मुख्य सामग्रीवर वगळा

भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग तीन )

 उगवतीचे रंग

विश्वास देशपांडे, चाळीसगाव
भारतरत्नावली
द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग तीन )

आर डी आणि जे आर डी या बापलेकांचं कर्तृत्व समजून घेण्याआधी आपण एम्प्रेस मिल जी जमशेटजींनी नागपुरात सुरु केली आणि मुंबईत सुरु केलेलं ताज हॉटेल यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. खूप रोचक आणि आपल्या टाटांबद्दलच्या माहितीत ती भर टाकणारी ठरेल. त्यावरून जमशेटजींची दूरदृष्टी कळेल आणि एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर टाटांचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो हेही समजून घेता येईल.

एम्प्रेस मिल सुरु झाली ती १८७४ मध्ये. आपल्याला माहिती असेल की याच सुमारास युरोपिअन देशात नुकतीच औद्योगिक क्रांती झाली होती. इंग्लंड ही त्यावेळी जगाच्या कापडउद्योगाची राजधानी होती. अशा वेळी जमशेटजींनी इंग्लंडमधील कापडनिर्मिती करणारे माग पाहिले. पण ते त्यांना तितकेसे आवडले नाहीत. त्यापेक्षाही सुधारित माग आपल्याला पाहिजेत असे त्यांना वाटले. तपासाअंती अमेरिकेत अशा गिरण्या आणि असे सुधारित माग आहेत हे त्यांना कळले. त्यांनी तिथून दोन माग एम्प्रेस मिलसाठी मागवले आणि एम्प्रेस मिल दिमाखात सुरु झाली.

त्या काळी विदर्भात लोकांना गिरणीत किंवा ऑफिसात नियमितपणे काम करण्याची सवय अंगी बाणलेली नव्हती. ते खूप सुट्या घेत असत. जमशेटजी आपल्या मिलमध्ये काम करणाऱ्या अशा लोकांना रागावले नाहीत किंवा त्यांच्या कामातून पैसेही कापून घेतले नाहीत. त्यांनी कामगारांच्या भविष्यासाठी भविष्य निर्वाह निधीची कल्पना जन्माला घातली. भविष्य निर्वाह निधीची कल्पना ही टाटांची देणगी आहे. त्यावेळी ही कल्पना इंग्लंडमध्ये सुद्धा नव्हती. याशिवाय जमशेटजींनी कामगारांचे वार्षिक स्नेहसंमेलन, चांगल्या कामगारांना बक्षीस देणे इ प्रथा सुरु केल्या. त्यामुळे कामावर असणारी कामगारांची गैरहजेरी आपोआप कमी झाली शिवाय सुट्या घेण्याचे प्रमाणही कमी झाले.

ताज हॉटेल ही सुद्धा टाटांची अतिशय आगळीवेगळी अशी निर्मिती आहे. ताज हॉटेल बांधून टाटांनी मुंबईच्या सौंदर्यात भर तर घातलीच पण भारतीयांना अभिमान वाटेल अशा हॉटेलची निर्मिती केली. त्यामागे अशी कथा सांगितली जाते की एकदा जमशेटजी टाटा आपल्याकडील परदेशी पाहुण्यांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया जवळील वॅटसन हॉटेलात घेऊन गेले. त्या हॉटेलात त्याकाळी फक्त परदेशी पाहुण्यांनाच प्रवेश दिला जात असे. त्यामुळे गेटवरील सुरक्षारक्षकाने जमशेटजींना आत सोडण्यास नकार दिला. त्या वेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या परदेशी पाहुण्यांनाही अगदी ओशाळल्यासारखे सारखे झाले आणि ते जमशेटजींची माफी मागू लागले. तेव्हा जमशेटजी म्हणाले, ' मी याच हॉटेलशेजारी असे एक हॉटेल बांधीन की तुमचे सारे परदेशी पाहुणे माझ्याच हॉटेलात वास्तव्यास येतील.

आणि खरोखरीच झालेही तसेच. हे हॉटेल म्हणजे जमशेटजींच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक होते. जमशेटजींनी स्वतः परदेशात फिरून त्यासाठी लागणाऱ्या बांधकामाचे साहित्य, टाईल्स, खांब, विजेचे दिवे, पंखे इ गोष्टी आणल्या. पॅरिसमधील आयफेल टॉवर जवळील प्रदर्शनातून खास प्रतीचे लोखंडी खांब आणले. हे खांब आज सुमारे १२० वर्षांनंतरही मेजवानीच्या दालनाचे छत भक्कमपणे तोलून धरत हॉटेलची शोभा वाढवत आहेत. ताज हॉटेलची रचना अशी होती की पाहुण्यांना त्यांच्या खोल्यातून समुद्रदर्शनाचा आनंद सहजपणे लुटता यावा. यासाठी ताजचे प्रवेशद्वार त्यांनी पाठीमागच्या बाजूला ठेवले होते. याशिवाय हॉटेलच्या सर्व खोल्यांमध्ये हवा खेळती राहील या दृष्टीने खोल्यांची उंची आणि रचना ठेवण्यात आली होती. ताज हॉटेलची निर्मिती झाल्यापासून परदेशी पाहुण्यांचे ते आकर्षणकेंद्र बनले.

ताज हॉटेल बरोबरच टाटा केमिकल्सची पण निर्मिती करण्यात आली . या कंपनीने पाश्चात्यांची केमिकल्स निर्मिती क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढली. या सगळ्या कंपन्या आणि उद्योग उभे करण्यासाठी जमशेटजी अहोरात्र मेहनत घेत होते. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. त्यांना खूपच अशक्तपणा जाणवू लागला. त्यांनी रतन दादाभाय उर्फ आर डीं ना बोलावून सांगितले की दोराब आणि तुम्ही आता एकत्रितपणे काम करा. आजपर्यंत मेहनतीने मी जे हे उद्योगविश्व उभे केले आहे, त्याची जबाबदारी सांभाळा. तुम्हाला जरी यात भर घालता आली नाही तरी अवनती होऊ देऊ नका. टाटांचे नाव खराब होऊ देऊ नका. '

पुढे पाश्चात्य देशांच्या दौऱ्यावर असताना अतिश्रमाने जामशेटजींची प्रकृती ढासळली. जर्मनीतील नोहाइम या ठिकाणी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. आता त्यांच्या मागे त्यांचे पोलाद प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, विश्व विद्यापीठ हे प्रकल्प पूर्ण करणे तसेच तीन कापडगिरण्या, ताज हॉटेल, टाटा केमिकल्स इ उद्योग सांभाळण्याची जबाबदारी दोराब आणि आर डी यांच्या शिरावर येऊन पडली. पण हे दोघेही अत्यंत कर्तृत्वान होते. त्यांनी जमशेटजींचा वारसा नुसताच पुढे चालवला नाही तर त्यात अनेक पटींनी भर घातली आणि टाटांचे नाव आणखी उज्वल केले. ( क्रमशः )
( पुढील भाग शुक्रवारी )

©️ विश्वास देशपांडे,चाळीसगाव
१०/०२/२०२१
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा )
दोराबजी टाटा 




















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...