आणि आपले करिअरही घडवले आहे. अजित आगरकर, सौरव गांगुली, लियांडर पेस या खेळाडूंनी टाटा समूहाच्या साहाय्याने आपला उत्कर्ष साधला आहे. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बिलियर्ड्स, शूटिंग, ऍथलेटीक्स वा गिर्यारोहण यापैकी कोणत्याही क्रीडाप्रकारातील खेळाडू टाटांकडून कधी विन्मुख परत गेले नाहीत.
जेथे जेथे टाटांच्या कंपन्या आहेत, तेथील जवळपासची गावे टाटांनी दत्तक घेतली आहेत. आपल्या कामगारांच्या सर्वांगीण विकासाची, आरोग्याची काळजी त्यांनी नेहमीच घेतली आहे. कामगारांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली आहे. देशात आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी टाटा समूहाने आर्थिक मदतीबरोबरच आपले कुशल मनुष्यबळ, साधनसामुग्री पुरवून देशाप्रती असलेली आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे.
( क्रमशः पुढील भाग बुधवारी )
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०७/०३/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा